मी येऊ का?

पार्वती आणि महेशच लग्न होऊन पाच वर्ष झाली होती. एकदा पार्वती महेश सोबत तिच्या मावशीच्या घरी गे?

वयाच्या साठीतील पार्वती, आपल्या कथेची नायिका. पार्वती साधारण चाळिशीत असतानाची गोष्ट आहे. रात्री सगळ्यांनी जेवणं केली आणि गप्पा मारत बसले होती. साधारण रात्रीचे दहा वाजले असतील तितक्यात दारावर थाप पडली. 

ठक.. ठक

"कोण आहे?" आतून पार्वतीने आवाज दिला. 

दार वाजले की, कोण आहे ही विचारायची तिची सवय तिने घरात सगळ्यांना लावली होती. जेणेकरून कोणा अनोळखी व्यक्तीसाठी दार उघडले जाऊ नये.

"काकू, मी स्मिता." स्मिता म्हणजे पार्वतीच्या घर मालकाची मुलगी. 

पार्वतीने दार उघडले. वरच्या मजल्यावरून खाली धावत आलेली स्मिता धापा टाकत उभी होती. 

"काकू, तुमच्यासाठी गावाहून फोन आहे. चला लवकर ते पाच मिनिटांत परत फोन करणार आहे." स्मिता.

तिचा निरोप ऐकून पार्वती तशीच वर स्मिताच्या घरी गेली. मागोमाग स्मिता सुध्दा वर गेली. फोन येईपर्यंत स्मिताच्या आईने आणि पार्वतीने गप्पा मारल्या.

"अगं ही मुलं विचित्र आहेत बघ. घाबरतात तरी ती आहट सीरियल बघत राहतात. बघ कशी पळत गेली खाली घाबरते म्हणून." स्मिताची आईने सांगितले.

तितक्यात फोन आला. पार्वतीने फोन उचलला. ती काही बोलणार तितक्यात तिकडून आवाज आला. आवाज कातरत होता.

"हॅलो ताई, मी दिपू बोलतो आहे. आपली पुर्वी गेली. सकाळी अंत्यविधी करणार आहेत. तू लवकर ये." असं बोलून दिपूने रडत रडत फोन ठेवला. 

पार्वतीला काहीच कळले नाही, ती तिथेच मटकन खाली बसली. डोळ्यात आठवणींनी गर्दी केली होती.

"आमची पुर्वी गेली." इतक बोलून ती खाली आली. मागोमाग स्मिता आणि तिची आई सुद्धा आली.

पार्वती घरात आल्याबरोबर महेशरावांच्या गळ्यात पडली. 

"आपली पुर्वी गेली." इतकचं ती बोलत होती. तिला सगळ्यांनी शांत केले. थोडावेळ गेल्यावर ती शांत झाली.  

रात्री काही वाहन नसल्याने पहाटेच्या बसने जायचे ठरले होते. 

"कसं झालं असं? काही कारण सांगितलं का दिपूने?" महेशने विचारले.

"तो काहीच बोलला नाही." पार्वती डोळे पुसत बोलली.

"पार्वती, स्वतः ला सावर. तुम्ही दोघे जा, मुलांची काळजी करू नका. ते आमच्यासोबत राहतील. त्यांना तुम्ही नेऊ नका असं मला वाटतं " स्मिताची आई पार्वतीला समजावत बोलली.

"हो ताई, तुम्ही बरोबर बोलत आहात. दोन दिवसात परत येऊ तोपर्यंत तुमच्यावर मुलांची जबाबदारी सोपवतो." महेशराव.

काहीवेळाने स्मिता आणि तिची आई वर निघून गेल्या.

"पार्वती, त्यांनी आपलं ऐकलं असतं तर कदाचित असं झालं नसतं." महेशर खिन्न मनाने बोलला.

दोघांच्याही डोळ्यासमोर बारा वर्ष आधीची ती घटना उभी राहिली.

