सेलिब्रिटी वाईफ (भाग 2)

सुपरस्टार विहान जेव्हा रीनाला त्याचा नंबर देतो

सेलिब्रिटी वाईफ (भाग 2)

रीना मल्होत्रा. सुपरस्टार विहान मल्होत्राची बायको. कार्यक्रमात सर्वांशी बोलून झाल्यावर आपल्या जागी येऊन ती बसली आणि कार्यक्रम बघू लागली. स्टेजवर डान्स शो सुरू होता, एका प्रेमगीतावर एक कपल नाचत होते. ते बघतांना ती भूतकाळात हरवली.

"सर ऑटोग्राफ प्लिज..."

विहान मल्होत्राची जबरदस्त फॅन असलेली रीना, तिच्या शहरात तो आला काय..ती देहभान विसरून त्याची एक झलक बघण्यासाठी धावपळ करत होती. विहान एका हॉटेलमध्ये थांबल्याचं तिला कळलं, घरी खोटं सांगून ती बाहेर पडली आणि हॉटेलबाहेर ठाण मांडून बसली. सकाळी सकाळी ती गेलेली..दुपार झाली, संध्याकाळ झाली तरी तिचा धीर सुटला नव्हता. मग रात्री 8 ला अचानक गेटमधून विहानची कार बाहेर आली तसं तिने कारला रोखलं.

"ओ मॅडम, सरका.."

ती हलायला तयार नव्हती. ड्रायव्हर खाली उतरून तिला हटकू लागला तरी ती ऐकेना.. शेवटी विहान बाहेर आला. त्याला बघून आजूबाजूची लोकं गर्दी करू लागली. तिने क्षणाचाही विचार न करता त्याला घट्ट आलिंगन दिलं..

"विहान..खूप मोठी फॅन आहे मी तुझी.."

बोलतांना तिच्या भावना अनावर होत होत्या, तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिला असं बघून विहानच्या डोक्यात चलबिचल सुरू झाली. त्याने पटकन खिशातून त्याचं कार्ड काढून दिलं आणि हळूच म्हणाला, आपण मेसेज वर बोलू..

आपण स्वप्नात तर नाही ना अशी तिची अवस्था झाली. कार्ड डोळ्यासमोर ठेवूनच ती घरी गेली. घरी आई बाबा रागावतील की काय कसलंच भान नव्हतं..

"रीने कुठे गेलेलीस गं? फोन का उचलत नाही? मूर्ख मुलगी..."

तिला काहीच ऐकू येत नव्हतं, कार्ड घेऊन ती खोलीत गेली आणि दार लावून घेतलं. तिचं वागणं बघून आई बाबा घाबरले,

"काय झालं हिला? कुणी काही...."

दोघेही बाहेरून दार ठोठावू लागले..

काही वेळाने रीना जरा भानावर येते आणि दार उघडते. आई रडवेली होऊन विचारते,

"रीने काय झालं सांग ना? तुला कुणी काही केलं तर नाही ना? तू ठीक आहेस ना?"

रीना आईला घट्ट मिठी मारते आणि झालेली हकीकत सांगते. हे ऐकून वडील खुश होतात, विहान म्हणजे सुपरस्टार..तरुण..रुबाबदार.. त्याने रीना ना नंबर दिला म्हणजे यांचं सूत जुळू शकतं.. मग दाखवून देईन मी त्या देसाईला..की आम्हीही मोठी माणसं आहोत म्हणून..!!!

रीनाचे वडील एका छोट्याशा कंपनीत कामाला होते. त्यांचे अधिकारी कामगारांना अपमानास्पद वागणूक देत, त्यातल्या त्यात तो देसाई, त्याचा मुलगा रणजी मध्ये, मुलगी मॉडेल...रुबाबात येतो आणि बढाया मारतो. देसाईचं आणि रीनाच्या वडिलांचं कधीच पटलं नव्हतं...

विहानने रिनाला नंबर दिला हे ऐकून आई मात्र धास्तावली. तिला पुढचं भविष्य दिसू लागलं..कारण रीना त्याची केवळ फॅन नव्हती, त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होती, त्याच्यामागे वेडीपीशी झालेली. रीनाचं Bsc चं तिसरं वर्ष सुरू होतं.. अभ्यासात ती बरी होती पण तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं असं आईला मनापासून वाटत होतं.

