चाफ्याची बहरलेली गोधडी..

चाफ्याची बहरलेली गोधडी..


कथा
चाफ्याची बहरलेली गोधडी
©स्वप्ना...
"नाथा जरा माझा पलंग खिडकीकडे लावशील का? सगळे ओरडत आहेत.. रागवत आहेत मला फालतू हट्ट करू नको म्हणून पण तुला माहीत आहे ना सगळं.. त्याचा बहर बघूनच डोळे मिटतील माझे.. पानगळ होऊन फक्त जाड हिरवीगार देठं उभी आहेत ना दिमाखात.. फिकट पांढरी मध्येच सुर्यासारखी पिवळी फुलं बहर होऊन त्याच रूप अगदी सुंदर दिसत असेल ते बघू दे जाण्याआधी शेवटचं.."

आजीच्या वाक्यावर नाथा हसला.
“बरं आजी.."
म्हणत नाथाने आजीच्या डोक्यावर थोपटलं.

"तू ऐकणार नाहीसच ग अजे.."

म्हणत त्याने तिच्यासकट कसरत करत तो पलंग आणला खिडकीशी. आजी म्हणाली,

"मानेखाली थोड्या दोन उश्या घाल म्हणजे दिसेल चाफा नीट .."

म्हणत तिने मान उचलली. त्याने हसून तिच्या मानेखाली उश्या ठेवल्या. ती त्या झाडाकडे बघता बघता झोपली. त्यानेही खिडकीशी डोकावलं खरंच एकही पान त्यावर नाही आणि फुलांचा बहर असा भरून आलेला.. त्याने हाताशी असलेलं एक फुल तोडलं आणि त्याची अंगठी बनवली ती आपल्याच बोटात धरून त्याने आरश्यात डोकावलं. आरश्याने त्याला मागच्या काळात नेलं.

टोपलभर फुलं घेऊन आजी आपल्या भोवती फिरत होती त्यावेळी आपण आठ एक वर्षाचे होतो. ती म्हणत होती,

"हे बघ आज तुझ्या शाळेतल्या स्पर्धेत तुला कृष्ण करते.. ह्या फुलांचा हार,टोप,कानातले त्याचीच अंगठी तू बघ तर कसा मस्त दिसशील नाथा ह्या रुपात तुला कोणी ओळखायचं नाही.."

म्हणत आजीने भराभर ह्या फुलांचे दागिने केले. आपण जरा रुसलो तर म्हणाली,

"अरे असं काय करतो तुझ्या मित्रांच्या भारी ड्रेसला.. कोणी पोलीस कोणी राजा जरी झाले तरी आपल्या चाफ्याने बघ ना तुला कसे छान सजवले.. आपण तोंड फुगवून शाळेत गेलो. वेशभूषा स्पर्धा सुरू झाली.आजीने शिकवलेलं पद आपण मस्त म्हंटले..

"नका दुःखी होऊ जगी,..
नसेल जरी सोबत कुणी,..
चाफ्यालाही कोणी नसताना,..
बहरून यावे वाटते किनी,..
एकटच येतो जगी माणुस
जातो ही एकटाच तो,..
जगण्याचा बहर टिकवा,..
हाच सांगतो नाथ कृष्ण तो.."

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मोठ्या बाईंनी तर विशेष कौतुक केलं आणि आजीला बोलावून म्हंटल्या..

"आजी कमाल आहे तुमची एवढं दुःख आयुष्यात आहे तरी त्या नातवासाठी सगळं दुःख गिळून किती आंनदी,उत्साही जगता तुम्ही.."

त्यावेळी आजीने आपल्याला पटकन पोटाशी धरलं होतं आणि बाईंना म्हणाली,

"बाई मी ही सामान्य बायकांसारखी रडत बसले होते.अपघातात ह्याचा आजा, ह्याचीआई माझा एकुलता एक लेक गेला त्याक्षणी वाटलं आपण का वाचलो. खुप दिवस दगडासारखी होऊन बसून राहायचे दारात एकदा टपकन चाफ्याचं फुल डोक्यात पडलं. सहज वर बघितलं तर फांद्या नुसत्याच एकही पान नाही पण शेंड्याला भरगच्च फुलं.. खरंतर किती जून ते झाड पण असा विचार कधी आला नाही आणि आता आला त्याक्षणी वाटलं.. झाड निमित्त होऊन देवाचा संदेश मला सांगतंय. काहीही झालं तरी जगण्याचा बहर सोडायचा नाही मग ह्या लेकरसाठी आता अशी भरभरून जगायला शिकले.. मला काही साधन नव्हतं पैसे कमवायला मग ह्या चाफ्यालाच मनात धरलं आणि गोधडीवर तसेच फुलं विणायला घेतले. हातात कला होती त्याला बहर आला. एकटीला हे सगळं जड चाललं होतं पण बाई ह्या शाळेतल्या अनेक शिक्षकांकडून भरपूर ऑर्डर मिळाल्या. व्यवसायला बहर आला मग हा बहर शिकवायचे केंद्रच बनवले आणि ते शिकवले फक्त अनाथ बायांना.. एकीला एक मिळत गेली आणि आता चालू आहे असं बहरून जगणं."

आजीची ही सगळी वाक्य त्याला आठवली. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. टपकन आजीच्या हातावर एक अश्रू पडलाच आजीला जाग आली. हातानेच आजीने त्याला खाली वाकायला लावलं.

“नाथा.. असा रडत बसू नकोस. आपण ह्या चाफ्याकडून शिकलो ना तसाच राहा. कठिण परिस्थितीतही फुललेला. आपण चालवलेलं अनाथ महिला आश्रम आणि चाफ्याची गोधडी केंद्र असंच पुढं ने.. गेले मी जरी तुझ्या आयुष्यातून निघून तरी.. चाफ्याचा बहर असाच आयुष्यभर फुलु दे..”

आजीने डोळे मिटले नाथाने एकदा आजीकडे बघितलं आणि एकदा बहरलेल्या चाफ्याकडे दोघेही एकच सांगत होते.. जगण्याचा बहर जपायचा,.

वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा. अश्याच सकारात्मक कथांचे पुस्तक हवे असल्यास 7038332429 ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.. धन्यवाद.
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद