बालपण ! बालपण म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुची रेशमी झूल. बालपण म्हणजे अनंतरंगी स्वत्व सिद्ध करणारे चिमुकले गवतफूल. शालेय वयात घडणाऱ्या सगळ्या घटना आयुष्यात शिलालेखासारख्या कायमच्या कोरल्या जातात. चांगले, वाईट सगळेच संस्कार याच वयात घडतात.
माझं प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झालं. तिथं जास्तीत जास्त मुली दारिद्र्यरेषेखालच्याच असायच्या. पण पाचवी नंतर मी हायस्कूलमध्ये गेले. तिथल्या वातावरण खूपच वेगळं. अनेक मोठ्या लोकांच्या मुली वर्गात असायच्या. त्या खूप नटून थटून शाळेत यायच्या. त्यांचं राहणीमान कपडे वगैरे आणि एकूणच वैभव पाहून कवी"बी"यांच्या ओळी आठवायच्या.
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या...
कां गं गंगा यमुना ही या मिळाल्या...
विभा विमला आपटे प्रधानांच्या...
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या...
हौस बाई पुरवीन तुझी सारी...
परी आवरी हा प्रलय महा भारी...
आणि वाटायचं श्रीमंती श्रीमंती म्हणतात ती हीच. मैत्रिणींकडे गेले तर त्यांच्याकडे अनेक वेगवेगळे खाद्यपदार्थ दिसायचे. हे सगळे पदार्थ आम्हाला मिळायचे तर नाहीतच पण ते विकत मिळतात हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. कपड्यांची चैन तर परवडणारी नव्हती. कपडे लवकर फाटू नये म्हणून आई जाडे भरडे कपडे आमच्यासाठी शिवायची. आपल्या मुलांची हौस आपण पुरवू शकत नाही यामुळेआई वडील दोघेही दुःखी असायचे.
काळ पुढे पुढे जात होता. बालपण संपलं. तारुण्य आलं. शिक्षण पूर्ण झालं. नोकरीही मिळाली. पण लहानपणी अनुभवलेली परक्यांची श्रीमंती स्वतःच्या जीवनात आणावी असं कधी वाटलंच नाही. मौजमजा करावी, दागदागिने घालावे असे मनातही आलं नाही. अवतीभवतीचा गोरगरीब समाज पाहिला ,की मन आक्रंदुन उठायचं.वाटायचं, "या हीनदीनांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हीच खरी श्रीमंती आहे.
साने गुरुजींच्या "जयांना कोणी ना जगती, सदा जे अंतरी रडती, तया जाऊन हसवावे "या नुसार साधेपणाने राहून दीनदुबळ्यांचे अश्रू पुसण्यातचं खरी श्रीमंती आहे. हे समजण्याइतपत मनही श्रीमंत झालं.
धन्यवाद
सौ.रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा