चांदी

एक हृदयस्पर्शी आठवण....
*चांदी*
मे महिना सुरु होता उन्हाळी शेतीची भात कापणी सुरु होती. लॉकडाऊन मुळे शाळा बंद त्यामुळे मी देखिल थोडीफार मदत करण्यासाठी शेतात जात असे.
मला चांगलेच आठवतय २३ मे रविवार चा दिवस होता. बरीच संध्याकाळ झाली होती.आम्ही शेतावरचे काम आटपून घरी आलो.आजोबांनी सवयी प्रमाणे गोठयात जाऊन पाहिले तर सगळी गुरे आली होती पण चांदी आली नव्हती. अरे! चांदी आली नाही अजुन आजोबा ओरडून सांगत होते. इतक्यात काका धावत धावत आले व म्हणाले आपल्या मानीवरच्या शेतात नदी किनारी आपली चांदी चिखलात रुतून बसली आहे. काकांचे हे बोलण ऐकून मला तर रडूच कोसळले . निरोप मिळताच पप्पा, काका व आजोबा निघाले. मी फार हट्ट केला परंतु रात्र पडल्यामुळे पप्पानी नेल नाही.
रात्री ते परत आल्यानंतर समजले की, लाकडांच्या आधारे चांदीला चिखलातुन बाहेर काढले. पण तीला पाय धरता येत नाही म्हणुन तिथेच ठेवले.हे ऐकून मला गहिवरून आले.रात्री झोपच लागली नाही. सारखी चांदीच डोळ्यां समोर दिसत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आजोबा व पप्पा सोबत मी शेतावर गेलो. चांदीची हालत पाहवत नव्हती. आम्हांला पाहुन तीने काहीसा उठण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते शक्य झाले नाही. तिचे पाय एकदम आखडुन गेले होते. तसं ती आता बरीच म्हातारी देखिल झाली होती. माझ्या जन्माच्या आधी तिला आजोबांनी चिंचणी या गावातुन त्यांच्या मित्रा कडुन अर्धोली वर आणली होती. अर्धोली म्हणजे होणारे एक वासरू तुम्हांला एक आम्हांला या तत्वावर. तिचा रंग तांबडा आणि कपाळावर पांढऱ्या रंगाचा अर्धचंद्र होता म्हणून तिचे नाव चांदी .आज आमच्या घरात तिचाच वाढा होता. त्यामुळे चांदी गाय घरात सगळ्यांची लाडकी गाय होती. खासकरून माझी तर जास्तच कारण माझ्या जन्मानंतर मम्मीला दुध कमी होते त्यामुळे मला चांदीचेच दुध पाजले जायचे हे आजी आणि मम्मी नेहमी सांगत.आज तीच चांदी असहाय पणे पाय दुमडून बसुन होती.
मी तसाच जड मनाने चांदी जवळ गेलो. नेहमी प्रमाणे तिच्या गळ्यावर हात फिरवला तसं तिच्याही डोळ्यांत अश्रू आले. तिचे अश्रू पाहुन माझ्याही डोळ्यांत आपसूक पाणी आले. मी तिच्या गळ्यावर हात फिरवत राहिलो. आम्ही सोबत आणलेला चारा तिला दिला पप्पानी नदीतून पाणी आणले ते मोठ्या घमेल्यात तिच्या समोर ठेवले. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आजोबा व पप्पानी शेतातील लाकडं आणुन तात्पुरता मंडप करुन त्यांवर फांद्या टकल्या.
करोना संकटात शाळा बंद त्यामुळे मी दररोज सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या वेळेस आजोबांसोबत जायचो आणि चांदीला चारा व पाणी प्यायला मदत करायचो.काही दिवसांनी तीची तब्बेत आणखी खालावली माझ आजोबांसोबत रोजचे जाऊन चांदीला चारा-पाणी देण चालुच होत. शेवटी सोमवारी ३ मे च्या दिवशी ती आम्हांला सोडुन गेली..त्या दिवशी तिच्या बरोबर घालवलेल्या जुन्या आठवणी काढुन खुप- खुप रडलो फक्त मनात कुठेतरी एक समाधान होत की, शेवट पर्यंत चांदीची सेवा करण्याची संधी मला मिळाली.कारण तीची सेवा करतांना जो आनंद मिळायचा तो माझ्या बालमनाला खूपच समाधान देऊन जायचा...
(सत्य घटनेवर आधारित)
लेखन - चंद्रकांत घाटाळ
संपर्क : ७३५०१३१४८०