चंद्र आहे साक्षीला! - भाग ३४ 

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग ३४ 

"ओके, सगळ्यांना मी दिलेला होमवर्क कळला आहे? प्रत्येकाने कोणत्याही एका कंपनीच्या शेअरबद्दल माहिती गोळा करायची आहे. त्या शेअरची प्राईस गेल्या महिनाभरात किती वाढली, कमी झाली, न्यूजमध्ये त्याबद्दल काय माहिती आली होती, हे सगळं तुम्ही पुढच्या क्लासला घेऊन यायचं आहे आणि मग आपण त्यावर चर्चा करणार आहोत. ओके?" सानिका समोर बसलेल्या १५-१६ वर्षांच्या मुलांचा 'स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं' ह्याचा क्लास घेत होती. एवढ्या लहान वयाच्या मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे खूपच गहन विषय होता खरंतर पण सानिकाच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्यांना त्या विषयाचा पण लळा लागला होता. नुसत्या पुस्तकी ज्ञानाचा भडीमार करण्यापेक्षा प्रत्यक्ष आयुष्यातली काही उदाहरणं देऊन शिकवल्यामुळे साहजिकच त्यांना गोष्टी समजणं सोप्पं जात होतं. एकदा तर तिने चक्क चालू क्लासमध्ये कोणतेतरी शेअर्स विकत घेऊन दुसऱ्या दिवशी ते विकून त्यातून झालेला फायदा मुलांना दाखवला. अर्थात हे सगळं करायची त्यांना इतक्यात परवानगी नव्हती. पण तिच्या त्या प्रात्यक्षिकामुळे एवढ्या छोट्या गावात राहूनही आपण अशा गुंतवणुकी करू शकतो हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता. क्लास सुटल्यावर सगळी मुलं घरी जायला निघाली, सानिकाची नजर मात्र समोर काहीतरी शोधत होती.

"नमिता, इकडे ये एक मिनिट." तिने बाहेर पडत असलेल्या एका मुलीला आवाज देऊन बोलावलं. तशी ती आपल्या दोन वेण्या हलवत धावत आली.

"नमिता, तू पिहूला भेटलीस का गं इतक्यात? गेले तीन-चार क्लास ती आलीच नाहीये. असं करत नाही ती." सानिकाने विचारलं. क्लासला येणाऱ्या सगळ्याच मुलांशी सानिका क्लोज असली तरी पिहू खास होती तिच्यासाठी. 

"माहित नाही, सानिकाताई. मला पण नाही भेटली ती इतक्यात. ती खेळायला पण येत नाही.  कदाचित बाहेर गेली असेल." नमिता खांदे उडवत म्हणाली. ती गेल्यावर सानिका पिहूचाच विचार करत होती. असं न सांगता निघून जाणं तिच्या स्वभावाला धरून नव्हतं. बाकी कोणाला नाही तरी सानिकाला सांगितलंच असतं तिने. 'शाळेतून घरी जाताना तिच्या घरी जाऊन बघते काय झालंय.' ती स्वतःशीच विचार करत तिकडून निघाली. 

पिहूचं घर शाळेच्या अगदी जवळंच होतं. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती हे त्या घराच्या अवस्थेवरून दिसतंच होतं. त्यांच्या घराचं गंजलेलं गेट ढकलून सानिका आत आली. मुख्य घराचा दरवाजा बंदच होता. कोणाची चाहूलही नव्हती. तिने एकदोनदा पिहूला आवाज दिला पण काहीच उत्तर आलं नाही तेव्हा ती तिकडून निघाली. घरी पोहोचेपर्यंत ती तिचाच विचार करत होती. 

"सानू? लक्ष कुठेय? मी कधीची आवाज देतेय तुला." सानिकाच्या मागोमाग घरात शिरलेल्या  आशाताई म्हणाल्या.

"सॉरी आई, जरा वेगळ्याच विचारात होते मी. मला सांग तू त्या निमकरांना ओळखतेस का गं?" सानिकाला काही केल्या पिहूबद्दल जाणून घेतल्याशिवाय चैन पडत नव्हतं. 

"हां गावातली म्हणून ओळख आहे पण फार नाही. जरा विक्षिप्तच आहे ती फॅमिली. त्या निमकरांची काही वर्षांपूर्वी नोकरी गेली. ते पूर्ण दारूच्या आहारी गेलेत. त्या आपल्या गावातल्या दारूच्या दुकानावर पडलेले असतात. बायकोच्या जीवावर चालू आहे संसार. पण त्याला काही अर्थ नाही. नवरा एवढा हाताबाहेर गेलाय तरी ही त्याचं सगळं ऐकत बसते. मधल्यामध्ये त्या पोरीचे हाल होतात. पिहू.. गोड आहे गं पोरगी. आणि मेहनती आहे एकदम. अभ्यासात कायम पुढे असते." आशाताई म्हणाल्या.  सानिका ऐकत होती.

"तू का विचारतेयस?" त्यांनी पुढे विचारलं.

"काही नाही. ती पिहू आली नाहीये गेले काही दिवस माझ्या क्लासला. म्हणून जरा काळजी वाटत होती." सानिका म्हणाली. 

