चंद्र आहे साक्षीला! - भाग २४

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग २४ 

मागच्या भागात : 

'असा काय हा, ह्याला मला बघून आनंद नाही झालाय का?' सानिका स्वतःच्याच विचारात हरवलेल्या समीरकडे अपेक्षेने बघत होती. )

"समीर? असा दारात का उभा आहेस? आत ये ना." सानिका म्हणाली. तो अजूनही शॉक मध्येच होता. तंद्रीतच जाऊन तो समोरच्या खुर्चीवर बसला. 

"सानिका चहा दे ना विश्वासला. वाट बघतोय तो." चौधरीकाकू तिला चिडवत म्हणाल्या. सानिकाने जाऊन त्याच्यासमोर चहाचा ट्रे धरला. विश्वास चहाचा कप घ्यायचा सोडून तिच्याकडे बघत होता. 

"रागावणार नसशील तर एक सांगू का?" विश्वासने विचारलं.

"प्रयत्न करेन मी न रागवायचा." सानिका उपहासाने म्हणाली. 

"तुझ्या गालावरची खळी खूपच छान आहे. तू हसल्यावर बघत राहावंसं वाटतं." तो काहीसा लाजतच म्हणाला. समोर बसलेल्या समीरचा रागाने तिळपापड होत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला.

"थँक यु." सानिका खोटं हसत म्हणाली. उरलेला एक चहाचा कप घेऊन ती समीरसमोर आली. 

"मला नकोय. विश्वासला अजून एक कप हवाय का विचार." तिच्याकडे न बघता तो बोलला. सानिकाला आता हळूहळू गोष्टींचा उलगडा होत होता.  

"समीर मी तुला नंतर सगळं सांगते. तुला वाटतंय तसं काही नाहीये. हा काहीतरी गैरसमज झालाय." ती हळू आवाजात कुजबुजली. तरी तो तिच्याकडे बघायलाच तयार नव्हता. नाईलाजाने ती ट्रे ठेऊन जाऊन बसली.

"मुंबईमध्ये कुठे राहायला असतेस तू?" विश्वासने पुढचा प्रश्न विचारला. 'ह्याला काय करायच्यात नसत्या चौकश्या.' समीरने मनात विचार केला.

"जोगेश्वरी. तू कुठे असतोस?" सानिकाने उगाच विचारलं. समीरच्या चेहऱ्यावरचे बदलत चाललेले भाव बघून तिला हसायला येत होतं..

"मी काय म्हणते, आपल्यासमोर बोलायला पोरांना कठीण जात असेल. त्यांना बाहेर जाऊ दे का? म्हणजे दोघं मनमोकळेपणाने बोलतील." चौधरीकाकूनी सुचवलं. 'ह्या आणि ह्यांची लेक माझ्या राशीला का आलेत कळत नाही. असो, सानिका जाणारंच नाही ह्या चोम्याबरोबर बाहेर' समीरचं अजूनही स्वतःशीच बोलणं चालू होतं.

"बाहेर कशाला? इकडेच बोलू की. म्हणजे सगळ्यांनाच बोलता येईल." सानिका थोडी वैतागून म्हणाली. तिच्या वैयक्तिक आयुष्यात कोणी एवढी ढवळाढवळ करायची तिला सवय नव्हती. तिचा पेशन्स आता संपत चालला होता. आशाताईंनी ते ओळखलं आणि तिला काहीतरी कारण काढून आत घेऊन गेल्या.

"सानू मी काय म्हणते, तू जाऊन ये ना थोडावेळ बाहेर त्याच्याबरोबर. इकडे गावात सगळे एकमेकांना ओळखतात. उगाच नाती कशाला खराब करायची. मी कुठे म्हणतेय त्याच्याशी लग्न कर. बोलून झालं की नाही सांगून टाक तुला नाही पटलं तर. पण घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करणं बरं नाही ना." त्या तिला समजावत होत्या. खूप आढेवेढे घेऊन सानिका तयार झाली आणि तणतणतच बाहेर आली.

"चला जाऊया आपण बाहेर." ती म्हणाली आणि समीर ताडकन उठून उभा राहिला.

"तुम्ही पण येताय का? अचानक असे उभे राहिलात?" विश्वासाने समीरकडे बघून विचारलं, "नाही नेलं असतं तुम्हाला पण माझ्या बाईकवर तीन जणं मावणार नाहीत." त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं.

"हो का? मग एक काम करा, तुम्ही थांबा घरी, मी आणि सानिका जाऊन येतो. तसंही आमच्या ग्रुपमधले सगळे तिची वाट बघतायत." समीर वैतागून म्हणाला. त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे चाललं होतं सगळं.

"समीर तू पुढे हो, मी येतेच ह्याच्याशी बोलून." म्हणून सानिका त्या विश्वासाबरोबर घराबाहेर पडली. तिने नजरेनेच समीरला सॉरी म्हंटलं. 

"पण सानिका.. " तो तिच्या मागोमाग बाहेर आला. त्याच्यासमोरच ते दोघं गाडीवर बसून निघून गेले. 'सानिका त्याच्याबरोबर निघून गेली? आता मात्र हद्द झाली. अशी कशी वागू शकते ही माझ्याशी. इतके दिवस मी हिला भेटायची वाट बघत होतो आणि आज हा विश्वास कुठून उगवला अचानक?' समीर चरफडत त्याची बाईक घेऊन निघाला.

____****____

"काय? आता हा काय नवीन ट्विस्ट?" सानिकाकडून परतलेल्या समीरला वैतागलेलं बघून चंदूने विचारलं. 

