Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

चांदणे शिंपीत जा..

Read Later
चांदणे शिंपीत जा..
विषय :आणि ती हसली

शीर्षक : चांदणे शिंपीत जा..


खळखळून हसणाऱ्या निनादच्या फोनमध्ये केतकीने सहज डोकावून पाहिले.

ईनफा मम्मा…
धिस इज नॉट अ गुड हॅबीट…!

असं कुणाच्या फोन मध्ये डोकावयाचे नसते. काही पर्सनल चॅटिंग सुरू असतयं आम्हा मित्र मैत्रिणीचे.
तुला तुझ्या लाईफ मध्ये असे कुणी खास नसेल म्हणून तुला काही कळत नाही नां.

असं म्हणत फोन चार्जर घेऊन निनाद रुममध्ये जायला वळला, आणि केतकी पुन्हा एकदा खपली निघून भळभळणारी जखम घेऊन तिथेच उभी राहिली...किती चुक आहे नां....

"दुःख जुनं झालं की बोथट होतं"

आपल्या कथेची नायिका :
केतकी पुरोहित

चाफेकळी नाक, केतकीचा गोरा वर्ण, निलाक्षी डोळे..अगदी बघत रहावे….

तीन भावा नंतर जन्मलेली केतकी, जन्म काय अगदी सोहळा. गुबगुबीत त्या मांसाच्या गोळ्याला गुलाबी रंगावरून नाव मिळाले
"केतकी" केतकीचे बाबा पौरोहित्य करायचे. पिढीजात चालत आलेल्या व्यवसायामुळे त्यांना पुरोहीत नाव मिळाले. अत्यंत लाडाची केतकी, तिची आई शाळेत शिक्षिका होती.
निसर्गाने नटलेले कोकणातील लहानसे गाव "कोलाड"

भरपूर झाडे असलेले अंगण आणि दोन मजली टुमदार घर…याच निसर्गाच्या सानिध्यात केतकी फुलपाखरासारखी बागडत मोठी होत होती.

"घरी कुणी आहे का..?" या आवाजावर आई घाईघाईने बाहेर आली.

"अंग बाई तुम्ही कधी आले मुंबई वरून?" ओसरी वर बसलेल्या पाहुण्यांची अगत्याने तिने विचारपूस केली.

कुलकर्णी काका आणि त्यांचे बिऱ्हाड बदली होऊन कोलाड मध्ये आले. पुरोहितांचे जुने परिचित.
आईने स्वयंपाकाची पटकन तयारी केली. सगळ्यांना हातपाय धुवायला सांगितले.

मैत्रिणींसोबत खेळून आलेल्या केतकीला तिच्या बंगई वर कुणी तरी झोके घेताना दिसले. तरातरा चालत घरात येऊन आईला विचारणार तोच नवीन पाहुणे आलेले दिसले.

"कोण गं ही, वहिनी ही केतकी का...? किती गोड दिसते…मोठी झाली गं पोर... बाळ जवळ ये, कोणत्या वर्गात आहे?"
"मी आठवीत." असं म्हणून केतकी बाहेर पळाली.

रात्री जेवतांना सगळ्यांची ओळख झाली…तिच्या पेक्षा लहान दोन मुली आणि बरोबरीचा तो…!
खाली पाहत लाजत जेवत होता.

"अनू असा शांत का? वर बघ...हि बघ तुझ्याच वयाची केतकी..!"

आपल्या कथेचा नायक :
अनिरुद्ध कुलकर्णी

जवळपास पंधरा दिवस दुसरी जागा मिळेपर्यंत आईने त्यांची सोय वरच्या मजल्यावर केली होती. केतकीला नवीन मैत्रीणी मिळाल्या होत्या आणि अनिरुद्ध तर तिच्या वर्गातच…पण कधीच तिच्याशी न बोलणारा…आपले काम बरे म्हणणारा…

किती मदत करत होती केतकी त्याची, मागे पडलेला अभ्यास करण्यासाठी पण. तिच्याशी अनु फक्त कामापुरते बोलायचा…तिच्या भावांचा मात्र खास मित्र झाला...हसत खेळत अबोला करतं आठवीचे वर्ष संपले.

