चंद्र आहे साक्षीला - भाग १६

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग १६

सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे होत होत्या. रविवारी आयोजित केलेल्या मीटिंगची खबर गावातल्या बहुतांश घरात पोहोचली होती. आता फक्त किती लोकं येतात तेवढं बघणं बाकी होतं. आदल्या दिवशी सानिका तिने केलेल्या प्रेसेंटेशनचं प्रिंट आऊट घेऊन वैद्यांच्या वाड्यावर पोहोचली. तिला बघून वनिताताई एकदम खुश झाल्या. 

"सानिका, ये ये. आज इकडे कसं येणं केलंस?" त्या तिला पाणी देत म्हणाल्या. समोरच वसंतराव तळलेल्या गऱ्यांचे बकाणे भरत बसलेले.  

"तुम्हाला तर कळलंच असेल ना काकू उद्या आम्ही शाळेत मीटिंग ठेवली आहे. गावातल्या लोकांना 'मोबाईल पे' ची माहिती द्यायला. त्याबद्दलच समीरशी थोडं बोलायचं होतं. आणि ही छत्री परत द्यायची होती. परवा मला दिली त्याने ती माझ्याकडेच राहिली." सानिका म्हणाली.

"बघा, दुसऱ्यांच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून छत्री देतो आपला मुलगा आणि इकडे वडिलांच्या ढुंग.." वसंतराव काही बोलायच्या आधीच वनिताताईंनी त्यांना थांबवलं, "अहो, काहीही काय बोलता तिच्यासमोर." तसे ते नाईलाजाने गप्प बसले.

"काय झालं काकू?" सानिकाने कुतूहलाने विचारलं. 

"अगं त्यादिवशी समीर तुला सोडायला गेला ना तेव्हा त्याने बाईक मंदिराबाहेर ऊन्हात पार्क केली आणि हे त्या जाधवांशी गप्पा मारण्याच्या नादात जाऊन बसले बाईकवर आणि बसला चटका बूडाला." वनिताताई येणारं हसू दाबत म्हणाल्या, सानिकालाही हसायला येत होतं. ते बघून वसंतराव तणतणत बाहेर निघून गेले. सानिका आणि वनिताताईंनी इतका वेळ अडवून ठेवलेलं हसणं खदखदून बाहेर आलं. तेवढ्यात समीर तिकडे आला.

"अरे वा, मला पण सांगा काय जोक झाला ते." सोफ्यावर सानिकाच्या बाजूला बसत तो म्हणाला. बसताना त्याचा हात तिच्या हाताला  घासला गेला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. वनिताताई त्यांच्याकडे बघत होत्या.

"तुम्ही दोघं बसा एकमेकांकडे बघत.. म्हणजे बोलत. मी आलेच." म्हणून त्या हसत स्वयंपाकघरात गेल्या. 

सानिकाने पटकन तिच्या प्रेझेन्टेशनची फाईल समीरला दाखवली. ती पूर्ण डोळ्याखालून घातल्यावर समीर थोडावेळ विचार करत होता, "अमेझिंग. यातली माहिती खूपच चांगली आहे. लोकांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्यात आहेत. पण एक सुचवू का?" समीरने विचारलं. सानिकाने मानेनंच संमत्ती दिली.

"लोकांना हे समजणार नाही. म्हणजे ह्यात तू घातलेले ग्राफिक्स वगैरे चांगलेच आहेत, पण आपल्याला जर इकडच्या लोकांना हे ऍप वापरण्यासाठी उद्युक्त करायचं असेल तर आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्याच्याशी ते रिलेट करू शकतील." समीर समजावत होता. 

इतका वेळ आनंदात असणारी सानिका पुन्हा टेन्शनमध्ये आली. "म्हणजे? आता आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय, त्या वेळात नवीन काय करायचं? समीर मी माती खाल्लीये का? एवढ्या सगळ्या लोकांना बोलावलंय आपण उद्या आणि माझी काही तयारीच नाही झालीये." सानिका अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होती. समीर उठून तिच्यासमोर उभा राहिला आणि त्याने तिच्या खांद्याला धरून तिला स्वतःकडे वळवलं. तिच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर पसरलेली काळजी बघून त्याला हसायला येत होतं. ती चिंतेने नखं खात त्याच्याकडे बघत होती.