"रीने नंबर दिलाय म्हणून लगेच बोलणं सुरू करू नकोस..मोठी माणसं ती..उगाच चुकीची स्वप्न पाहू नकोस...तुझ्यासाठी तो देव असेल पण त्याच्यासाठी तू सर्वसामान्य व्यक्ती... चांगला अभ्यास कर, नोकरी कर, मोठी हो..चांगला मुलगा पाहून लग्न कर आणि.."

ते ऐकून वडील किंचाळले,

"केली ना छोटी बात..सामान्य माणसाने स्वप्न पाहू नये का?"

"पहावीत ना, मोठं बनण्याची, स्वतःच्या कर्तृत्वाने.. असं दुसऱ्याच्या कर्तृत्वात भागीदार होऊन नाही.."

वडील निघून गेले..आई रीना कडे बघतच राहिली. येणारं भविष्य साफ दिसू लागलं.

रेडिओवर गाणं सुरू झालं..

ssssss....."साधीभोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही.."ssss

______

हळूहळू दोघांत बोलणं सुरू झालं...त्या काळात विहानचं नाव आयेशा नामक मॉडेल सोबत जोडलं जात होतं, हे ऐकणं रीनाला जड जायचं. हळूहळू दोघेही वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलू लागले आणि एक दिवशी अचानक...विहानने रीनाला लग्नाची मागणी घातली..

रिनाला आकाश ठेंगणं झालं..

स्टेजवरचा डान्स संपला आणि रीना भानावर आली...डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या तिच्या..लग्नाचा क्षण तिच्यासाठी स्वर्ग होता पण त्यानंतर... स्वर्गातून अचानक कुणीतरी नरकात ढकलावं असं काहीसं झालेलं...

******
"मी दौऱ्यावर जातोय, पंधरा दिवसांनी येईन परत..काही असेल तर फोन कर"

मंत्री यश धर्माधिकारी त्याच्या बायकोला निघता निघता सांगत होता..सांगितल्यावर तिची प्रतिक्रिया ऐकण्याचे कष्टही त्याने घेतले नाही...

तो गेला अन ती स्वतःशीच बोलू लागली..

"फोन करू? आणि काय सांगू फोनवर? की माझ्याकडे थोडेच दिवस आहेत हे? गेल्या चार महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये चक्कर मारतेय...आज निदान झालं, की माझ्याकडे थोडेच दिवस आहेत... सकाळपासून झोपून आहे मी दिसलं नसेल यांना? माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव कळले नसतील यांना?...खूप विचार केल्यानंतर तिने ठरवलं...फोनवर तर फोनवर, सत्य यांना सांगायलाच हवं.."

तिने मेसेज केला..रिप्लायची वाट बघत संध्याकाळ झाली..

संध्याकाळी चार पाच डॉक्टर घरी आले, त्यांनी तपासलं.. मोठ्या डॉक्टरकडे चेकअप करण्यासाठी घेऊन जायला लागले...

"साहेबांचा आदेश आहे...मुंबईला तपासणी, तिथेही नाही तर अमेरिकेला जायचं आहे आपल्याला.."

आता त्यांना कोण सांगणार, डॉक्टर बघून आजार बदलत नसतो..त्याक्षणी तिला हवा होता आधार, आपल्या माणसाचा...तू मला हवी आहेस अशी आर्त हाक देणारा तिचा माणूस..तिच्या अस्तित्वासाठी सैरभैर होणारा माणूस...ती नसण्याची कल्पना करताच डोळ्यात पाणी आणणारा माणूस..

पण त्याक्षणी मिळालं काय? ढीगभर अनोळखी डॉक्टर आणि उपचारासाठी अकाउंट वर जमा झालेले लाखभर पैसे...सगळं जमून आलं पण ती एक हाक...तो आवाज, तिकडून उमटलाच नाही...

क्रमशः

(पुढील भाग या कथेला 150 लाईक्स झाल्यावरच )

🎭 Series Post

View all