चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ...

मुल पालकांसाठी बोधकथा...
*चल रे भोपळ्या टुणुक टुणुक*
चंद्रपुर नावाच्या एका गावात एक म्हातारी आजी राहत होती.ती रिटायर्ड शिक्षिका होती.ती अतिशय हुशार विनोदी आणि हौशी स्वभावाची होती. तीला मोहन नावाचा एक मुलगा होता तर नेहा नावाची एक मुलगी होती.मोहन चांगले शिक्षण घेऊन अमेरिकेत मोठ्या नोकरीत होता. तर नेहा लग्न होऊन बाजुच्या गावात राहत होती. तिचाही नवरा चांगल्या नोकरीत होता. त्यांना एक मुलगा होता त्याचे नाव भावेश पण सगळे त्याला लाडाने भोलू म्हणत.
गेल्या वर्षीच आजीच्या पतीचे निधन झाल्या मुळे ती एकटी पडली. म्हणून मोहनने आईची काळजी घेण्यासाठी कांता नावाची एक कायमस्वरूपी मोलकरीण ठेवली होती.
कांता आजीची व्यवस्थित काळजी घेत असे. तसं आजीची देखिल कधी काहीच कटकट नसे. आजीला महिन्याला पेन्शन होती. मोहन देखिल वेळच्या वेळी पैसे पाठवी ..आजीला आता काही काळजी नव्हती ती आपला वेळ मस्त पुस्तके वाचण्यात घालावी...
एके दिवशी आजीला नेहाचा निरोप आला. आई लवकरात लवकर घरी ये.निरोप मिळताच आजी लेकीकडे जायला निघाली. नातवासाठी तीने घरातील बनवलेले मेथीचे लाडु घेतले.जातांना ती कांताला म्हणली कांता! मी लेकीकडे चालले आहे. तिकडे तुप रोटी खाऊन जाडजुड होऊन संध्याकाळी किंव्हा उद्या परत येईन. तो पर्यंत तु घराकडे नीट लक्ष ठेव! कांताला आजीचा विनोदी स्वभाव माहीत होता. ती हसली.. तुम्ही जाडजूड होऊन येईपर्यंत मी नीट लक्ष ठेवते.. तिनेही प्रती विनोद केला. दोघीही खळखळून हसल्या..
नेहाच घर आजीच्या घरा पासुन फक्त दोन-तीन किलोमीटर वर होते. त्यामुळे आजी चालतच निघाली. वाटेत तिला बरीचशी दुकाने लागली. त्या दुकानांत कुठे वेफर्सच्या माळा टांगलेल्या होत्या तर कुठे उघड्यावर वडापाव समोसे होते. तीने नातवासाठी यांतील काही -काही घेतले नाही. फक्त एका केळी वाल्या कडुन एक डझन केळी मात्र घेतली. ती देखिल त्याला दहा प्रश्न विचारून केळी ताजी आहेत ना? केमिकल पावडर ने तर पिकवलीत नाही ना? वैगरे वैगरे..
भोलू ने आजीला दरात पहिल्या बरोबर तो ओरडला आजी आली! आजी आली!! धावत जाऊन त्याने आजीच्या हातातील पिशवी घेतली.व त्यात तो खाऊ शोधू लागला त्याला केळ्या व घरातील मेथीच्या लाडवांन व्यतिरिक्त काही मिळाले नाही. तो हिरमुसला व म्हणाला हे काय ग आजी? जरा वेफर्स वडापाव समोसे वैगरे काही तरी आणयचे ना! ..अरे! भोलू असे बाहेरचे पदार्थ खायचे नाही. त्यामुळे लोक आजारी पडतात आजी समजावण्याच्या स्वरात म्हणाली. तसा भोलूने भोंगा चालु केला. आई! आता तुच बघ स्वतःच्या डोळ्यांनी हा आख्खा दिवस वेफर्स,वडापाव, समोसे ,कॅडबरी खात असतो. अजिबात कोणाचे काही ऐकत नाही. काही संगितले की, हा असा भोंगा पसरतो.
लॉकडाऊन मुळे शाळा नाही हे देखील कधी कधी घरूनच काम करतात. त्यांना डिस्टर्ब नको म्हणून हे देखिल त्याचे सगळे लाड पुरवतात. त्यामुळे भोलू अतिशय हट्टी बनला आहे. त्यासाठीच तर तुला बोलवले.. आता तुच काहीतरी कर बाबा! बघ ना चरबी मुळे कसा भोपळ्या सारखा सुजला आहे तो.. नेहा रागा रागात म्हणाली.
अस!.. त्यासाठी मला बोलवलस होय. ठिक आहे! मी त्याला काही दिवस घेऊन जाते. म्हणजे तुलाही आराम मिळेल आणि जावई बापूंना देखिल व्यवस्थित काम करता येईल.आजी स्वतः शिक्षिका राहिल्याने लहान मुलांचे मानसशास्त्र तीला चांगलेच ठाऊक होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आजी भोलूला घेऊन तिच्या घरी जायला निघाली.जाडजूड भोलू दहा पंधरा मिनिट चालल्यानंतर थकला.मला वेफर्स पाहीजे वडापाव तरी पाहीजे म्हणून हट्ट करू लागला. पण आजीने त्याचे काही एक ऐकले नाही. ए भोपळ्या! चल लवकर आजी डाफरली.तसा भोलू पुन्हा चालायला लागला. कसा बसा तो आजीच्या घरा जवळ पोहचला एव्हाना त्याला फार भुक लागली होती. कांता! हे कांता!! जरा भोलू साठी चपाती भाजी बनव ग! आजीने अंगणातुनच कांताला ऑर्डर दिली.
