चंद्र आहे साक्षीला - भाग १९

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग १९ 

"सानू, अगं लवकर खाली ये गं. उठलीस की नाही अजून." आशाताईंचा आवाज ऐकून सानिका डोळे चोळतच खाली आली. 

"सकाळी ६ वाजता एवढी का ओरडतेयस?" सानिका आली तेव्हा चंदू, गौतमी, गोपाळ, लावण्या समोर बसले होते. सानिकाने एकदा त्यांच्याकडे आणि स्वतःच्या अवताराकडे पाहिलं. ते सगळे छान कुठल्यातरी पिकनिकला चालल्यासारखे आवरून आलेले आणि सानिका मात्र नाईटड्रेस मध्ये होती. 

"तुम्ही सगळे इकडे? एवढे तयार होऊन?" तिने गोंधळून विचारलं.  

"विसरलीस ना? आपला प्लॅन ठरलेला ते." मागून आलेल्या आवाजाने तिने गोंधळून बघितलं. समोर खाकी ट्राऊझर्स आणि कॅज्युअल व्हाईट शर्ट घालून समीर उभा होता. 'एवढ्या भल्या पहाटेही हा इतका कसा फ्रेश आणि हँडसम कसा दिसू शकतो' तिने स्वतःशीच विचार केला. त्या विचाराने आणि आपण त्याच्यासमोर मिकीमाऊसची चित्र असलेला नाईटड्रेस घालून उभे आहोत ह्या कल्पनेने तिचा चेहरा लाल झाला. 

"मिकी माऊस, हाऊ क्युट. माझं फेवरेट कार्टून आहे." तिच्या मनातले भाव ओळखून समीर म्हणाला. सानिकाने पटकन त्याची नजर चुकवली. तिचा राग अजूनही पूर्ण गेला नव्हता. 

"सानू अशी कशी विसरलीस तू. तुमची बीच पिकनिक ठरली आहे म्हणे आज. सगळे इकडे पोहोचले आणि तू अजून तयार पण नाही झालीस?" आशाताई लेकीच्या वेंधळेपणावर नाराज होत म्हणाल्या.

"तू तयार हो, मी तुला सांगतो सगळं." मागे उभा असलेला समीर तिच्या कानाजवळ कुजबुजला. त्याचा श्वास तिला तिच्या मानेवर जाणवला तशी ती शहारली. जास्त आढेवेढे न घेता ती आवरायला निघून गेली. मुंबईहून निघताना तिने घेतलेला एक पायघोळ स्लिव्हलेस ड्रेस तिने चढवला. पांढऱ्या रंगाच्या त्या मऊसूत कॉटनच्या ड्रेसवर निळ्या रंगाची नाजूक फुलं होती. तिचे कुरळे केस तिने थोडेसे विंचरून मोकळे सोडले होते. त्याच्या छोट्या बटा तिच्या कपाळावर स्थिरावल्या होत्या. ओठाला हलकीशी लिपस्टिक आणि गळ्यात ड्रेसला मॅचिंग असा निळा स्कार्फ घालून ती खाली आली तेव्हा जिन्यापाशी उभा असलेला समीर तिच्याकडे पाहातच राहिला. त्याच्याकडे चोरटे कटाक्ष टाकत ती जिन्यावरून खाली आली. बाकी सगळेही निघण्यासाठी उठले.

"चला आता. बघायला अख्खा दिवस आहे. इकडे सासूबाईंना शंका यायच्या आधी निघूया आपण." चंदूने हरवलेल्या समीरच्या पोटात कोपर मारत म्हंटलं. तसा तो भानावर आला. 

घराबाहेर तीन बाईक उभ्या होत्या. समीरने अर्थातच सगळी सेटिंग लावली असल्यामुळे सानिका त्याच्यामागे बसणार हे निश्चितच होतं. काही वेळ ती त्याच्या बाइकसमोर घुटमळली आणि शेवटी बाईकवर मागे बसली.

