चाफा बोलेना भाग ८

It's a Blooming love story..

#चाफा_बोलेना... 
#भाग८
©अर्चना बोरावके"मनस्वी"
    अबोली दुधाचा ग्लास घेऊन अविच्या खोलीत आली. खोलीमध्ये येताच गुलाब आणि मोगऱ्याच्या दरवळ तिला जाणवला. पलंगाला सगळीकडून मोगऱ्याच्या माळांनी सजवले होते.... पलंगावर गुलाबाच्या पाकळ्या पसरवून ठेवलेल्या होत्या.... हे सगळे बघून अबोली एकदम लाजून गेली.  मनात प्रेम आणि संकोच अशा दोन्ही भावनांची दाटी झाली..... आज लग्नाची पहिली रात्र! कथा कादंबर्‍यांत वाचलेली किती तरी वर्णने तिला आठवू लागली...... त्या गोष्टींत रमणारी अल्लड अबोली, स्वतःच्या आयुष्यात आलेली ही पहिली रात्र कशी असेल याची कल्पना करत एकेक पाऊल पुढे टाकत त्या पलंगाजवळ आली. तिने दुधाचा ग्लास पलंगाशेजारच्या स्टूलवर ठेवला.... आणि तिचे लक्ष अविकडे गेले. तो त्याच्या टेबलजवळ बसुन कसली तरी फाईल बघत होता..... त्याचे अबोलीकडे लक्षही गेले नाही. अबोली त्याच्याजवळ गेली.
      " अवि काय करतोय रे ?"
     " काही नाही..... सगळी कागदपत्रे व्यवस्थित ठेवतोय.... ऐनवेळी धावपळ नको... परवा सकाळीच निघायचेय ना आपल्याला!"
    " अरे मग उद्याचा दिवस आहे ना! उद्या कर सर्व... आता खूप उशीर झालाय...दिवसभर खूप थकून गेला असशील.... आराम नको का करायला? .... उद्याचा दिवस पण धावपळीत जाणार आहे..... चल, झोप आता. "
    अविने अबोलीकडे एकदा वर पाहिले आणि परत आपले डोके त्या फाईलमध्ये घातले .
  " अबोली मला आजच हे काम संपवायचे आहे.... तू झोपून घे.... मी नंतर काम झाल्यावरच झोपणार आहे. "
      " अरे मग मीही बसते ना तुझ्याबरोबर.... तू काम कर आणि मी तुझ्याशी बोलत बसते.... तू आल्यापासून आपण बोललो तरी आहोत का? माझ्या मैत्रिणी काय म्हणत होत्या तुझ्याबद्दल, ते सांगायचे आहे तुला. "
        " हे बघ अबोली, महत्त्वाचे काम चाललंय माझं.... मला शांतपणे करु दे.... तू झोप पाहू आता.... "
     अविच्या बोलण्याने अबोली एकदम शांत झाली.... तिला फार वाईट वाटले...  अविने माझ्याकडे नीट पाहिलेही नाही आज..... मी कशी दिसत होते, हे एका शब्दानेही बोलला नाही.... सगळा श्रृंगार कोणासाठी केला होता मी? .... किती आसुसले आहे मी तुझ्या प्रेमाच्या एका नजरेसाठी! ..... दिवसभर नाही निदान आता तरी थोडं बोलायचं ना माझ्याशी.....  प्रेमाच्या गोष्टींनी आजची रात्र कायम स्मरणात राहील असं काहीतरी बोलायचं सोडून मला सरळ झोपायला सांगतो आहे..... दोन शब्दही प्रेमाचे त्याला बोलावेसे वाटत नाही का?..... ती तशीच खट्टू होऊन पलंगावर गेली....
पाठमोर्‍या  अविला बघता बघता तिला कधी झोप लागली.... हे तिलाही कळले नाही.....तिची स्वप्नं तिच्या मनात तशीच राहिली.
