चंद्र आहे साक्षीला! - भाग ४०

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग ४०

सगळ्यांना भेटून सानिका घरी आली तेव्हा आपल्याच विचारात होती. ती सगळ्यांशी बोलत असतानाच समीर तिकडून अचानक निघून गेल्यामुळे तिला त्याच्याशी बोलताच आलं नव्हतं आणि आता तिचा फोनपण उचलत नव्हता तो. 'समीर आधीच खूप कठीण जाणार आहे रे हे मला, प्लिज तू हे अजून कठीण नको ना करुस माझ्यासाठी' तिने मनातच विचार केला.

"सानू? लक्ष कुठेय? दोनदा विचारलं मी जेवायला वाढू का." आशाताईंनी आपल्या लेकीकडे बघत विचारलं. 

"हां? नाही नको. भूक नाहीये मला." सानिका आपल्या रूमकडे जात म्हणाली.

"सानू, इकडे ये. काय झालंय?" त्यांनी तिला जबरदस्ती आणून स्वतःच्या बाजूला बसवलं. आता सानिकावर दुसरी मोठी जबाबदारी होती. त्यांना सगळं सांगायची.

"आई, आत्ता दीक्षित सरांचा फोन आलेला. त्यांनी मला प्रमोशन दिलंय." तिने आधी त्यातल्या त्यात चांगल्या बातमीने सुरवात केली.

"काय सांगतेस काय सानू! किती गं हुषार माझी लेक. बघ मी तुला बोलले होते ना, तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळणार. उगाच एवढं टेन्शन घेतलंस आणि मला पण दिलंस. थांब मी देवासमोर साखर ठेऊन आले." म्हणून त्या लगबगीने उठून आत गेल्या. जाताना त्यांनी तिला मायेने जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. त्यांच्या स्पर्शाने तिला गहिवरून आलं.

"एवढी चांगली बातमी आहे आणि असं तोंड करून का सांगतेयस? केवढं टेन्शन आलं मला." त्या परत बाहेर आल्यावर म्हणाल्या.

"आई, ते.. सर म्हणत होते की मला पुढच्याच आठवड्यात परत जावं लागेल. माझी पुढची सुट्टी कॅन्सल केली आहे त्यांनी." तिने डोळ्यातलं पाणी अडवायचा प्रयत्न करत म्हंटलं. आशाताईंच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. पण त्यांनी स्वतःला सावरलं.

"अगं बाई हो का. म्हणजे अगदी लगेचच निघायचंय का तुला? मला वाटलं अजून थोडे दिवस असशील इकडे. तेवढीच मला कंपनी." त्या डोळ्याला पदर लावत म्हणाल्या. ते बघून सानिकाने त्यांना मिठी मारली. मगाचपासून तिने अडवून ठवलेलं डोळ्यातलं पाणी बाहेर आलंच. 

"ए वेडाबाई, अगं रडतेयस काय. इतकी छान बातमी  मिळाली आहे आज. मी आपलं सहज म्हंटलं. आईला काय मुलांचा सहवास हवाच असतो ना. तू अगदी वर्षभर राहिली असतीस इकडे तरी परत जाताना माझं मन हळहळलंच असतं. पण खूप खुश आहे हां मी. माझ्या लेकराचं स्वप्न पूर्ण होतंय ते बघून. मी बघितलंय ना तू ह्यासाठी किती कष्ट केले आहेस ते." त्या तिला समजावत म्हणाल्या . 

"आई, मी तुला खूप मिस करेन." सानिका हुंदके देत त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली. आशाताई आपल्या मनातलं वादळ लपवत आपल्या लेकीला शांत करत होत्या.

____****____

"हाय सानिका, काँग्रॅच्युलेशन्स!" दुसऱ्या दिवशी दुपारी शाळेतला क्लास संपवून घरी परत चाललेल्या सानिकाला कोणीतरी मागून आवाज दिला तसं तिने वळून बघितलं आणि तिच्या कपाळावर आठ्या आल्या.

"विश्वास? तू अजून इकडेच आहेस वाटतं. नोकरी वगैरे सोडली आहेस का?" तिने जरा वैतागूनच विचारलं. तिला आधी वाटलं समीर असेल पण त्याच्या जागी ह्याला बघून तिचा पुरता मूड गेला. तिने त्याला स्पष्ट नकार दिल्यानंतर सुध्दा तो तिच्या मागेच लागला होता. चौधरी काकूंनी त्याला तिचा नंबर पण दिला होता त्यामुळे त्याचे रोज येणारे शायरी अंदाजातले गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज डिलीट करायचं नवीन काम सानिकाला नियमित करावं लागत होतं.

