चाफा बोलेना ... भाग ४

It's a Blooming love story.

#चाफा_बोलेना... 
#भाग४
©अर्चना बोरावके"मनस्वी"
       

अविच्या जाण्याची तयारी जोरात सुरू झाली. कागदपत्रांची जमवाजमव, शहरात हेलपाटे, पैशांची तजवीज, लागणार्‍या सामानाची खरेदी या सगळ्यात अवि पूर्ण बुडून गेला. अबोलीची घालमेल होत होती. त्याच्याशी बोलायला तिला संधीच मिळत नव्हती. आधीही इतकी वर्ष तो दूर होता.... आता तर अजूनच दूर चालला होता. आता कुठे तिला तिच्या मनातील भावना समजू लागल्या होत्या.... आता कुठे प्रेमाची पालवी तिच्या मनाला फुटू लागली होती. ज्याच्याकडे लहानपणापासून एक सवंगडी आणि मित्र म्हणुन पाहिले, त्याचे वेगळे रूप आत्ताच तर कुठे मनात बसू लागले होते..... अजुन तर तिला, तिच्या मनाचाही थांग लागत नव्हता. तिला अवि आवडतो हे तिला लहानपणापासूनच माहीत होते... पण यालाच प्रेम म्हणतात का, याचा तिला अजून शोध लागायचा  होता...... आणि अवि ? त्याच्या मनात काय आहे, हे तरी कुठे माहीत होते? तो जेव्हापासून बाहेर गेला, तेव्हापासुन त्यांचे बोलणेही कमी होत गेले. पहिल्यासारखे तिच्याशी मनमोकळे तो आता बोलतच नसे. गांभीर्याचे आवरण जणू त्याच्या आकर्षक चेहर्‍यावर चढले होते. अबोलीला त्याच्याशी खूप बोलायचे होते..... तो जाण्याआधी आठवणींचे अनेक मोती मनाच्या कुपित गोळा करून ठेवायचे होते. पण तिला तो कधी मोकळा दिसतंच नव्हता..... कामात गढून गेला होता.
                 अविची सर्व तयारी झाली. तिकीट आले. दोन दिवसांनंतर जाण्याचा दिवस होता. अबोलीच्या जीवाची घालमेल सुरू झाली. शेवटी तिला आठवले..
" अगं आत्या, अवि  इतका लांब चाललाय, आपल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन आशिर्वाद घ्यायला नको का? आम्ही जाऊन येऊ का आज मंदिरात?"
   " हो गं बाळा! मलाही तेच वाटत होते.... महादेवाच्या आशीर्वादाने इतके दिवस सर्व आपल्या मनासारखे झाले.... या पुढेही होईल. तुम्ही आजच जा. "
   संध्याकाळी चारलाच अबोली तयार झाली. आकाशी रंगाचा ड्रेस घातला ..... आकाशी रंग तिचा आणि अविचा आवडीचा! बागेतल्या अबोलीचा गजरा केसात माळला...... मूळच्याच टपोऱ्या डोळ्यांना काळजाच्या रेघेने खुलवले..... मागे एकदा अविने आणलेल्या मोत्याच्या बांगड्या हातात घातल्या..... मोत्याचेच डूल कानात घातले. स्वतःचे रूप आरशात निरखून पाहिले..... आणि ती स्वतःवरच खुष झाली.
          वैजू आत्याने एका पिशवीत दूध,  आणि पेढ्यांचा बॉक्स दिला.
    " अवि, महादेवाचे आशिर्वाद घेऊन ये.....आणि जाताना थोडी ताजी फुले आणि बेलपत्र ही घेऊन जा."
   अवि आणि अबोली निघाले. वैजू आत्या, ते दिसेनासे होईपर्यंत त्यांच्याकडे कौतुकाने बघत राहिली," अगदी शंकर-पार्वती सारखा अनुरूप जोडा आहे..... महादेवा, सगळं व्यवस्थित होऊ दे.......लेकरांना कायम सुखी ठेव. "
               अविबरोबर चालताना अबोली मोहरून गेली होती. तिला काय बोलावे काही सुचेचना. मंदिर जवळ आले. मग अविच म्हणाला, " बेल आणि फुले पण घ्यायचीत ना? "
   " अरे मंदिराच्या बाजूलाच किती तरी झाडे आहेत..... विसरला की काय तू? "
       नदीच्या बाजूने जाताना अबोलीचे लक्ष तिच्या आवडीच्या नीलकमलांकडे गेले..... तिने हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यातून अविकडे पाहिले. तोही तिच्याकडेच पहात होता
" लहानपणी यासाठी मला किती वेळा तू नदीत उतरायला लावायची.... आणि माझा चिखलाने भरलेला अवतार बघून वर हसायची..... हवीत का तुला कमळे आजही?"
     अबोली लाजून गेली...." अविला सगळं आठवतंय तर!"
    ती काहीच बोलत नाही असं बघून , तो पाण्याकडे गेला... कडेची दोन तीन कमळे काढून आणली..... अबोली सुखावली.... त्याची पँट चिखलाने भरली होती, पण आज ती हसली नाही.... तीचं मन भरून आलं...