"तू कशाला काळजी करतेयस. अगं शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून गेले असतील बाहेर कुठेतरी. परत आली की येईल क्लासला." त्या सानिकाला समजावत म्हणाल्या. "चला बाई, स्वयंपाकाला लागते. सानू तू पण जरा स्वयंपाकाचं बघ बरं का. लग्न करायचं झालं तर आलं पाहिजे सगळं." आशाताई त्यांचं वनिताताईंबरोबर झालेलं बोलणं आठवून म्हणाल्या. पण सानिकाने सोयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी त्याच उठून नाईलाजाने स्वयंपाकाला गेल्या. 

____****____

रविवारी गावाची मासिक सभा होती. सानिकाची हि दुसरी सभा. पहिल्या सभेत तिने पुढाकार घेऊन राबवलेल्या 'डिजिटल पेमेंट' अभियानाच्या घवघवीत यशानंतर गावातल्या सगळ्यांनी तिला आवर्जून पुढच्या मीटिंगला यायची रिक्वेस्ट केली होती. तीही अर्थात जाणारच होती. गेल्या महिनाभरात ती गावातल्या इतक्या उपक्रमात सहभागी झाली होती की त्या गावाबद्दल तिलाही आता आपलेपणा वाटू लागला होता. आणि तिकडे जायचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे..समीर! तिला दोन दिवसांनी भेटणार होता तो आज. त्यांच्याकडे झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेनंतर तो बिझनेसच्या कामासाठी बाहेर गेलेला तो आजच परत आला होता. आशाताई आणि सानिका दोघी आवरून शाळेकडे जायला निघाल्या. रस्त्यात निमकरांच्या घरावरून जाताना सानिकाने बाहेरूनच डोकावलं. घराचं दार उघडं होतं आणि आत हालचालही दिसत होती. पण आता गावाच्या मीटिंगमध्ये भेट होईलच म्हणून तिने आत जायचं टाळलं. दोघी शाळेच्या गेटमधून आत शिरत असतानाच समोरून समीर त्यांच्याच दिशेने येत होता. त्याला बघून सानिकाच्या चेहऱ्यावर मोठठं स्माईल आलं. आशाताईंनीही वेळ बघून लगेच तिकडून काढता पाय घेतला. 

"हाय. आय मिस्ड यु !" आल्याआल्या तो म्हणाला. सानिकाने आजूबाजूला बघून डोळे वटारले.

"मी आता ठरवलंय, तू जोपर्यंत इकडे आहेस तोपर्यंत मी कुठेही बाहेर जाणार नाहीये. उगाच आपला महत्वाचा वेळ वाया नको जायला. लोकांकडून महत्वाची उत्तरं मिळवायची आहेत मला." तिच्या जवळ उभा राहात तिला डोळा मारत तो म्हणाला.

सानिकाने हसून मान हलवली ,"आणि बिझनेसचं काय?" 

"तो काय आपलाच आहे ना. बॉस म्हणून तेवढी सवलत मिळतेच मला. दोन दिवसांत अजूनच छान दिसायला लागली आहेस तू." तो सानिकाकडे बघत म्हणाला. तिला भेटून झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता. 

"हो का? तू तर तसाच दिसतोयस पण." सानिका त्याला चिडवत म्हणाली. 

"हम्म्म खरंच? त्यादिवशीसारखं नीट बघून सांग ना." समीर म्हणाला. पूजेच्या दिवशीचा प्रसंग आठवून सानिकाचा चेहरा लाल झाला.

"हाये हाये, हेच तर मिस करत होतो मी. आता कसा दिवस पूर्ण झाला माझा. पण काय गं तू सांगितलं नाहीस मला." समीर म्हणाला. तिने त्याला प्रश्नार्थक नजरेनेच 'काय?' विचारलं.

"तू मिस केलंस का मला?" समीर तिच्या खांद्याजवळ जात कुजबुजला.

"होsss.. खूप मिस केलं आम्ही तुला." मागून आलेले गौतमी, गोपाळ आणि चंदू एका स्वरात म्हणाले. ते बघून सानिका आणि समीर दोघं ओशाळले. 

"प्रत्येक वेळेला चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी येणं कसं जमतं रे तुम्हाला." समीर त्यांना मनात शिव्या घालत म्हणाला. त्याच्या सानिकाप्रतीच्या भावना एव्हाना त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच कळल्या होत्या. पण सानिकाने दिलेल्या प्रेमाच्या कबुलीबद्दल समीरने फक्त चंदूलाच सांगितलं होतं कारण गौतमीला कळलं असतं तर दुसऱ्याच दिवशी ते सानिकापर्यंत पोहोचलं असतं आणि समीरला ते नको होतं. त्यांचं बोलणं चालू असतानाच गावाची मुख्य कमिटी - वैद्य, जोशी, जाधव आणि चौधरी समोर येऊन स्थानापन्न झाले. आणि लोकंही शांत झाली. त्यांच्या मीटिंगला सुरवात होत असतानाच अचानक काही अंतरावरच असलेल्या निमकरांच्या घरातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज यायला लागला. सगळ्यांनी वळून त्यादिशेला बघितलं. सानिकाने पॅनिक होऊन समीरकडे बघितलं, त्यालाही काही कल्पना नव्हती. पुढचा मागचा कसलाही विचार न करता सानिका त्यांच्या घराच्या दिशेने धावत सुटली. 

"सानिका, थांब!" समीर आणि बाकीचेही तिच्या मोगोमाग निघाले. मीटिंगमधले बाकीचे लोकंही गोंधळून त्या दिशेने निघाले. काय घडत होतं निमकरांच्या घरात?

क्रमशः!

🎭 Series Post

View all