चांदणचकवा जंगलातला

एक वळीवाचा पाऊस आणि गूढ अनुभव

आज बऱ्याच दिवसांनी जंगल भटकंतीचा बेत ठरवायला आम्ही एकत्र आलो होतो.संत्या,राजा, शऱ्या यार.कुठेय तुम्ही?दत्ताची व्हॉईस नोट ग्रुपवर आदळली.म्हणाजे नियोजित ठिकाणी सर्वात आधी तो पोहोचला होता. आस्मादिक तब्बल अर्धा तास उशिरा पोहोचले.

तेवढ्यात संत्या चिडला,"काय यार पशा कधी येणार?संत्या फोन लाव त्याला."
तेवढ्यात मी हाशहुश करत पोहचलो,"काय यार केवढ उन?"

राजा हसला,"गपय संध्याकाळ झालीय आता."

तर मे महिन्याचा शेवट आल्याने सुट्टी संपून जायच्या आधी एक छोटी भटकंती व्हायला हवी.चर्चा सुरू झाली आणि चहा गार आणि चर्चा गरम अशी अवस्था निर्माण झाली.शेवटी प्रवास, ऊन,आणि इतर सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुण्यापासून जवळ जायचे ठरले.दुसऱ्या दिवशी डॉट सकाळी सहा वाजता निघायचे.


पहाटे पाच वाजता नोटिफिकेशन आले.सगळेजण आवरून यायला आणि निघायला नेहीप्रमाणेच साडेसात वाजले.एकमेकांवर दोषारोप सुरू झाले.शेवटी एकदाची गाडी स्टार्ट झाली आणि मग गप्पा,चेष्टामस्करी सगळी धम्माल सुरू झाली.एक तासाने राजेशने आवाज दिला,"इकडे एक प्रसिद्ध मिसळ मिळते तिथे थांबा."

शरदने सुर लावला,"आधीच निघायला उशीर झाला आता हादडायला परत एक तास."

त्याकडे कानाडोळा करत आम्ही आत शिरलो.शेजारी एक बाबा बसले होते.आमच्या गप्पा ऐकून म्हणाले,"पोरांनो कुठ निघालाय?"

राजाने बाबांना हसत म्हंटले,"निघालो तिकड डोंगरावर फिरायला."

म्हातारा म्हणाला,"पोरावो अंधार पडायच्या आत माग फिरा बाबा."

पशा हसत म्हणाला,"का वो बाबा काय भूतबित हाय का तिथं?"

म्हातारा नुसता हसून निघून गेला.संत्या म्हणाला,"तो म्हातारा अस का म्हणाला असेल?"

सगळे हसायला लागले,"गप रे संत्या,काही होत नाही."


मिसळ पोटात पडली आणि आम्ही सुसाट निघालो.एका तासाने आम्ही नियोजित स्थळी पोहचलो.सकाळचे साडेदहा वाजले होते.आता एक डोंगर चढून मग सोंडेने उतरून पुन्हा एक डोंगर एवढी भटकंती होती.सुरुवातीला करवंदाच्या जाळ्या पाहून,"जाळीमंदी पिकली करवंद द द द द."असे म्हणत.सगळे नाचायला लागले.


चढणीला दाट जंगल झाडी लागली.संतोष म्हणाला,"राजा वाट नीट माहीत आहे ना?"

राजा म्हणाला,"गप संत्या,तुला नेतो नीट."

करवंदे खात हसत खेळत एक चढण पार केली.वरून सोंडेच्या उताराला पोहोचायचे होते.जंगल वाटा किती फसव्या असतात हे भटक्यांना वेगळे सांगायला नको.झाडीतून अर्धा तास चालल्यावर लक्षात आले की वाट चुकली.राजेश थोड थांबला,"जरा थांबा रे,मी पुढे जाऊन पाहतो."

तेवढ्यात घाम पुसत शरद म्हणाला,"राजा जरा साखरझोेप मोडली असती तर असे उन्हात तळून निघालो नसतो आम्ही."

प्रशांत म्हणाला,"गप शऱ्या,चालत रहा."


असे बोलत काट्याकुट्यात दीड तास तंगडतोड करत एकदाचे सोंडेने उतरलो.त्यानंतर तब्बल तीन तासाच्या थरारक प्रवासानंतर आम्ही गडावर पोहोचलो.अंगातून घामाच्या धारा वहात होत्या,पाणी पिऊन आम्ही जरा विसावलो होतो.जवळपास दुपारचे चार वाजलेले.गड फिरत असताना वातावरण पालटू लागले.गार वारा वाहू लागला.ढगांची चाहूल लागली.मनाला छान प्रसन्न वाटू लागले.मातीचा गंध आसमंतात दरवळू लागला.



वळीव भरून आला आणि त्यानंतर निसर्गाचे तांडव सुरू झाले.पावसाने क्षणात रौद्र रूप धारण केले.आम्ही किल्ल्यातील गुहेचा आधार घेतला.आता आम्हाला जाणीव झाली.आपण अडकलो आहोत. धो- धो कोसळणारा पाऊस आला की मला मस्त चारोळ्या सुचतात पण आज जरा चिंता वाटू लागली.


अर्धा तास वाट पाहिली.त्यानंतर राजेश म्हणाला,"इथेच थांबून राहिलो तर अंधार पडेल."

त्यावर शरदने मत मांडले,"आपण गड उतरायला सुरुवात करू."


सगळ्यांचे यावर एकमत झाले.अंधारून आलेलं ढग,सगळीकडून वाहणारे पाणी आणि त्यात ओलेचिंब भिजत गड उतरणारे आम्ही.एरव्ही ह्या अशा पावसाळी सहलीत मजा येते.पण आज आम्ही अडकलो होतो.सावकाश गड उतरून आलो आणि आम्ही डोंगरसोंड चढण्यासाठी चालू लागलो.एका ठिकाणी ओढा लागला.


दत्ता मागे फिरला,"नको यार,पाणी जास्त असेल तर?"

तेव्हा संतोष म्हणाला,"अरे अजून पाऊस पडतोय,जर आणखी वाढले तर,त्यापेक्षा आता आपण जाऊ शकतो."


शेवटी साखळी करून आम्ही तो ओढा पार केला.संध्याकाळचे साडेसहा वाजत आले होते.तब्बल दोन तास कोसळत असलेला पाऊस आता ओसरू लागला.वळीव असाच असतो क्षणात धोधो कोसळतो आणि नंतर आभाळ एकदम निरभ्र होऊन जाते.


वातावरण निवळले त्यामुळे जरा हायसे वाटू लागले.अंगावरचे कपडे चिंब भिजल्याने अंगाला चिकटले होते, बुट भिजल्याने जड झालेले.अशा स्थितीत एकेक पाऊल उचलणे म्हणजे दिव्यच.मी वैतागून म्हणालो,"कोणत्या मुहूर्तावर राजाने हा ट्रेक ठरवला काय माहित?"


दत्ताने चिडवत आग पेटवली,"मुद्दाम आपली खोड मोडायला असला मार्ग निवडला त्याने."

शरद मात्र सिरियस होत म्हणाला,"अंधार झाला तर आधीच निसरड्या वाटा,त्यात जंगली जनावरे यांचा धोका होईल,चाल आवरती घ्या."


चढण सुरु झाली. सूर्य मावळतीला जाऊ लागला.आभाळाचे रंग आणि जंगलातले वातावरण बदलू लागले.प्रकाश अंधारात बदलला आणि क्षणापुर्वी मनोहर भासणारे जंगल गूढ,रहस्यमय वाटू लागले.मोठी झाडे अंधारात अंगावर येऊ लागली.अशा वेळी हमखास आठवतात त्या भयकथा.


आमचा गाईड काळजीपुर्वक वाट निवडत होता.राजेश म्हणाला,"खूण म्हणून एखादी फांदी मोडा."


कारण दुसरे काहीच नव्हते जवळ.ओल्या कपड्यात चालून थकलो होतो.एक विस्तीर्ण आंब्याचे झाड पाहून जरा विसावलो. संतोष म्हणाला,"झाडाखाली नको,अनोळखी ठिकाणी थांबू नये."


तेवढ्यात दत्ता बोलला,"काही जंगल भटक्यांना असे अनुभव आहेत."


ही चर्चा चालू असताना रातकिडे किर्र करत होते.मी शरदला म्हंटले,"वेळ किती झालाय रे?"


घड्याळ पहात शरदने उत्तर दिले,"साडेसात!"


आम्ही चालू लागलो.जंगलातून काजवे चमकत होते,रातकिडे ओरडत होते आणि जंगलात कोल्ह्यांचे,कुत्र्यांचे ओरडणे.वाट काही संपत नव्हती.कपडे ओले असल्याने आता थंडी वाजू लागली होती.इतक्यात संतोष ओरडला,"ते बघ,तिकडे शेकोटी पेटली आहे."


संतोष पुढे जाणार एवढ्यात दत्ताने त्याला मागे खेचले,"थांब,एवढ्या जंगलात इतकी छोटी शेकोटी कशी?"


तेवढ्यात शरदला एक म्हातारा तिथे दिसला.शरद त्याला हाक मारणार एवढ्यात मी गप्प रहायची खूण केली.तितक्यात त्या म्हाताऱ्याची मान एकशे ऐंशी अंशात वळली,"या की शेकायला."



आम्ही सगळे पळत सुटलो.एवढ्या थंडीत घामाने चिंब भिजलो होतो सगळे.तरी राजेश म्हणाला,"भास झाला असेल रे."


मग मी चिडलो,"सगळ्यांना एकदम सेम भास कसा होईल?"


यावर कोणाकडेही उत्तर नव्हते.जवळपास दोन तास चालत होतो आणि झाडी संपत नव्हती.तेवढ्यात संतोष ओरडला,"पशा बघ,हा तोच आंबा आहे."


