चंद्र आहे साक्षीला! - भाग २८

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग २८  

सूर्यास्त होऊन गेला आणि मुंबईचे रस्ते लाखो दिव्यांनी उजळून निघाले होते. चाकरमानी थकूनभागून घरी परतत होते. मुलं शाळा संपवून घरी निघाली होती. कॉलेज आणि ऑफिस संपल्यानंतर मागे रेंगाळणारी प्रेमीयुगुलं मरिन डाइव्हच्या किनाऱ्यावर बसून स्वप्न रंगवत होती. 

"रात्रीच्या वेळेची मुंबई काही औरच असते नाही? आम्ही इतके वेळा आलोय इकडे. रात्री जागून असाइन्मेंट्स पूर्ण झाल्या कि इकडे येऊन मस्त चहा पीत गप्पा मारत बसायचं. एक चहाची टपरी होती तिकडे तेव्हा, रात्री सगळी कॉलेजची मुलंच असायची. तू पण आली असशीलच की इकडे बरेचदा. तुझ्या घरापासून तर जवळंच आहे एकदम." समीर समोरच्या अथांग समुद्राकडे बघत म्हणाला.

"आलेय ना पण मी रात्री कधीच नाही जात समुद्रावर. वेगळीच हुरहूर लागते मनाला. नक्की शब्दात नाही सांगता येणार मला पण अस्वस्थ वाटतं एकदम." सानिका म्हणाली. दोघं दिवसभर मुंबईदर्शन करून शेवटी थकून भागून तिकडे येऊन बसले होते.

"मग तू योग्य माणसाबरोबर कधी गेलीच नसशील रात्रीची समुद्रावर. मस्त चांदण्यात हात धरून मऊ वाळूवर चालत समोरच्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब बघणं म्हणजे सुख आहे. बाकी कसलाच आवाज नाही, फक्त समुद्राची गाज. दूरदूरपर्यँत बाकी कोणीच नाही, जस्ट यु आणि दॅट समवन स्पेशल!" समीर तिच्याकडे बघत म्हणाला. सानिकाने त्याच्या डोळ्यांत बघितलं. 'हा किती जणींबरोबर गेला आहे असा रात्रीचा समुद्रावर? एवढा रोमँटिक आणि चार्मिंग आहे. म्हणजे भरपूर गर्लफ्रेंड्स झाल्याच असतील ह्याच्या.' 

"पुन्हा हरवलीस ना माझ्यात?" समीर बोलला तशी ती भानावर आली. "तुझ्या नजरेत मला जे दिसतं ते ओठांवर कधी येणार? अजून किती वेळ वाट पाहायला लावणार आहेस मला सानू? सांगून टाक ना आता प्लिज." समीर तिच्या जवळ जात म्हणाला. सानिकाने अवघडून दुसरीकडे बघितलं. समीरने हळूच तिचा हात हातात घेतला.

"मी नाही गेलोय कोणत्या मुलीबरोबर रात्रीचा चांदण्यात फिरायला." तो तिच्याकडे बघून म्हणाला. जणूकाही तिच्या मनातलं त्याने ओळखलं होतं. "हां गर्लफ्रेंड्स होत्या माझ्या, अगदी खोटं नाही बोलणार मी. पण एवढी स्पेशल कोणी नाही मिळाली. बघू आता कधी योग येतो." तिला डोळा मारत तो म्हणाला. 

"गर्लफ्रेंड्स? अशा किती होत्या?" सानिका जरा चिडूनच म्हणाली.

"हा हा हा, प्रेमात पडायच्या आधीच एवढी पझेसिव्ह झालीस?" तिला चिडवत तो म्हणाला. "आणि मला विचारतेयस, तुझं काय? तुझे पण असतीलच की बॉयफ्रेंड्स." त्याने विचारलं.