आणि शाळेत पहिल्या नंबरवर यावेळी अनिरुद्ध होता..केतकी दुसरी आली होती…आजपर्यंत केतकीचा पहिला नंबर कधीच चुकला नव्हता…तिलाच आश्चर्य वाटले....

"अग केतकी, जा तुझ्या वाढदिवसाला कुलकर्णी काका काकूंना आणि मुलांना बोलावं जेवायला घरी."


…नाजूकश्या केतकीवर गुलाबी रंगाचा परकर पोलके खूप उठून दिसत होते. सगळे अगदी तिचे कौतुक करत होते. पण केतकी मात्र कुणाच्या तरी नजरेतील कौतुकाची वाट पहात होती.

" कशी दिसत आहे अनिरुद्ध मी आज "

आपल्या नवीन परकराची गिरकी घेऊन केतकी बोलली.
" छान " एवढेच बोलून अनु निघुन गेला…

माणसाने बोलक असावे… कमीत कमी जिथे बोलायचे तिथे तरी....
पहिल्यांदा डोळ्यात अश्रू अनावर झाले केतकीच्या....

नववीत दोघांनी स्काॅऊट गाईड घेतले होते. रोजची परेड शाळा सुटल्यावर होत होती..सहजच घरी जाताना वेळ होत होता…शाळेपासून घराच्या मध्ये एक लहान ओढा ओलांडून पलीकडे जावे लागे. वर्षभर भरपूर पाणी असायचे ओढ्याला…तेव्हा मात्र अनिरुद्ध नकळत हळू चालायचा तिला सोबत म्हणून….

वर्गात येऊन गुरुजी म्हणाले
"यावेळी आपल्या वर्गाची सहल कुंडलिका नदीच्या काठावर असलेल्या निसर्गरम्य स्थळी जाणार आहे. दोन दिवस अगदी मंतरलेले असणार आहेत."

आईने भरपूर सुचने सोबत केतकीची तयारी करून दिली. केतकी तर हवेतच उडत होती. पहाटेच सगळे मुलं मुली सहलीसाठी तयार होऊन शाळेत जमली. आला नव्हता तो अनिरुद्ध....

केतकीची घालमेल होत होती. तेवढ्यात तो बसमध्ये चढताना दिसला. आणि केतकीच्या गालावर खळी पडली…!

"किती हा वेळ अनु...? बस आता सुटतच होती."
"काही काम होते आणि मला बरं नाही वाटत आहे." असे म्हणून तो तिच्या बाजूला सीटवर बसला, चेहर्‍यावर रूमाल ओढुन…तिने त्याच्या हाताला हात लावला. अंग चांगलेच तापले होते.

सगळे आपले सामान घेऊन खाली उतरले…जागेवर सामान ठेवून सगळे सहलीचा आनंद घेत होते. केतकी मात्र मुद्दाम वेळ काढून मागे रहात होती.... अनिरुद्ध सोबत, त्याची काळजी घेत…तो मात्र तिच्या पासून दूर रहात होता….

कुणीतरी इतकं खास असावं....
कि नजरेत दुसरं कुणीच नसावं...!

त्या रात्री शाळेच्या शिक्षकांनी चमकणारे काजवे दाखविण्यासाठी सर्व मुलांना नदीच्या पलिकडे नेले…मागे होते ते फक्त केतकी आणि अनिरुद्ध…किर्र अंधारात कळून चुकले होते...वाट चुकली म्हणून…

"अनु मला भिती वाटते" अंधारात नकळत तिने त्याचा हात पकडला.
"मी आहे नां, घाबरू नकोस. तुला एकटी सोडणार नाही कधीच...." त्याचा आश्वस्त स्वर तिला खूप धीर देऊन गेला.

