चंद्र आहे साक्षीला - भाग १८

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग १८ 

सानिकाचे गावातले दिवस मजेत चालले होते. कधीनव्हे ती तिच्या कामापलीकडे बाकीच्या गोष्टींना वेळ देत होती. गावातल्या लोकांशी पण तिची चांगली ओळख झाली होती. खास करून तिने राबवलेल्या 'डिजिटल पेमेंट' अभियानामुळे तर गावातले सगळेच तिला ओळखायला लागले होते. त्या यशस्वी उपक्रमांनंतर तिने दिवसातून एक-दोन तास गावातल्या शाळेत जायला पण सुरवात केली होती. तिकडच्या मुलांना गुंतवणुकीचे धडे देण्यासाठी. शाळेच्या प्राध्यापकांनी खास तिला रिक्वेस्ट करून बोलवून घेतलं होतं त्यासाठी. अर्थात त्यातून फार पैसे मिळत नसले तरी तिला समाधान मिळत होतं. ही भावना तिच्यासाठी नवीन होती. चंदू, लावण्या, गोपाळ, गौतमी ह्यांच्याशी पण तिची खूप छान मैत्री झाली होती. मुंबईमध्ये असताना स्वतःला कामात बुडवून घेतलेल्या सानिकाला मिथिला शिवाय कोणी मैत्रीणच नव्हती. पण इथे हे सगळे तिच्या वयाचे होते. त्यांच्याबरोबर संध्यकाळी भेटून पारावर गप्पा  मारणं, नारळ सुपारीच्या बागांमध्ये फिरायला जाणं सानिकाला आवडत होतं. मुंबईत एकटी राहून एकलकोंडी आणि माणूसघाणी झालेल्या सानिकाला इकडे येऊन तिच्या आसपासची माणसांची गजबज आवडायला लागली होती. गावात झालेल्या मवाल्यांच्या प्रसंगाला पण ४-५ दिवस होऊन गेले होते. पुन्हा ते गावात दिसले नव्हते त्यामुळे लोकंही झाल्या प्रकाराबद्दल विसरली होती आणि सानिकाही.

"आज समीर नाहीये का?" सानिकाने विचारलं. सगळे एका संध्याकाळी पारावर भेटले होते. दोन दिवस झाले समीरचा काही पत्ता नव्हता त्यामुळे सानिकाला जरा विचित्र वाटत होतं. नाहीतर या गावात आल्यापासून एकही दिवस असा गेला नव्हता जेव्हा तो तिला भेटला नव्हता. 

"तो काय मोठा साहेब आहे बाबा. वेळ नसतो त्याच्याकडे. पण तू का विचारतोयस ? आठवण वगैरे येतेय की काय त्याची." चंदू तिला चिडवत म्हणाला. तशी सानिकाची कानशिलं एकदम गरम झाली.

"ए चंदू, काहीही काय बोलतोस, ती कशाला मिस करेल सॅमीला. मिस तर मी करतेय." लतिका लगेच फुरंगटून म्हणाली. पण सानिकाचं तिकडे लक्ष नव्हतं. ती तिच्याच विचारात हरवलेली. 'कुठे गेला असेल हा? एरवी तर कॉल/मेसेज करतो इतके वेळा. मीच फोन करू का?' तिकडून निघत तिने त्याला फोन लावला पण त्याने उचलला नाही. शेवटी ती घरी येताना त्याच्या घरी गेली. त्याचे बाबा अंगणातच बसले होते. 

"नमस्कार काका, समीर आहे का घरी?" तिने दारातून आत शिरत विचारलं.

"नाही गं, त्याची कोणीतरी मैत्रीण आली आहे मुंबईवरून तिच्याबरोबर बाहेर गेलाय तो. तू ये ना, बस. मी हिला बोलावतो." ते म्हणाले. 

