चंद्र आहे साक्षीला - भाग १

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

एम.जी. रोड वरच्या 'गपशप' कॅफेचं दार उघडून एक मुलगी टेचात आत शिरली. साधारण तिशीच्या आसपासची, शिडशिडीत बांधा, मानेवर रुळणारे कुरळे केस, त्यावरच्या गोल्डन हायलाईट्समुळे त्यांना मस्त स्टायलिश लुक आला होता. चेहऱ्यावर थोडाफार मेकअप, लाल रंगाची लिपस्टिक.. तिच्या मूळच्या उजळ कांतीला शोभेल अशी. तिचा ब्रँडेड सूट, हाय हिल्सचे शूज, गळ्याभोवती बांधलेला सॅटिनचा स्कार्फ ह्या सगळ्यावरून ती एखाद्या उच्चभ्रू कुटुंबातली वाटत होती. ह्या सगळ्याहूनही आकर्षक होता तो म्हणजे तिच्या चालीतला आत्मविश्वास. आत शिरल्यावर तिने डोळ्यावरचा काळा चष्मा काढला. तिचे पिंगट डोळे आत बसलेल्या लोकांवरून फिरून शेवटी काउंटरच्या मागे उभ्या असलेल्या मुलीवर स्थिरावले. तिच्याकडे बघून तिने नजरेनेच खूण केली आणि ती कोपऱ्यातल्या सीटवर जाऊन बसली. ती तिकडे जात असताना आजूबाजूला बसलेल्या मुलांच्या नजरा तिला स्वतःवर जाणवल्या. "हं.. बॉईज. सगळे सारखेच!" स्वतःशीच बोलत ती तिच्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसली आणि तिने तिचा लॅपटॉप उघडला. मोजून ५ मिनिटांनी मगाशी काउंटरमागे उभी असलेली मुलगी तिची कॉफी आणि एक छोटं सँडविच घेऊन आली. 

"मिस. सानिका? तुमची कॉफी आणि सँडविच." त्या मुलीने हसून ते समोरच्या टेबलवर ठेवलं, तसं सानिकाने लॅपटॉपमधून वर डोकं काढलं. 

"थँक यु सई. सकाळची ही एकच अशी वेळ आहे जेव्हा काहीही सूचना न देता मला हवं ते बरोबर मिळतं. नाहीतर दिवसभर सगळे मूर्खच बांधले असतात माझ्या राशीला." सानिका हसून म्हणाली. तशी सई मान डोलावून तिकडून निघून गेली आणि सानिका पुन्हा तिच्या लॅपटॉपमध्ये बुडाली. नजर लॅपटॉपवर ठेऊनच तिने कॉफीचा पहिला घोट घेतला. त्या पहिल्या घोटानेच तिची सगळी मरगळ गेली. पहाटेपर्यंत एका प्रेझेंटेशनवर काम करत बसल्यामुळे तिची झोप झालीच नव्हती. तरीही चेहऱ्यावरचा थकवा दिसू न देता तिला आज ऑफिसमध्ये जाऊन उरलेलं काम पूर्ण करायचं होतं. उद्याचा दिवस खूपच महत्वाचा होता.. तिच्या करिअरसाठी. 'जर मि. मेहेतांचं हे डील मी कंपनीला मिळवून दिलं तर ह्यावर्षीचं प्रमोशन माझंच. त्या वाळिंबेला काय करायचं ते करू दे.' स्वतःशीच विचार करत तिने दातओठ खात समोरच्या फाईल्स नजरेखालून घालायला सुरवात केली. तेवढ्यात वाजलेल्या फोनने तिचं लक्ष वेधलं. 

"गुड मॉर्निंग आई. मला वाटलं आज फोन करायला विसरलीस की काय." सानिका हसून म्हणाली. 

"अशी कशी विसरेन. दिवसातून हा फोन ठरलेला असतो ना आपला. नंतर तुझा कुठे पत्ता असतो काही. एकदा कामात बुडालीस कि आपली एक म्हातारी आई आहे ह्याचं पण भान नसतं तुला." समोरून आशाताईंचा आवाज ऐकून सानिकाने नाईलाजाने मान हलवली. 

"निघालीस का ऑफिसला? नाश्ता केलास का?" आशाताईंनी पुढे विचारलं. 

"हो तेच करतेय आता. काय गं आई, बॉयफ्रेंड सारखे प्रश्न काय विचारतेस तू मला. जेवलीस का, झोपलीस का, नाश्ता केलास का." सानिका हसून म्हणाली. 

"आता तू बॉयफ्रेंड शोधत नाहीस म्हणून मलाच विचारावं लागतं. दुसरा कोणी असेल विचारणारा तर तसं सांग मला, मग मी नाही विचारणार." आशाताई तिला चिडवत म्हणाल्या. 

