चाफा बोलेना! (भाग -३) अंतिम

A small incidence between husband n wife.

जलद लेखन ( कथामालिका)

चाफा बोलेना !

( भाग -३) अंतिम

लेखिका-  ©® स्वाती बालूरकर, सखी

कथा पुढे-

आता मुलं मोठी झाली होती.  रमायला काही नव्हतं. निनादचा मितभाषी  स्वभाव आता तिला खूप बोचायला लागला होता. दुसर्‍या जोडप्यांसारखं नवर्‍याशी गप्पा मारत बसावं असं वाटायचं . . . पण अशक्यच. ती बडबडी होतीच पण आता मात्र स्पष्टवक्ती बनत चालली होती.

नाही पटलं तर बोलायचं. . कुणी ऐको अथवा न ऐको!

मग कधी कधी तिचं बोलणं किर- किर वाटत होतं तर कधी, गमतीशीर वाटायचं . मग ती तरी किती दिवस आपल्या भावना दाबणार?

ती भांड्यांशी , वस्तुशी सुद्धा काही बाही बोलायची.

असेच दिवस जात होते. .

बर्‍याच  दिवसांनंतर  घरात मुलांसाठी दाळबाटीचा कार्यक्रम  ठरला होता. परीक्षा संपली होती त्यामुळे इशिताही स्वयंपाकघरात मदत करत होती.

निशीच्या सासुबाई पण आलेल्या होत्या महिन्याभरासाठी.

दुपारी मस्त जेवणाचा बेत रंगला.

बाबांचं बोटं चाटून बट्टी खाणं पाहून उल्हासला हसू आवरेना.

" काय बाबा तुम्ही? आज तरी दाद द्यावीच लागेल तुम्हाला. . दाळबाटी खूप छान झालीय म्हणून!"

" अस् काही नाही ती नेहमीच छान करते. . म्हणजे आजही खूप छान झालीय आणि. . ! " बाबा अजुन चाचरत होते. . .

" बस्स! सांगितलंत ना. . नेहमीच छान करते. . मग मला नेहमीचीच कॉंम्लिमेंट मिळाली. रोज विचारायचं कामच नको!"निशी वैतागली.

निशी ताट घेवून सोबत जेवायला बसली.

सासूबाईंना तिचा सूर कळाला. त्या पटकन बोलल्या" अगं त्याला सवय  नाही सांगायची पण तुझं खूप कौतुक करतो गं बाहेर. . "

"राहू द्या ना सासूबाई, कशाला उगीच त्यांचं हे वागणं झाकून नेता. . ?"

"नाही गं निशी आपलं सगळं कुटुंब , नातेवाईक तुझं खूप कौतुक करतात. . सगळ्याच बाबतीत!" सासूबाई पुन्हा बोलल्या.

मग सगळेच समजवायला लागले आणि बोलण्या बोलण्यात एकदम निशी ओरडली. . आईऽ गं!

चावताना दाळबाटीच्या घासाऐवजी तिची तोंडातली त्वचा दातांमधे आली आणि ती किंचाळली, तोंडाला हात लावून ती बेसिनकडे पळाली . .
तोंडातून भळाभळा रक्त वाहायला लागलं !

चूळ भरली, साखर खाल्ली . . घरातले छोटे छोटे उपाय केले पण जखम चांगलीच मोठी होती. सुळ्या दातांमधे ओठांचा मधला भाग आला होता.
उल्हास इशीता व बाबा खूपच घाबरले.

अर्जंट  गाडी काढली आणिनिशीला दवाखान्यात नेलं.
डॉक्टरांनी उपचार केले, काही तास दवाखान्यातच  ठेवा म्हणाले. पण तोंडातली जखम ती कशी सहन होणार?

"खूप दुखतंय!" हे बोलण्यासाठी निशीने तोंड उघडलं अन ती सुजलेली त्वचेची गाठ पुन्हा दाताखाली आली.

आईऽऽ .  जिवाच्या आकांताने निशी ओरडली.
पुन्हा रक्त वहायला लागलं.

काही तास प्रयत्न  केल्यानंतर डॉक्टरांनी  ऑपरेशन करण्याचा निर्णय  घेतला.

ऑपरेशन झाले आणि निशीला वाईस रेस्ट सांगितली. . अर्थात बोलायचे नाही.

लिक्विड  फुड व आराम!

तिचा महिनाभरासाठी  आवाज बंद. . ! सुरुवातीला मुलांना एक दोन दिवस काही वाटलं नाही. . दवाखान्यात चकरा होत होत्या . . आळीपाळीने!

घरी आजी होती. . मुलंही काम करत होते, ते बाबांनाही कामात मदत करत होते.

घरातल्या बारीक सारीक गोष्टींची किंमत आता त्यांना कळत होती!

निशी किती बेस्ट होम मेकर होती ते मुलांना कळायला लागलं होतं!

चार दिवसांनी तिला घरी आणलं पण आवाज बंद. . बोलणं बंद!

उल्हास व निनादची सेवा करणं पाहून ती फक्त डोळ्यातून अश्रू काढायची व हातात हात घट्ट  धरायची!

हळु हळू निनादला हे खूप असह्य व्हायला लागलं. . तिचा आवाजच नाही घरात.  सतत  शांतता व गंभीर वातावरण. . सगळं यांत्रिक  झालं होतं. .

एक दिवस तो निशी जवळ बसला होता आणि रेडियोवर भावगीतांच्या कार्यक्रमात ते गाणं वाजलं. . "

"चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना!"

निनाद हमसून रडायलाच लागला. ". तू बोल गं निशी. . कधी बोलशील?"

निशी ही रडायला लागली. . मुलं आली!

"काय झालं.  . . ? का रडताय दोघेजण.  . ?"

"दादा ऐकना ते कुठलं गाणं लागलंय. . आई बोलत नाहीय ना. . बाबा मिस करतायत रे आपल्यासारखंच!" इशिता म्हणाली.

" हं बाबा. . आता कळालं असेल ना तुम्हाला की आईला कसं वाटत असेल. . तुम्ही बोलत नाही तेव्हा?" उल्हास बाबांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला!

" हो रे उल्हास . . खरच आहे तिचं. .  पण  मी पहिलेपासून तसाच आहे ना रे!" निनाद वरमला होता.

" पण बाबा. .  माणसाने थोडं बदलावं ना आपल्या जवळच्या माणसांसाठी. ." इशिता खूप भवनिक होऊन म्हणाली.

निशीने पटकन इशिताचा हात हातात घेतला.

" हो बेटा बरोबर आहे. . आता  आईचा चाफा बोलणार बरं का !"त्याने निशीच्या डोक्यावरून हात फिरवला.

किती समाधान होतं तिच्या चेहर्‍यांवर!

महीनाभरात निनादचा स्वभाव खूप बदलला .
तो मोकळं बोलायला लागला, निशीला वेळ द्यायला लागला. स्वतःच्या गोष्टी शेअर करायला लागला!

अशाप्रकारे अबोल चाफा बोलका झाला!

समाप्त

©® सौ. स्वाती बालूरकर देशपांडे ,सखी
दिनांक २९. ०१.२०२१

पुनः  प्रकाशन-  ६ डिसेंबर २२

🎭 Series Post

View all