चंद्र आहे साक्षीला - भाग २

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

दिवसाची सुरवातच इतकी वाईट झाली होती कि पुढचा दिवस कसा जाणार होता याची पूर्ण कल्पना सानिकाला आली होती. थोड्यावेळाने तिने सांगिल्याप्रमाणे बजेटची फाईल तिच्यासमोर आली तेव्हा त्यातही चुका होत्याच. पुन्हा कोणाला काही करायला सांगण्यापेक्षा आपणच त्या सुधाराव्यात म्हणून सानिका त्या कामात बुडाली. बघता बघता दिवसाची रात्र झाली. कामाच्या नादात सानिकाला जेवायलाही सुचलं नव्हतं. फाईल्समधून डोकं बाहेर काढत तिने घड्याळाकडे बघितलं. आठ वाजून गेले होते. खुर्चीत मागे टेकून तिने आळस दिला. दिवसभर एका जागी बसून तिची पाठ आखडली होती. पाय मोकळे करण्यासाठी ती केबिनमधून बाहेर आली. बहुतेक सगळे एव्हाना घरी गेले होते. त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांकडे बघून सानिकाने नाईलाजाने मान हलवली आणि ती पॅन्ट्रीमध्ये कॉफी घ्यायला गेली. कॉफी घेऊन ती तिथल्याच एका सोफ्यावर बसली. सकाळपासून पहिल्यांदाच तिने तिचा फोन उघडला. आशाताईंनी तिला पन्ह आणि कोकम सरबताच्या ग्लासेसचा फोटो पाठवला होता. एका फोटोमध्ये त्या आणि त्यांच्याच वयाच्या अजून काही मैत्रिणी चीअर्स  करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या आयुष्यातला निवांतपणा बघून सानिकाला त्यांचा हेवा वाटला. 

त्या फोटोजवर हार्ट्सची स्माईली पाठवून तिने तिचं सोशल मीडिया अकाउंट उघडलं आणि तिच्या हातातला कप जवळपास सटकला. तिच्या हृदयातून वेदनेची सूक्ष्म कळ गेली. समोर धरलेल्या फोनवर एक हसरं जोडपं त्यांच्या हातातल्या अंगठ्या मिरवत सानिकाकडे बघत होतं. सानिकाचा एक्स बॉयफ्रेंड जॉन होता तो. 

दोन तीन वर्षांपूर्वी सानिका ऑफिसच्या कामासाठी अमेरिकेला गेलेली. तिकडेच तिची जॉनशी ओळख झाली. अमेरिकन विचारांचा, स्वतंत्र जीवनशैली असलेला जॉन सानिकाला तिच्या नकळत आवडला. दोघं एकत्र खूप फिरले. रोज ऑफिसनंतर दोघं न्यूयॉर्कमध्ये नवीन नवीन पदार्थ खायला जायचे. त्याच्या सहवासात सानिकाला वर्ष  कसं गेलं कळलंही नाही. इतक्या कमी वेळात ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले होते. आपण आयुष्यात कधी कोणत्या मुलामध्ये इतकं गुंतू असं सानिकाला कधी वाटलंच नव्हतं. तिचा परत यायचा दिवस जवळ येत होता तशी दोघांची घालमेल वाढत होती. दोघांनी पुन्हा भेटण्याचे प्लॅन्स बनवले. लांब राहूनही आपण आपलं नातं टिकवून ठेऊ असं दोघांनी ठरवलं. पण परत आल्यानंतर काही महिन्यातच त्यांच्यामध्ये भांडणं सुरु झाली. वेळेतल्या फरकामुळे त्यांचं फारसं बोलणं होत नव्हतं. जॉनला फोनवर बोलण्यात फार रस नव्हता. तो सानिकाला पुन्हा अमेरीकेला यायला आग्रह करत होता. पण तिच्यासारख्या सगळं प्लॅन करून वागणाऱ्या मुलीला असं तडकाफडकी तिचं मुंबईतलं आयुष्य सोडून अमेरिकेला जाणं पटत नव्हतं. आशाताईंचही आता वय होत होतं. आज ना उद्या त्यांना तिच्या आधाराची गरज लागणारंच होती. ह्या सगळ्यातुन जॉन आणि सानिकाचं नातं टिकू शकलं नाही. आणि आज जॉनने त्याच्याच ग्रुप मधल्या एका मैत्रिणीशी लग्न केलं होतं. सानिका फोन बंद करून पुन्हा तिच्या केबिनमध्ये आली. पण तिचं कामात लक्ष लागत नव्हतं. जॉनच्या लग्नाचे फोटोज बघून तिच्या मनावर आलेली मरगळ तिला झटकता येत नव्हती. शेवटी ती उरलेल्या फाईल्स घेऊन ऑफिसमधून निघली. 'घरी जाऊन फ्रेश होऊन उरलेलं काम संपवेन', तिने स्वतःशीच विचार केला आणि ती तिचं केबिन बंद करून निघाली. 

रस्त्यातच तिने रात्रीच्या जेवणासाठी पिझ्झा घेतला. एरवी एकदम कडक डाएट करणाऱ्या सानिकाला आज काहीतरी चमचमीत खायची ईच्छा होती. कामाचा वाढता ताण आणि मगाशी जॉनच्या लग्नाचे बघितलेले फोटोज या सगळ्यामुळे तिचा मूड पार गेला होता. घरी येऊन फ्रेश होऊन ती कामाच्या फाईल्स उघडून बसली. सगळ्या फाईल्स डोळ्याखालून घालताना तिला नवीन गोष्टी लक्षात येत होत्या. उद्या दुपारच्या मि. मेहेतांबरोबरच्या मिटींगच्या आधी सगळ्या टीमशी तिला पुन्हा एकदा बोलून काही गोष्टी फायनल करायच्या होत्या म्हणून तिने सगळ्यांना सकाळी आठच्या ठोक्याला ऑफिसमध्ये हजार राहायचा ई-मेल पाठवला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. तिने शेवटची फाईल बंद केली आणि झोपायला तिच्या खोलीत गेली. पण तिच्या मनात चाललेल्या विचारांमुळे तिला लगेच झोप लागणार नाहीये हे तिलाही माहिती होतं. ती उठून फ्रिजमधून एक कोकचा कॅन घेऊन तिच्या बाल्कनीमध्ये आली. दहाव्या मजल्यावरच्या तिच्या फ्लॅटमधून जोगेश्वरीच्या दाटीवाटीने उभ्या असलेल्या उंच इमारती तिला दिसत होत्या. उशीर झाला असल्यामुळे बहुतांश घरातले दिवे घालवून लोकं झोपली होती. दुसऱ्या दिवशीच्या दगदगीसाठी तयार होत. रात्रीच्या गडद होत चालेल्या अंधारात मुंबानगरीची धावपळही मंदावत होती. पण दिवसाच्या या प्रहरालाही ज्याचं तेज जराही कमी झालं नव्हतं असं कोणीतरी होतं. सानिकाचं लक्ष नकळत आकाशातल्या त्या पांढऱ्या शुभ्र तेजस्वी गोलाकडे गेलं. मुंबईतल्या लाखो दिव्यांचा झगमगाटही त्याच्यापुढे फिका पडला होता. त्या चंद्राकडे बघताना आज तिला एकदम एकटं वाटलं. 