अनिरुद्ध ssssss…केतकीsssssss… मित्र मैत्रिणींचे आवाज दुरून कानावर पडत होते. तोच केतकीला जाग आली. एका झाडाखाली बसून दोघांनी रात्र काढली होती…रात्रभर थंडी सहन करत त्याच्या मिठीत तिला झोप लागली होती….

तो मात्र रात्रभर तापाने तळमळत होता… मुलांनी त्याला उचलून धरले…आणि केतकी मनाने तिथेच राहिली….!
चांदण्यात फिरताना....
माझा धरिला तू हात....
तो दिवसभर तापात फक्त तिचे नाव घेत होता. केतकी मी कधीच तुला एकटी सोडणार नाही….

नववीचा निकाल लागला…आणि अनिरुद्ध च्या वडिलांची बदली झाली मुंबईला…एक वर्षासाठी शाळा बदल झाल्यास, उगाच अनुचे शालेय नुकसान होणार म्हणून त्याला केतकीच्या बाबांनी घरीच ठेवून घेतले.

काय वेड होते त्या दिवसांचे…मंतरलेले दिवस…रोज तो डोळ्याने दिसला की केतकीची नजर खाली झुकलेली असे…. कधीकधी ओझरते स्पर्श…पण अनिरुद्ध आपल्या मर्यादेत राहत असे.

दहावीची सराव परिक्षा संपली आणि आणि आज शाळेतला शेवटचा दिवस… सर्व मुलांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, उज्वल भविष्यासाठी.

केतकी मात्र अनु आपल्याला काही तरी बोलेल याची वाट पाहत होती....तो मात्र खंबीर आपल्या विश्वात दंग....

अपेक्षा खूप नव्हत्या, तुझ्या आठवणीत कैद व्हायचे होते मला…!
खूप काम असले तरी, मैत्रीत वेळ द्यायला हवा होता तुला…!

पेपर संपल्यानंतर एक दिवस अनुचे बाबा त्याला न्यायला आले…सकाळपासून केतकीचा मुड बिघडला होता...काही कारण काढुन ती त्याच्या जवळपास घुटमळत होती…तो जायला निघाला तोच त्याच्या बाबांना म्हणाला,
"माझे काही सामान वरती माळ्यावर राहिले आहे मी घेऊन येतो." त्याला माहिती होते केतकी तिथेच भेटणार.

रडून रडून लाल झालेला केतकीचा चेहरा त्याने हातात घेतला…तिच्या डोळ्यात डोळे घालून बस एवढेच म्हणाला,
"सगळं कळत होतं मला. पण हेच वय असतंय काही तरी करायचे. शिक्षणात पुढे जायचे…मी तुला पण तेच सांगतोय. हुशार आहेस, शिक्षणात खंड पडू देऊ नको. आयुष्यात जर पुन्हा भेटायचे असेल तर नक्कीच भेटू."
असं म्हणून तो निघुन गेला....कधीच न परतण्यासाठी.

आज मी आनंदात आहे. एक त्रिकोणी कुटुंबात....
पण आजही फेसबुकवर त्याच्या डिपी मध्ये, जेव्हा तो सिंगल आहे हे बघते, तेव्हा पुन्हा जुन्या आठवणी छळायला येतात..…

\"\"आठवणी आपल्या नसतात,
पण हृदयात ठाण मांडून बसतात\"\"

सकाळी उगाच मम्मीला दुखावले, याची जाणीव होताच निनाद हळवा होऊन मम्मीला बिलगला.

"मम्मी एक कप काॅफी तुझ्या हाताची"

"हो रे राजा आता करते बस दो मिनीट."

असे म्हणून खुदकन हसून किचन कडे वळली.

मी केतकी....!
०००
©® दिपा…

ईरा राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा
टिम : भंडारा
©® दिपाली समर्थ
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dipali Samarth

Housewife

I'm a poetry writer.

//