"आता आपण एकत्रच जाऊ परत मुंबईला, पुढच्या आठवड्यात." तो तिच्याकडे बघून हसत म्हणाला. 'ही लतिका पण ना, जरा गप्प बसत नाही. ह्याला जाऊन सगळ्या बातम्या कशाला दिल्यात हिने. आता कळलं समीर तिच्यावर इतकं का चिडतो.' सानिकाने डोक्याला हात लावला.

"मी काय म्हणतो सानिका, तू पुन्हा एकदा आपल्याबद्दल विचार कर ना. मला माहितीये आपण एकमेकांना फार ओळखत नाही पण हरकत काय आहे ट्राय करून बघायला." तो तिला म्हणाला.

"हे बघ विश्वास, मला नाही वाटत ते शक्य आहे. मी तुला आधीच सांगितलंय मला ह्यात काही इंटरेस्ट नाहीये. सो प्लिज, लिव्ह मी अलोन!" म्हणून सानिका तिकडून जायला निघाली. तर तो चक्क गुढघ्यावर बसून तिचा हात पकडून तिला विनवण्या करायला लागला.

"सानिका प्लिज, हवं तर आपण फक्त मैत्री ठेऊ, बाकी मला काहीच नको. आणि मग तुला वाटलं तर तू माझ्याशी लग्न कर. प्लिज, फक्त मैत्री करायला तरी हो म्हण." भर गावातल्या रस्त्यात त्याला हे करताना बघून सानिकाचं डोकं पुरतं सटकलं. पण तिला आता शेवटच्या दिवसांमध्ये काही तमाशा नव्हता करायचा म्हणून ती शक्य तेवढी शांत राहून बोलत होती.

"विश्वास, हा मूर्खपणा बंद कर अँड स्टॉप ऍक्टिंग लाईक अ किड! मला हि फालतुगिरी अजिबात आवडत नाही." सानिका आजूबाजूला बघत म्हणाली. जाणारी येणारी लोकं त्यांच्याकडे बघून हसत होती.

"नाही तू माझी मैत्री स्वीकारत नाहीस तोपर्यंत मी उठणारंच नाही." विश्वास हट्टाला पेटला होता. सानिकाने मनातल्या मनात चौधरीकाकूंना चार शिव्या घातल्या, कशाला ह्याला माझ्या राशीला आणलंय कळत नाही.

"ओके, फक्त मैत्रीचा विचार करेन मी. आणि तेही तू हे मूर्खासारखं वागणं बंद करावंसं म्हणून. ऊठ आता. " ती म्हणाली तसा तो खुश होऊन उठला. 

"ओ काका, बघताय काय, हो म्हणाली ती." तो वेड्यासारखा आजूबाजूने जाणाऱ्या लोकांना सांगत होता. 

"शट अप विश्वास, फक्त मैत्रीचा विचार करायला हो म्हंटलं आहे मी." सानिका तणतणत तिकडून निघाली.

____****____

समीरचं कालपासून काय बिनसलंय ते वनिताताईंना कळतंच नव्हतं. आल्यापासुन त्याची चिडचिड चालू होती. धड जेवलाही नव्हता तो कालपासुन. त्यांनी विचारल्यावरही काही उत्तर दिलं नव्हतं त्याने.

"अहो, तुम्ही जरा बोलता का त्याच्याशी. काल सकाळी तर बरा होता, मग अचानक काय झालं?" त्या वसंतरावांना म्हणाल्या.

"असेल काहीतरी. तरुण मुलांचे काय ते मूड स्विंग्स असतात म्हणे. आमच्या वेळेला नव्हतं असं काही. असं वागलं वडीलच कानाखाली हात स्विंग करायचे. ह्यांना कोण बोलणार पण आता. आजकाल वडीलच घाबरून असतात मुलांना. तू टेन्शन घेऊ नकोस. होईल नॉर्मल थोड्यावेळाने. मी बोलून काय होणार आहे." ते म्हणाले.

वनिताताई पुढे काही बोलणार त्यात त्यांची नजर गेटमधून आत शिरत असलेल्या लतिकाकडे गेली. "झालं, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. ही कशाला आलीये इकडे." वैतागतच त्या तिच्यापाशी गेल्या.

"काकू, नमस्कार करते." लतिकाने वाकून नमस्कार केला.

"अगं अगं, हे कशाला. ठीक आहे. काही काम होतं का?" त्यांनी विचारलं.