"झालं का तुझं सुरु आई. तूच विचार मला, तेवढ्यासाठी बॉयफ्रेंड कुठे शोधू मी. आधीच दिवसभर लोकांच्या बावळट प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. त्यात अजून एका बावळटाची भर नको." सानिका कॉफीचा घोट घेत म्हणाली. 

"हो गं बाई, अख्या जगात तू एकटी तेवढी शहाणी आहेस, बाकी सगळे बावळट. बरं मी तुला सांगायला फोन केला की मी संध्याकाळी घरी नसणार आहे. आमची वाडीतल्या बायकांची आज ड्रिंक्स पार्टी आहे. तू संध्याकाळी फोन केलास आणि मी उचलला नाही तर काळजी करत बसशील म्हणून सांगून ठेवलं." आशाताई उत्साहाने सांगत होत्या. 

"आई? तुमची ड्रिंक्स पार्टी आहे? त्या वाडीतल्या कुंटे काकू नववारी नेसून फिरतात सगळीकडे आणि त्या दारू पिणार आहेत? आणि मुळात तू हे कधी चालू केलंस?" त्यांचं बोलणं ऐकून सानिकाच्या हातातला कप धक्क्याने खाली पडणार होता. 

"अगं ड्रिंक्स म्हणजे कैरीचं पन्हं आणि कोकम सरबत असणार आहे गं. गावात सगळ्यांच्या बागेतली कोकमं आणि कैऱ्या उतरवल्या आहेत ना आता उन्हाळ्यासाठी. म्हणून आम्ही आमची छोटीशी पार्टी करणार आहोत." आशाताई निरागसपणे म्हणाल्या आणि सानिकाला हसायला आलं. 

"बरं बरं. करा ड्रिंक्स पार्टी तुम्ही. मला आज रात्री उशीरच होईल, उद्या प्रेझेन्टेशन आहे ना महत्वाचं. ते एकदा झालं की मी मस्त आराम करणार आहे." सानिका म्हणाली. 

"तू आणि आराम? तोंड बघ आरशात. शेवटची सुट्टी कधी घेतली आहेस तू आठवतंय तरी का? काम वगैरे ठीक आहे पण जरा जीवाला आराम दे गं. शेवटी माणूस कमावतो कशासाठी?" आशाताई लेकीला समजावत म्हणाल्या खरं पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये हे त्यांना आधीच माहिती होतं. 

"बरं बाई, तू इकडे ये, मग मी सुट्टी घेते. चल आता ठेवते, ऑफिसला पोहोचायची घाई आहे जरा." सॅन्डविचचा शेवटचा तुकडा तोंडात कोंबत सानिका म्हणाली आणि तिने फोन ठेवला. 

कॅफेवरून ऑफिसपर्यंतचा रस्ता खरंतर वीस मिनिटांचाच होता पण सकाळच्या ट्रॅफिकमुळे सानिकाला जवळ जवळ पाऊण तास लागला. त्यात मार्च संपत आलेला. गाडीत ए.सी. असताना पण तिला बाहेरच्या उन्हाची झळ जाणवत होती. दर दोन मिनिटांनी हातातल्या घड्याळाकडे नजर टाकत, रस्त्यातल्या ट्रॅफिकवर चरफडत कशीबशी ती ऑफिसला पोहोचली. आत शिरल्या शिरल्या ऑफिसमधला शिपाई, रमेश, तिची बॅग घ्यायला धावत पुढे आला. 

"गुड मॉर्निंग मॅडम, चहा पाठवू का केबिन मध्ये?" रमेशने अदबीने विचारलं. सानिकाच्या स्वभावाला ऑफिसमधले सगळेच टरकून असायचे. त्यात सध्याचं महत्वाचं प्रोजेक्ट चालू असताना सानिकाचा मूड ऊंच कड्याच्या टोकावरून हळूहळू खाली घसरत जाणाऱ्या दगडांसारखा झाला होता. कडेलोट होणार हे निश्चित होतं फक्त त्याला आपण जबाबदार नको म्हणून ऑफिसमधले सगळेच तिच्या अवती भोवती सांभाळून वागायचे. 

"नको. टीमला मीटिंग रूममध्ये पाठवा, मला महत्वाचं बोलायचं आहे." म्हणून सानिका तिच्या केबिनमध्ये गेली. तिकडच्या काही फाईल्स घेऊन ती तडक मीटिंग रूममध्ये निघाली. 

मोजून दहा मिनिटांनी मीटिंग रूममध्ये दहा लोकं दाटीवाटीने बसली होती. समोरच्या मोठ्या स्क्रीनवर प्रेझेन्टेशन चालू होतं. सानिकाचे डोळे त्यावर खिळलेले आणि बाकी सगळ्यांचे त्यांच्या समोर ठेवलेल्या फाइल्सवर. सगळेच सानिकाची नजर टाळत होते. 