पार्वती आणि महेशचे लग्न होऊन पाच वर्ष झाली होती. एकदा पार्वती महेशसोबत तिच्या मावशीच्या घरी गेली. पूर्वीच्या काळात लग्न लवकर होत होती आणि जो पर्यंत मोठ्या मुलाचे वा मुलीचे लग्न होई तोपर्यंत घरात पाळणा हलत असे. पार्वतीच्या आईसह दहा जण भावंडं होती. पार्वतीची आई सगळ्यात मोठी आणि पार्वतीच्या लाडाची मावशी सगळ्यात लहान, त्यामुळे मावशी सुद्धा पार्वती पेक्षा दोन चार वर्षांनी मोठी होती. वयात अंतर कमी म्हणून दोघी मैत्रिणी सारख्याच होत्या. 

पार्वतीची मावशी म्हणजे हिराबाई आणि मावसा रघु दोघे सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. सतत होणाऱ्या बदलीमुळे त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागे. आता सुद्धा ते खानदेशातील एका खेड्यात म्हणजे मालदाभाडी इथे भाड्याने राहायला गेले. आता मुलं मोठी झालीत म्हणून मध्यवर्ती खेडं त्यांनी निवडलं की जिथून त्यांना बदलीच्या गावी ये-जा करता येईल. 

पार्वती आणि महेश पोहोचताच मावशीची मुलं दिनु आणि पुर्वी नाचू लागले. ताई आली म्हणून टाळ्या वाजवत होते. पार्वतीची दोन्ही मुलं सुशील आणि लता दोघे, दिपू आणि पूर्वी सोबत बाहेर खेळायला निघून गेले. पार्वती, महेश घरात गेले. घर छान नीट नेटके लावलेले होते. घात छोटे पण छान होते. तितक्यात पार्वतीची नजर घराच्या एका कोपऱ्यात असलेल्या कठड्याकडे गेली. तिथे जाताना तिचा जीव एकदम जड वाटत होता. असे मध्येच काय आहे हे बघायला ती त्या दिशेने गेली मागोमाग महेशराव पण गेले आणि दोघे ते बघून एकमेकांकडे बघतच राहिले. दोघांना सुद्धा कोणीतरी आपल्याला बघत आहे असे जाणवले.

"मावशी,अगं हे काय? असं कसं घर घेतलं तू?" पार्वती.

"काय करणार खेड्यात भाड्याने घर मिळणं खूपच कठीण आहे. दुसरीकडे खूप शोधलं पण मिळेना म्हणून मग हेच घर घेतलं." हिरा चहा ठेवत बोलली.

महेश आणि पार्वतीने परत एकदा तिथे बघितले. ती एक खोल विहीर होती. जी एका जाळीच्या झाकणाने बंद करून ठेवली होती. तिच्या तळाशी स्वच्छ पाणी होते. त्याचा थंडावा वर जाणवत होता. पण त्या गारव्यात एक अनामिक चाहूल होती. त्या तळात एक लोखंडी दरवाजा होता. बघूनच खूप वर्षांपूर्वीचा आहे हे समजत होतं. ज्यावर भलं मोठठं पितळाचं कुलूप लावलेलं होतं. राजा महाराजांच्या काळात ज्या ठेवणीचे दरवाजे, कुलूप असायचे तसच ते कुलूप आणि दरवाजा होता. इतक्या उंचावरून देखील ते कुलूप मोठ्या कढई इतक मोठ्ठं दिसत होतं, म्हणजे ते किती मोठं असेल ह्याचा अंदाज दोघांना आला होता. घराच्या छताच्या गवाक्षातून उन्हाची एक तिरीप सरळ त्या पाण्यात पडत होती. विशेष म्हणजे ते गवाक्ष असं बनवले होते की, दिवसभर उन्हाची तिरीप त्या विहिरीच्या पाण्यावर पडायची. पार्वती आणि महेश या दोघांना ते बघून जरा भीतीच वाटली होती.

"पण किती भीती वाटते हे बघितले की." महेश बोलला.

"हो सुरुवातीला आम्हाला पण भीती वाटली,पण आता सवय झाली. तुम्ही दोघे इथे या तिकडे जाऊ नका." रघु चहाचा कप महेशच्या हातात देत म्हणाला.

तसे दोघे समोरच्या पलंगावर जाऊन बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या मधून मधून पार्वती त्या विहिरीला बघत होती. तिला सतत वाटत होते की, कोणीतरी तिथे आहे. बोलता बोलता रात्र झाली. गावाकडे जेवणं लवकर होतात त्यामुळे सात वाजेला जेवणं करून सगळे समोरच्या अंगणात मोकळ्या हवेचा आनंद घेत गप्पा मारत बसले होते. 

"आज आपण बाहेरचं झोपू." हिरा.

"चालेल, किती छान वाटत अंगणात मोकळ्या हवेत चांदण्यांच्या प्रकाशात झोपायला." महेश मोकळ्या निरभ्र आभाळाकडे बघत बोलला.

तितक्यात कुठून तरी एक माणूस येऊन त्यांच्या समोर उभा राहिला. भगवी धोती, चेहऱ्याला टिळा, हातात रुद्राक्षाची माळ होती. बघून कोणी साधू वाटत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि आग होती. 

" इथे जास्त दिवस राहू नका, नाहीतर फार मोठी किंमत मोजावी लागेल." असं बोलून तो तावा तावात निघून गेला. 

सगळे दोन मिनिट शांत झाले. 

"इतका विचार नका करू असं काही नसतं." विषय बदलवत रघु म्हणाला. 

सगळे बाहेर झोपले, पण नियतीच्या मनात वेगळेच होते. कधी नव्हे तर मे महिन्यात पाऊस सुरू झाला. सगळे धावत अंथरूण उचलत आत आले. पाऊस आला तसा गेला सुद्धा. पण बाहेर सगळीकडे पाणी होते त्यामुळे आता घरातच झोपावे लागणार होते. ह्या सगळ्या गडबडीत रात्रीचे बारा वाजले. मुलं झोपली होती, पार्वती आणि महेशने डोळे बंद केले. हिरा आणि रघु मात्र जागीच होते. झोपू नकोस असं रघुने हिराला डोळ्यांनीच खुणावले होते. 

थोडावेळ गेला पार्वती आणि महेशला झोप लागतच आली होती की, अचानक बाहेर कुत्री भुंकण्याचा आवाज आला. त्याकडे दुर्लक्ष करत दोघांनी परत डोळे मिटले आणि थरारक खेळ सुरू झाला.

अचानक जमीन हलल्यासारखी वाटली, तसे दोघे उठून बसले. हिरा आणि रघु लगबगीने त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि एक अतिशय भीती दायक घोगरा आवाज आला. 

" मी वर येऊ का?"

तसे पार्वती आणि महेश घाबरले. दोघे काही बोलणार तितक्यात हिराने पार्वतीचे आणि रघुने महेशचे तोंड दाबले आणि डोळ्यांनीच काही न बोलण्याचा इशारा केला. सगळे एकमेकांना घट्ट पकडून बसले. 

नंतर अजून एक आवाज आला पण तो एका बाईचा आवाज होता . परत तोच प्रश्न

"मी वर येऊ का?"

पहाटे सुमारे चारपर्यंत हाच खेळ चालू होता. प्रत्येक वेळ आवाज बदलायचा पण प्रश्न तोच होता. उत्तर येत नाही म्हणून कधी काही पडल्याचा, तर कधी रडण्याचा, कधी पाण्याचा आवाज यायचा. पार्वती आणि महेश घामाघुम झाले होते. कधी एकदा सकाळ होते अस त्यांना वाटत होत. सुदैवाने मुले गाढ झोपली होती. शेवटी चार वाजले आणि हा खेळ थांबला. 