"हो तुम्हाला सगळ्यांना एक मस्त बातमी द्यायला आलेय. सॅमी कुठेय." तिने विचारायला आणि समीरने घरातून बाहेर यायला एकच वेळ आली. त्याने त्रासुनच तिच्याकडे बघितलं.  

"हाय सॅमी, तुला कळलं का? आपल्या सानिकाचं लग्न ठरलं." लतिका म्हणाली. समीरच्या हातातला पाण्याचा ग्लास खणखणss करत समोर पडला. वनिताताई तोंड उघडं ठेऊन तिच्याकडे बघतंच राहिल्या.

"व्हॉटsss? तू काय बोलतेयस कळतंय का तुला?" समीर चिडून तिच्यादिशेने चालत आला.  वनिताताईंना टेन्शनच आलं होतं. आधीच ह्याचं डोकं फिरलंय, त्यात ही काहीही बोलतेय.

"हो सॅमी, हे बघ ना. किती रोमँटिक ना. तो विश्वास आहे ना त्याने तिला सगळ्या गावासमोर गुढघ्यावर बसून प्रपोज केलं मग ती हो म्हणणारच ना. काश मलापण कोणीतरी असं प्रपोज केलं असतं." लतिका तिच्या फोनवरचा फोटो त्याच्यासमोर नाचवत म्हणाली. समीरने तिच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघत तिच्या हातातला फोन हिसकावून घेतला. त्याच्या सानिकाचा हात पकडून तो विश्वास तिच्यासमोर खाली बसला होता. आणि सानिका? ती त्याला हो म्हणाली होती? तेवढ्यात वनिताताईंचा पण फोन वाजला, त्यांच्या भजनी मंडळाच्या व्हाट्सअप ग्रुपवरही तोच फोटो आला होता आणि त्या खाली घुलेकाकूंच्या स्माइलीज होत्या. 

"तुला काय माहिती गं ती हो बोलली की नाही? ह्यानेच काहीतरी बावळटपणा केला असेल." समीर लतिकावर उखडला. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात वनिताताईंनी त्याला त्यांचा फोन दाखवला. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. 

"सानिका खरंच.." त्याचे पुढचे शब्द नव्याने त्याच्या गळ्यात आलेल्या आवंढ्यात विरून गेले. 

"समीर.." नुकत्याच त्यांच्या वाड्यात शिरलेल्या सानिकाने त्याला हाक मारली. वनिताताईंनी तिच्याकडे बघितलं. पण समीर? तो तिच्याकडे पाठ फिरवून तिकडून निघत होता.

"समीर, थांब. काय चालू आहे तुझं? कधीपासून तुला कॉल करतेय मी. तुझ्याशी बोलायचंय मला." सानिका त्याच्याबाजूला उभ्या असलेल्या लतिकाकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली. 'ही आहेच का इकडे. तिकडे हिची आई माझ्या डोक्यावर बसलीये आणि इकडे ही माझ्या समीरच्या.' 

"काय बोलायचंय? लग्नाचं आमंत्रण द्यायला आलीयेस का?" समीरने उपरोधाने विचारलं.

"काय? कोणाचं लग्न?" सानिका गोंधळली होती. समीर काहीच बोलला नाही." समीर?" तिने त्याला हाताला धरून स्वतःकडे वळवलं.

"विश्वास आणि तुझं लग्न. त्यालाच हो म्हणाली आहेस ना आज?" समीरने तिच्याकडे बघत रागाने विचारलं.

"व्हॉटsss? कशाबद्दल बोलतोयस समीर?" सानिकाला अजूनही काही कळत नव्हतं.

"ह्याच्याबद्दल बोलतोय मी. तूच आहेस ना ही? गावाच्या चौकात हे असलं काहीतरी झाल्यावर गावात कोणाला कळणार नाही असं वाटत होतं का तुला?" सानिका सामोरच्या फोटोकडे आ वासून पाहात होती. इतक्या कमी वेळात कोणीतरी त्यांचा फोटोकाढून तो गावभर पसरवलाही होता.

"समीर काहीतरी गैरसमज होतोय तुझा. मी.." सानिका काही बोलायच्या आधीच समीरने चिडून तिच्या दोन्ही दंडाना धरून स्वतःकडे ओढलं. 

"गैरसमज माझा झाला होता आत्तापर्यंत. तुझ्या मोकळ्या वागण्याला प्रेम समजून बसलो मी. पण तुला कशाची काही पडलीच नाहीये. मी विचारलेल्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर अजून इतके दिवसांनी दिलं नाहीयेस आणि ह्याला एका क्षणात हो म्हणून मोकळी झालीस तू? असं कसं वागू शकतेस तू माझ्याशी?" समीरच्या चेहऱ्यावरचा राग बघून सानिका पण घाबरली होती. त्याला एवढं चिडलेलं तिने कधीच पाहिलं नव्हतं. 

