Nov 30, 2021
नारीवादी

चाफा बोलेना!

Read Later
चाफा बोलेना!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

पती पत्नीच्या नात्यातला सुंदर  संवाद व अनुभव!

चाफा बोलेना!

 

"लोकांचं बरं आहे बाबा. . बायका रुसल्या तर नवरे गुडघे टेकतात. . आमचं नशीब इतकं कुठलं? इथे ना रुसता येत ना मनवता येतं!"
निशी स्वतःशीच पुटपुटली.

तिच्या मुलीने, इशिताने हे ऐकलं व मोठ्यांदा हसायला लागली.

"काय झालं दात काढायला?" निशि चिडली

"आईऽ अगं हे कुणाला ऐकवतीयस तू?"

"कुणाला ऐकवणार. ?. कोण ऐकतय माझं इथे?"

" आई तू तुझी जुनी टेप सुरु करू नको यार. . पप्पांसमोर काही बोलत नाहीस मग मागून ही धुसफुस करतेस. . "

"आता समोरच बोलले ना मी, त्यांना  किंमतच नाही माझी!"

"अगं पण ते ऐकतायत का बघ तरी . . त्यांच्या कानात ईयर फोन्स आहेत ते मस्त जुन्या गाण्यांची मजा घेत सोफ्यावर पडलेत. . त्यांना ऐकू जाईल असेल असं बोल किंवा मग बोलूच नकोस. . !"

"त्यांची मजा मी कशाला खराब करू? सगळं करून नामा निराळे. . मी आपलं माझी माझी बोलत असते. . मिक्सर शी, डायनिंग  टेबलाशी, नाहीतर माझ्या भांड्यांशी,"

आतून  उल्हास आला. . तो सर्व ऐकत होता,
"इशू. . .  अगं हे तिचं स्ट्रेस मॅनेजमेंट  आहे गं!
तिने बडबड केली की तिला कुणाशी तरी बोलल्याचं समाधान मिळतं. .तनाव दूर होतो!"

"ते मला कळत नाही पण .  ते ऐकत नाहित ना मग बोलून तरी काय फायदा?" निशीने पुन्हा बडबड सुरु केली.

" आई तुझा नेमका प्रॉब्लेम  काय गं? बाबा स्वभावाने शांत आहेत हा ? कि तुला रुसता येत नाहित हा ?" दोघांनी  एकमेकांना टाळी दिली.

" हेच तर. . तुम्ही सगळे एक होता. . वेळ पडल्यावर. . तुमच्या बोलण्यातलं मला कळत नाही. तुमच्या इतकं शिकले नाहीना मी. . ते तर काय सगळं हो ला हो च करतात. . कधी म्हणून 'असं नाही, तसं नाही' म्हणतच नाहित!" निशी अगदी रडवेली झाली.

" हे काय गं आईऽ .  यू आर सो क्यूट. . अगं तुझ्या शिक्षणाचा काय संबंध घरात? तू खूप अमेझिंग मॉम आहेस. . इतकी छान गृहिणी  आहेस. . किती करत असतेस तू. . दिवसभर राबतेस. . का स्वतःला असं कमी समजतेस?" इशिताने आईच्या गळ्यात हात घातले व समजावलं.

"आणि आई नवरे भांडतात आणि वाद घालतात हा प्रॉब्लेम  असतो गं बायकांचा. . तुझी स्टोरीच वेगळी. तू जे ठरवतेस ते बाबा  ऐकतात. . तू केलं त्याला कधीच नाव  ठेवत नाहीत. . अजुन काय हवं? बी हॅपी!"
उल्हास ने  तर आपली मॅनेजमेंट  काउन्सिलिंग सुरू केली.

"तुला नाही कळायचं उल्हास. . अरे काय केलं ते मुकाट्याने खाणं. . हा मला माझा अपमान वाटतो.  आता सांगायचंच  तर काल इडली चटणी केली. कुठल्या तरी कामाच्या घाईत मीठ विसरलं. ह्या माणसाने व्यवस्थित खाल्ली. कशी झालीय तर म्हणाले की छान. . अन ऑफिसला निघून गेले.  मी खायला बसले तेव्हा कळंलं  की चटणीत मीठच नव्हतं. . मला इतकं अपराधी वाटलं अरेऽ. . सांगायचं तरी ना!"
निनाद उठून आला होता व निशीच्या मागे उभे होता.
तिला कल्पना नव्हती.

"अगं आईऽ  आम्ही दोघं  सांगतो ना तुला. . पदार्थ मस्त झालाय की, भारीच झालंय किंवा काहितरी कमी जास्त आहे. . चांगलं आहे ना ते किरकिर नाही करत दीपक मामासारखी!" इशिता पुन्हा आईशी लाडात बोलली.

" नाही गं ईशू! किरकिर वाटते  ऐकताना पण बोलणारा  माणूस मोकळा राहतो बोलून. . तो साठवत नाही मनात. . पण हे तर सगळ्या जगाचा ताण स्वतःवर घेतात. . अरे  बोलून रागवायचं कधीतरी . . दोन शब्द बोलायचे ना.  . .यांचा रागच  असा की ते बोलतच नाहित . . दोन दोन दिवस! मला नाही राहवत. . सतत  काहीतरी चुकलं की काय असं वाटतं . . मग ते खूप शिकलेले. . मोठ्या पोस्टवर. . तर दडपण येतं गं मला!" ती मनातून बोलत होती अन पटकन खांद्यावर हात ठेवलेला जाणवला. . वळून पाहिलं तर निनाद!

निशी खुप वरमली.

" कशाला त्रास करून घेतेस. . मी असाच आहे थोडा अबोल. अगं तू बोलतेस ना म्हणून घर भरलेलं असतं. तू स्वयंपाक खूप उत्तमच  करतेस. त्यामुळे काय म्हणणार ? मला स्तुती करता येत नाही अन अन्नाला नावे ठेवता येत नाहित. मला साधा चहा धड जमत नाही. . मग तिखट मीट कमी पडलं किंवा विसरलं तर काय त्यात! घालून खायचं. . तुझ्या मागे किती धावपळ असते सकाळी? हे घर अाहे ना हॉटेल नाही. . झालं का समाधान!  आणि हो मला पटतं तुझं सगळं म्हणून  तर मी शांत असतो. . एखादी गोष्ट नाही पटली तर मी शांत असतो कारण तुला दुखवायचं नसतं!"

आता मात्र निशी खूप वरमली. इतकं स्पष्ट  मुलांसमोर कधीच बोलणं झालं नव्हतं.

उल्हास ही खुश झाला व म्हणाला. . "बाबा यू आर रियली ग्रेट. . आईला किती छान सपोर्ट करता तुम्ही. . यू आर अमेझिंग कपल. . चला मातोश्री  नाश्ता द्या आता. . तुमचा चाफा बोलला!"

" हा हा हा" मोठ्यांदा सगळेच हसले. . .

"उल्हास चाफा काय रे?" बाबांनी विचारलं. .

"अहो ती मराठी भावगीतं खूप ऐकते ना तिला चाफा बोलेना चाफा चालेना गाणं फार आवडतं म्हणून म्हणालो तसं. . !"

"चल रे तुझं आपलं काहीतरीच . . !" निशी अक्षरशः  लाजली व आनंदात किचनमधे गेली.

निशी शिकलेली असली तरीही पदवी झाली की लग्न झालं होतं त्यामुळे ती घरातच गुंतुन पडली.
लग्नानंतर २ वर्षातच उल्हासचा जन्म झाला आणि मग नोकरी किंवा करियर असं कधी लक्षातच आलं नाही. नवरोबा व्यवस्थित सेटल होते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या  सुद्धा कधी गरज भासली नाही.
मुळात निशीचा स्वभावही काटकसरी. . त्यामुळे स्वतःच्या गरजाही तिने वाढवल्या नाहीत.
कॉलनीतल्या सो कॉल्ड हौशी बायकांशीही तिने कधी  जास्त मैत्री केली नाही. त्यामुळे भिशी , किटि ,शॉपिंग  किंवा आऊटिंग हा खर्चही नाही.

पण आताशा मात्र तिला संवादाची गरज वाटू लागली होती. 

निनाद  खूपच शांत , संयमी व समजून घेणारा. . त्यामुळे मनमोकळं घडघड बोलणं असं नाहिच कधी! हो ला हो किंवा जुजबी बोलणं. . पेपर, टिवी किंवा शब्दकोडी  यातच  तो विरंगुळा शोधायचा.

निशीला स्वयंपाकघर खूप प्रिय!

मग  सगळं घरच नीटनेटकं ठेवणं अन नवीन नवीन  काहीतरी करणं यात गुंगुन जायची! वाचनाची विशेष आवड नव्हती. 

दोघांत अबोला नसला तरीही संवादही विशेष नव्हता. निरोप देणे. जेवायला येणार की नाही सांगणे , निशीच्या दहा वाक्यांनंतर एखादा होकार किंवा नकार देणे.

देहबोलीतून , स्पर्शातून , नजरेतून  उल्हासचे बाबा बोलायचे.

तिला आताशा या वयात कळत होतं की तिच्या स्वतःच्या  बाबांना  काय त्रास झाला असेल? तिचे बाबा खूप खेळकर व बोलके पण आई खूप सौम्य शांत व मितभाषी ! ते नेहमी तक्रार करायचे.

आता मुलं मोठी झाली होती.  रमायला काही नव्हतं. त्याचा मितभाषी  स्वभाव आता तिला खूप बोचायला लागला होता. ती बडबडी होतीच आता मात्र स्पष्टवक्ती बनत चालली होती.
नाही पटलं तर बोलायचं. . कुणी ऐको अथवा न ऐको!
मग कधी कधी तिचं बोलणं किर- किर वाटत होतं तर कधी, गमतीशीर वाटायचं . मग ती तरी किती दिवस आपल्या भावना दाबणार?

ती भांड्यांशी , वस्तुशी सुद्धा काही बाही बोलायची.

असेच दिवस जात होते. .

बर्‍याच  दिवसांनंतर  घरात मुलांसाठी दाळबाटीचा कार्यक्रम  ठरला होता. परीक्षा संपली होती त्यामुळे इशिताही स्वयंपाकघरात मदत करत होती.

निशीच्या सासुबाई पण आलेल्या होत्या महिन्याभरासाठी.

दुपारी मस्त जेवणाचा बेत रंगला.

बाबांचं बोटं चाटून बट्टी खाणं पाहून उल्हासला हसू आवरेना.
" काय बाबा तुम्ही? आज तरी दाद द्यावीच लागेल तुम्हाला. . दाळबाटी खूप छान झालीय म्हणून!"

" अस् काही नाही ती नेहमीच छान करते. . म्हणजे आजही खूप छान झालीय आणि. . ! " बाबा अजुन चाचरत होते. .

" बस्स! सांगितलंत ना. . नेहमीच छान करते. . मग मला नेहमीचीच कॉंम्लिमेंट मिळाली. रोज विचारायचं कामच नको!"निशी वैतागली.

निशी ताट घेवून सोबत जेवायला बसली.

सासूबाईंना तिचा सूर कळाला. त्या पटकन बोलल्या" अगं त्याला सवय  नाही सांगायची पण तुझं खूप कौतुक करतो गं बाहेर. . "

"राहू द्या ना सासूबाई, कशाला उगीच त्यांचं हे वागणं झाकून नेता. . ?"

"नाही गं निशी आपलं सगळं कुटुंब , नातेवाईक तुझं खूप कौतुक करतात. . सगळ्याच बाबतीत!" सासूबाई पुन्हा बोलल्या.

मग सगळेच समजवायला लागले आणि बोलण्या बोलण्यात एकदम निशी ओरडली. . आईऽ गं!

चावताना दाळबाटीच्या घासाऐवजी तिची तोंडातली त्वचा दातांमधे आली व ती किंचाळली, तोंडाला हात लावून ती बेसिनकडे पळाली . .
तोंडातून भळाभळा रक्त वाहायला लागलं !

चूळ भरली, साखर खाल्ली . . घरातले छोटे छोटे उपाय केले पण जखम चांगलीच मोठी होती. सुळ्या दातांमधे ओठांचा मधला भाग आला होता.
उल्हास इशीता व बाबा खूपच घाबरले.

अर्जंट  गाडी काढली व निशीला दवाखान्यात नेलं.
डॉक्टरांनी उपचार केले, काही तास दवाखान्यातच  ठेवा म्हणाले. पण तोंडातली जखम ती कशी सहन होणार?

"खूप दुखतंय!" हे बोलण्यासाठी निशीने तोंड उघडलं अन ती सुजलेली त्वचेची गाठ पुन्हा दाताखाली आली.

आईऽऽ .  जिवाच्या आकांताने निशी ओरडली.
पुन्हा रक्त वहायला लागलं.

काही तास प्रयत्न  केल्यानंतर डॉक्टरांनी  ऑपरेशन करण्याचा निर्णय  घेतला.

ऑपरेशन झाले आणि निशीला वाईस रेस्ट सांगितली. . अर्थात बोलायचे नाही.

लिक्विड  फुड व आराम!

तिचा महिनाभरासाठी  आवाज बंद. . ! सुरुवातीला मुलांना एक दोन दिवस काही वाटलं नाही. . दवाखान्यात चकरा होत होत्या . . आळीपाळीने!

घरी आजी होती. . मुलंही काम करत होते, ते बाबांनाही कामात मदत करत होते.

घरातल्या बारीक सारीक गोष्टींची किंमत आता त्यांना कळत होती!

निशी किती बेस्ट होम मेकर होती ते मुलांना कळायला लागलं होतं!

चार दिवसांनी तिला घरी आणलं पण आवाज बंद. . बोलणं बंद!

उल्हास व निनादची सेवा करणं पाहून ती फक्त डोळ्यातून अश्रू काढायची व हातात हात घट्ट  धरायची!

हळु हळू निनादला हे खूप असह्य व्हायला लागलं. . तिचा आवाजच नाही घरात.  सतत  शांतता व गंभीर वातावरण. . सगळं यांत्रिक  झालं होतं. .

एक दिवस तो निशी जवळ बसला होता आणि रेडियोवर भावगीतांच्या कार्यक्रमात ते गाणं वाजलं. . "

"चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना!"

निनाद हमसून रडायलाच लागला. ". तू बोल गं निशी. . कधी बोलशील?"

निशी ही रडायला लागली. . मुलं आली!

"काय झालं.  . . ? का रडताय दोघेजण.  . ?"

"दादा ऐकना ते कुठलं गाणं लागलंय. . आई बोलत नाहीय ना. . बाबा मिस करतायत रे आपल्यासारखंच!" इशिता म्हणाली.

" हं बाबा. . आता कळालं असेल ना तुम्हाला की आईला कसं वाटत असेल. . तुम्ही बोलत नाही तेव्हा?" उल्हास बाबांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला!

" हो रे उल्हास . . खरच आहे तिचं. .  पण  मी पहिलेपासून तसाच आहे ना रे!" निनाद वरमला होता.

" पण बाबा. .  माणसाने थोडं बदलावं ना आपल्या जवळच्या माणसांसाठी. ." इशिता खूप भवनिक होऊन म्हणाली.

निशीने पटकन इशिताचा हात हातात घेतला.

" हो बेटा बरोबर आहे. . आता  आईचा चाफा बोलणार बरं का !"त्याने निशीच्या डोक्यावरून हात फिरवला.

किती समाधान होतं तिच्या चेहर्‍यांवर!

महीनाभरात निनादचा स्वभाव खूप बदलला .
तो मोकळं बोलायला लागला, निशीला वेळ द्यायला लागला. स्वतःच्या गोष्टी शेअर करायला लागला!

अशाप्रकारे अबोल चाफा बोलका झाला!

समाप्त

© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे ,सखी
दिनांक १७ ०२.२०२१
 

"

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 24 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.