चाफा बोलेना भाग 3

It's a love story that blooms with time....

#चाफा_बोलेना3 ....
#भाग३

©अर्चना बोरावके"मनस्वी"
       दिवस, महिने सरू लागले. अबोली हळू-हळू मोठी होऊ लागली. अभ्यासापेक्षा गाणे आणि नृत्यात जास्त रमू लागली. अवि सुट्टीला आल्यावर त्याच्याशी काय बोलू नि काय नको, असं तिला होऊन जायचं. त्याला घेऊन मग नदीकाठच्या शिव मंदिरात जायची. तो नसताना झालेल्या किती तरी गोष्टी तिला त्याला सांगायच्या असत.... तशी ती नावाप्रमाणे कमी बोलणारी, पण अवि समोर आल्यावर तिच्या गप्पांना उधाण येई.
त्यांनी मंदिराच्या आवारात लावलेल्या चाफ्याच्या छोट्या रोपट्याकडे ती त्याला घेऊन जाई.
"अवि, बघ ना अजुन हे रोपटे, किती लहान राहिलंय..... मी नेहमी येऊन बघते , ते तेवढंच दिसतंय.... कधी मोठे होणार ते? कधी फुले येणार रे त्याला? मला फुलांनी डवरलेले ते झाड बघायचे आहे. हिरव्या कोंदणातून बाहेर येणारी ती चकाकती पांढरी-पिवळी फुले किती आवडतात मला! "
      " अगं, होईल ते मोठं. थोडा वेळ तर दे.... तू नाही का अजून तशीच लहान आहे. एका वर्षात काही मोठी झाली नाही. "
     " पण तू किती रे उंच झाला! आणि चष्मा पण लागला... एव्हढा अभ्यास करतो का? "
     अवि फक्त हसायचा.... मग ते दोघे नदीकाठी फिरत, तो तिच्या आवडीची निळी कमळे पाण्यातून काढून देई. अबोलीला खूपच छान वाटे, अवि तिच्या आवडी निवडी लक्षात ठेवतो म्हणुन!
            अवि आता बारावी पास झाला. मोठ्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन झाले. त्याचे येणे आता  वर्षातून दोन वेळाच होई. अबोलीचेही  पुढचे शिक्षण गावातच सुरू होते .... तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेली अबोली, दिवसेंदिवस रूपाने खुलू लागली होती.... तारुण्यसुलभ भावना मनात डोकावू लागल्या होत्या. अभ्यासापेक्षा कादंबर्‍या वाचण्यात ती स्वतःला विसरून जाऊ लागली..... कविता वाचताना हळवी होऊ लागली. तिचे तिलाच कळत नसे की, तिला काय होतेय ते!........सुंदर स्वप्नांच्या दुनियेत ती हरवून जाऊ लागली. नदीकाठी जाऊन एकटीच ती बसायची..... स्वतःच्याच मनोराज्यात ती आसपासचे जग विसरून जायची. मंदिराच्या आवारात येताच तिला आठवायची ती तिची भातुकली.... अविबरोबर रंगलेले ते बालिश खेळ..... ती एकत्र खाल्लेली झुणका-भाकरी! ....... या आठवणींनी तिच्या चेहर्‍यावर एक वेगळीच लाली चढायची..... तिला कळायचेच नाही की, ती का इतकी लाजतेय? ...... हृदयात अशी अनामिक हुरहुर का जाणवतेय? ....    तिच्या भावनांचा तिलाही थांग लागत नसे ..... एका वेगळ्याच दुनियेत ती हरवून जात असे.
                अविची घरी पत्रे येत. अबोली पत्र आले की, आधी पटकन ते उघडून बघे.... तिला वाटे, अवि नक्की तिच्यासाठी काहीतरी लिहिल, पण ते साधं खुशालीचं पत्र असे, तिचा हिरमोड होई.
" असा कसा आहे हा? माझ्यासाठी काहीच लिहीत नाही. साधं अबोली कशी आहे, मला तिची आठवण येते, असेही लिहीत नाही.... आता आल्यावर मी बोलणारच नाही त्याच्याशी... "  असं ठरवून मोकळी होई. तिला वाटे आपणही त्याला पत्र लिहावे . ती पत्र लिहायला सुरूही करायची...... पण काही सुचायचेच नाही. अवि आल्यावर आपण इतके बोलतो... पण पत्रात काय  लिहायचे, हे का सुचत नाही, याचा तिला राग यायचा आणि ती कागद फाडून फेकून द्यायची. अशीच तीन - चार वर्षे गेली...
        