"आता तरी सांगणार आहेस का मला हे सगळं काय चाललंय?" तिने विचारलं.

"हो सांगतो की. त्याचं काय आहे मी गेले दोन दिवस माझ्या एका खास मैत्रिणीबरोबर फिरत होतो. ती पण मुंबईवरूनच आलेली. मग चंदू मला म्हणाला तिला एवढं आपलं गाव दाखवलं मी आणि तुला काहीच नाही दाखवलं तर बरोबर नाही वाटणार ना. म्हणून मी म्हंटलं ठीक आहे. तुला पण थोडं फिरायला घेऊन जाऊया." समीर तिला चिडवत म्हणाला.

"हो का? एवढी दया दाखवायची काही गरज नाहीये. मी माझी माझी फिरू शकते." सानिका फणकाऱ्याने म्हणाली. 

गावातून बाहेर पडताच कच्चा रस्ता सुरु झाला. आधारासाठी नकळत सानिका समीरच्या खांद्यावर झुकली. दोन्ही हातांनी तिने त्याला घट्ट पकडलं होतं. त्याच्या हाताचे आणि खांद्याचे टोन्ड मसल्स तिला त्याच्या शर्टमधूनही जाणवत होते. बाईकवरून फिरायची सवय नसल्याने ती आधीच बिथरली होती. त्यात खराब आणि वळणा वळणाच्या रस्त्यावरून जाताना तिला अजूनच भीती वाटत होती. तिचा घाबरलेला चेहरा बघून समीरला मजा येत होती. 

"जरा हळू चालव ना गाडी. तुला नसेल पण मला माझ्या जीवाची पर्वा आहे. गर्लफ्रेंडबरोबर फिरताना तर अगदी सांभाळून चालवत होतास गाडी." सानिका म्हणाली. साईड मिरर मधून तो तिच्या चेहऱ्यावरची निराशा बघत होता.

"हो मग, ती स्पेशल आहे. तिला काही झालं तर केवढं नुकसान होईल माझं. मी सहनच नाही करू शकत ते. सध्या ती खूपच महत्वाची आहे माझ्या आयुष्यात." समीर अजूनही मस्करीच्या मूड मध्येच होता. तिला होत असलेला त्रास बघून तो मनातून सुखावत होता.

"हो का? एवढी महत्वाची आहे तर तिला बोलवायचं ना इकडे. माझा जीव कशाला धोक्यात टाकतोयस. गाडी थांबव बघू तू आधी. मला उतरायचंय." सानिकाने त्याला गाडी बाजूच्या एका वळणावर थांबवायला लावली आणि ती गाडीवरून उतरली. बाकीचे एव्हाना बरेच मागे पडले होते.

"अगं इथे मध्येच कुठे उतरतेस. मी मज्जा करत होतो." बाईकला स्टॅन्ड लावत समीर म्हणाला. 

"मी परत चाललेय. मला नाही जायचं कुठे तुझ्याबरोबर." म्हणून सानिका जायला निघाली तसा समीरने तिचा हात धरला. माघारी निघालेल्या सानिकाची पाऊलं थांबली.

"कोणीतरी जेलस होतंय का?" समीरने तिच्या डोळ्यांत बघत विचारलं.

"जेलस? आणि मी? ओह प्लिज." सानिकाने डोळे फिरवत म्हंटलं.  

"खरंच नाही होत आहेस का जेलस?" तिच्या हातावरची पकड घट्ट करत समीरने दोन पाऊलं तिच्या दिशेनं टाकली. त्याला इतकं जवळून बघताना सानिकाही गोंधळून गेली होती.

"हो म्हणजे थोडं वाटणारंच ना. मी तुझी एवढी लहानपणापासूनची मैत्रीण आणि मला काही महत्त्वच देत नाहीस तू." तिने उगाच काहीतरी उत्तर दिलं.