"रश्मी, उद्याच्या क्लायंट मीटिंगसाठी भिंग पण घेऊन ये." सानिका उपहासाने म्हणाली तसे कोपऱ्यात बसलेल्या रश्मीचे हात थरथरायला लागले. 

"काय झालं मॅडम?" ती रडकुंडीला येत म्हणाली. 

"मला तू उभी आहेस तिथून हे काय लिहिलंय ते वाचून दाखवतेस का जरा?" सानिका हाताची घडी घालून दीर्घ श्वास घेत म्हणाली. कडेलोटाचा क्षण जवळ येत चालला होता. रश्मी मान खाली घालून उभी होती. पाच मिनिटं रूममध्ये स्मशान शांतता पसरली. रूममध्ये बसलेल्या सगळ्यांनाच ती पाच मिनिटं पाच वर्षांसारखी वाटली. 

"मी गेला महिनाभर ओरडून सांगते आहे की उद्याचं प्रेझेन्टेशन ह्या टीमसाठी किती महत्वाचं आहे. तरी आज चोवीस तास आधी मला तुम्हाला इतक्या सध्या गोष्टी का सांगाव्या लागतायत? आपण एवढ्या कष्टाने बनवलेलं प्रेझेन्टेशन क्लायंटला वाचताच आलं नाही तर काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला कोणालाच जबाबदारीची जाणीव का नाहीये? हे काय माझं एकटीचं काम आहे का? पगार तुम्हाला सगळ्यांनाच मिळतो ना? नाही म्हणजे ऑफिसच्या वेळेच्या बाहेर तर कामं करतच नाही तुम्ही पण ऑफिसमध्ये असताना तरी कामं करत जा स्वतःची. वाढदिवस साजरे करायला, ऑफिसनंतर ड्रिंक्सला जायला, पार्ट्या करायला बरा वेळ मिळतो तुम्हाला." सानिका वैतागून बोलत होती. समोर सगळे अजूनही शांतच होते. 

"आज काय मी एकटीनेच बोलायचं आहे का? सागर कुठे आहे? बजेटची फाईल त्याच्याकडे आहे ना? मला ते सगळं एकदा नजरेखालून घालायचं आहे. उद्या सगळ्यांसमोर मला काही प्रॉब्लेम नकोय." सानिका रूममध्ये नजर फिरवत सागरला शोधत म्हणाली

"मॅडम तो आज सुट्टीवर आहे. त्याच्या बायकोची तब्येत बरी नहिये, प्रेग्नेंट आहे ना ती." रश्मी चाचरत म्हणाली. आपल्यावरचा राग आता दुसरीकडे वळणार म्हणून तिला थोडं हायसं वाटत असलं तरी सागरसाठी वाईटही वाटत होतं. 

"व्हॉट? तो आज सुट्टीवर आहे? त्याचं काम उद्याच्या प्रेझेन्टेशन मध्ये किती महत्वाचं आहे माहिती आहे ना त्याला? मग आजच त्याला सुट्टीवर जायचं होतं? बायकोला बरं नाहीये तर अजून कोणीच नव्हतं का घरी त्याच्या? सगळी नुसती कारणं! काम पूर्ण झालं नसेल म्हणून बायकोच्या नावावर सुट्टी घेऊन मोकळं व्हायचं. त्याला फोनकरून बजेटची फाईल मला ई-मेल करायला सांगा. पुढच्या पंधरा मिनिटांत मला त्याचे प्रिंट्स माझ्या टेबलावर हवे आहेत. तसं नाही झालं तर पुन्हा कधीच माझ्या टीममध्ये तोंड दाखवायची गरज नाही असं स्पष्ट सांगा त्याला." सानिका रश्मीकडे बघत म्हणाली. 

"मी फोन करू मॅडम?" रश्मीला वाटलेला दिलासा क्षणात नाहीसा झाला. कोणाशी एवढं कठोरपणे बोलणं तिला बाप जन्मात जमणार नव्हतं. 

"छे छे, असली कामं तुला कशी सांगेन मी. एक काम कर, तू माझ्या केबिनमध्ये जाऊन बस, हे फोन वगैरे मी करते. चहा वगैरे पाठवू का तुझ्यासाठी?" सानिका पुन्हा रुक्षपणे म्हणाली आणि रश्मीच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहायला लागलं. तिच्याकडे दूर्लक्ष करून सानिका मिटिंग रूममधून बाहेर पडली आणि तिच्या केबिनमध्ये गेली. 

( कसं होईल सानिकाचं उद्याचं प्रेझेंटेशन? त्या प्रेझेन्टेशनमुळे तिच्या आयुष्याला काय कलाटणी मिळेल? पाहूया पुढच्या भागात!)

क्रमशः!

🎭 Series Post

View all