   
    अवि घरी आला होता. कॉलेज संपले होते...... विलास मामाबरोबर रात्री गहन चर्चा सुरू होती. वैजू आत्या, अबोलीची आई सर्व जण बसुन बोलत होते. अबोलीला राग आला. सगळे महत्त्वाचे बोलताहेत आणि मला कुणी बोलावले सुद्धा नाही.... मला काही किंमतच नाही..... असं म्हणुन रागाने ती मुद्दाम त्यांच्यात येऊन बसली.
           " मामा, मला अमेरिकेच्या यूनिवर्सिटीतुन स्कॉलरशिप मिळाली आहे . दोन वर्षाच्या पुढील शिक्षणासाठी मला तिथे जायचे आहे. माझी खूप इच्छा आहे जायची.... तुला काय वाटते? "
           "अरे, पण तिकडे जाणे आणि रहाण्याचा यांचा खर्च कसा करायचा? ते पण दोन वर्षांसाठी?"
        " मामा, आत्ताच खर्च आहे. तिथे गेल्यावर मी काही काम करून पैसे मिळवू शकतो. पण आत्ता तिकीट आणि वर खर्च तरी आपल्याला करावा लागेल. "
       " अरे तरी सुद्धा भरपूर पैसा लागेल. मी साधा शेतकरी. इतके दिवस जमलं सगळं. पण हे जरा आपल्या आवाक्याबाहेरचे वाटतेय. तू इथेच कर ना काही तरी. "
        " मामा , फारच थोड्या मुलांना अशी संधी मिळते... मला खूप इच्छा आहे.... बघ ना प्रयत्न करून. "
अबोलीला धीर धरवेना .
  "अवि , कशाला जातो तू ? इथेच घे ना काय हवं ते शिक्षण... "
  विलासराव तिला वैतागून बोलले," अबोली तू शांत रहा बरं.. आमचे चाललेय ना बोलणे... ठरवू आम्ही काय ते! "
      पण अबोली मात्र नाराज झाली..... लहानपणी उपाशी राहून, गोंधळ घालून सगळ्यांना आपल्या तालावर ती नाचवत होती.... आता तेही शस्त्र चालणार नव्हतं.      अवि शहरात शिकायला जाताना म्हणाला होता, " मी लवकर परत येईन... "
आता इतकी वर्ष झाली तरी याचं शिक्षण काही पुरे होत नाही... हा परत गेला तर? ... या विचाराने तिला काही सुचेना.
   
     विलासरावांचे काही ठरत नव्हते. लाखो रुपयांचा बंदोबस्त कसा करायचा?
    रात्री अबोलीची आई त्यांना म्हणाली," एक गोष्ट करू शकतो. आपले अर्धे शेत विकू आणि पैसे उभे करू."
      विलासरावांना थोडे आश्चर्य वाटले . हिला, अविबद्दल इतके प्रेम कसे अचानक उत्पन्न झाले?
   " अहो, अवि इतका हुशार आहे. परदेशी शिकणार..... तिथे आज ना उद्या त्याला  चांगली नोकरी मिळेल... मोठा पगार मिळेल.... त्याला एक अट घाला. त्याने आपल्या अबोलीशी लग्न करायचे वचन दिले, तर आपण त्याला पैसे देऊ. आपली एकुलती एक मुलगी आहे. तिचे कॉलेज पण तोपर्यंत पूर्ण होईल...  त्याच्याशी लग्न करून आयुष्यभर सुखात राहील ती! ...अविसारखा हुशार आणि चांगला मुलगा , शोधून तरी सापडेल का आपल्याला? "
      विलासरावांना पत्नीचे म्हणणे पटले. पण अशी सौदेबाजी कशी करायची?  अविला असे लग्नाचे लगेच कसे विचारायचे? त्याला काय वाटेल?  अन् त्याच्या मनात असे काही नसले म्हणजे?
 
दोन दिवस कुणीच काही विषय काढला नाही. अबोलीची आई विलासरावांच्या मागे लागली होती , पण त्यांना काही धाडस होत नव्हते . अवि मात्र इकडे घाईवर आला होता. आईच्या सारखे म्हणत होता, " मामाला कसेही करून मदत करायला सांग म्हणुन."
      शेवटी वैजूआत्या विलासरावांना म्हणाली, " विलास, अरे काय ठरवलंय तू ?  अवि आस लावून बसलाय रे ."
     " आक्का, इतके पैसे जमवायचे म्हणजे, शेत विकावं लागेल.... आणि शेत विकून बसलो तर पुढे काय करायचं? ... अजून किती आयुष्य जायचंय. अबोलीचं लग्न व्हायचंय अजून."
     " अरे , अवि शिकून पैसे कमवेल , मग देईल रे तुझे पैसे परत. "
   " आक्का, पुढचं कोणी बघितलंय? तो परत आला नाही तर?...... पण एक करु शकतो आपण..... तू अबोलीला आपली सून करून घेणार असशील तर मी पैशाची व्यवस्था करतो. "
" एव्हडंच ना? अबोली तर आधीपासूनच माझी लाडकी आहे. ती माझी सून झाली तर मला किती आनंद होईल! ..... माझी काही हरकत नाही. "
" पण अविला विचारायला नको का? तो काय म्हणेल? "
" तो माझ्या शब्दाबाहेर नाही..... आणि तो कशाला नाही म्हणेल? त्याची तर लहानपणापासूनची मैत्रीण आहे अबोली. किती पटतं दोघांचही.... माझ्याकडुन शब्द घे... अबोलीच माझी सून होणार.  अविला सध्या आपण यातले काही सांगायला नको.... उगाच जाताना त्याच्या मनावर ओझे नको.... योग्य वेळ येताच मी सांगेन... तो नाही म्हणणारच नाही. "
        अबोलीने हे संभाषण ऐकले...... अविबरोबर आपले लग्न होणार, या कल्पनेनेच ती मोहरली.... लाजून स्वतःचाच चेहरा तिने तिच्या हातात लपवला ...... हृदयाची धडधड वाढली...... आणि मन स्वप्नांच्या हिंदोळ्यावर आनंदाने झोके घेऊ लागले.
क्रमशः
   ©अर्चना बोरावके"मनस्वी"
#टीप :या कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. पूर्वपरवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
       माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी माझ्या #मनस्वी या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.
 
PC: Google 

🎭 Series Post

View all