
सकाळी कोणीतरी दरवाजावर जोरजोरात थापा मारत होतं. त्यानेच सानिकाची झोप मोडली. डोळे किलकिले करत तिने घड्याळात वेळ बघितली आणि ती ताडकन उठून बसली. पावणे आठ! 'एवढा वेळ कशी झोप लागली मला. आणि माझा गजर कसा नाही वाजला. आता वेळेत ऑफिसला पोहोचणं अशक्य आहे.' ती उठून पटापट यावरून वीस मिनिटांत घराबाहेर पडली. निघायला उशीर झाल्यामुळे तिचा नेहमीचा टिपटॉप मेकअप करायला तिला आज वेळ मिळाला नाही. जेमतेम तोंडावर पावडरचा पफ टेकवून आणि हाताला मिळेल ती लिपस्टिक लावून ती घराबाहेर पडली. नशिबाने तिला ट्राफिक कमी लागलं त्यामुळे ती साडे-आठ पर्यंत ऑफिसला पोहोचली. केसांवरून हात फिरवत ती मीटिंग रूममध्ये शिरली, "आय एम सॉरी. मला यायला जरा उशीरच झाला." म्हणून सानिकाने समोर बघितलं आणि ती दारातच थबकली. आत रश्मी एकटीच बसली होती.
'हे काय? बाकीचे सगळे कुठे आहेत?' तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं.
'त्यांना थोडा उशीर होणार आहे मॅडम. सुप्रियाला मुलीला शाळेत सोडून यायचंय, सागर त्याच्या बायकोला डॉक्टरांकडे नेऊन मग येणार आहे. आणि बाकीच्यांनी तुमचा ईमेल सकाळी वाचला असेल त्यामुळे त्यांना लवकर यायला जमलं नसेल.' रश्मी म्हणाली. सानिकाने काहीतरी बोलायला तोंड उघडलं पण तिचे शब्द आतच राहिले. जमेल तेवढ्या गोष्टी रश्मीला करायला सांगून ती मीटिंग रूममधून बाहेर पडली. 'एवढा बेजबाबदारपणा? मी ह्यांना एक दिवस एक तास लवकर यायला सांगितलं तेही ह्यांना जमलं नाही? घरची कामं एवढी महत्वाची आहेत तर नोकरी करतात कशाला.' सानिकाची चिडचिड होत होती. त्यातच तिला समोरून वाळींबे येताना दिसले. त्यांना बघून तिने पटकन तिची वाट बदलायचा प्रयत्न केला पण तोपर्यँत उशीर झाला होता. वाळिंबेनी तिला पाहिलं होतं आणि आपल्या विरळ होत चाललेल्या केसांवरून हात फिरवत ते तिच्या दिशेनेच येत होते.
"अहो भाग्यम, आज चक्क पाध्ये मॅडमच दर्शन झालं आम्हाला सकाळी सकाळी." आपल्या सुटलेल्या पोटावरून खाली घसरणारी पॅन्ट वर करत ते म्हणाली. चेहऱ्यावरची फ्रेंच कट दाढी ते आज ट्रिम करून आले होते. ओठांवरच्या दाट मिशीखाली त्यांचं काहीसं छदमी हास्य सानिकाला दिसलं.
"तुमचं कुठे माझंच नशीब म्हणायचं. काय वाळिंबे कसे आहात? बरेच दिवसात दिसला नाहीत. ऑफिसमध्ये नव्हतात वाटतं." सानिकाने कपाळावरच्या आठ्या लपवायचा प्रयत्न करत विचारलं.
"अहो ऑफिसमध्ये नाही तर अजून कुठे असणार मी? पण जरा कामात व्यस्त होतो. आजच्या प्रेझेन्टेशनची तयारी करत होतो. फार महत्वाचा क्लायंट आहेत मि. मेहता. एकदा का ह्यांचं डील मिळालं माझ्या टीमला की ह्या वर्षीचं प्रमोशन आणि बोनस पक्का. बायकोला रिअल डायमंड चा नेकलेस हवा आहे ह्या वर्षी. " वाळिंबे म्हणाले.
"अरे वाह, चांगलंय की. आणि तुमच्याकडे काय कमी आहे पैश्यांची. एक काय दहा नेकलेस घेता येतील तुम्हाला आत्ता." सानिका घड्याळाकडे बघत म्हणाली.
"काहीही तुमचं. अहो आमच्या सारख्या संसारी माणसांना खर्च असतात. मुलांची शिक्षणं ,घरखर्च. तुम्हाला कुठे कळणार म्हणा. असो, ऑल द बेस्ट तुम्हाला. आजच्या मिटिंगसाठी." बोलताना सानिकाला टोमणा मारत वाळिंबे म्हणाले आणि आपल्या केबिनच्या दिशेने निघाले.
वाळिंबे सानिकाला आठ वर्ष सिनिअर होते. पण सानिकाच्या महत्वाकांक्षी स्वभावामुळे तिने खूप कमी वेळात कंपनीमध्ये तिचं स्थान निर्माण केलं होतं. आता वाळिंबेंबरोबर तिची कामासाठी आणि प्रमोशनसाठी चुरस होती. अनुभवाने सिनिअर आणि पुरुष असल्यामुळे त्यांना सगळं सहजासहजी मिळतं आणि सानिकावर अन्याय होतो असं तिला कायम वाटायचं. वाळिंबेंचे इंडस्ट्रीमध्ये बरेच कॉन्टॅक्टस होते. कोणताही नवीन क्लायंट वाळिंबेना प्राधान्य द्यायचा. आणि सानिकाला मात्र छोटी छोटी अकाउंट्स सांभाळायला मिळायची. पण त्यातही तिने आपल्या कौशल्याने आणि स्टॉक मार्केटच्या अभ्यासाने त्या क्लायंटस ना त्यांच्या छोट्या गुंतवणुकीवर पण भरपूर रिटर्न्स मिळवून दिले होते. त्यामुळे तिचे सध्याचे क्लायंटस तिला सोडून दुसऱ्या कोणाकडे जाणं शक्यंच नव्हतं. पण सानिकाला आता तिच्या कामाचा आवाका वाढवायचा होता. त्यासाठी कंपनीमधले काही महत्वाचे क्लायंटस स्वतःकडे वळवायची तिची धडपड चालू होती. आज अशाच एका महत्वाच्या क्लायंट बरोबर तिची मिटिंग होती..मि. मेहता. त्यासाठी गेले कितीतरी दिवस ती अविरत झटत होती. ह्या नवीन क्लायंटला किती पैसे गुंतवायचे आहेत, कशात गुंतवायचे आहेत, त्यातून त्यांना किती फायदा मिळू शकेल, बाकीच्या लोकांपेक्षा सानिकाचं गुंतवणूकीचं धोरण कसं चांगलं आहे ह्या सगळ्याचा सपशेल अभ्यास तिने केला होता. आज तिला तेच प्रभावीपणे मि. मेहता आणि त्यांच्या टीमसमोर मांडायचं होतं. सानिकाकडे सगळी छोटी अकाउंट्स सांभाळायला असल्यामुळे तिच्या टीमला मोठ्या क्लायंटसमोर प्रेझेन्टेशन करायचा अनुभव नव्हता. त्यामुळेच त्यांची धांदल उडाली होती.
बघता बघता मीटिंगची वेळ जवळ आली. सगळे रूममध्ये एकत्र बसले होते. वाळिंबेंच्या टीमने प्रेझेंटेशन दिलं. त्यावर मि.मेहता एकदम खुश झाले. सानिकाचं टेन्शन वाढत होतं. आयुष्यात पहिल्यांदाच ती एवढी अस्वस्थ झाली होती. आपण ह्या मीटिंगसाठी पुरेसे तयार नाही आहोत असं तिला वाटत होतं. त्या द्विधा मनस्थितीमध्येच ती समोर गेली आणि तिने प्रेझेंटेशन सुरु केलं. स्क्रीनकडे बघता क्षणीच सानिकाला कळलं की तिने सांगितलेले बदल अजून झालेच नाहीयेत. तिला स्क्रीनच्या एवढ्या जवळ उभं राहूनही लिहिलेलं नीट वाचता येत नव्हतं. तिच्या हाताच्या तळव्यांना घाम फुटला. तिने कसंबसं चेहऱ्यावरचं हास्य टिकवून ठेवलं. ती तिचा प्लॅन, बजेट सगळं नीट समजावून सांगत होती. ती बोलत असतानाच सागरने बजेटच्या फाईल्स सगळ्यांच्या समोर ठेवल्या. त्यातले नंबर्स बघून मि. मेहेतांनी त्यांच्या टीमकडे बघितलं. त्यांच्या नजरांनी सानिका अस्वस्थ होत होती. त्यांच्या मनात काय चाललंय ते तिला कळत नव्हतं.
"मि. मेहता, मी तुम्हाला सांगितलेला प्लॅन तुम्ही आम्हाला दिलेल्या माहितीवरून बनवला आहे. पण एकदा आपण हे डील फायनल केलं की मला तुमच्याकडून अजून थोडी माहिती घ्यायला आवडेल. त्याने तुम्हाला अधिकाधिक फायदा करून द्यायला आम्हाला मदत होईल." सानिका सारवा सारव करत म्हणाली. मि. मेहता अजूनही त्यांच्या समोरच्या फाईल्समध्ये बुडाले होते. पाच मिनिटं कोणीच काही बोललं नाही. शेवटी मि. मेहतांनी फाईल मधून डोकं बाहेर काढलं आणि त्यांनी फाईल बंद केली. त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून एव्हाना सानिकाला त्यांच्या निर्णयाची कल्पना आली होती.
