चंद्र आहे साक्षीला - भाग १०

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

समीरची बाईक वैद्यांच्या वाड्याच्या मुख्य दरवाजातून आत शिरली. त्यांचा वाडा म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या कोणाचेही पाय क्षणभर घुटमळतील असा होता. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना केळ्याची झाडं, भिंतीवर चढलेल्या नाजूक विविध रंगी फुलांच्या वेली, काही शोभेच्या तर काहींना अत्यंत सुरेख वास. थोडं पुढे आल्यानंतर अंगणाच्या मध्यभागी तुळशी वृंदावन, त्यावर डोलणाऱ्या मंजिऱ्यांच्या सुगंध वातावरणात बनला होता. मुख्य अंगणाच्या डाव्या बाजूला झाडावरून उतरवलेल्या फळांची साठवणीची खोली, अगदी अद्ययावत, वातावरण नियंत्रित. इकडून बाजारासाठी निघणारं प्रत्येक फळ एकदम अव्वल दर्जाचं असायचं. अंगणाच्या उजव्या बाजूला एक छोटी मोरी, अंगणात काम करणाऱ्यांना हात-पाय धुण्यासाठी. त्यापुढे पापड, कुरडया, गरे उन्हात वळवण्यासाठी एक चौथरा बांधला होता. तिथून पुढे आलं की एक वाट वैद्यांच्या दूर दूर पर्यंत पसरलेल्या नारळ सुपारीच्या आणि इतर फळांच्या बागेकडे जात होती आणि दुसरी त्यांच्या वाड्याच्या मुख्य वऱ्हांड्याकडे . अंगणात एक मोठा भक्कम लोखंडी कड्यांचा झोपाळा बसवला होता. त्यावर वसंतराव वैद्य म्हणजेच समीरचे वडील अडकित्याने सुपारी कातरत बसलेले.

"आई, ए आयडे, आहेस कुठे?" सानिकाला घरी सोडून आलेला समीर आईला शोधत होता.

"आले, आले, कशाला एवढा आरडा ओरडा करतोयस?" पदराला हात पुसत वनिताताई बाहेर आल्या.

"अगं मी उद्या आशाकाकूंना आणि त्यांच्या मुलीला आपल्याकडे जेवायला बोलावलं आहे दुपारी. तुला सानिका आठवतेय का? माझ्या वर्गात होती?" समीर म्हणाला.

"अगं बाई हो का? चालेल करते मी तयारी. पण काय रे, ती सानिका मुंबईला असते ना? गेल्या कित्यके वर्षांत तिला पाहिलंच नाहीये. आशा तिच्याबद्दल सांगत असते पण भेटले नाहीये मी तिला कधी. शाळेत असताना एकदम नाजूक होती पोरगी. तुला शाळेत सोडायला आणायला यायचे तेव्हा पाहिलं आहे तिला बरेचदा." वनिताताई आठवत म्हणाल्या.

"हो गं, दोन तीन दिवसांपूर्वीच इकडे आलीये ती. काल आंबे द्यायला गेलो होतो तेव्हा भेट झाली आमची. म्हणून म्हंटलं बोलवावं आपल्याकडे. मी सांगितलं आशाकाकूंना तू बोलावलं आहेस असं." समीर म्हणाला.

"हो का? क्या बात है, स्वारी एकदम खुश दिसते आहे आज. स्वतःहून लोकांना जेवायला वगैरे बोलावलं आहेस. आशाकाकूंना बोलवायचं होतं का बालमैत्रिणीला?" त्याला चिडवत वनिताताईंनी विचारलं.

"आई तू पण ना. सांग मला तुला काही मदत हवी असेल तर." घरात जाताना त्यांचे गाल ओढत समीर म्हणाला. तशा त्या हसल्या.

"अहो, ऐकलंत का. आपल्या सम्याची बालमैत्रीण आली आहे म्हणे. स्वतःहून तिला जेवायला बोलावलंय उद्या ह्याने." वनिताताई उत्साहाने वसंतरावांना सांगत होत्या.

"मग करायचा का लग्नाचा हॉल बुक?" वसंतराव त्यांना चिडवत म्हणाले.

"तुम्ही मलाच चिडवा. मुलाने पहिल्यांदा कोणत्यातरी मुलीशी बोलण्यात रस दाखवलाय त्याचं तुम्हाला काहीच नाही." वनिता ताई तोर्र्यात म्हणाल्या.

"आता त्यात मी काय करणार? आणि तू उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नकोस. मागे एकदा हा असाच घरी येऊन कोणत्यातरी 'सुंदरी' बद्दल बोलत होता म्हणून केवढी खुश झाली होतीस तू? त्या गोपाळची म्हैस निघाली ती." वसंतराव म्हणाले.

"अहो ही मुलगीच आहे हो. आशाने मला फोटोज दाखवले आहेत की तिचे. फार गोड आहे हो पोरगी." वनिताताई स्वप्नांत रमत म्हणाल्या.

"चला माझं काम झालं, जरा जोश्याकडे जाऊन येतो. ह्या वेळेच्या गावाच्या मीटिंगसाठी काही नवीन मुद्दे आहेत म्हणे त्याच्याकडे. बघतो काय म्हणतोय तो. आपल्या चिरंजीवांना पण सांगा ह्या रविवारी मीटिंग ठरवली आहे. नंतर मला ओरडत बसतो तो सांगितलं का नाही म्हणून." वसंतराव त्यांचा पांढरा शुभ्र सोनेरी कडा असलेला पंचा खांद्यावर टाकत निघाले आणि वनिताताई स्वयंपाकघरात त्यांच्या कामाला गेल्या.

दुसऱ्या दिवशी वनिताताईंचा दिवस लवकरच सुरु झाला. सकाळी उठून अंगणात सडा घालून, तुळशीची आणि देवांची पूजा करून त्या स्वयंपाकाला लागल्या. आमरस पुरी, बटाट्याची भाजी, फणसाची भाजी, सोलकढी आणि आमटी भात असा मेनू केला होता त्यांनी. समीर सकाळीच कोणालातरी कामाच्या संदर्भात भेटायला बाहेर पडला होता. वैद्यांचा एक्स्पोर्ट चा खूप मोठा बिझनेस होता. स्वतःच्या घरच्या आणि गावातल्या लोकांच्या बागांमध्ये पिकणारी फळं आणि त्यांपासून बनवलेले पदार्थ ते भारतात आणि भारताबाहेरही पाठवत होते. त्यामुळे त्यांच्याबरोबरच गावातल्या लोकांचाही फायदा होत होता. घर बसल्या त्यांच्या मालाला मिळणारी किंमत खूपच चांगली होती. वसंतरावांनी त्यांच्या उमेदीच्या वर्षात हा बिझनेस सुरु केला होता. समीरही त्यांच्याच तालिमीत तयार झालेला. मुंबई आणि बंगलोर सारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेऊन पुढे तो अमेरिकेला एक वर्षाचा बिझनेस कोर्स करायला गेला होता. तिकडून भरपूर कॉन्टॅक्टस बनवून तो परत कोकणात आला होता. वडिलांनी चालू केलेल्या बिझनेसचा आवाका त्याने आधुनिक इंटरनेट आणि त्याचे मोठमोठ्या शहरातले कॉन्टॅक्टस वापरून कोकणाबाहेर आणि विदेशातही वाढवला होता. आधी छोट्या छोट्या धंद्यांपर्यंतच पोहोचणारा त्यांचा माल आता मोठ्या शहरांमधल्या व्यावसायिक दुकानांमध्ये विकला जात होता. समीरने प्रत्येक शहरात वितरक नेमले होते, त्यांच्यामुळे कमी कमिशन मध्ये जास्तीत जास्त माल विकायला मदत होत होती. बापलेकाने मिळून बिझनेस पुढे नेला असला तरी त्यात वनिताताईंचाही मोलाचा वाटा होता. गावातल्या एरवी घरकामात बुडालेल्या बायकांना घेऊन त्यांनी एक लघुउद्योग सुरु केला होता. त्या अंतर्गत लोणची, पापड, मसाले, आंबा-फणसाच्या गरापासून बनवले जाणारे पदार्थ याचं उत्पादन त्या उद्योगातून होत होतं. बाकीच्या गोष्टींबरोबरच हे ही गावाबाहेर विकलं जात होतं. कणवली जरी छोटंसं गाव असलं तरी या गावात प्रत्येकजण स्वतःच्या जीवावर काही ना काही करत होता, स्वतःसाठी आणि गावासाठीही. मासिक देणगीतून जमा झालेल्या फंडातून गावाच्या विकासाची अनेक कामं मार्गी लावली जात होती.  

दुपारी अकराच्या सुमारास आशाताई आणि सानिका वैद्यांच्या वाड्यावर आल्या. सानिकाने गडद निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. कानात तिचे नेहमीचेच डायमंडचे छोटेसे कानातले होते. एरवी कायम मोकळे असणारे कुरळे केस तिने आज बांधले होते, उन्हाच्या झळांमुळे. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता. ती दरवाजातून आत येत असताना वनिताताईंनी तिच्याकडे बघितलं आणि वसंतरावांकडे बघून खूण केली त्यावर वसंतरावांनी उसासा टाकला.

"या या, बसा. मी पाणी घेऊन येते हां." वनिताताई त्यांना हॉलमध्ये सोफ्यावर बसवत म्हणाल्या.

"काय छान वास येतोय गं वनिता. खूप घाट घातला आहेस वाटतं नेहमीसारखा. तरी मी समीरला म्हणाले होते आईला सांग जास्त काही करत बसू नकोस." आशाताई म्हणाल्या.

"छे गं. फार काही नाही केलंय मी. एरवी आम्ही तीन डोकीच असतो जेवायला. असं कोणी आलं की स्वयंपाक करायला पण छान वाटतं ना. ही सानिका ना? कशी आहेस बाळा? खूप वर्षांनी बघितलं तुला." वनिता ताई हसून म्हणाल्या.

"मी मजेत. आईकडून खूपवेळा तुमचं नाव ऐकलं आहे. आज भेटायचा योग आला." सानिका पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाली.

"हो ना. खूप वर्षांनी आलीस गावात. चांगली सुट्टी घेऊन आली आहेस ना? आई एकदम खुश असेल आता लाडकी लेक आलीये म्हणून. जशी होतीस तशीच आहेस गं एकदम." वनिताताई म्हणाल्या. त्यावर सानिका नुसतीच हसली.

"समीर कुठे दिसत नाही. बाहेर गेलाय का?" आशाताईंनी विचारलं.

"हो सकाळीच बाहेर पडलाय तो. कुठली तरी मीटिंग होती. पण येतच असेल एव्हाना. तोपर्यंत मस्त पन्ह देऊ का मी तुम्हाला? कालच गर काढून ठेवलाय." वनिताताईंनी विचारलं खरं पण त्यांच्या उत्तराची वाट न बघता त्या आधीच आत जाऊन पन्ह्याचे ग्लास भरून घेऊन आल्या. तेवढ्यात समीरच्या गाडीचा आवाज आला आणि पाठोपाठ २-३ मिनिटांनी समीर आत आला. सानिकाने एकदा त्याच्या दिशेने बघितलं आणि काही क्षण तिची नजर त्याच्यावरच खिळली.

दारातून आत शिरलेला समीर तिला आत्तापर्यंत भेटलेल्या समीरपेक्षा वेगळाच दिसत होता. पांढरा शुभ्र कडक इस्त्री केलेला शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट.  त्याने व्यायामाने कमावलेलं शरीर त्यातून उठून दिसत होतं. शर्ट चापून चोपून इन केलेला आणि त्यावर महागाचा काळ्या रंगाचा पट्टा लावला होता. पायात पोलिश केलेले ब्रँडेड शूज होते. त्याचा चेहरापण आज एकदम स्वच्छ आणि तुकतूकीत दिसत होता. विंचरून बसवलेले दाट केस हेल्मेटमुळे थोडे विस्कटले असले तरी छान वाटत होते. क्लीन शेव केलेल्या त्याच्या चेहऱ्यावरचे त्याचे ब्राऊन डोळे आज एकदम उठून दिसत होते. सानिकाची नजर त्याच्यावर खिळली असतानाच त्याने तिच्याकडे बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचं मिश्किल हास्य आलं. त्याचं हसणं इतकं निखळ होतं की त्याच्या डोळ्यांतूनही ते दिसत होतं. सानिकाही त्याच्याकडे बघून हसली आणि तिने नजर दुसरीकडे वळवली. पण त्या दोघांमध्ये झालेली ती नजरानजर वनिताताईंच्या नजरेतून सुटली नाही. त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

🎭 Series Post

View all