            सकाळी दाराची कडी वाजू लागली तशी अबोली उठली..... वैजूआत्या आवाज देत होती. अबोलीने शेजारी पाहिले. अवि पलंगाच्या एका बाजूला अंग चोरून झोपलेला होता..... शांत झोपलेला अवि, झोपेत किती सुकुमार दिसत होता..... त्याचे घनदाट काळेभोर केस कपाळावर रूळले होते..... झोपेतही त्याचे डोळे अर्धे उघडेच रहात असत..... किती दिवसांनी ती त्याला असे जवळून बघत होती..... त्याच्या  गुलाबी ओठांवर हसू उमटले होते, जणू झोपेत सुंदर स्वप्नच तो बघत होता.... त्याच्याकडे असेच पहात रहावे असं तिला वाटून गेलं....तिने, तिचा हात त्याच्या केसातून फिरवण्यासाठी वर उचललाच होता, तोच वैजू आत्याची परत हाक ऐकू आली.
                  साडी ठीक करून ती बाहेर आली..... वैजू आत्याची अनुभवी नजर एकदा तिच्या चेहर्‍यावरून तर एकदा खोलीवरून फिरली.... दुधाचा भरलेला ग्लास तिला तसाच स्टूलवर दिसला..... काहीही न बोलता त्या अबोलीला घेऊन बाहेर गेल्या.
              सकाळ पासून घरात गडबड सुरू झाली.... त्यांच्याबरोबर काय काय द्यायचे याची यादी बनवली गेली...... सामानाची बांधाबांध करायची होती. दुपारी जेवणे झाल्यावर सगळे जण अवि आणि अबोलीचे सामान भरू लागले.... अबोलीला एकदा  अविबरोबर महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाचे आशिर्वाद घेऊन यावे अशी खूप इच्छा होती. वैजू आत्याला सांगताच ती तयार झाली.
    " पण लवकर या हो दोघे! तिन्ही सांजेच्या  आत या घरी ... अबोली तिथे गेली की रमूनच जाते..."
     अवि आणि अबोली निघाले.
   " परत लवकर यायला मिळेल की नाही माहित नाही अवि ! मी महादेवाला नवस बोलले होते की आपलं लग्न झालं की जोडीने येऊन मंदिरात मनोभावे पूजा करीन.... "
    " म्हणजे काय महादेवाने लग्न जमवले आपले? "
   " महादेव तर लहानपणापासुनच पाठीशी आहे आपल्या! इथेच तर रंगत होती आपली भातुकली..... आणि आता त्या भातुकली मधले आपण दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती-पत्नी झालो आहोत..... त्याचीच ही कृपा! तू नसताना किती वेळा मी इथे यायची.... तासनतास माझ्या मनातले या शंभू महादेवाला सांगत असायची..... तोच मला धीर देत असायचा..... आणि त्यानेच तुला माझ्यासाठी परत पाठवले... "
    " मी माझ्या आईसाठी आलो अबोली..."
    अबोलीने चमकून त्याच्याकडे पाहिले.... ती काही बोलणार तोच त्यांना मंदिरातील गुरुजी येताना दिसले... त्यांच्या हातूनच पूजा करायची होती अबोलीला..... ते सगळे मंदिरात निघाले. जाताना नदीकाठच्या नील कमलांकडे अबोलीची नजर गेली.... तिला वाटले होते अवि पटकन पुढे जाऊन फुले तोडून आणील.... पण त्याने तिकडे पाहिलेही नाही.... सरळ पुढे निघाला. अबोलीला फार वाईट वाटले.... पण तसे न दाखवता तीही लगबगीने पुढे निघाली.
          मंदिराच्या आवारातील चाफ्याच्या झाडाजवळ ती उभी राहिली.... डोळे भरून त्या फुलांनी डवरलेल्या झाडाला डोळ्यात साठवून घेऊ लागली.... आता परत कधी बघायला मिळणार हे झाड? तिने आणि अविने लावलेले ते झाड तिने इतके दिवस प्राणापलीकडे जपले होते..... तो नसताना त्याच्या आठवणीने, त्या झाडाशी आपले हितगुज केले होते.... त्या फुलांनी तिला वेड लावले होते...... ती चाफ्याची फुले आता परत कधी बघायला मिळणार? तिचा जीव होता त्या झाडात! तिने  अविला  झाड हलवून फुले पाडायला लावली.... ती फुले आपल्या साडीच्या पदरात झेलून, तिने तो सारा सुगंध मनात साठवला आणि मंदिरात गेली.
