चंद्र आहे साक्षीला - भाग १४

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

( मागच्या भागात : 

"गावातल्या बऱ्याच लोकांनी बँकेच्या ए.टी.एम बद्दल तक्रार केली आहे. मशिन मधल्या नोटा बरेचदा संपलेल्या असतात त्यामुळे लोकांची  सामान विकत घेताना आणि बाकीच्या आर्थिक व्यवहारांना पंचाईत होते. आपण बँकेशी ह्या विषयावर बोललं पाहिजे." जोश्यांनी पुढचा मुद्दा मांडला. 

"मग कॅशवर जास्त अवलंबून नाही राहायचं. आजकाल एवढी डिजिटल माध्यमं उपलब्ध आहेत की आर्थिक देवाण घेवाण करायला." अचानक आलेल्या आवाजाच्या दिशेने सगळ्यांनी बघितलं. आशाताईंच्या बाजूला इतकावेळ गप्प बसलेली सानिका बोलत होती.)

"तुमची सगळ्यांची ओळख करून देतो. ही सानिका, आशाताई पाध्येंची मुलगी. मुंबईत वास्तव्याला असते, काही दिवस इकडे राहायला आली आहे. सानिका, तुझा प्रस्ताव जरा समजावून सांगतेस का सगळ्यांना." वैद्यकाका सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा बघून म्हणाले. काही दिवसांपूर्वी झालेला प्रकार त्यांनी फार मनाला लावून घेतलेला दिसत नव्हता.

सगळ्यांच्या आपल्यावर खिळलेल्या नजर बघून सानिका जरा गोंधळली, पण लगेच तिने स्वतःला सावरलं, "हो नक्कीच. मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये आजकाल मोबाईल च्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी खूप नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. अगदी पाच रुपयांच्या कोथिंबिरीपासून ते पाच हजारांच्या वस्तूंसाठी तुम्ही मोबाईल मार्फत पेमेंट करू शकता. हे पेमेंट गिऱ्हाईकाच्या बँक अकाउंट मधून विक्रेत्याच्या अकाउंट मध्ये अगदी सेकंदात जमा होतं. त्यामुळे पैसे घेऊन फिरायला नको किंवा पैसे जमा करायला बँकेत जायला नको. जर गावातले सगळेच व्यवहार ह्या पद्धतीने व्हायला लागले तर कोणालाच पैसे काढायला ए.टी.एम च्या रांगेमध्ये उभं राहावं लागणार नाही." सानिका बोलत असताना सगळे शांतपणे ऐकत होते. वैद्यकाकूही कौतुकाने बघत होत्या तिच्याकडे. झाल्या प्रसंगानंतरही त्यांच्या मनात तिच्याबद्दल अढी नव्हती. अजूनही ती आपल्या घरात सून म्हणून यावी असंच त्यांना वाटत होतं. इतकावेळ तिच्याकडे बघणं टाळत असलेला समीरही तिचं बोलणं ऐकत होता. 

"आम्हाला काही जमत नाही बाई असलं, हातात पैसा असलेला बरा. बँकेने पैसे देऊ दिले नाहीत तर? आणि दुसऱ्याच कोणी पैसे काढून घेतले तर आमचे? उगाच तुमच्या मुंबईकरांच्या नसत्या तऱ्हा आम्हाला नको." चौधरीकाकू मोडता घालत म्हणाल्या.

"अहो हे एकदम सुरक्षित असतं, असं कोणीही कोणाच्याही अकाउंट मधून पैसे काढू शकत नाही. आणि शिकायलाही सोप्पं आहे." सानिका म्हणाली. परवा गावात आलेली मुलगी सगळ्या गावासमोर आपल्याला असंमत्ती दाखवत आहे हे चौधरींना अजिबात आवडलं नव्हतं. पण गावातली बाकीची लोकं मुंबईहून आलेल्या ह्या स्मार्ट मुलीच्या बोलण्याने प्रभावित झाल्यासारखी वाटत होती.

"आणि सानू शिकवेल कि सगळ्यांना. ती इकडेच आहे अजून बरेच दिवस." आशाताई आपल्या मुलीच्या कल्पनेला पाठिंबा देत म्हणाल्या.

"काय गं सानिका, जमेल का तुला? आता कल्पना तुझी आहे म्हंटल्यावर पूर्णत्वाला पण तूच न्यायचीस बरं का." वैद्यकाका हसून म्हणाले आणि सानिकाने मान डोलावली.

