चाफा बोलेना भाग १०

It's a Blooming love story...

#चाफा_बोलेना
#भाग१०
©अर्चना बोरावके"मनस्वी"
       अवि दुसर्‍या दिवसापासुन कॉलेजला जायला लागला .... अबोलीला करमेना. ती कधी घरी फोन करायची... इकडची मज्जा सांगायची..... वैजू आत्या आणि आई तिला अविविषयी विचाराच्या.... तीही सगळं व्यवस्थित आहे असं सांगायची.
     जवळ जवळ पंधरा-वीस दिवस होत आले होते तिला तिथे येऊन.... आता हळूहळू नवीन घराची सवय होत होती.... अवि तिला काय हवं नको विचारत होता....पण तिच्याशी अजून तितका मोकळेपणाने बोलत नव्हता... आता ती रोज अविच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात आपला वेळ घालवू लागली... स्वयंपाकघरात काम करताना तिचे गाणेही सुरू होई....  घरात कोणी नसल्याने मोकळ्या आवाजात ती गायची. एकदा असंच ती
'चाफा बोलेना.... चाफा चालेना.... चाफा खंत करी काही केल्या फुलेना....'
हे तीचं आवडीचं गाणं गात होती...... तेव्हड्यात तीचं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं.... समोरच्या खिडकीतून एक युवती तिच्याकडे बघून हात हलवून तिला मोठ्याने म्हणत होती, " खूप छान आवाज आहे तुझा.... गातेही मस्तच....."
  अबोली तिच्याकडे बघून नुसतीच हसली.....  अविने सांगितलं होतं आजूबाजूच्या कोणाशीच बोलायचे नाही.... घराबाहेरही जायचे नाही.... पण ही तर मराठीच दिसते... अवि काहीच बोलला नाही की आपल्या शेजारी मराठीच लोक राहतात म्हणुन.....
             संध्याकाळी अवि घरी आला. अबोलीने त्याच्या आवडीचे गुलाबजाम बनवले होते..... त्याच्यासाठी लगेच ती घेऊन आली.... गुलाबजाम बघून अवि एकदम खुश झाला..... लगेच खायला सुरुवात केली... मग त्याच्या लक्षात आले, " अबोली, तू खाल्ले का?"
   " नाही, तुझ्या आधी मी कशी खाणार? .... आपण नेहमी कोणताही खाऊ एकत्रच खायचो ना! मी तुझ्यासोबत खाल्ले तर चालेल ना तुला? असं म्हणुन अबोलीने त्याच्या वाटीतील एक गुलाबजाम उचलला...."
       अवि खायचा एकदम बंदच झाला.
  अबोलीला फार वाईट वाटले.
" अवि, हे असं किती दिवस चालणार? आता आपण पती-पत्नी आहोत..... तू तर असा वागतोस, जशी मी कुणी परकी आहे.... अरे निदान मैत्रीच्या नात्याने तरी माझ्याशी प्रेमाने वाग ..... दिवसभर मी तुझा विचार करते... तुला खुश ठेवायला किती धडपडते...पण तुला याची किंमतच नाही.... तुझ्या मनात काय आहे सांग ना मला... "
    " सॉरी अबोली, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय का? अबोली हे सर्व मला खूप अवघड वाटतंय गं..... मी खूप प्रयत्न करतो.... पण अजून मला हे नवीन नातं स्विकारायला खूप जड जातंय.... पण मी वचन दिलंय आईला... मी नक्की प्रयत्न करणार... थोडा वेळ देशील ना मला? .... "
    अबोलीला खूप बरे वाटले.... तो निदान माझा विचार तरी करतोय.... काही हरकत नाही.... अजून काही काळ ती वाट पहायला तयार झाली. अविने तिच्यासाठी इंग्लिश बोलायच्या काही सीडी आणल्या होत्या... काही पुस्तकेही आणली. त्या दिवशी जेवताना अवि तिच्याशी भरपूर बोलला.... जुन्या आठवणीत ते रमून गेले... त्याने तिला हसवण्याचा  पुष्कळ प्रयत्न केला.
              सकाळी अबोली त्याला मुद्दाम सोडायला बाहेर आली.... त्यांची बाग आता चांगली बहरली होती..... रंगीबेरंगी फुले वाऱ्यावर डोलत होती..... अशा प्रसन्न सकाळी आज अवि आनंदी दिसत होता..... तो बदललेला अवि बघून अबोलीही आनंदली.... तेव्हड्यात ती कालची युवती तिच्या घराबाहेर अबोलीला दिसली.
   " अवि ती मराठीच आहे ना! तिने मला काल  "हाय!" केले.
   " अविचा चेहराच पालटला.... तुला सांगितले ना, कुणाशी बोलायचे नाही म्हणुन.... तू नवीन आहेस इथे.... कुणीही तुला फसवू शकतं..मी गेल्यावर लगेच घरात जा.
   अवि गाडीत बसुन गेला. अबोली घरात जायला वळली होती की ती युवती परत
" हाय!" म्हणाली.
   पटकन तिच्या जवळ आली...., " मी रेवती... अवि आणि मी एकाच यूनिवर्सिटीत होतो शिकायला... तो प्रोफेसर झाला आणि मी जॉब स्विकारला.... आम्ही घरेही एकाच वेळी घेतली... तुझं नाव काय? ... मस्त गातेस तू...येत जा माझ्याकडे एकटीच असते मी.. ."
     अबोली तिच्याशी थोडंफार बोलली.... पण तीचं लक्षच नव्हतं बोलण्याकडे.
   अविने मला हे सांगितलं का नाही? तिच्या मनात अनेक शंका यायला लागल्या. तिने अविचे कपाट उघडले....कपड्यांच्या खाली तिला एका अल्बममध्ये त्या दोघांचे किती तरी फोटो  दिसले....." अवि किती आनंदी दिसतोय या फोटोंमध्ये.... हे दोघे फक्त मित्रच होते की अजून काही? ..... अवि म्हणुन माझ्याशी असा वागतो की काय.... अरे देवा, त्याने ही लग्नाआधी का नाही सांगितले?..... पण त्याला कुणी विचारलेच नाही...... आता विचारू का त्याला? पण आता विचारून काय फायदा? "
     विचार करून तीचं डोकं फिरायची वेळ आली.
रोजची वेळ झाली तरी अवि  अजून आला कसा नाही? इतक्यात घरातला फोन वाजला. पलीकडून कुणीतरी इंग्लिश मधून काहीतरी सांगत होतं..... पण ते इतकं भरभर आणि अमेरिकन उच्चारातलं इंग्लिश तिला काही कळेना. तीने इंग्लिश मध्ये सांगितले , " प्लीज स्पीक स्लोली.."
     ती स्त्री जे बोलली, ते ऐकून ती बेशुद्ध व्हायचीच बाकी राहिली होती.. तिला फोन सुरु आहे याचेही भान राहिले नाही..... पलीकडून परत आवाज येऊ लागला. अबोलीने तिने दिलेला पत्ता लिहून घेतला.
       अविचा अ‍ॅक्सीडेंट झाला होता.... तिला काही सुचेना.... हॉस्पिटलला जावे कसे? काहीच माहिती नाही..... एकीकडे अविची काळजी आणि दुसरीकडे असहाय्य असल्याचे दुःख! तेव्हड्यात तिला शेजारची रेवती आठवली.. ती आली असेल घरी. अबोली धावतच तिच्याकडे गेली... रडत रडत सर्व सांगितलं. रेवतीने पटकन तिची गाडी काढली.... दोघी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या..... अविवर उपचार सुरू होते... बरंच लागलं होतं.... एका पायाला फ्रॅक्चर झालं होतं... दुसर्‍या पायाला  आणि डोक्याला जबरदस्त मार बसला होता. रेवती डॉक्टरांशी बोलली.... त्याच्या कॉलेजमधल्या सहकाऱ्यांशी बोलून कॉलेजतर्फे पैशाची व्यवस्था होते की नाही ते विचारले. सुदैवाने सर्व खर्च इन्शुरन्समध्ये होता... अबोलीची ती काळजी मिटली.... काही दिवस त्याला हॉस्पिटल मधेच रहावे लागणार होते. त्याला भेटायचीही परवानगी नव्हती... तिने त्याला लांबूनच पाहिले.... अविची अशी अवस्था बघुन तिला रडूच आवरेना. रेवतीने तिला सावरले...
