चंद्र आहे साक्षीला! - भाग ३६

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग ३६

(मागच्या भागात :

निमकरवर ओरडायला समीरने तोंड उघडलं पण त्याआधीच तिकडे उभ्या सगळ्यांना कापरं भरेल असा भारदस्त आवाज त्या छोट्याश्या घरात घुमला 

"निमकरsss! बास! सानिकाबद्दल अजून एक शब्द बोललास तर परिणाम खूप वाईट होतील!")

सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या. इतका वेळ शांतपणे मागे उभे असलेले समीरचे वडील, वसंतराव वैद्य एक एक पाऊल टाकत पुढे येत होते तशी त्यांच्यासमोरची माणसं बाजूला होत होती. सानिकाच्या बाजूला उभे राहात ते डायरेक्ट निमकरच्या नजरलेला नजर मिळवून उभे  होते. निमकर पण जरा घाबरलाच होता. त्याच्या बाजूला उभा असलेला समीरपण आश्चर्याने बघत होता. त्याने खूप कमीवेळा त्यांना एवढं चिडलेलं बघितलं होतं. त्यांच्या आवाजाने क्षणभर तोही हडबडला.

"तुझी लायकी नाहीये सानिकासारख्या मुलीचं नाव तुझ्या ह्या घाणेरड्या तोंडातून घ्यायची. काय भाषा आहे ही एका मुलीशी बोलायची?" वसंतराव त्याच्यावर गरजले. निमकरची आता चांगलीच तंतरली होती. इतकावेळ आपण काहीही बोलू आणि सगळे ऐकून घेतील ह्या भ्रमात असलेल्या त्याची सगळी दारू वसंतरावांच्या एका वाक्यात उतरली. वसंतरावांचा सहा फूट उंचीचा आणि आखाड्यात कमावलेला देह, रागाने लाल झालेले डोळे आपल्या इतक्याजवळ बघून त्याला घाम फुटायला लागला होता. पण तरीही कुत्र्याची शेपूट ती, इतक्या सहज थोडीच सरळ होणार. 

"ओ, तुम्हाला काय करायचंय. मी हिच्याशी बोलतोय ना?" तो कुठूनतरी उसनं अवसान आणून म्हणाला. 

"माझ्या उपस्थितीत कोणत्याही मुलीची अशी बदनामी मी सहन करणार नाही. आणि कणवली मध्ये तर नाहीच नाही. सानिकासारख्या मुली ह्या गावातल्या बाकीच्या मुलींसाठी आदर्श आहेत. स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं विश्व उभं करणं सगळ्यांनाच जमत नाही. स्वतःकडेच बघ एकदा. जे तुला ह्या वयात जमलं नाहीये ते तिने तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाची असताना करून दाखवलंय. तू कोणत्या तोंडाने तिची लायकी काढतोयस?" वसंतरावांनी एक पाऊल पुढे टाकलं तसा निमकर मागे गेला. समीरने त्याची बखोटी कधीच सोडून दिली होती. जा म्हंटलं तरी पुढे गेला नसता आता तो वसंतरावांकडे बघून.

"ह्यापुढे जर मला कळलं की तू तुझ्या घरात कोणालाही मारहाण केली आहेस तर देवाशप्पथ सांगतो, माझी सगळी कनेक्शन्स वापरून तुला जास्तीत जास्त वर्षांची जेल होईल ह्याची सोय मी स्वतः करेन. ज्या मुलीला घरच्या लक्ष्मीसारखं वागवलं पाहिजे, आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, तिला तू असं झाडूने मारतोयस?" त्यांची नजर अजूनही निमकरवरून हलली नव्हती. "राहिला प्रश्न सानिकाचा, तर आत्ताच्या आत्ता सगळ्या गावासमोर तिची माफी माग. नाहीतर तू आहेस आणि मी आहे." 

काय बिशाद होती निमकरची त्यांचा शब्द खाली पडू द्यायची, "सॉरी" तो हळू आवाजत पुटपुटला.

"मोठयानेssss!" वसंतराव गरजले. त्यांच्या आवाजाने सानिकापण दचकली.

"सॉरी सॉरी, मला माफ कर. मी असं बोलायला नको होतं." निमकर जवळपास पायाच पडला होता तिच्या. सानिकानेही फार न ताणता त्याला माफ करून टाकलं. भरल्या डोळ्यांनी तिने वसंतरावांकडे बघितलं. आजपर्यंत ह्या जगात तिच्या आईशिवाय कोणीच तिच्यासाठी असं खंबीरपणे उभं राहिलं नव्हतं. "थँक यु!" ती गळ्यात आलेला आवंढा गिळत म्हणाली. त्यांनी हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला. 

"चला, शो संपला आहे, आपणही सगळे निघूया." वसंतरावांनी जमलेल्या बाकीच्यांकडे बघून म्हंटलं. हळूहळू गर्दी पांगली. आशाताई सानिकाला घेऊन बाहेर आल्या. झाल्या प्रकारानंतर ती अजूनही बिथरलीच होती. काही न बोलता मान खाली घालून चालत होती. एखाद्या पराजित योध्यासारखी. त्यांच्या मागोमाग समीर पण बाहेर आला. तिला तसं कोमेजलेलं बघून जीव तुटत होता त्याचा. पण एवढ्या लोकांसमोर त्याला तिच्याजवळही जाता येत नव्हतं. 

"आशा, मी काय म्हणते तुम्ही दोघी थोडावेळ आमच्याकडेच चला. जेऊन वगैरे दुपारी जा घरी. आणि मी नाही ऐकणार नाहीये हां. तसंही सानिकाचं मागच्या वेळी जेवण राहिलंच आहे की." वनिताताई म्हणाल्या. समीरचा चेहरा खुलला, 'आयडे, आय लव्ह यु' तो मनातच म्हणाला. आशाताईंना खरंतर कळत नव्हतं काय करावं पण लाडक्या मैत्रिणींसमोर त्यांचं पण फार काही चाललं नाही. शेवटी त्या हो म्हणाल्या. 

____****____

आशाताई आणि वनिताताई स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत असताना सानिका अंगणात झोपाळ्यावर बसली होती. घरी आल्यापासून ती फार काहीच बोलली नव्हती. तिला एकटं बसलेलं बघून समीर तिच्याबाजूला जाऊन बसला. अलगद त्याने त्याचा हात तिच्या हातावर ठेवला,"आर यु ओके?" त्याच्या आर्जवी स्वराने तिला पुन्हा भरून आलं. तिने नुसतीच मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा स्माईल बघण्यासाठी आसुसला होता तो. पण झालेला प्रकार इतका सहजासहजी विसरणं सोप्प नव्हतं तिच्यासाठी हे कळत होतं त्याला.

"सानू, मला माहितीये, हे बोलणं सोप्पं आहे, पण प्लिज एवढा विचार नको करुस. त्या निमकरसारख्या माणसाचा तर अजिबात नाही. अगदीच विचार करायचा असेल तर पिहूचा कर. आज तू नसतीस तर काय झालं असतं तिचं? किती छान सांभाळून घेतलंस तू. स्वतःच्या घरच्यांपेक्षा तू जवळची वाटलीस तिला. ह्यातच आलं ना सगळं. तिकडे एवढी लोकं होती पण त्यांच्यात हिम्मत नव्हती पुढे येऊन बोलायची. ते तू केलंस. किती अभिमान वाटला माहितीये मला तुझा." समीरने अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हाच तिला आलेल्या हुंदक्यानं तिचं शरीर शहारलं. 

"आता रडणं बास हां सानू. मुंबईमध्ये दुसऱ्यांना रडवणारी मुलगी इकडे येऊन स्वतःच रडतेय? हे बरोबर नाही. नाही बघू शकत गं मी तुला एवढ्या त्रासात. त्या निमकरचे दात पाडण्यापासून स्वतःला थांबवण्यासाठी किती संयम ठेवलाय नाही माहिती तुला. पण तू जर आता अशीच रडत राहिलीस तर मात्र त्याला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही हां. आता डोळे पूस आणि जेवायला चल बघू." समीर तिला समजावत म्हणाला.

"समीर मला थोडावेळ एकटं बसायचंय. प्लिज.. तुम्ही सगळे जेऊन घ्या. मला माहितीये तू माझ्या चांगल्यासाठीच बोलतोयस आणि तुझं म्हणणं पटतंय मला. पण असं क्षणात सगळं विसरणं नाही रे शक्य माझ्यासाठी." ती म्हणाली. 

"सानू.." समीर काही बोलणार तितक्यात सानिकाच म्हणाली "प्लिज?". तसा तो नाईलाजाने तिकडून गेला. स्वतःच्याच विचारात हरवली असताना सानिकाला मागे कोणाची तरी चाहूल लागली. 

"समीर प्लिज मला एकटं राहू दे म्हंटलं ना मी" तिने चिडून मागे वळून बघितलं तर समोर वसंतराव उभे होते. तशी ती एकदम गोरीमोरी झाली.

"काका, तुम्ही? सॉरी मला वाटलं समीर आहे." ती म्हणाली.

"हरकत नाही. बसलो तर चालेल का इथे मी? समीरला पिटाळून लावलंस तसं मला नाही ना करणार." त्यांनी हसत विचारलं. तशी ती हसली. दोघं काहीवेळ शांत बसले होते.

"थँक यु काका. मगाशी तुम्ही माझ्यासाठी जे केलंत ते आजपर्यंत कोणीच केलं नाहीये. पण माझी बाजू घेताना तुमचे त्यांच्याशी संबंध खराब झाले ह्याचं वाईट वाटतंय मला. शेवटी एका गावात राहून माझ्यामुळे तुमच्यात वैमनस्य आलेलं नाही आवडणार मला." सानिका अपराधीपणे म्हणाली.

"तू त्याचं टेन्शन नको घेऊस. ही असली सोयरीक ठेऊन काय करायचंय. आणि तसंही त्या निमकरने एवढी दारू घेतली होती उद्यापर्यंत त्याला काही आठवणार पण नाही." ते हसत म्हणाले.

"चांगलंय. मला वाटतंय मी पण एखादी बाटली मारूनच जायला हवं होतं तिकडे म्हणजे मला पण सगळं विसरणं सोप्पं झालं असतं." सानिका म्हणाली आणि वसंतराव खदखदून हसले.

"मग हवीये का तुला? माझ्याकडे आहे. फक्त आमच्या हिला सांगू नकोस. नाहीतर मला तिच्या मारापासून वाचवायला कोणीच नसेल." ते म्हणाली आणि सानिका पण खुद्कन हसली. 'हा तोच माणूस आहे का ज्याने मगाशी निमकरांना सरळ केलं?' तिला प्रश्नच पडला.

"मी कितीही बाटल्या रिचवल्या तरी सत्य कुठे बदलणार आहे. दारूच्या नशेत का होईना, ते बोलले ते खरंच तर होतं . माझ्या स्वतःच्या वडिलांनाच मी नकोशी झाले होते. आयुष्यभर वाट बघितली त्यांची मी. शाळेच्या प्रत्येक बक्षीस समारंभाला समोरच्या लोकांमध्ये त्यांना शोधायचे मी, वाटायचं आपल्याला बक्षीस मिळालंय हे बघून अचानक प्रेक्षकांमधून उठून अभिमानाने टाळ्या वाजवतील ते. कॉलेजवरून घरी यायला उशीर झाला तर खडसावून जाब विचारतील, पण काळजीपोटी. सगळ्या गोष्टी कठीण होऊन बसल्यावर अचानक माझ्यासमोर येतील आणि म्हणतील 'तू एकटी नाहीयेस सानू, मी आहे आता तुझ्याबरोबर'. पण ते आलेच नाहीत. आपली मुलगी काळी कि गोरी ते बघायलाही नाही.. मी जिवंत आहे की मेलीये हे बघायलाही नाही. शेवटी मीही अपेक्षा करणं सोडून दिलं. पण तुम्ही डोळे झाकल्याने जग तुम्हाला बघायचं थांबत नाही ह्याची नव्याने प्रचिती आली आज. तुम्ही भविष्यात कितीही यशस्वी व्हा पण तुमचा भूतकाळ पुसता येत नाही हेच खरं." सानिका नव्याने येणार हुंदका आवरत म्हणाली.

"मग नाहीच पुसायचा भूतकाळ. आपल्या भविष्याचा मार्ग आपल्या भूतकाळातूनच जातो की. आपल्या प्रगतीला चांगल्या गोष्टी जेवढ्या कारणीभूत असतात तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त वाईट अनुभव जबाबदार असतात. राहिला प्रश्न तुझ्या वडिलांचा, त्यांनी काय करावं हे तुझ्या हातात कधीच नव्हतं. तुझ्यासारख्या गोड पोरीला दूर करणं हे त्यांचं दुर्दैव आहे, तुझं नाही. लोकांना त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींची किंमत नसते हेच खरं." वसंतराव डोळ्याला पंचा लावत म्हणाले.