"चला, आजच्यासाठी एवढंच पुरे. पुढच्या मीटिंगमध्ये भेटूच परत." म्हणून जोशी त्यांचा पंचा खांद्यावर टाकत उठले आणि त्यांच्या बरोबर बाकीचेही घरी निघाले.

"आशा, लेक हुशार आहे बरं का. काय छान कल्पना सुचवली. पण काय गं सानिका, आम्हाला सगळ्यांना जमेल का हे?" गावातल्या बायका सानिकाभोवती गराडा घालून उभ्या होत्या.

"हो जमेल की, एवढं कठीण नसतं." सानिका हसून म्हणाली. तिने घेतलेला हा नवीन उपक्रम तिला पुढचे काही दिवस तरी गुंतवून ठेवणार होता. सगळ्या बायकांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतानाच सानिकाची नजर मागे उभ्या असलेल्या समीरकडे गेली आणि त्या दोघांची नजरानजर झाली. सकाळी त्याच्या नजरेत दिसलेला राग थोडा कमी झाल्यासारखं वाटलं सानिकाला. पण तेव्हाही तो तिच्याशी काही न बोलता तिकडून निघून गेला.

-------***-------

"काय रे गोप्या, ही सानिका एकदम भारीच आहे. पहिल्याच मीटिंगला येऊन फुल फुटेज खाल्लं हिने." मीटिंग नंतर गावातली पोरं जवळच्याच धाब्यावर जेवायला गेली होती. समीरही त्यांच्याबरोबर होता.

"सानिका नाही, सानिका वहिनी म्हणा रे." स्वतःच्याच विचारात हरवलेल्या समीरला चिडवत गोपाळ म्हणाला आणि सगळी पोरं हसायला लागली.

"ए गोप्या, काहीपण काय बोलतोस." त्याला गप्प करत समीर म्हणाला. पण मनातून त्याला गुदगुल्या झाल्या खरं. सकाळी तिला बघितल्यापासून त्याच्या मनात तिचेच विचार चालू होते. तिच्याशी तुटक वागताना त्यालाही त्रासच होत होता. तिने मीटिंगमध्ये सुचवलेला प्रस्ताव त्याला आवडला असूनही तिच्याकडे दुर्लक्ष करून तो तिकडून निघाला होता. तिने आपल्याशी बोलायला यावं, त्यादिवशीच्या तिच्या वागण्यामागचं कारण आपल्याला सांगावं असं त्याला वाटत होतं. त्याचा राग घालवण्यासाठी तिने काहीच प्रयत्न केले नाहीत याचंही त्याला वाईट वाटत होतं. एवढी अपेक्षा कशाला करतोय मी तिच्याकडून? तिचं त्या दिवशीचं वागणं त्याला खटकलं होतं हे खरं असलं तरी त्यांची एवढी ओळख नव्हती की त्याच्या चिडण्याने तिला फरक पडावा. त्यातच त्याचे मित्र आता त्याला तिच्या नावाने चिडवत होते म्हणून त्याची अजून चिडचिड होत होती.

"काहीपण काय, त्या दिवशी बघितलं आम्ही तुम्हाला बाईकवरून डबल सीट जाताना. छान दिसत होता हां जोडा एकदम." गोपाळला डोळा मारत चंदू म्हणाला. 

"ती धावायला गेलेली तेव्हा पडली म्हणून मी तिला घरापर्यंत लिफ्ट दिली. आणि बाईकवर डबल सीट घेतलं म्हणजे काय लगेच कपल झालो का आम्ही. ह्या गोप्याला कितीवेळा सोडलं आहे मी बाईकवरून." समीर म्हणाला.

"बरोबर आहे, पण आपला गोप्या वहिनींसारखा क्युट थोडी आहे. ते वेगळं असतं रे सम्या." चंदूचं चिडवणं काही थांबत नव्हतं.

"जाऊदे तुम्हाला समजावण्यात काही अर्थ नाहीये." म्हणून समीर तिकडून वैतागून निघाला.

एरवी खेळकर स्वभावाचा समीर गेले दोन-तीन दिवस जरा चिडचिड करत होता. सानिकाच्या वागण्याने त्याच्याही नकळत त्याच्यात झालेला बदल त्याला समजला नसला तरी वनिताताईंना तो दिसत होता. गावाच्या मीटिंगमधलं समीरचं सानिकाकडे दुर्लक्ष करणं पण त्यांनी बघितलं होतं पण ह्यावर उपाय काय हे मात्र त्यांना सुचत नव्हतं. अस्वस्थ मनाने त्या अंगणात येरझाऱ्या घालत होत्या. समीर आणि वैद्यकाका मीटिंग नंतर त्यांच्या मित्रांबरोबर कुठेतरी गप्पा कुटायला गेलेले आणि वनिताताई स्वयंपाकाची तयारी करायला घरी आल्या होत्या. आपल्या विचारात हरवल्या असतानाच गेटचा आवाज आला तसं त्यांनी वळून बघितलं. समोरून सानिका त्यांच्या दिशेने चालत येत होती.

"हाय काकू, कशा आहात?' त्यांच्याकडे बघून हसून तिने विचारलं.

"मी छान, पण तू अशी अचानक इकडे? सगळं ठीक आहे ना?" त्यांनी काहीसं काळजीने विचारलं.

"हो हो. आज असं अचानक इथे आल्याबद्दल सॉरी, आणि त्या दिवशीच्या माझ्या वागण्याबद्दल सुद्धा." सानिका म्हणाली.  "मी खरंतर अशी वागत नाही काकू. पण सध्या बाकीच्या गोष्टींच्या टेन्शनमुळे माझी जरा चिडचिड होतेय. तुम्ही त्या दिवशी मला आणि आईला इतकं प्रेमाने जेवायला बोलावलंत, एवढ्या कष्टाने माझ्या आवडीचे पदार्थ बनवलेत आणि मी त्याचा अपमान करून अशी निघून गेले. खरंच सॉरी काकू." त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली. तिच्या शब्दांतला प्रामाणिकपणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो बघून वनिताताईंना बरं वाटलं. 

"अगं ठीक आहे. एवढं सॉरी वगैरे नको म्हणूस. होतं असं कधी कधी. तुम्हा पोरांना कामाचं टेन्शन काय कमी असतं होय. ये बस. चहा करू का तुझ्यासाठी? का जेवूनच जातेस? त्यादिवशीचं राहिलंच की तुझं." तिला अंगणातल्या झोपाळ्यावर बसवत वनिताताई म्हणाल्या. 

"नाही नको. पुन्हा कधीतरी येईन. आईला पुढे पाठवून तुम्हाला भेटायला आले. ती थांबली असेल जेवायला. येते मी आता. आणि पुन्हा एकदा सॉरी हां." सानिका मनापासून म्हणाली आणि जायला वळाली. काही पावलं पुढे गेल्यावर तिने मागे वळून बघितलं, "समीरला पण माझ्यातर्फे सॉरी सांगा. मी सकाळी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण.." सानिकाने तिचं वाक्य अर्ध्यातच थांबवलं. 

"हो सांगते नक्की. त्याचं वागणं एवढं मनावर नको घेऊस तू. तो जितका पटकन चिडतो ना तितकाच पटकन राग विसरून पण जातो. मी सांगते त्याला." वनिताताई म्हणाल्या. त्यांच्या मनात पुन्हा आनंदच्या उकळ्या फुटायला सुरवात झाली होती. सानिकाला जाऊन जेमतेम काही मिनिटं होत असतानाच फाटकातून समीरची बाईक आत शिरली. गाडी नेहमीच्या जागी जाऊन समीर घरात जायला निघाला. एरवी हसत येऊन वनिताताईंचे गाल ओढणाऱ्या समीरचं आज त्यांच्याकडे लक्षंही नव्हतं. 

"हे काय, एवढ्या लवकर आलास पण? जेवायला गेला होतास ना मित्रांबरोबर?" वनिताताईंनी आपल्या पाठमोऱ्या लेकाला विचारलं.

"हो पण जेवलो नाही. भूक नव्हती फार." समीर त्यांची नजर चुकवत म्हणाला.

"हो का? मग उगाच गेलास तिकडे. माझ्याबरोबर घरी आला असतास तर सानिकाची भेट तरी झाली असती. आत्ताच निघाली ती इकडून, सॉरी म्हणायला आली होती. गोड आहे हो पोरगी." वनिताताईंच्या तोंडून सानिकाचं नाव ऐकून समीरची घरात जात असलेली पाऊलं थांबली. 

"सानिका आली होती? मग थांबवायचंस ना तू तिला. लगेच कशी काय गेली ती." सानिका घरी आल्याचा त्याला आनंदही झाला होता आणि त्याला न भेटता गेल्याचं दुःखही. 

"हो, तू तिच्याशी बोलत नाहीयेस म्हणे. बिचारीला किती वाईट वाटत होतं तुझ्या वागण्याचं. म्हणून आली घरी सॉरी म्हणायला तर तू गायब." वनिताताई त्याला चिडवत म्हणाल्या. 

