सेलिब्रिटी वाईफ (भाग 1)

The Masked Truth Of Celebrity Wives
सेलिब्रिटी वाईफ (भाग 1)

"मॅडम एक फोटो प्लिज..प्लिज मॅडम..एक, एक.."

शाईन चॅनेलच्या अवॉर्ड शोसाठी सेलिब्रिटीजने हजेरी लावली होती, त्यांच्या एन्ट्री फोटो साठी शेकडो फोटोग्राफर आणि पत्रकार बाहेर गर्दी करत होते. कॅमेऱ्याच्या फ्लॅशने सगळं वातावरण चंदेरी झालं होतं. सेलिब्रिटी नवनव्या outfit मध्ये स्वतःला सांभाळत पोज देत होते. मधेच एखादा पत्रकार एखाद्या गॉसिपबद्दल खोचक प्रश्न विचारे, मग सेलिब्रिटी चिडून त्यांना उत्तरं देत निघून जात होते. हे प्रसंग मुद्दाम घडवून आणले जायचे, म्हणजे मीडियाची एक नवी news मिळवण्यासाठीची धडपड.

रीना मल्होत्रा, नेहमीप्रमाणे एक नवा फॅशनेबल पोशाख परिधान करून स्टेजवर पोज देण्यासाठी आली, फोटोग्राफरची फोटोसाठी धडपड सुरू झाली, रीना खूपच सुंदर दिसत होती. तिला स्टेजवरून हलूच देत नव्हते पत्रकार. त्यात फोटोसाठी दोन फोटोग्राफरची जरा धक्काबुक्की झाली, दोघेही स्टेजला खेटून असल्याने त्यांच्यातला संवाद रीनाच्या कानी पडला.

"अरे ध्यान से भाई, क्या कर रहा है"

"सॉरी भाई, मुझे भी जल्दी है रे...विहान सर की वाईफ की तसविरे हमेशा व्हायरल होती है..मुझे एक अच्छे अँगल से फोटो लेना है भाई.."

हा संवाद कानी पडताच रीनाने डोळे गच्च मिटले आणि कुठेही लक्ष न देता तिथून निघून शो च्या हॉलमध्ये तिने प्रवेश केला. खुर्चीवर आपलं नाव बघून तिने मटकन बसून घेतलं. आजूबाजूला असलेल्या ऍक्टर्स, म्युजिशियन, सिंगर, दिग्दर्शक यांना तिने मोठ्याने हसून आलिंगन दिलं..आणि परत आपल्या जागेवर बसून घेतलं.

पर्स मधून रुमाल काढत हळूच आपले डोळे टिपले.

"विहान सर की वाईफ...विहान सर की वाईफ.."या पलीकडे तिची काही ओळखच नव्हती.. त्यात मन थाऱ्यावर नव्हतं.. ऍक्टर विहान शूटिंग साठी परदेशी गेलेला..बसल्या बसल्या तिने मोबाईल पहिला, इंस्टा वर त्याने स्टोरीज टाकलेल्या..सिनेमातील हिरोईन सोबत गळ्यात गळे घालून, आलिंगन देऊन असे फोटो...यावेळी ती काहीच बोलली नाही, मागच्या वेळी बोललेली तेव्हा विहानने किती खालच्या पातळीला जाऊन छळ केलेल्याचं तिला आठवलं...

****

"कुठेही जायचं नाहीस, निवडणुका तोंडावर आल्या आहेत..उगाच कुणी मीडियावाल्याने तुला पाहिलं तर प्रोब्लेम होईल, काहीही छापतील.."

"अहो शॉपिंगला जातेय, काही चुकीचं करायला नाही.."

"हो, पण मीडिया माहितीये ना, म्हणतील..बघा बघा, इथे जनता दुःखात आहे आणि बायको शॉपिंग करतेय"

"म्हणजे आम्ही कुठेच जायचं नाही का?"

"तुला काय हवं ते घरी आणायला सांगतो माझ्या माणसांना...लिस्ट दे फक्त"

"असुद्या, महिन्यापासून चार भिंतींकडे बघून वीट आलाय मला..बघेन मी माझं"

_____

"यावेळी जिजूंची निवड होईल का गं संघात?"

"काही सांगता येत नाही"

"आणि तुझी तब्येत बरी आहे ना? पाचवा महिना सुरू आहे, काळजी घे.."

"हो रे दादा.."

"कॉलनीतले लोकं टोमणे मारत होते, लग्न झालं आणि बायकोचा झाला म्हणून, देशासाठी खेळणं विसरला.."

हे ऐकून प्रितीने पटकन फोन ठेवून दिला आणि रागाला कसाबसा आवर घातला.."

_____

प्रतीक आणि आयेशा ऑडिशन देऊन नुकतेच घरी आले होते.

"तुला काय वाटतं आपलं सिलेक्शन होईल?"

"God knows.."

थोड्या वेळात प्रतीकला सिलेक्शन झाल्याचा फोन येतो...तो आनंदाने उसळी मारतो..विसरून जातो की आयेशाला डावललं गेलंय.. आयेशा स्वार्थ विसरून त्याच्या आनंदात सहभागी होते. पण पुढे या यशाची हवा डोक्यात जाणार हे तिला कुठे माहीत होतं...

____

ही कथा आहे चार बायकांची, सेलेब्रिटी वाईफची..सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेल्या, कोमेजलेल्या स्त्री मनाची...चंदेरी दुनियेमागील काळा अंधार सोसणाऱ्यांची, स्वतःचं अस्तित्व हरपून केवळ नवऱ्याच्या ग्लॅमरवरून ओळखल्या जाणाऱ्या कटपुतल्यांची...चेहऱ्यावर खोटा मुखवटा चढवून लपवणाऱ्या खऱ्या वेदनेची..

पूढे घडणार आहे अजून बरंच काही, आनंदाची आणि दुःखाचीही परमोच्च पातळी..कधीही न ऐकलेले आणि पाहिलेले प्रसंग, अकल्पनीय घटना आणि बरंच काही..

सिरीज वाचायला इच्छुक आहात? नक्की कळवा कमेंट्स मध्ये..कमेंट्स जास्त असल्या की हुरुप येतोच की हो !

🎭 Series Post

View all