"सानू अगं केवढं टेन्शन घेत्येस. माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आपल्या ग्रुपच्या सगळ्यांना इकडेच बोलावून घेतो. तू रिलॅक्स हो जरा. हे काय नॅशनल लेव्हलचं प्रेझेंटेशन आहे का? आपलीच लोकं आहेत सगळी. आणि आपण त्यांच्या फायद्यासाठीच काहीतरी करतोय ना. मग कशाला एवढं घाबरायचं?" समीर तिला म्हणाला. एक हात तसाच तिच्या खांद्यावर ठेऊन त्याने चंदूला फोन करून बाकी सगळ्यांना घेऊन यायला सांगितलं. तो फोनवरून सगळ्यांना सूचना देत होता. सानिकाने सुरु केलेला हा प्रोजेक्ट पूर्ण करणं त्याच्यासाठी पण तितकंच महत्वाचं झालं होतं. बाजूला उभी असलेली सानिका त्याच्याकडे पहात होती. त्याच्या हाताच्या उबदार स्पर्शात तिची काळजी कधीच मिटली होती. अचानक त्याच्या असण्याचा तिला खूप आधार वाटला. आज पहिल्यांदाच तिच्या बरोबर कोणाच्यातरी असण्याने तिच्या मनावरचं ओझं दूर झालं होतं. 

-------****-------

रविवारी शाळेच्या हॉलमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली होती. लोकं दाटीवाटीने उभी होती. वयस्कर माणसांना बसायला खुर्च्यांची सोय केली होती. सानिका आणि 'कणवली युथ' ग्रुपचे बाकीचे सगळे मेम्बर्स सकाळपासूनच तिकडे तयारीसाठी आले होते. ठरलेल्या वेळेला कार्यक्रम चालू झाला. 

"नमस्कार, आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सगळे आज सुट्टीच्या दिवशीही इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानते. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, मागच्या मासिक सभेत मी गावातील रोख रकमेचे व्यवहार कमी करण्यासाठी एक प्रस्ताव मांडला होता.  आज त्या प्रस्तावाबद्दल बोलण्यासाठीच आपण इथे जमलो आहोत. पण मी पुढे काही बोलायच्या आधी आम्ही तुम्हा सर्वांसाठी एक सरप्राईज ठेवलं आहे, ते बघण्यासाठी तुम्हाला शाळेच्या आवारात यायची मी विनंती करते." सानिकाने जमलेल्या सगळ्यांचं स्वागत केलं आणि ती त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी अंगणात घेऊन आली . 

अंगणातल्या एका मोठ्या झाडाखाली, समीर भाज्यांची गाडी घेऊन उभा होता. समीर? हो तोच होता तो. त्याने केलेल्या भाजीवाल्याच्या वेशात तो पटकन ओळखूही येत नव्हता. पण त्याचे मिश्किल ब्राउन डोळे मात्र दुरूनही ओळखायला येत होते. सानिकाला लोकांबरोबर बाहेर येताना बघून त्याने लगेच, 'भाजी घ्या भाजी' ओरडायला सुरवात केली.

"नौटंकी" म्हणून सानिका जवळचं उभ्या आशाताईंच्या जवळ जाऊन उभी राहिली. 

लोक स्थिरावत असतानाच लतिका गिऱ्हाईक बनून समीरकडे भाजी घ्यायला आली आणि तिने सुट्ट्या पैशांवरून समीरशी भांडण सुरु केलं.

"ओ, ताई. दोन रुपये सुटते नाहीयेत माझ्याकडे, त्या बदल्यात कोथिंबीर देऊ का?"  समीर म्हणाला. 

"ताई कोणाला म्हणतोयस? लत्तू म्हण ना मला. एवढा हँडसम भाजीवाला पहिल्यांदाच बघतेय मी." लतिका समोर समीरला बघून लाजत म्हणाली. समीरने तिला खुणेनेच लोकं असल्याची आठवण करून दिली. समोर एकंच हशा पिकला होता. त्याने भानावर आलेली लतिका म्हणाली, "नाही, मला माझे दोन रुपये परत पाहिजेत. नाहीयेत म्हणजे काय? माझ्या बाबांना सांगून मी गावाच्या मिटिंग मध्ये मांडणार आहे हा मुद्दा. हे आजकाल नेहमीचं झालंय." ती तावातावाने बोलत होती.