"मिस. सानिका, तुमचा प्लॅन चांगलाच आहे पण ह्यातले नंबर्स मला जरा चुकीचे वाटतायत. तुम्ही हे सगळे स्वतः डोळ्याखालून घातले आहे का? मि. वाळिंबे ऑफर करतायेत त्यापेक्षा तुमचा प्रॉफिट खूपच कमी आहे. परत तुमच्या एकंदरीत अनुभवावरून तुम्हाला एवढी मोठी गुंतवणूक सांभाळायचा अनुभव आहे असं वाटत नाही. म्हणूनच मी वाळिंबेंची ऑफर घ्यायचं ठरवलं आहे. आय एम सॉरी!" म्हणून मि. मेहता जायला निघाले. सानिका मान खाली घालून उभी होती. हातातून निघून चाललेली संधी थांबवण्याचा कोणताच मार्ग तिला सुचत नव्हता. मि. मेहता आणि त्यांची टीम रूममधून बाहेर पडल्यावर सानिका रिकाम्या खुर्च्यांकडे बघत उभी होती. सागर, रश्मी, सुप्रिया आणि तिची बाकीची टीमही तिच्यासमोर उभी होती.
"मॅडम, तुम्ही.." रश्मी काही बोलणार तितक्यात सानिकाने हातानेच तिला गप्प बसायची खूण केली आणि रश्मीचा चेहरा पडला.
"आता कशाला थांबला आहात इकडे? मिटिंग संपली आहे. आपल्याला डील मिळालं नाहीये. तुमच्यासाठी आनंदाची गोष्टच आहे. लवकर घरी जाता येईल आता. रोज ऑफिसमध्ये थांबायला नको. ते तुम्ही तसेही थांबत नव्हतातच म्हणा. मग आता माझ्या तोंडाकडे बघत का उभे आहात?" सानिकाने विचारलं. तिचा आवाज रागाने थरथरत होता.
"सॉरी मॅडम, वाईट आम्हाला सगळ्यांनाच वाटलंय. पण शेवटी डील आपल्या कंपनीलाच मिळालं आहे ना? वाळिंबे सरांच्या टीमला मिळालं म्हणून काय झालं." सागर चाचरत म्हणाला.
"हो का? आता तू मला न मिळालेल्या यशात समाधानी कसं राहायचं हे शिकवणार आहेस का? त्यापेक्षा तुम्ही तुमची कामं नीट करण्याकडे लक्ष द्या. माझे अर्ध्याहून अधिक प्रॉब्लेम्स त्यानेच दूर होतील. एवढ्या महत्वाच्या मीटिंगमध्ये तुम्ही चुकीचे नंबर्स कसे दाखवू शकता? आणि हे .. हे तुमचं प्रेझेन्टेशन? काल हजारवेळा सांगूनही अजून ह्याची साईझ वाढवली नाहीच आहे तुम्ही. कोणाला वाचता येतंय का हे?" एक फाईल हातात हलवत सानिकाने विचारलं. सगळे शांत उभे होते.
"नाही चूक माझीच आहे. तुमच्याकडून मी काहीही अपेक्षा ठेवल्या हेच चुकलं माझं. दिवस पुढे ढकलायचे, घर चालवता येईल एवढे पैसे कमवायचे आणि त्यात खुश राहायचं. जिद्द, महत्वाकांक्षा याच्याशी तुमचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. मग कशाला तुम्ही जीव ओतून काम कराल. माझ्याच वाटेला अशी टीम मुद्दामूनच दिली आहे दीक्षित सरांनी. त्या वाळिंबेना आता माझ्या नाकावर टिच्चून बोलायला कारणच मिळेल. तुमच्या सगळ्यांच्या चुकांचे परिणाम मला भोगायला लागतात. आणि काय रे सागर तू काय म्हणालास? प्रोजेक्ट वाळिंबेंच्या टीमला मिळालं म्हणून काय झालं? तुमच्या सगळ्यांचा पगार त्यांनी कंपनीला मिळवून दिलेल्या प्रॉफिटमधून येतो असं वाटतं का तुम्हाला? उद्या आपल्याकडे पुरेसे क्लायंटस नाहीत म्हणून लोकांना काढायला सांगितलं तर तेव्हा पण तत्वज्ञान शिकवशील का तू?" सानिकाचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिची पूर्ण टीम हतबल होऊन समोर उभी होती.
"तुम्ही सगळे युजलेस आहात. आत्ताच्या आत्ता.." सानिकाचं वाक्य अर्धवटच राहिलं.
"मिस. सानिका.." इतकावेळ दारात शांतपणे उभे राहून सानिकाचा उद्वेग बघत असलेले दीक्षित सर कडाडले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.
"आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये या. मला तुमच्याशी बोलायचंय." म्हणून दीक्षित सर तिकडून निघून गेले. सानिकाने तिच्या टीमकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती सरांच्या पाठोपाठ निघाली.