"अगदी खूप नव्हते. पण एक दोन सिरीयस रिलेशनशिप्स होत्या. मी अमेरिकेला गेलेले तिकडे एक जॉन म्हणून होता. आम्ही बरेच सिरीयस होतो एकमेकांबद्दल, अगदी लग्नाचा वगैरे पण विचार आला होता मनात. पण नाही वर्कआऊट झालं. मागच्या महिन्यात लग्न झालं त्याचं." ती म्हणाली. आज त्याच्याबद्दल बोलताना तिला काहीच त्रास नाही झाला. समीर मनातल्या मनात त्या जॉनचे आभार मानून मोकळा झाला. जॉन तिच्या आयुष्यातून गेला नसता तर आज सानिका त्याच्या आयुष्यात नसती.

"नशिबाचा भाग असतो सगळा. तुमच्या नशिबात जी व्यक्ती असेल तीच भेटते तुम्हाला. अगदी अनपेक्षित वेळी आणि ठिकाणी." तो म्हणाला. त्याच्यासारख्या एवढ्या शिकलेल्या मुलाचा नशिबावर विश्वास आहे हे बघून सानिकाला आश्चर्य वाटलं. ती काही बोलणार तेवढ्यात मागून ओळखीचा आवाज आला, "सानू?" दोघांनीही चमकून मागे बघितलं. समोर मिथिला उभी होती, तिच्या नवऱ्याबरोबर.  

"ओह माय गॉड, व्हॉट अ सरप्राईज! मिथू? तू इकडे काय करतेयस?" सानिका तिला मिठी मारत म्हणाली.

"हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे. कोकणातून कधी आलीस? मला सांगितलं पण नाहीस. बिझी आहेस वाटतं." समीरकडे बघून डोळा मारत ती म्हणाली. 

"नाही नाही, मी दोन दिवसांसाठीच आले आहे. घरी जरा गडबड झाली म्हणून एकदम अचानक यावं लागलं. उद्या परत जाणार आहे. आणि हा समीर! आपल्या शाळेत होता. तू ओळखलं नाहीस का?" सानिका म्हणाली. समीरला हसायला आलं, पहिल्यांदा त्याला भेटली तेव्हा तिने स्वतःने त्याला ओळखलं नव्हतं आणि आता ती मिथिलाला टोमणे मारत होती.

"ओह हाय समीर, थोडा ओळखीचा वाटलं चेहरा मला. वैद्यकाकुंचा मुलगा ना तू? आईकडून त्यांचं नाव ऐकलं आहे बरेचदा. हा माझा नवरा, हितेन!" मिथिलानं पुढे येऊन समीरची आणि हितेनची ओळख करून दिली.  सगळ्यांच्या ओळखी झाल्यावर, गप्पा रंगल्या होत्या. रात्र चढत होती.

"काय गं मिथू, तुम्ही दोघं इकडे फिरताय मग वेदा कुठे आहे?" सानिकाने विचारलं. 

"आज हितेनच्या आई  आल्या आहेत घरी म्हणून वेदाला त्याच्याकडे सोडून आम्ही खूप दिवसांनी बाहेर पडलो आहोत दोघंच. इतकं छान वाटतंय. नाहीतर नुसते संसारी झालो होतो. तुम्हाला आत्ता नाही कळणार. लग्न झालं आणि मुलं झालं की कळेल." मिथिला म्हणाली.

"हो ना. बघू आता कधी नशिबात येतंय आमच्या." समीर सानिकाकडे बघत म्हणाला. मिथिलाच्या नजरेतून ते सुटलं नाही. सानिका मात्र उगाच इकडेतिकडे बघत बसली होती. 

"ए आपण चौघं क्लबिंगला जायचं का? कम ऑन सानू , किती दिवस झाले यार. पुन्हा असा चान्स कधी मिळेल माहित नाही. आणि अनायसे समीर पण आहे. त्याला आपल्या फेमस 'होरायझन' ला घेऊन जाऊया." मिथिला एकदम उत्साहाने म्हणाली. तसंही घरी करण्यासारखं अजून काहीच नव्हतं त्यामुळे सगळेच तयार झाले. पंधरा मिनिटांनी ते चौघं मरिनड्राइव्हच्याच एका रुफटॉप क्लबमध्ये म्युजिक एन्जॉय करत गप्पा मारत होते. क्लबची व्हाइब वेगळीच होती. लाऊड म्युजिक, त्याच्या तालावर थिरकणारी तरुणाई, फॅन्सी वन पिसेस मध्ये हाय हिल्स घालून आणि तोंडावर टनभर मेकअप फसलेल्या तोऱ्यात चालणाऱ्या मुली आणि त्यांच्या मागेमागे फिरणारी मुलं, काही मोठे कॉलेजचे ग्रुप्स, ऑफिसनंतर टीमबरोबर आलेले काही कलिग्स.. सगळे आपल्याच विश्वात रममाण होते. चौघांनी एकदा आपल्या आजूबाजूला नजर फिरवली आणि कोपऱ्यातलं एक रिकामं टेबल पटकावलं.  