"अरे तो मुलगा अचानक समोर उभा केल्यावर तिला नाईलाजाने जावं लागलं असेल त्याच्याबरोबर. एवढं काय त्यात. लग्नाला हो तर म्हणाली नाहीये ना ती." गौतमी समीरला समजावत म्हणाली.

"पण आपलं भेटायचं ठरलेलं ना? आणि तिला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता तर कशाला गेली त्याच्याबरोबर बाईकवर बसून." समीरची चिडचिड चालू होती.

"एक सांगू का तुला समीर? सानिकाच्या मनातल्या भावना समजून घेण्यात तुझी काही चूक नाही झालीये ना? ती इकडे काही कायमची आली नाहीये. तिची सुट्टी संपल्यावर ती मुंबईला निघून जाईल. मग तिला वाटलं असेल तिकडच्याच मुलाशी लग्न करावं. तू तिच्या प्रेमात पडलायस हे.." गौतमीचं वाक्य अर्ध्यातच असताना समीरने तिच्याकडे चमकून बघितलं. 'मी सानिकाच्या प्रेमात पडलोय? छे छे, कसं शक्य आहे हे. मला ती आवडते, तिच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो इथपर्यंत ठीक आहे. पण मी प्रेमात कसा पडेन तिच्या. आम्ही एकमेकांना इतकं ओळखतच नाही अजून.'

"गौतमी, तुला वाटतंय तसं नाहीये. मी काही प्रेमात पडलो नाहीये तिच्या. आपलं भेटायचं ठरलं असताना ती आली नाही ह्याचा राग आलाय मला." समीर चिडून म्हणाला. चंदूने डोक्याला हात लावला.

"अरे मग झाडावर काय तिला आंबे तोडायला घेऊन गेला होतास का? काय सम्या तू पण. मगाशी त्या पोराबद्दल बोलतानाचा तुझा चेहरा बघितलास का? म्हणे प्रेमात नाही पडलोय." चंदू नाईलाजाने डोकं हलवत म्हणाला.

"हे बघ मला मान्य आहे की मला ती आवडते, पण हे प्रेम वगैरे जरा अति होतंय. तीन आठवड्यात कोणी कोणाच्या प्रेमात पडतं का?" समीरने त्याचं बोलणं उडवून लावलं.

"नसेल तर चांगलंच आहे. तसंही ती मुंबईला निघून गेल्यावर तुम्ही थोडीच भेटणार आहात." गौतमी म्हणाली. वेदनेची सूक्ष्म कळ समीरच्या मनात उमटली. 'म्हणजे सानिका मुंबईला गेल्यावर मला परत भेटणारच नाही? ती मला दोन दिवस भेटली नाही तर मला एवढा त्रास होतोय आणि तिला काहीच फरक पडत नाहीये. खरंच गौतमी म्हणतेय तसं मी तिच्या प्रेमात पडलोय? आणि तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल तर?' समीरच्या मनात विचारांनी थैमान घातलं होतं. तेवढ्यात सानिका तिकडे पोहोचली.

"आय एम सो सो सॉरी.. तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलावून मीच उशिरा आलेय. पण सकाळी एवढा गोंधळ झाला त्यामुळे उशीर झाला." सानिका म्हणाली. तिचं लक्ष समीरकडे होतं. तो तिच्याकडे बघतही नव्हता. 

"हरकत नाही. पण हा कोण विश्वास? आणि तू इकडे येऊन मुलं बघतेयस माहिती नव्हतं. लग्न वगैरे करणार आहेस की काय." चंदू म्हणाला.

"करेलच. एवढी एकांतात बोलायला गेली होती त्याच्याशी. होकार देऊनच आली असेल." बोलतानाही समीरला त्रास होत होता. बाकीचे नाईलाजाने मान हलवत होते आणि सानिकाला त्याची चिडचिड बघून हसायला येत होतं. कुठेतरी मनातून सुखावत होती का ती? 

"पहिल्याच भेटीत हो कसं म्हणणार. बघू पुढे. तसा चांगला आहे मुलगा. दिसायला बरा आहे, वागायला बोलायला पण ठीकठाक आहे." सानिका उगाच त्याला चिडवायला म्हणाली. मागच्या वेळीस ती इन्व्हेस्टर आलेली तेव्हा त्यानेही तिला चिडवलं होतंच की. 

"दिसायला बरा आहे म्हणे. काय लाजत होता. हा मुलगी बघायला आलेला आणि स्वतःच लाजत बसलेला. जाऊदे मला काय करायचंय. मी जातोय. मला बाकीची कामं आहेत." म्हणून समीर तिकडून तणतणत निघाला. 

"अरे समीर, थांब.. माझं ऐकून तर घे." सानिकाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो त्याआधीच तिकडून निघून गेला. 

"सानिका तू खरंच लग्नाचा विचार करतेयस का?" गौतमीने तिला विचारलं.

"नाही गं, त्या चौधरीकाकूंनी कोणीतरी मुलगा अचानक आणून समोर उभा केला माझ्या त्यामुळे मला बोलावं लागलं त्याच्याशी. मला काही इन्टेरेस्ट नाहीये त्याच्यात. इन फॅक्ट, आम्ही बाईकवरून निघालो खरं पण घरापासून थोडं पुढे गेल्यावर लगेचच मी त्याला नाही सांगून टाकलं." सानिका म्हणाली.

"का? चांगला होता ना मुलगा? मग हो म्हणायचं की. का अजून कोणी आवडला आहे?" चंदू तिला चिडवत म्हणाला. सानिकाचे गाल उगाच लाल झाले. तिने समीर गेला त्या दिशेने बघितलं. 'एवढा काय चिडला हा. माझ्याशी न बोलताच निघून गेला. मस्करी पण कळत नाही.' आजची त्यांची भेट अपूर्णच राहिली होती.

क्रमशः!

🎭 Series Post

View all