"काका? काय झालं?" सानिकाने गोंधळून विचारलं. 

"काही नाही. रेवाची आठवण आली." ते म्हणाले. सानिकाच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून ते पुढे म्हणाले, "रेवा.. समीरची मोठी बहीण." सानिकाला धक्काच बसला, 'समीरला मोठी बहीण आहे?'

"समीर व्हायच्या दोन वर्ष आधी आम्हाला मुलगी झाली होती. आमचं पहिलं अपत्य. तुला सांगू नाही शकत मी किती खुश होतो. जगातली सगळी सुखं तिच्या पायाशी आणून ठेवायची होती मला. तिचं शिक्षण, छंद, आरोग्य कशात काही म्हणजे काही कमी पडू देणार नव्हतो मी. तिला डॉक्टर झालेलं पाहायचं होतं मला. पांढऱ्या कोटात, गळ्याभोवती स्टेथोस्कोप, लोकांची सेवा करताना.." ते भूतकाळात हरवले होते. 

"पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. एक वर्षाची असतानाच ती आम्हाला सोडून गेली. डॉक्टरांना शेवटपर्यंत निदान करताच आलं नाही. पुरते उध्वस्त झालो होतो आम्ही. तिच्यासाठी बघितलेली सगळी स्वप्न नियतीच्या एका डावाने क्षणात उधळून लावली. रेवाचा बाबा म्हणून अभिमानाने मिरवणारा हा बाप त्यादिवशी पोरका झाला." वसंतराव बोलत होते. "तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिचाच भास झाला तुझ्यात. पहिल्यांदा तू त्या गेटमधून आत आलीस ना, क्षणभर वाटलं माझी रेवाच आली. डोळ्यांत तीच चमक, तेच लाघवी हास्य. ती असती आज तर तुझ्यारखीच आयुष्यात खुप मोठी झाली असती. भरभरून आशीर्वाद दिले असते तिला ह्या हातांनी. म्हंटलं असतं तिला, तू तुला हवं ते कर, हा बाप कायम तुझ्या पाठीशी उभा असेल." स्वतःच्या थरथरणाऱ्या हातांकडे बघत ते म्हणाले. सानिकाने त्या कृश झालेल्या थरथरणाऱ्या हातांवर हात ठेवला आणि वसंतरावांकडे बघितलं. मगाशी त्यांच्या रागाची दिसलेली झलक आता कुठेच उरली नव्हती. आता तिच्यासमोर बसला होता आपल्या मुलीच्या आठवणीत झुरत असलेला एक अगतिक बाप.

"समीर झाल्यावर ते दुःख थोडं कमी झालं. त्याच्यावरही खूप जीव आहे बरं का माझा. पठ्ठ्या माझ्या एक पाऊल पुढे आहे. बिझनेस एवढा पुढे घेऊन गेलाय. आमच्यावर पण फार जीव आहे त्याचा. तरीही कुठेतरी मनाचा एक कोपरा अजूनही माझ्या रेवाचाच आहे. पण आज तो कोपरा तुझ्यासाठी हळहळला. तुला एक सांगतो बाळा,  तुझे सख्खे वडील नाही आणून देऊ शकत मी तुला. पण ह्यापुढे कायम लक्षात ठेव, हा बाप आहे तुझ्याबरोबर. रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाची नाती खूप बळकट असतात कारण ती कर्तव्यांच्या धाग्याने नाही तर भावनांच्या मजबूत दोरखंडाने बांधलेली असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी असेन तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा." त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. इतकी वर्ष एका बापाच्या प्रेमाला आसुसलेल्या तिने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. दोघांचाही इतक्या वर्षांचा मनाचा बांध आता फुटला होता. अश्रू नद्या बनून वाहात होते. एका बापाचा खूप वर्षांपूर्वीच गमावलेल्या त्याच्या मुलीचा शोध आज संपला होता आणि एका लेकीला कधीही नशिबात न आलेल्या बापाच्या काळजाचा ठाव लागला होता.

घराच्या दारातून आशाताई, वनिताताई आणि समीर भरल्या डोळ्यांनी त्या दोघांकडे पाहात होते. पण एकमेकांना नव्याने उमगलेल्या त्या बापलेकीच्यामध्ये जाण्याची हिम्मत त्या तिघांमध्येही नव्हती.

क्रमशः!

🎭 Series Post

View all