"नाही नको, मी सहजच आले होते. जरा घाईत होते. नंतर येते निवांत." म्हणून सानिका हिरमुसली होऊन निघाली. 'असा काय हा. एक फोन उचलायला पण वेळ नाहीये का ह्याला. एवढी कोण मैत्रीण आलीये? मला नाही घेऊन गेला कधी फिरायला इतके दिवसांत.' मनाशी विचार करत ती गावाच्या मुख्य चौकात आली. रस्ता क्रॉस करून येत असताना तिला समोरून समीरची बाईक येताना दिसली. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. पण त्याचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो त्याच्या मागे बसलेल्या मुलीशी काहीतरी बोलण्यात मग्न होता. दोघं अगदी हसत खिदळत बाईकवरून फिरत होते. सानिकाने त्या मुलीकडे ओझरतं बघितलं. टाईट शॉर्ट टॉप, जीन्स आणि हाय हिल्सच्या सँडल्स घालून समीरला खेटून बसली होती ती. सानिकाने ओशाळून दुसरीकडे बघितलं. समीरच्या आयुष्यात कोणी मुलगी आहे ह्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं. निराश होऊन ती घरी आली. दुसरा दिवस संपत आला तरी समीरचा काहीच पत्ता नव्हता. सानिकाने दहा वेळा फोन चेक केला पण प्रत्येकवेळेला तिच्या पदरी निराशाच पडली.

"एवढी काय त्या फोनला चिकटून बसली आहेस? कामाचा फोन येणार आहे का?" आशाताईंनी आपल्या अस्वस्थ झालेल्या लेकीकडे पाहात विचारलं. 

"नाही गं. कामाचा फोन कशाला येईल मला. असाच कंटाळा आलाय म्हणून बघत होते." सानिका म्हणाली. दिवसाची रात्र झाली. सानिका अजूनही समीरचा आणि त्या मुलीचाच विचार करत होती. 'हे काय चाललंय माझं. एवढा का विचार करतेय मी. कोणाबरोबर का फिरेना तो. तसाही आमचा शाळेनंतर काही संपर्क पण नव्हता. मग आता अचानक दोन आठवड्यात मी त्याच्यासाठी एवढी महत्वाची कशाला असेन. जाऊ दे , वेळ मिळेल तेव्हा बोलू की. पण एवढा कशात बिझी आहे कि एक मेसेज करायला पण वेळ मिळत नाहीये ह्याला.' तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. तेच विचार डोक्यात घेऊन तिला कधी झोप लागली तिलाच कळलं नाही. 

सकाळी उठून सानिकाने फोन बघितला तेव्हा समीरचा गुड मॉर्निंगचा मेसेज बघून तिचा चेहरा खुलला. ती त्याला रिप्लाय करणार तेवढ्यात तिच्यातला इगो जागा झाला. 'मी कशाला लगेच मेसेज करू, आता ह्याला वेळ मिळाला तर सगळ्यांनी ह्याच्याशी बोलायचं का?' स्वतःशीच ठरवत ती तयार होऊन जॉगिंगला घराबाहेर पडली. आज ती पुन्हा त्या दिवशीच्याच जागी येऊन पोहचली. गावापासून ४०-५० मिनिटांच्या अंतरावर डोंगरावरच्या दाट झाडीमध्ये लपलेल्या त्या घरासमोर. ती लांबून त्याचं निरिक्षण करत असतानाच आतून तीन चार माणसं बाहेर आली. एकंदरीत त्यांच्या हावभावांवरून ती सभ्य घरातली तर वाटत नव्हती. त्यातल्या एका मुलाला तिने लगेच ओळखलं. हा तोच होता ज्याने गावात तिचा हात पकडला होता. तो प्रसंग आठवून सानिकाच्या अंगावर शहारा आला. ती जवळच्याच एका झाडामागे उभी राहून त्यांच्या हालचाली निरखत होती. तेवढ्यात तिला त्यातली दोन माणसं कसलेतरी बॉक्स घेऊन तिच्या दिशेनेच चालत येताना दिसली तशी ती घाई गडबडीने तिकडून निघाली. 'ह्याबद्दल बाकीच्यांना सांगितलं पाहिजे' असं मनोमन ठरवून तिने पुन्हा धावत गावाचा रस्ता धरला. 