           ते मंदिराच्या आवारात पोहोचले.
  "अवि, हे बघ चाफ्याचं आपण लावलेलं रोप किती मोठं झालंय..... किती दिवस वाढतच नव्हतं..... पण आता बघ फुलांनी कसं डवरलंय! सुगंध पसरलाय सगळीकडे! किती सुंदर आहेत ना ही फुले... पांढर्‍या शुभ्र शिंपल्यात पिवळा टपोरा मोती ठेवलाय कुणी असं वाटतंय... संध्याकाळच्या सोनेरी उन्हात बघ ही फुले कशी न्हाऊन निघाली आहेत.... पाकळ्यांच्या कडांना स्पर्शून ही सोनेरी किरणे त्या फुलांना कशी छान  सोनेरी छटा देत आहेत..... किती सुंदर दिसताहेत ही चमचमणारी चाफ्याची फुले!
आपण हीच फुले घेऊ महादेवाला.
       अवि हसू लागला... " तू लहानपणी चाफ्याच्या फुलांना काय म्हणायची माहीत आहे? पांढर्‍या भाताच्या मधोमध कुणीतरी पिवळ्याधम्मक वरणाची धार घातली आहे असे तुला वाटायचे.... किती खादाड होती तू! नुसते खायचेच विचार असायचे तुझ्या डोक्यात!... आणि आज ही कवि मनाची अबोली वेगळीच वाटते आहे मला... किती मोठी झालीस तू..... मला तर तीच अबोली आठवते अजून लहानपणीची!
  त्याच्या बोलण्यावर अबोली लाजून गेली..."  अविच्या सर्व लक्षात आहे... तो मला विसरला नाही अजून!"
अवि खाली पडलेली फुले गोळा करू लागला....
     "  अवि खालची फुले कशाला? झाडावरची ती चमचमणारी फुले घेऊ आपण."
    अविने झाड जोरजोरात हलवले....... अबोलीने आपली ओढणी हातात पसरून घेतली....... चाफ्याचा पाऊस तिच्या अंगावर पडू लागला ...... त्या फुलांच्या वर्षावाने ती न्हाऊन निघाली......तिच्यासाठी तो फक्त फुलांचा वर्षाव नव्हता..... तो होता प्रेमाचा वर्षाव.... तिच्या दृष्टीने ती तिच्या प्रेमाची पोचपावती होती...... फुलांच्या रूपाने झालेला तो प्रेमाचा अबोल संकेत होता.....त्या फुलांचा सुगंध जणू तिने अंगावर पांघरला...... तिच्या तनामनात प्रेमाचा सुगंध भरून गेला..... कायमचा!
       " अबोली, पुरे झाली का फुले?"
   अविच्या बोलण्याने ती भानावर आली. दोघे मंदिरात गेले. मनोभावे महादेवाही पूजा केली.... लहानपणीच्या मैत्रीचे प्रतीक असलेली नीलकमळे अबोलीने शंकराला वाहिली....... अबोलीच्या अबोल प्रेमाची साक्ष असलेली ताजी चाफ्याची फुले  अविने वाहिली..... अबोलीला आज तिच्या भोळ्या शंकराला प्रथमच काहीतरी मागितले...... काय होते ते?
   तिने तिच्या बालपणीच्या सख्याची साथ मागितली होती.. आयुष्यभरासाठी! हाच माझा जन्माचा जोडीदार व्हावा अशी मनोभावे इच्छा व्यक्त केली होती.
           आज किती तरी दिवसांनी अवि अबोलीबरोबर खूप बोलला.... अबोली त्याच्या सहवासाने उमलून गेली.... तिच्यातील कळीचे कधी फुल झाले हे तिलाही कळले नाही. तिने दोन चाफ्याची फुले उचलली. पाकळ्यांना मध्ये चीर मारून फुलांचा देठ त्यात गुंफून बोटात लहानपणी घालायची तशी अंगठी तयार केली...... अविला  एक दिली.... एक स्वतःच्या बोटात धरली..
     " अबोली, हे काय अजून अशी अंगठी बनवते तू ? आपण खेळताना बनवत असू अशा अंगठ्या एकमेकांसाठी!"
     " हो! तीच आठवण आली आज! तू चालला ना आता. माझ्याकडून ही छोटीशी भेट! माझी आठवण म्हणुन ही चाफ्याची अंगठी ठेवशील ना जवळ तुझ्या? आणि मी ही माझी अंगठी जपून ठेवेन...... तुला माझी आठवण येईल ना अवि ?"
       " वेडीच आहे अजूनही तू अबोली! "
असंं म्हणुन त्याने ती अंगठी तिच्याकडून घेतली.... आणि ते घरी निघाले.
क्रमशः

वाचकहो, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. 

©अर्चना बोरावके"मनस्वी "
#टीप :या कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. पूर्वपरवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
       माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी माझ्या #मनस्वी या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.
 

🎭 Series Post

View all