"ओके, तुम्ही काय ड्रिंक्स घेणार? तुझं तर मला माहिती आहे सानू, समीर तू काय घेणार?" मिथिलाने विचारलं.

"मला काही नको मिथू. उद्या ड्राइव्ह पण करायचंय. तुम्ही घ्या सगळे." म्हणून सानिकाने नकार घंटा वाजवली.

"ए सानू, प्लिज पकवू नकोस यार. घे ना थोडी. गाडी काय समीर चालवेल. आणि उद्या दुपारपर्यंत थोडीच राहणार आहे त्याचा इफेक्ट. ते काही नाही. यु आर हॅविंग अ ग्लास ऑफ वाईन विथ मी!" मिथुने फर्मान काढलं आणि सानिका तयार झाली. 

"समीर एखादी बियर घे ना माझ्याबरोबर." मिथिलाच्या नवऱ्याने आग्रह केला म्हणून समीरही तयार झाला. सानिका आणि मिथिला त्यांची ऑर्डर द्यायला गेल्या. 

"सो, मला सांगणार आहेस का हा मि. चार्मिंग आणि तुझं काय चालू आहे ते? कसे कॉलेज प्रेमींसारखे बसला होतात तिकडे मारिन ड्राइव्हवर." मिथिला तिला चिडवत म्हणाली. दोघी बारच्या कॉउंटरवर शॉट्स मारत उभ्या होत्या. सानिकाने 'कुठे काय' अशा आशयाने खांदे उडवले. मिथिलानं डोळे मोठे केले तशी सानिकाने समीरबद्दल तिला सांगितलं.

"हाऊ रोमँटिक. त्याच्याकडे बघून वाटतंच तो तुझ्या प्रेमात वेडा असेल ते. किती इंटेन्सली बघतो तो तुझ्याकडे. आत्ता पण त्याची नजर इकडेच आहे बरं का." मिथिलाने मागे खूण करत म्हंटलं. सानिकाने वळून बघितलं. हितेनशी बोलताना समीर मध्येमध्ये तिच्याकडेच बघत होता.

"मला काही समजत नाहीये मिथू. तुला तर माहितीच आहे जॉन नंतर मला ह्या सगळ्याचा विचार करायला वेळच नाही मिळाला. पण आता समीरच्या बाबतीत मला काय वाटतंय तेच कळत नाहीये मला. त्याच माझ्याकडे बघणं, माझ्या मागेपुढे फिरणं मला एवढं हवंहवंसं का वाटतंय? त्याच्या प्रेमात पडले आहे का मी? पण त्याचीही भीती वाटते आता. पुन्हा तो त्रास, भांडणं, ब्रेकअप अगदी नको वाटतंय." सानिका म्हणाली. समोरचा शॉट ग्लास तोंडात रिकामा करून तिने तोंड वाकडं केलं. "उद्या जाम हँगओव्हर होणार आहे." त्यांची ऑर्डर येईपर्यंत दोघींची टकिला शॉट्स मागवले होते.  