"लहानपणापासून तर गोपाळ पण आहे माझा मित्र. पण तो नाही चिडलाय माझ्यावर." समीरने विचारलं. 

"मग गोपाळला बसवायचं ना मागे बाईकवर. मला कशाला बसवलंस." सानिकाने चिडून त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि ती उलट्या दिशेने चालायला लागली 

"रिया शर्मा. इन्व्हेस्टर होती ती." समीरने ओरडून सांगितलं. तशी सानिका पुन्हा थांबली.

"आपल्या गावातल्या उद्योगांच्या प्रमोशनसाठी मी मुंबईमधले काही इन्व्हेस्टर्स शोधत होतो. तेव्हा तिचा कॉन्टॅक्ट मिळाला. इथल्या कोणत्याही उद्योगांत इन्व्हेस्ट करायच्या आधी तिला इकडे बनवल्या जाणाऱ्या वस्तूंची, पदार्थांची क्वालिटी चेक करायची होती. म्हणून मी तिला घेऊन गावात फिरत होतो." समीर म्हणाला.

"ओह तरी मला वाटलंच ती तुझ्या टाईपची नाहीये." त्याच्यासमोर उभी रहात सानिका म्हणाली. अचानक तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं.

"अच्छा? मग कोण आहे माझ्या टाईपची मुलगी?" समीरने हसून विचारलं. 

"मला वाटतं तुझी आणि लतिकाची जोडी छान वाटेल." सानिका त्याला चिडवत म्हणाली. तिचा राग आता कुठल्याकुठे पळाला होता.

"हंsss.. राग गेलेला दिसतोय आता." समीर हसत म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आलेलं हसू पाहून त्याचा जीव भांड्यात पडला होता.

"मला कुठे राग आलेला. चल आता. टाईमपास करत बसू नकोस. उगाच उशीर होईल." बाईकवर मागे बसत सानिका म्हणाली आणि समीरने स्वतःशीच हसत बाईक चालू केली.

काही वेळातच ते एका सुंदर बीचवर पोहोचले. मनुष्यवस्तीपासून लांब असलेल्या ह्या निर्जन समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य काही औरच होतं. दूरवर पसरलेला अथांग समुद्र, त्या पलीकडून डोकावत असलेला सूर्याचा तांबडा गोळा, त्याच्या सोनेरी किरणांमध्ये न्हाऊन निघालेल्या समुद्राच्या लाटा, किनाऱ्यावरच्या वाळूत रुतलेल्या असंख्य शिंपल्यांवरून परावर्तित होत असलेली सोनेरी किरणं, लाटांची गाज.. डोळ्याचं पारणं फिटेल असा होता तो नजारा. त्यांच्या पाठोपाठ बाकीचेही तिकडे पोहोचले. बरोबर आणलेल्या चटया त्यांनी जवळच वाळूत पसरल्या. चहाचे थर्मास बाहेर आले आणि त्या बरोबर ओले काजू आणि बाकीचा सुका मेवा सुध्दा.. बरोबर आणलेल्या बाकीच्या पदार्थांवर ताव मारत त्यांची पिकनिक सुरु झाली. वेगवेगळे गेम्स खेळण्यात, मनमोकळं हसण्यात, भरपूर गप्पा मारण्यात वेळ कसा गेला कोणालाच कळलं नाही. संध्याकाळचा परतीचा सूर्य त्यांचा निरोप घ्यायला पुन्हा एकदा आला. तीच सोनेरी किरणं, तेच तेज.. सानिका त्या नयनरम्य देखाव्यात हरवली होती आणि समीर तिच्या चेहऱ्यात.

"किती सुंदर जागा आहे ही. इकडून जाऊच नये असं वाटतंय. मुंबईमध्ये मी इतके वेळा समुद्रावर गेलेय, पण इकडची शांतता तिकडे नाही मिळाली कधी." ती म्हणाली.

"शांतता बाहेर नाही माणसाच्या मनात असली पाहिजे. तुमच्या मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळ कुठे आहे तुम्हाला जरा थांबून कुठल्याही गोष्टीचं सौंदर्य अनुभवायला. घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत असता तुम्ही सारखे." समीर म्हणाला.

"अच्छा? तुला कसं माहिती?" सानिकाने विचारलं.

"कसं म्हणजे? मी राहिलो आहे मुंबईला ३ वर्ष. माझं ग्रॅज्युएशन तिकडेच झालं. त्यानंतर २ वर्ष बेंगलोरला आणि २ वर्ष अमेरिकेला होतो मी. बिझनेसमधली ऍडव्हान्स डिग्री मिळवायला. तिकडे वर्षभर काम करून अनुभव घेऊन आलो परत. बाहेर सगळीकडे पैसा, सुखसोयी सगळं मिळालं पण इकडे असणारा कम्फर्ट नाही मिळाला. तेव्हाच ठरवलं काम आपल्या गावात राहूनच करायचं. बाबांनी चालू केलेला बिझनेस पुढे न्यायचा. आताही बरेच बिझनेस कॉन्टॅक्टस आहेत अमेरिकेत. कधी जायचा योगही येतो तिकडे. पण तिकडे गेल्यावर ओढ मात्र घरचीच लागली असते. आईच्या हातचं जेवण जेवल्याशिवाय पोटच भरत नाही माझं." समीर म्हणाला. सानिका आश्चर्यचकित होऊन ऐकत होती. हा एवढा शिकून, जग फिरून शेवटी इकडे येऊन स्थगित झाला आहे? आणि ह्या गावात राहून त्याने एवढा मोठा बिझनेस वाढवला आहे? तिला त्याच्याबद्दल वाटणारा आदर अजूनच वाढला. 

"मी कॉलेजला होतो तेव्हा आम्ही ही जागा शोधून काढली. इकडे यायचा रस्ता जंगलातून जातो त्यामुळे फार लोकं नसतात इकडे. जास्त कोणाला ही जागा माहिती पण नाहीये. म्हणूनच ही इतकी सुंदर आणि शांत आहे." थोडावेळ शांततेत गेल्यावर समीर तिला म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं. वाऱ्याने तिचे कुरळे केस सैरभैर होऊन तिच्या चेहऱ्यावर आलेले, ते मागे करायची तिची झटपट चालू होती. समीरचा हात त्याच्याही नकळत तिच्या चेहऱ्याकडे गेला. तिच्या चेहऱ्यावरचे केस त्याने अलगद तिच्या कानामागे अडकवले. "खरंच खूप सुंदर आहे" तिच्याकडे बघत तो म्हणाला तेवढ्यात मागून त्याला खोकण्याचा आवाज आला. चंदू त्यांना बोलवायला आलेला. सानिका आणि समीर पटकन सावरून बसले. 

"खरंच खूप सुंदर आहे ही जागा. असं म्हणायचं होतं मला." समीर म्हणाला. सानिकानेही संमत्ती साठी मान हलवली. 

"हां, मला येडा बनवून झालं असेल तर चला आता. काय पण बोलतोस सम्या!" चंदू तिकडून निघून गेला आणि पाठोपाठ ते दोघंही जायला निघाले. 

"समीर तू पुढे हो, मी पटकन एक फोटो काढून आले." सानिका म्हणाली. समोरचं सुंदर दृश्य कॅमेरामध्ये टिपण्यासाठी फोन काढायला तिचा हात तिच्या बॅगेकडे गेला आणि अचानक ती स्तब्ध झाली. गेल्या कित्येक वर्षांत आज पहिल्यांदाच ती तिचा फोन घरी विसरली होती आणि दिवसभर तिला त्याची जाणीवही झाली नव्हती.

क्रमशः!

🎭 Series Post

View all