खरंतर जॉन आणि तिचं ब्रेकअप होऊन बरेच महिने लोटून गेलेले पण आज त्याचं लग्न झाल्याचं कळल्यापासून तिला तिच्या एकटेपणाची जाणीव अजूनच तीव्रतेने होत होती. ह्या सगळ्याला कुठेतरी तीही कारणीभूत होतीच. कोकणातल्या 'कणवली' नावाच्या गावात ती लहानाची मोठी झाली. ती २-३ वर्षांची असतानाच तिचे वडील दुसऱ्या कोणत्यातरी बाईसाठी सानिकाला आणि तिच्या आईला सोडून गेले. तेव्हापासून ते जिवंत आहेत की नाहीत हे ही सानिकाला किंवा तिच्या आईला माहिती नव्हतं. बारावी नंतर सानिकाने ते गाव सोडलं आणि ती मुंबईला आली. फायनान्सची डिग्री मिळवून तिने लगेच एम.बी.ए. ला ऍडमिशन घेतली. मुळातच खूप हुशार असल्याने तिला सगळीकडेच शिष्यवृत्त्या मिळाल्या आणि त्यामुळे तिच्या शिक्षणाचा खर्च आशाताईंना परवडू शकला. नाकी डोळी नीटस, वागायला बोलायला स्मार्ट असल्याने कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये तिच्या अवतीभोवती फिरणारी मुलं कमी नव्हती पण तिने कायमच सगळ्यांना स्वतःपासून दूर लोटलं होतं. 'आपण बरे आणि आपलं काम बरं, कशाला उगाच कोणामध्ये गुंतून त्यांना आपल्यावर वर्चस्व गाजवायची संधी द्यायची. प्रेम म्हंटलं की अपेक्षा आल्या, रुसवे फुगवे आले. माझ्याकडे ह्या साठी वेळच नाहीये' असंच तिला कायम वाटायचं. पण जॉन वेगळा होता. अमेरिकेमध्ये वाढल्यामुळे दुसऱ्यांच व्यक्तिस्वातंत्र्य जपणं, त्यांना मोकळीक देणं हे त्याला जमत होतं. त्यामुळे सानिकाला त्याच्या प्रेमाचं कधी दडपण नाही आलं. त्याच्याबरोबर घालवलेले क्षण तिने खूप एन्जॉय केले. त्याच्याबरोबर असताना तिला पहिल्यांदा तिचं आयुष्य कोणाबरोबर तरी वाटून घ्यावंसं वाटायला लागलं. पण सगळी नाती शेवटपर्यंत टिकतातच असं नाही. मन जुळलं तरी वेळही जुळून यावी लागतेच की. जॉनशी नातं संपवल्यावर सानिका बरेच दिवस निराश होती. त्यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तिने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिलं. त्यामुळे तिचे कामाचे तास वाढत गेले, सुट्ट्या घेणं जवळपास बंदच झालं. आशाताईंना ह्या सगळ्याबद्दल पूर्ण माहिती नसली तरी आपल्या मुलीचं काहीतरी बिनसलं आहे हे त्यांना कळत होतं. काही दिवस त्या मुंबईला येऊन तिच्याबरोबर राहून गेल्या. तिने थोडे दिवस कामातून सुट्टी घेऊन कोकणात येऊन जावं असंही त्यांनी सुचवलं होतं. त्यामुळे तिला तिच्या रुटीनमधून थोडा बदल मिळेल आणि मनावरची मरगळ आपोआप दूर होईल असं त्यांना वाटत होतं. पण सानिकाला तिकडे जाण्यात रस नव्हता. बारावी नंतर ती त्या गावातून बाहेर पडली ती पुन्हा कधी तिकडे गेलीच नाही. आशाताईच अधून मधून मुंबईला येऊन राहून जायच्या. आपल्या मुलीचं करिअर अगदी उत्तम चाललं आहे ह्याचा त्यांना अभिमान होता. एवढ्या लहान वयात तिने स्वतःचं घर, गाडी, भरपूर पगाराची नोकरी सगळं स्वतःच्या जीवावर मिळवलं होतं. फक्त एकच काळजी त्यांना कायम खात होती, ती म्हणजे तिच्या लग्नाची. लग्नाचा विषय काढला की सानिका त्यांच्यासमोरून निघूनच जायची. त्यात हे जॉनचं प्रकरण झाल्यापासून तर तो विषय काढायची पण चोरी झाली होती. 'आपण आपल्या मुलीला किती दिवस पुरणार. त्यात ती एकुलती एक. आपल्यानंतर तिच्याकडे आपलं असं  म्हणायला कोणीतरी असावं' असं एक आई म्हणून त्यांना वाटणं स्वाभाविक होतं. बरेच प्रयत्न करून झाले, तिच्यासाठी स्थळं शोधून झाली पण सानिकाने काही त्यांच्या प्रयत्नांना धूप घातली नाही. शेवटी कंटाळून त्यांनी सगळं देवभरोसे सोडून दिलं.

घड्याळाने एकचा ठोका दिला तशी सानिका भानावर आली. तिच्या हातातला कोकचा कॅन कधीच रिकामा झाला होता. तो टाकून ती झोपायला तिच्या बेडमध्ये शिरली. दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी मनात बनवत असतानाच कधी झोप लागली ते तिला कळलंही नाही.

🎭 Series Post

View all