   " अबोली तुला हिम्मत ठेवावी लागेल... आणि आता सगळं शिकावं लागेल."
रेवतीने तिला  येण्याचा रस्ता परत नीट दाखवला, कॅब कशी बोलवायची, बस कुठून मिळते... एकटीने प्रवास कसा करायचा ते सर्व सांगितले.
     रात्री अबोलीला झोपच आली नाही..... घरी फोन करावा तर सगळेच चिंतेत पडतील.... नंतर सांगू त्यांना, असं तिने ठरवलं. आता तिला मन घट्ट करून अविला बरं करायचं होतं.  ती दुसर्‍या दिवसापासुन  हॉस्पिटलला जाऊ लागली....कधी कधी रेवती तिला सोडायची. दिवसभर ती तिथेच बसुन रहायची.... अडखळत का होईना इंग्लिश मधून तिथल्या लोकांशी बोलायला लागली. अवि बराच वेळ झोपलेलाच असायचा... उठला तरी काही बोलण्याची त्याची अवस्थाच नसायची..... तो खुणेनेच ती विचारेल तेव्हढे सांगायचा.... त्याने बँकेचे कार्ड तिला देऊन घरखर्चासाठी पैसे काढ म्हणुन  सांगितले. अबोलीने कुणाची तरी मदत घेऊन पैसे काढून स्वतःजवळ ठेवले.
           पाच दिवसांनी अवि थोडं खाऊ लागला.... ती त्याच्यासाठी गरम-गरम खीर आणू लागली.... अजून काही दिवस त्याला तिथेच रहायचे होते. अबोलीमध्ये आता जरा हिम्मत आली.... डॉक्टरांशी बोलून ती तिच्या सर्व शंका विचारू लागली. सोबत डिक्शनरी असायचीच. डॉक्टरही म्हणाले "अजून तीन दिवसांनी घरी सोडू... पण प्लास्टर असल्याने एक महिना घरीच राहावे लागेल......" अबोलीला जरा हायसे वाटले , घरी ती त्याची हवी तशी काळजी घेऊ शकत होती.
          त्या दिवशी ती निश्चिंत होती.... अविला दुसर्‍या दिवशी हॉस्पिटलमधून सोडणार होते. सकाळीच लवकर ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली अविच्या रूममध्ये गेली तर तिला वेगळेच दृश्य दिसले.... दोन-तीन दुसरेच डॉक्टर त्याला तपासत होते... तिने विचारले, "काय झाले?"
     त्यांनी तिला इंग्लिशमध्ये सागितले, " रात्री त्याला खूप ताप भरला.....तो खूप ओरडायला लागला.... विचित्र वागायला लागला... एकदम घाबरून गेला ........ त्याला (मेंटल इश्यू) मानसिक आजार आहे का यासाठी त्याच्या तपासण्या होणार होत्या......"
         अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकली...... अविला अजून तसे झटके येतात?  पण इतकी वर्षे तर असं कधी झालंच नाही.... त्याला गोळ्या चालू असतील का? त्याने घरात हे सगळे कधी सांगितलंच नाही..... आम्हाला वाटत होतं की तो त्यातून बरा झाला...... अबोलीपुढे अंधार दाटला... ती त्याच अवस्थेत घरी आली.
क्रमशः
©अर्चना बोरावके"मनस्वी "
#टीप :या कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. पूर्वपरवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
       माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी माझ्या #मनस्वी या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.
PC:  Google 
     
     

🎭 Series Post

View all