गोलूला आज सकाळ पासुन काहीच खाऊ न मिळाल्याने त्याला फारच भुक लागली होती. नाराजीने का होईना पण भुक लागल्यामुळे त्याने भरपूर चपाती भाजी खाल्ली. तेव्हा त्याला कुठे बरं वाटलं.
तरी त्याने पुन्हा वेफर्स साठी हट्ट केला तेव्हा आजीने त्याला व्यवस्थित समजाऊन संगितले की, बघ भोलू हे पाकिटातील पदार्थ दिसतात चांगले. पण प्रत्यक्षात ते चांगले नसतात. ते जुने जुने पदार्थ असतात त्यांना गंज लागलेला लोखंडाला कसा असतो तसा म्हणून तर त्यांना जंगफूड अस म्हणतात. त्यांत केमिकल टाकुन ते नव्याने बनवले जातात. ते केमिकल आपल्या पोटासाठी व मेंदु साठी हानिकारक असतात. म्हणून तर ते खाल्यावर मुलं आजारी पडतात. आणि वडापाव समोसे हे तर बऱ्याच वेळा उघडयावर असतात. त्यांवर किती तरी माश्या बसतात त्या माश्या त्याआधी कोण कोणकोणत्या घाणिवर बसल्या असतील कुणास ठाऊक? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते तेल किती तरी वेळा वापरलेले असते त्यामुळे फूड पॉइझन होऊन त्यातून टायफॉईड सारखे भयंकर आजार होण्याची शक्यता असते. म्हणून डॉक्टरांची सुई घेण्या पेक्षा ते पदार्थ न खाल्लेले कधीही चांगलेच बरोबर ना? आजीच्या या बोलण्यावर भोलूने आपली मान हलवली. व विचारले खरंच आजी हे पदार्थ गंजलेले असतात? त्याने कुतुहलाने विचारले. हो! अगदी खरं भोलू. आजीने त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवत संगितले.
रात्री मस्त आजीने भोलूला दोन तीन बोधपर आणि मनोरंजक गोष्टी सांगितल्या त्याला त्या फार आवडल्या.भोलू झोपल्यावर कांता आजीला म्हणाली
आजी काय हे? तुमचा एकुलता एक नातु आणि तुम्ही त्याला बाहेरच काहीच खाऊ देत नाही. तुमच्या कडे तर पैसा आडका देखिल आहे. तरिही तुम्ही त्याचा हट्ट पुरवत नाही अजुन लहान आहे तो! .. हेच! हेच!! चुकते लोकांच एकुलता एक आहे तो,आपल्या कडे काय भरपुर आहे, लहान आहे तो....ही जी सगळी कारण सांगतात ना तीच मुलांना हट्टी बनवतात.अग! माझी काय माया नाही भोलू वर.. पण काळजावर दगड ठेऊन कराव लागत आणि मी तर म्हणते प्रत्येक पालकांनी हे करायला हवं..मुलांना तात्पुरते वाईट वाटेल पण भविष्यात त्यांना त्याचा किती फायदा होईल.. आणि मुलांवर रागावण्या पेक्षा त्यानां समजाऊन संगितले पाहीजे. आजचच बग ना भोलू आला तेव्हा किती हट्ट करत होता नंतर मी जवळ घेऊन त्याला प्रेमाने सगळं समजाऊन संगितले तर किती फरक पडला.. आजी बोलत होती. आजीच बोलणे आता कांतालाही पटत होत..
दुसऱ्या दिवशी भोलूत बराच फरक जाणवला.. आजीनेही त्याचे कौतुक केले. आता भोलूने बाहेरच्या पदार्थांसाठी कधीच हट्ट केला नाही.. तो आता रोज उठुन आजी बरोबर योगा करायचा, सकाळी धावायला जायचा अभ्यास करायचा.. मोबाईल ऐवजी तो चांगली -चांगली पुस्तके वाचायचा..आणि विशेष म्हणजे घरचच खायचा त्यामुळे आपोआप त्याची तब्बेत कमी झाली. महिन्या भरात त्यालाही मोकळे-मोकळे वाटू लागले...त्याची चरबी उतरून गेली भोलू आता भोपळ्याचा दुधी झाला होता.
असाच एक दिवस नेहाचा निरोप आला अग आई फार दिवस झाले.भोलूची आठवण येते त्याला घेऊन ये.. लेकीचा निरोप मिळताच दुसऱ्या दिवशी आजी भोलूला घेऊन निघाली.. आता मात्र भोलू आजीच्या मागे टुनटुन उड्या मारत निघाला.. आजी देखिल त्याला त्याला लाडिक स्वरात सांगत होती चल रे! भोपळ्या टुणुक टुणुक ..चल रे! भोपळ्या टुणुक टुणुक ..
लेखन: चंद्रकांत घाटाळ..
संपर्क : ७३५०१३१४८०