"समीर.. यु आर हर्टींग मी!" ती कशीबशी तिचा हात त्याच्या पकडीतून सोडवायचा प्रयत्न करत म्हणाली.

वनिताताई पण पटकन पुढे आल्या,"समीर सोड तिला. तिला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घे."

"आणि तू दुसर्यांना हर्ट करतेस त्याचं काय सानिका? खरंच इतकं सोप्पं होतं का तुझ्यासाठी? तू पुढच्याच आठवड्यात मुंबईला जाणार आहेस हे कसंबसं पचवत होतो मी आणि आता हे? हेच करायचं होतं तर इतके दिवस मला कशाला वाट बघायला लावलीस." समीरने तिचे हात सोडून दिले. त्याच्या शब्दांनी खूप दुखावली होती ती आणि तेही तिची काहीच चूक नसताना.

"मी नव्हतं सांगितलं माझी वाट बघायला. तू स्वतःच्या मर्जीनेच बघत होतास ना?" तिचाही पारा आता चढला होता. रागाच्या भरात तिच्या तोंडून निघून गेलेल्या शब्दांचा आता पश्चात्ताप होत होता तिला. तिच्या वागण्याबोलण्यातून तिने त्याला कायमच तिच्या मनातल्या भावनांची जाणीव करून दिली होती. आणि मुंबईला झालेला प्रसंग तिला आठवत नसला तरी तो घडला होता हेच सत्य होतं. तिच्या प्रेमाची कबुली दिली होती तिने त्याच्यासमोर. मग त्याने तिची वाट बघणं साहजिकच होतं. 

"हो का? मग मुंबईमध्ये तू मला.." समीर बोलता बोलता एकदम गप्प बसला. त्याने आजूबाजूला बघितलं. हे बोलायची ही वेळही नव्हती आणि जागाही.

"माझं काही ऐकून न घेताच तू मला व्हिलन ठरवून मोकळा झालायस समीर. इथे मी तुझ्याशी आपल्याबद्दल बोलायला आले होते. पण आता वाटतंय बरं झालं काही बोलले नाही ते." सानिका हताश होऊन म्हणाली. ती इथून जायच्या आधीच त्यांच्यातली भांडणं चालू झाली होती. मग ती परत गेल्यावर काय होणार होतं? तिच्या मनातली भीती खरी ठरत होती.

"काय ऐकायचं आहे अजून? सगळं डोळ्यासमोर आहे सानिका. गावात सगळीकडे तुमच्या रोमँटिक प्रपोजलची बोलणी चालू आहेत." तो म्हणाला. त्या दोघांना तसं भांडताना बघून वनिताताईंचा जीव तुटत होता. त्यांना बघून एक गोष्ट तर स्पष्ट झाली होती, दोघं एकमेकांमध्ये गुंतले होते. पण आता हा काहीतरी नवीन गोंधळ होऊन बसला होता.

"मी काय म्हणते, आपण जरा आत बसून शांतपणे बोलूया का? असं आरडाओरडा करून काय होणार आहे. सानिका, ये तू आत." वनिताताई तिला घेऊन निघाल्या पण समीर तिकडेच थांबला होता.

"आई, मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. मला प्लिज एकटं सोडा." दोन बोटं कपाळावर फिरवत तो म्हणाला. 

"ठीक आहे, नको बोलूस. खऱ्या खोट्याची शाहनिशा न करता चिडून बस माझ्यावर. उरलेला आठवडा पण ह्यातच घालवू आपण. ओके? त्यानंतर मी इकडे नसणार आहे समीर. हे सगळे गैरसमज दूर करणं खूप अवघड होऊन बसेल मग." सानिका डोळ्यांत पाणी आणून त्याला समजवायचा प्रयत्न करत होती. तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. एरवी एवढा समजूतदार आणि समंजस असणारा समीर अचानक असा का वागतोय तेच तिला समजत नव्हतं. तिने हताश होऊन वनिताताईंकडे पाहिलं. त्यांनी डोळ्यांनीच तिला 'सगळं नीट होईल' अशी खूण केली. 

"समीर.." ती काही बोलणार तेवढ्यात वाड्याच्या फाटकातून गौतमी धावत आली. सगळ्यांनी तिच्या दिशेने बघितलं.

"लवकर.. लवकर गावाच्या चौकात चला. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय." तिने धापा टाकत सांगितलं.

क्रमशः!

🎭 Series Post

View all