"तू एवढा निगेटिव्ह विचार कशाला करतेयस. प्रत्येक वेळेला प्रेमात पडल्यावर ब्रेकअपच झालं पाहिजे असं काही नाहीये. कदाचित तुमचं लग्नही होईल. तुम्ही एकमेकांबरोबर खूप खुश राहाल. हॅप्पिली एव्हर आफ्टर म्हणतात तसं. आता कधी ना कधी लग्न करायचंच आहे ना. मग स्वतःच्या निवडीने करणं कधीही चांगलंच ना. आणि मी तुला जेवढं ओळखते सानू, त्यावरून तरी मला असं वाटतंय की तू हि त्याच्या प्रेमात पडली आहेस. आत्तापर्यंत कोणत्या मुलाला समोर उभी करत नव्हतीस तू आणि आता ह्याच्याबरोबर पार कोकणातून इकडे आलीयेस. तो फ्लर्ट करतो आणि तो चक्क लाजतेस? दुसरा कोणी असता तर आत्तापर्यन्त गाल सुजवला असतास त्याचा. तो सुजय आठवतोय का? कसला झापलेलास त्याला, पुढच्या रक्षाबंधनाला राखी घेऊनच आला होता तो." मिथिला जुन्या गोष्टी आठवत म्हणाली. "आणि रात्रीचं काय गं? एकत्रच राहणार आहात का दोघं?" सानिकाला डोळा मारत मिथिला म्हणाली. हा विचार तिने केलाच नव्हता. आधीच तिच्या डोक्यात चालू असलेली विचार चक्र अजून वेगाने फिरायला लागली होती.

रात्रीचे बारा वाजून गेले होते. चौघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. समीरची सगळ्यांशी छान ओळख झाली होती. सानिकाला तर एव्हाना चांगलीच चढली होती. कुठल्याही जोकवर ती भरभरून हसत होती. त्या मोकळ्या हसण्यामुळे तिची खळी अजूनच मनमोहक दिसत होती. एरवी मोजून मापून वागणारी सानिका आता एकदम बिनधास्त, मनमोकळी वागत होती. हसता हसता तिने समीरच्या दंडाला पकडलं.

"सम्या, काय बॉडी बनवली आहेस. कोणाला इम्प्रेस करायला?" तिने त्याच्याकडे बघून तोंडाचा चंबू केला. तिच्या तोंडून 'सम्या' ऐकून समीरची तर विकेटच गेली होती. त्याच्या खांद्यावर तसंच डोकं टेकवून ती स्वतःशीच बडबडत होती, हसत होती. समीरने अलगद त्याची हनुवटी तिच्या डोक्यावर टेकवली, तिच्या शाम्पूचा वास त्याच्या नाकात भरला. दोघं स्वतःच्याच नादात एकमेकांशी बोलत होते, खळखळून हसत होते. 

____****____

"समीर तु हिला नेशील ना नीट? नाहीतर दोघं आमच्या घरी चला." निघताना मिथिला म्हणाली. सगळ्यांचेच डोळे झोपेने जड व्हायला लागल्यावर ते तिकडून निघाले. 

"हो डोन्ट वरी. मी शुद्धीवर आहे की." तो हसत म्हणाला. तो कॅब थांबवायचा प्रयत्न करत होता. पण एवढ्या रात्री कॅब मिळणंही कठीणंच होतं.

"समीर,  तू मागे बस, मी तुला घेऊन जाते घरी." सानिका बाईकवर बसल्याची ऍक्टिंग करत त्याच्यासमोर येऊन उभी होती. तोंडाने डुर्रर्र डुर्रर्र आवाज काढणं चालू होतं तिचं. समीर आणि मिथिला दोघं तिच्याकडे बघत होते. मिथिलाला सवय होती. सानिकाला किती लगेच चढते ह्याची कल्पना होती तिला. पण समीर, तिच्या ह्या नवीन रूपाने पुरता चक्रावून गेला होता. नेहमी तिच्या वागण्यात असलेली अलिप्तपणाची भिंत आज मोडून पडली होती. एखाद्या लहान मुलीसारखी बागडली होती ती.

शेवटी एक कॅब त्यांच्यासमोर येऊन थांबली. समीर सानिकाची समजूत घालत तिला कॅबमध्ये बसवत होता. त्याने मिथिलाला बाय केलं आणि त्यांची कॅब निघाली. मिथिला त्या जाणाऱ्या कॅबकडे बघून समाधानाने हसली. खूप वर्षांनी ती तिच्या लाडक्या मैत्रिणीला एवढं खुश पाहात होती.

क्रमशः!

🎭 Series Post

View all