ती घरात शिरायला आणि समीर बाहेर पडायला एकंच गाठ पडली. त्याला बघून तिला आनंद झालेला खरंतर पण तिने चेहऱ्यावर तो दाखवला नाही. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून घरात शिरत होती. 

"हॅलो मॅडम, काय लक्ष कुठेय? इतक्या लवकर विसरलीस कि काय मला." समीर त्याच्या नेहमीच्याच मिश्किल आवाजात म्हणाला. इतक्या दिवसांनी तिला भेटून त्याच्या जीवात जीव आला होता. 

"ओह माझं लक्ष नव्हतं. इतके दिवसांनी तोंड दाखवल्यावर थोडं विसरायला होणारंच ना." ती म्हणाली. 

"म्हणजे? काल बाबा म्हणाले तू येऊन गेलीस. पण मला कॉल करायला जमलं नाही. काही काम होतं का?" त्याने न कळून विचारलं. 

"अच्छा म्हणजे आपण फक्त काही काम असेल तरंच बोलायचंय का आता? बरोबर आहे म्हणा, आम्ही कुठे एवढे खास आहोत की तू आमच्याबरोबर कामं सोडून फिरायला येशील." सानिका दुखावून म्हणाली. खरंतर तिच्या अशा बोलण्याचं तिलाच आश्चर्य वाटत होतं. शेवटी उगाच आपल्या तोंडून काहीतरी भलतंसलत निघून जायला नको म्हणून तिने तिकडून काढता पाय घेतला,"मी जाते, आई वाट बघत असेल." 

"अगं पण.." समीर काही बोलायच्या आतच ती घरात पळाली. तो मात्र अजूनही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे गोंधळून पाहत होता. 

संध्याकाळी 'कणवली युथ'ची मिटिंग होती. सगळे जमले होते पण सानिकाचा पत्ता नव्हता. समीरने तिला एक-दोनदा फोनही करून बघितला पण तिने उचलला नाही. शेवटी त्याने न राहवून विचारलं, "ए गौतमी, सानिका कुठेय?" गौतमीने नुसतेच खांदे उडवले.

"अरे तुमचं दोघांचं चाललंय काय? एकदा ती तुझ्याबद्दल विचारते एकदा तू तिच्याबद्दल." चंदूने त्याला डोळा मारत विचारलं.

"च्यायला ह्याचं बरं आहे. बाहेरून आलेल्या सगळ्या पोरी बऱ्या भाव देतात ह्याला. दोन दिवस कोणाबरोबर फिरत होतास रे बाईकवरून? गावातल्या सगळ्यांनी पाहिलं तुम्हाला दोघांना. सानिका वहिनींनी पण पाहिलं बरं का. गावात अफवांना उधाण आलंय. पोरी सगळ्या डिप्रेशन मध्ये गेल्यात." गोपाळ त्याला चिडवत म्हणाला. 

"काय? काहीही काय बोलतोस. ती मुंबई वरून आलेली इन्व्हेस्टर होती. तिला आपल्या गावातले लघुउद्योग, बागा, शेतं वगैरे बघायचं होते. ते दाखवत होतो मी." समीर म्हणाला. पण आता त्याला हळूहळू गोष्टींचा उलगडा होत होता. सानिकाने पण त्याला बघितलं होतं? म्हणून ती चिडली होती का? त्या विचारानेही त्याच्या मनाला गुदगुल्या झाल्या. 'सकाळी भेटली तेव्हा नाकाच्या  शेंड्यावर राग दिसतच होता. गाल फुगवून बोलली मला तेव्हा किती क्युट दिसत होती. पण तो राग ह्या कारणासाठी होता? मी दुसऱ्या कोणत्या मुलीबरोबर फिरलेलं तिला आवडलं नाही वाटतं. म्हणजे तिला माझ्याबद्दल काही..' समीर तिचा विचार करत एकटाच गालातल्या गालात हसत होता. त्याच्याकडे बघून चंदू  आणि गोपाळने  नाईलाजाने मान हलवली, 'गेली वाटतं ह्या मजनूची  विकेट'!

क्रमशः!

🎭 Series Post

View all