"काय गं आयडे तू पण. मला फोन करायचास ना. मी आलो असतो लगेच." समीर तक्रारीच्या सुरात म्हणाला. वनिताताई गालातल्या गालात हसत होत्या. 

"ठीक आहे. आता गावातच आहे ती, नंतर जाऊन भेट तिला. एवढं काय त्यात." त्या म्हणाल्या. पण त्यांचं बोलणं होईपर्यंत समीर बाईकवर बसून निघालाही होता.

"आई जेवण तयार ठेव, खूप भूक लागलीये. पटकन जाऊन येतो मग एकत्रच बसू जेवायला." फाटकातून बाहेर पडताना तो ओरडून म्हणाला आणि वनिताताई हसत स्वयंपाकाच्या तयारीला घरात गेल्या.

-------***-------

समीर 'पारिजात' समोर पोहोचला तेव्हा सानिका बागेत झाडांना पाणी घालत होती. ती पाठमोरी असतानाच समीरने तिला हाक मारलं, दचकून ती मागे वळाली आणि तिच्या हातातल्या पाण्याच्या पाईपमधून पाणी समीरच्या अंगावर उडालं. गोंधळलेली सानिका ते बंद करायचा प्रयत्न करत होती पण तोपर्यंत समीर पूर्ण भिजला होता. 

"आय एम सो सॉरी, तू असा अचानक आलास त्यामुळे मी दचकले. तू आत येतोस का मी तुला टॉवेल देते." सानिका त्याची माफी मागत म्हणाली. त्यादिवशीची सानिका आणि आजची सानिका किती वेगळी होती. "समीर?" तिच्या आवाजाने तो भानावर आला.

"आई म्हणाली तू घरी आली होतीस, काही काम होतं का?" त्याने विचारलं.

"हो म्हणजे.. माझ्या त्या दिवशीच्या वागण्यासाठी माफी मागायची होती मला. मी खूपच चुकीचं वागले तुम्हा सगळ्यांशीच. आणि तुला तर मी किती उलटसुलट बोलले. प्लिज मला माफ कर? अर्थात तू सगळं विसरून जाऊन माझ्याशी नीट बोलावस अशी अपेक्षाच नाहीये माझी. पण बघ जमलं तर." सानिका बोलली. तिला वाटत असलेला अपराधीपणा तिच्या बोलण्यातूनच जाणवत होता. तोंडदेखली माफी नव्हती मागत ती. तिच्या बोलण्याने समीरचा सकाळपासूनच राग कुठल्याकुठे पळाला. तिच्याशी बोलण्यासाठी त्याने गेले दोन दिवस किती वाट बघितली होती त्यालाच माहिती होतं. 

"हं.. तुला माहितीये मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. केवढी बोललीस तू मला." समीर दुःखी असल्याचं नाटक करत म्हणाला. सानिकाला ते खरंच वाटलं. एरवी ऑफिसातली सानिका आणि घरी तिच्या माणसांबरोबरची सानिका वेगळी होती. वरून कठोर असली तरी मन मृदू होतं तिचं. आपल्यामुळे कोणाला त्रास झालेला तिलाही सहन नव्हतं होत.

"एरवी मी कोणाला हि मुभा दिली नसती, पण तू मला इकडे आल्यापासून खूप मदत केली आहेस आणि मी तुझ्याशी इतकी वाईट वागले. तू मला हवी ती शिक्षा दे. एक काम कर, आता तू मला वाईटसाईट बोलतोस का? म्हणजे आपली फिट्टमफाट होईल." ती लहान मुलीच्या उत्साहाने म्हणाली आणि समीर अजूनच विरघळला. 

"ह्म्म्म.. शिक्षा तर मिळेलच."म्हणून त्याने एक पाऊल तिच्या दिशेने टाकलं. सानिका गोंधळून त्याच्याकडे  बघत होती आणि तेव्हाच त्याने बाजूला पडलेला पाईप उचलून तिच्या अंगावर पाणी उडवलं. 

"ओह गॉड समीर, हे किती बालिश आहे. वेडा आहेस का तू?" ती त्याच्या हातातून पाईप काढून घायचा प्रयत्न करत बोलली. त्या झटापटीत दोघांचा पाय सटकला आणि दोघं जमिनीवर फतकल मारून बसले. दोन मिनिटं एकमेकांकडे बघून दोघं खदखदून हसायला लागले. बंगल्याच्या खिडकीतून त्या दोघांना एवढं मनमोकळं हसताना पाहणाऱ्या आशाताईंच्या मनातही एक आशा मोहरली.

क्रमशः!

🎭 Series Post

View all