तेव्हा मी चिडलो,"येडचाप इथे कितीतरी झाडे आहेत."
एवढ्यात शरदने माझी मान डावीकडे वळवली.तिथे शेकोटीजवळ तो उभा होता.


अंगातले त्राण जाणे,याचा प्रत्यक्ष अनुभव आला.जंगलातील अंधारातून अनेक नजरा आमच्यावर रोखल्या आहेत असा भास होत होता.मी म्हणालो,"फक्त समोर बघून चालत रहा.राजेश यावेळी वाट वेगळी निवड."


आम्ही चालायला सुरुवात केली.थोडा वेळ चाललो आणि झाडा मागून बाळाच्या हसण्याचा आवाज आला.तरीही आम्ही चालत होतो.तेवढ्यात आवाज आला,"नगा मारू ओ,बाळाला पाजू द्या.भुकेल हाय."


आवाज ऐकून आम्ही पळत सुटलो.आता जंगल आमच्यासाठी सापळा बनले होते.तेवढ्यात अंधारातून घुंगरू वाजले,"नका मारू,म्या करते तुमि मनसाल ते."


जसेजसे पुढे जात होतो.वेगवेगळे संवाद कानावर येत होते.एवढ्यात संतोषच्या अंगावर काहीतरी पडले,"वाचवा!"त्याबरोबर आम्ही पळत सुटलो आणि राजेश ठेच लागून पडला.त्याबरोबर बॅटरी दूर जाऊन आदळली.आता सगळीकडे अंधार आणि चांदण्यांचा उजेड.



आम्ही सतत पळत होतो.शरदने घड्याळात पाहिले,"अकरा वाजले,आपण काही जगत नाही आता."


तेवढ्यात दत्ता म्हणाला,"बारा वाजेपर्यंत चालणे थांबवायचे नाही. बारा वाजता हा फेरा चुकेल."


आम्ही चालत राहिलो.पाचव्यांदा त्याच आंब्याच्या झाडाजवळ आम्ही पोहोचलो.दमल्याने एकही पाऊल उचलत नव्हते.तितक्यात झाडावरून आवाज आला,लई भूक लागली आये.थांब आता जेवायला मिळल बग.


ते ऐकून आम्ही परत चालू लागलो.अंधारात काजवे चमकत होते.तितक्यात माझ्या शेजारी कोणीतरी चालत असताना मला म्हणाले,"पावन,तंबाखू द्या."


मी पळत सुटलो आणि पाय घासरून पडलो.चारपाच पलट्या मारल्या,अंग सोलून निघाले.तरीही उठून चालत राहिलो.हळूहळू आमच्या आजूबाजूला चालणारी पावले वाढू लागली.लहान मुले,म्हातारे,स्त्रिया,पुरुष यांचे आवाज कानात घुमत होते.आता आपण संपणार.उगीच रात्रीचे थांबलो.



असे विचार चालू असताना राजेश ओरडला,"तिकडे कंदील दिसतोय,पळा,थांबू नका."


जीवाच्या आकांताने आम्ही पळत होतो.कंदील जवळ येत होता.आम्ही ओरडलो,"वाचवा,इकडे आहे आम्ही."


कंदील जागेवर होता आणि तिकडून आवाज आला,"थांबू नका,पळत रहा."


घामाने संपूर्ण भिजलेले आम्ही पळत होतो.जसजसा कंदील जवळ येऊ लागला,आमच्याबरोबर चालणारी पावले कमी होऊ लागली.आम्ही कंदीलाजवळ पोहोचलो आणि मागून आवाज आला,"सुटल, नायतर वळीव आला की वाचत न्हाय कुणी."



आम्ही क्षणभर थांबलो.शरदने घड्याळ पाहिले. बारा वाजून पाच मिनिटे.


कंदील जवळ आला.सकाळी भेटलेले बाबा होते.आम्ही बोलायच्या आधी ते म्हणाले,"खाली वाडीत असतो म्या.तुमची गाडी तिथच बगून शंका आली.चला आता.संकट टळलं."


आजवर आलेल्या अनुभवात हा अनुभव विलक्षण होता.विज्ञान खरे की अनुभव याचे उत्तर मात्र नव्हते.


बाबा पुढे म्हणाले,"ह्या जंगलात एका सरदाराच्या पोराच्या लग्नाचं वऱ्हाड कापल दुष्मानानी तवा पासून वळीवच्या पावसात पाहिला चकवा लागतो जंगलात."


आम्ही काहीही न बोलता चालत होतो.गाडीजवळ येताच बाबा म्हणाले,"नीट जावा पोरांनो."

सत्य,असत्य,भास,आभास काहीही कळत नव्हते.फक्त एकढे समजले की चांदणचकवा संपला होता आणि आम्ही वाचलो होतो.

वरील कथा पूर्णपणे काल्पनिक आणि मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेली आहे.

प्रशांत कुंजीर.