चक्रव्यूह- एक चकवा. भाग-3

विद्याने आईवडिलांच्या विरोधात जाऊन केलेलं लव्हमॅरेज तिला कुठून कुठे घेऊन गेलं. नक्की वाचा.

'चक्रव्यूह'- एक चकवा (भाग-3)

©®श्री. सारंग शहाजीराव चव्हाण. 

तिची वाट बघत असताना मनात नानाविध विचार येत होते,पण मी प्रत्येक शक्यता फेटाळत होतो. विद्याला आत जावून दोन तास उलटून गेले होते. मला आता एकाजागी बसून कंटाळा आला होता. इतक्यात सिक्युरिटी गार्डने गेट उघडलं आणि मी सावध झालो. कारण आता आत गेलेल्यापैकी कोणीतरी बाहेर येणार हे नक्की होतं.

थोड्याच वेळात त्या दोन मोटारी जशा पाठोपाठ आल्या होत्या तशाच पाठोपाठ गेट मधून बाहेर पडल्या. गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे गाडीमध्ये कोण आहे हे दिसत नव्हतं. गेटमधून बाहेर पडल्यावर त्या गाड्या सुसाट निघून गेल्या. आता मला विद्याच्या येण्याची आतुरता आणखी वाढली होती,इतक्यात मला विद्या गेटमधून बाहेर पडताना दिसली.

मी झाडाच्या मागे लपलो, कारण मला तिला इतक्यात सावध करायचं नव्हतं.

ती थोडीशी पुढे गेल्यावर मी तिच्या मागोमाग जाऊ लागलो. मग मी तिला पाठीमागून हाक दिली.

" विद्या."  अचानक मी हाक मारल्यामुळे ती थोडीशी दबकली. पण मागे न बघता ती पुढे चालू लागली.

 मी पुन्हा, "विद्या." अशी हाक मारली. आता ती मागे वळणार त्याआधीच मी तिच्याजवळ पोहोचलो.

ती मला बघून घाबरून गेली. मी तिला म्हणालो,"घाबरु नको प्लीज!" 

ती चेहऱ्यावर गंभीर भाव आणून म्हणाली,"तु इथे काय करतोय?"

मी थोडा बावचळून म्हणालो, "मित्राकडे आलो होतो."

ती म्हणाली,

"इथे तुझा मित्र कसाकाय असू शकतो? काहीपण सांगू नको."

मी म्हणालो, "का? इथे का असु नाही शकत?"

ती म्हणाली,"कारण इथे.............."   तिने पुढचं बोलणं टाळलं आणि ती म्हणाली, "ओके बाय! मला घाई आहे."

आणि ती चालू लागली.

पण आज मला तिच्याकडून तिच्याविषयी जाणून घ्यायचंच होतं.

मी पुन्हा तिला म्हणालो,"विद्या,तु दुबईला होती ना? मग आता इथे काय करत आहेस?" 

ती न ऐकल्यासारखं करून जोरात चालू लागली. त्यासरशी माझा संशय आणखी वाढू लागला. 

आता आम्ही बसस्टॉपवर पोहोचलो होतो. विद्या माझ्याकडे अधूनमधून 'मी कधी जातोय' हे बघत होती. पण आज मला तिच्या घरापर्यंत जायचंच होतं,कारण तिथून ती मला उत्तर दिल्याशिवाय कुठेही जाऊ शकणार नव्हती.

बस आल्यावर मी तिच्यानंतर बसमध्ये चढलो. ती माझ्याकडे बघून दातओठ खात काहीतरी पुटपुटत होती.

थोड्यावेळाने एका स्टॉपवर ती उतरु लागली,मग तिच्यापाठोपाठ मीपण उतरलो.

मला तिच्या मागे आलेलं पाहून तिला माझा राग आला होता. ती मला रागाने म्हणाली,"का माझा पाठलाग करत आहेस? प्लीज! माझा पिच्छा सोड. तुला काय हवं आहे?"

मी शांतपणे तिला म्हणालो,"मला काही नको, मला फक्त काही प्रश्नांची उत्तरं दे. मग मी निघून जाईन."

"पण तुला का हवी आहेत उत्तरं?" ती रागानेच म्हणाली.

मी म्हणालो,"तू माझी वर्गमैत्रीण आहेस आणि तू नक्कीच काहीतरी लपवत आहेस. मला तुझी काळजी वाटत आहे म्हणून विचारत आहे."

"माझी काळजी?" तिच्या चेहऱ्यावरचा  भाव बदलला होता,ती थोडावेळ स्तब्ध झाली आणि मग भावुक होऊन म्हणाली,"माझी काळजी माझ्या आई बाबांना खूप होती रे. पण मी त्या काळजीच्या बदल्यात काय केलं?"

आता तिचा बांध फुटला आणि ती भर रस्त्यात रडू लागली. मी तिला थोडा धीर देऊन सावरलं.

मी म्हणालो,"मला सांग काय असेल ते. मी तुला मदत करेन. तसेच माझ्याबद्दल मनात काही शंका ठेवू नको. मी फक्त एक मित्र या नात्याने तुला मदत करणार आहे,माझा वैयक्तिक बाकी काही स्वार्थ नाही."

स्वतःला सावरत ती म्हणाली,"जवळच माझं घर आहे. चल घरी जाऊन बोलू."

थोडावेळ चालल्यानंतर आम्ही दोघे तिच्या घरवजा खोलीत  पोहोचलो. तिने बसायला खुर्ची दिली आणि ती चहा करु लागली. 

मला तिचं घर बघून कमाल वाटत होती की,'हिचा नवरा एवढा रुबाबदार होता,मग ही अशा लहानशा खोलीत का राहत आहे?'

मी न राहवून तिला विचारलं,"विद्या! तुझे मिस्टर कुठे आहेत?" 

त्यावर तिचा काहीच प्रतिसाद आला नाही.

ती जाणूनबुजून लक्ष नसल्यासारखं करत होती.

"एकटीच राहतेस का तू?" मी पुढे म्हणालो.

त्यावर ती म्हणाली,"नाही रे. माझी मुलगी आहे की,शाळेला गेली आहे. येईलच इतक्यात."

मी विचारलं,"आणि मिस्टर कुठे असतात?" 

ती म्हणाली,"तो आमच्याबरोबर राहत नाही, त्याचं आणखी एक लग्न झालेल आहे, तो तिकडेच असतो."

आता तिच्या चेहऱ्यावर द्वेष दिसत होता.

"अगं तुमचं तर लव्ह मॅरेज झालं होतं ना? मग असं कसं?" मी हैराण होऊनच विचारलं .

ती चेहरा पाडून म्हणाली,"तो कधीच माझा नवरा नव्हता. माझ्या आधीच त्याचं दुसऱ्या एका स्त्रीशी लग्न झालं होतं. तो फक्त माझ्या मुलीचा बाप आहे पण माझा नवरा नाही."

 मी आता संभ्रमात होतो. काहीच बोलायला सुचेना.

ती म्हणाली,"त्याने मला फार मोठ्या कारस्थानाचा बळी बनवलं आहे, आता त्यातून माझी सुटका होणार नाही. मनात नसतानाही मला त्याच्या कुकर्मात सहभागी व्हावं लागत होतं आणि आता मी त्यात पूर्ण गुरफटून गेले आहे. आई बाबांचं ऐकलं असतं तर माझ्यावर अशी लपूनछपून जगायची वेळ आली नसती."

मी म्हणालो,"मला सगळ नीट सांगशील का? कदाचित मी तुला यात काही मदत करु शकेन."

ती काही बोलणार इतक्यात तिची मुलगी शाळेतून परत येताना दारात दिसली.

त्यावर ती म्हणाली,"आपण  याविषयी उद्या बोलू. माझ्या मुलीला यातलं काहीच माहीत नाही."

मी चहा घेतला आणि स्विच ऑफ केलेला मोबाईल चालू करून  तिचा मोबाईल नंबर घेऊन बाहेर पडलो. पण मनात हेच विचार होते की,'विद्या तिच्या नवऱ्यामुळे अडचणीत सापडली आहे. त्याने हिची फसवणूक करुन हिला कशात तरी अडकवलय असं वाटतं. पण नक्की काय झालं असेल? हे तिला पुन्हा भेटल्याशिवाय कळणार नाही.'

हा विचार करतच मी बसमध्ये चढलो आणि बॉसला कॉल करून 'आज ऑफिसला का आलो नाही.' ते समजावत घरचा मार्ग पकडला.

क्रमशः

विद्याचं ज्याच्याशी लग्न झालं होतं त्याने तिला कशात

अडकवलं होतं?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

'चक्रव्यूह'- एक चकवा.

श्री.सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.९९७५२८८८३५.

(कथा आवडल्यास नक्की लाईक करून आपला बहुमोल अभिप्राय द्या. तसेच मला फॉलो करा.)

🎭 Series Post

View all