         पूजा छान पार पडली. डोळे मिटून तिने महादेवाची प्रार्थना केली, " देवा तू माझ्या मनाप्रमाणे सर्व केलेस, आता या चाफ्याप्रमाणे प्रेमाचा सुगंधही आमच्या जीवनात पसरू दे...... आमचा संसार सुखाचा होऊ दे."
        त्या मंदिराचा, नदीचा आणि आमराईचा निरोप घेऊन ते दोघे निघाले.... तिने आपल्या बरोबर खूप सारी चाफ्याची फुले घेतली होती...... इथल्या क्षणांची सुंदर आठवण म्हणुन ती ही फुले बरोबर घेऊन जाणार होती!
            दोघेही घरी पोहोचले. जेवणे  झाली. दुसर्‍या दिवशी सकाळी लेक अमेरिकेला जाणार... परत कधी येणार हेही माहीत नाही.... लेकीशी चार शब्द बोलावे.. तिला कुशीत घेऊन निजावे म्हणुन अबोलीच्या आईने तिला तिच्याबरोबर झोपायला नेले.
" अवि व्यवस्थित वागतो ना तुझ्याबरोबर, अबोली?"
" हो गं आई! पण पहिल्यापेक्षा शांत झालाय... जास्त बोलतच नाही."
  " हे बघ अबोली, तू आता दूर परदेशात राहणार. तिथे तुला अविवर चांगलं लक्ष ठेवावं लागेल.... तिथलं वातावरण खूप मोकळं असतं,... तू अशी भोळी, तुला काही समजत नाही.... आपलं माणूस आपल्या शब्दात असलं पाहिजे... नीट नजर ठेव त्याच्यावर.. "
   " काहीही काय बोलतेस आई? तुला माहित आहे ना अवि किती चांगला आहे... तू चिंता करू नकोस.... आणि झोप आता. "
        इकडे वैजू आत्या अविकडे आली.
"अवि , अबोली आता तुझी पत्नी आहे.. तुझी तिच्याबद्दल काही कर्तव्ये आहेत.... तिला पत्नी असण्याचे सर्व हक्क आणि प्रेमही मिळाले पाहिजे.... ती पोर तुझ्यावर जीव ओवाळून टाकते, तिच्याशी प्रेमाने वाग....तिला ते सर्व दे, ज्याची ती हक्कदार आहे! मला तुम्हा दोघांचाही संसार सुखाचा झालेला बघायचाय.... तिकडे परदेशात आम्ही नसू तुला काही सांगायला... त्यामुळे आत्ताच सांगते, प्रेमाने प्रेम वाढते... सहवासाने विश्वास वाढतो आणि जिथे प्रेम आणि विश्वास आहे ना तिथे सहजीवनाची वेल बहरते.... आणि त्या वेलीवरील फुलांचा दरवळ आयुष्य सुगंधित करून जातो....
  लक्षात ठेवशील ना माझे हे बोल? "
         " मी प्रयत्न करीन आई... तिला काही कमी पडू देणार नाही... "
     वैजू आत्याला हे ऐकून बरे वाटले  पण तिच्या मनात अजूनही अविविषयी शंका होतीच...
क्रमशः

वाचकहो कशी वाटली कथा? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. 

©अर्चना बोरावके"मनस्वी "

#टीप :या कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. पूर्वपरवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
       माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी माझ्या #मनस्वी या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.
PC: Google 

🎭 Series Post

View all