"अहो, पण आता नाहीयेत तर कुठून देऊ? तुम्ही.." समीरचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच लतिका पुन्हा भांडायला लागली. तिचं ते कचाकचा भांडणं ऐकून समीरला तिला आठवण करून द्यावी लागली की तो खरंच भाजीवाला नाहीये आणि ते इथे गावातल्या लोकांसाठी पथनाट्य करतायत. 

"सॉरी सॅमी, मी विसरलेच होते. तू चिडला नाहीयेस ना." लतिकाने आपली चूक लक्षात आल्यावर सारवा सारव करत विचारलं. शेजारी उभ्या असलेल्या गोपाळ आणि चंदूने डोक्याला हात लावला.   

तेवढ्यात तिथे लावण्या आली आणि तिने दोघांना त्यांच्या मोबाईलवर 'मोबाईल पे' ऍप टाकून दिलं. दोघांनाही तिने ह्या ऍपने पैसे कसे ट्रान्सफर करायचे ते शिकवलं. ते करत असतानाच ऍपच्या सुरक्षिततेबाबतही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. लोकं लक्ष देऊन ऐकत होती. पथनाट्य संपल्यावर लोकांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. त्या सगळ्यांनाच ही ऍपची कल्पना आवडली. त्यांच्या पुढच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी सानिकाकडे मराठीमधून छापलेली पत्रकं तयारच होती. 

"आय होप तुम्हाला सगळ्यांना आमचं हे छोटंसं सादरीकरण आवडलं असेल. हे ऍप ह्या गावात कॅशलेस म्हणजेच डिजिटल व्यवहार करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे तुम्हाला कॅश घेऊन फिरायची चिंता नाही आणि विक्रेत्यांना सुट्टे पैसे ठेवण्याची. जर तुम्हाला या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही उद्यापासून गावात मुख्य चौकात स्टॉल्स लावणार आहोत. तिकडे तुम्हाला हे ऍप तुमच्या फोनवर चालू करून मिळेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला तिकडेच मिळतील. पुन्हा एकदा तुम्ही सगळे इकडे आल्याबद्दल धन्यवाद." म्हणून सानिकाने तिचं भाषण संपवलं. आणि लगेचच लोकांनी तिच्याभोवती गराडा घातला. कोणाला प्रश्न होते तर कोणाला आताच त्यांच्या फोनवर ऍप चालू करून हवं होतं. सानिका उत्साहाने सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होती. आशाताई त्यांच्या लेकीकडे कौतुकाने बघत होत्या. इकडे आल्यापासून पहिल्यांदाच त्या तिला एवढं खुश बघत होत्या. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुखावलेल्या त्या एकट्याच नव्हत्या. दूर उभं राहून सानिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद भरभरून सामावून घेणारी अजुनही एक व्यक्ति होती. लोकांची गर्दी कमी झाल्यावर सानिकाचं लक्ष समीरकडे गेलं. आजच्या मीटिंगला मिळालेल्या प्रतिसादाने ती एवढी खुश झालेली कि धावतच समीरपाशी आली आणि तिने त्याला मिठी मारली.

"थँक यु थँक यु थँक यु समीर. तुझ्यामुळेच हे शक्य झालं. नाहीतर मी काय केलं असतं. यु आर द बेस्ट!" ती खुश होऊन म्हणाली. समीर मात्र हे ऐकायला भानावरच नव्हता. तिचा चेहरा त्याच्या गालांना घासत होता. तिचे कुरळे केस वाऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर आले होते. तिच्या मंद पर्फ्युमचा वास त्याच्या नाकात भरला होता. तिच्या शरीराचा उबदार स्पर्श त्याला त्या भर उन्हातही हवाहवासा वाटत होता. चंदू आणि गोपाळ बाजूला उभे राहून गालातल्या गालात हसत होते. खुशीचा बहर उतरल्यावर सानिका त्याच्यापासून लांब झाली आणि बाकीच्यांशी बोलायला लागली, समीर मात्र अजूनही तिच्या मिठीतच हरवला होता.

क्रमशः!

🎭 Series Post

View all