रघुने घराचे दार उघडले. बाहेरचा गारवा आत आला. हिराने सगळ्यांसाठी चहा केला. पार्वती आणि महेश काही बोलणार तितक्यात रघुने बोलायला सुरुवात केली.

"हे आवाज या विहिरीतून येतात. इथे एक गुप्त धन आहे असं म्हणतात. त्यावर एक रखवालदार म्हणून कोऱ्या जोड्याचा आणि लहान बाळाचा बळी दिला आहे असं लोक सांगतात. जो कोणी त्याच्या प्रश्नाला उत्तर देतो त्याचा जागीच मृत्यू होतो. म्हणून आम्ही तुमच्या तोंडावर हात दाबून ठेवले होते. हे सगळं तुम्हाला अनुभवता येऊ नये म्हणून बाहेर झोपायचा बेत आखला होता, पण तुमच्या भाग्यात हा थरारक अनुभव होताच." रघु.

"कोरा जोडा म्हणजे? आणि तुम्ही अशा घरात रहायचं का ठरवलं?" पार्वती.

"कोरा जोडा म्हणजे ज्यांचं नुकतच लग्न झाल आहे आणि ज्यांच्यात शारिरीक संबंध झाले नाहीत असं जोडपं. 

काही इलाज नाही. घर भाड्याने मिळत नाही आणि मिळाल तर ते आम्हाला परवडत नाही म्हणून राहतो आहे. आता सवय झाली. रोज आवाज येत नाही. अमावस्या, पौर्णिमा असली की येतात. आज पौर्णिमा होती, त्यात तुम्ही नवीन माणसं. घर देण्याआधीच मालकाने आम्हाला सगळी कल्पना दिली होती, त्यामुळे ह्या घरात यायच्या आधी आमची मानसिक तयारी झाली होती." हिरा.

" हे फारच भयंकर आहे. तुम्ही इथे कसे राहतात, मला ह्याचेच नवल वाटत आहे. आम्ही आजच परत जाऊ आणि इथून पुढे रहायला येणार नाही. तुम्हीच आमच्याकडे या." महेश.

त्या दिवशी महेश आणि पार्वती निघून गेले. जाताना बस स्टॉप वर उभे होते. बस यायला वेळ होता. 

तिथे दोन गृहस्थ बोलत होते. त्यांच्या गप्पांमध्ये त्यांनी मध्येच महेशला प्रश्न केला . त्यानंतर महेश आणि ते दोघे बोलत होते. गावची हवा पाण्याची खबर बात सुरू होती.

"काल अचानकच पाऊस आला ना रात्री. अजून तर मे ची सुरुवात. वळव्याला ही अजून वेळ आहे." महेश.

"ओ भाऊ, काल पाऊस आला नाही. आम्ही तर रात्रभर बाहेरचं झोपलो होतो. घरात जाम उकडत होतं बघा." एक गृहस्थ.

"पण आम्ही तर रात्री पावसामुळे घरात गेलो." महेश.

"भाऊ, मी तुमच्या नातेवाईकांच्या घरा शेजारीच राहतो. पाऊस काल पडला नव्हता. हे नक्कीच त्या… जाऊद्या ना भाऊ. विचार करू नका." असे म्हणत दुसऱ्या गृहस्थाने विषय बदलला. 

पार्वती आणि महेश मात्र समजले की, काल रात्री झालेला पाऊस फक्त त्यांच्या घरावरच झाला होता. 

मध्यंतरीच्या काळात बरेचदा महेश आणि पार्वतीने मावशीला घर सोडण्याचा आग्रह केला. हिरा आणि रघुने देखील खूप घरं बघितले पण त्यांना घर मिळत नव्हते. मग मात्र नाद सोडून हिरा आणि रघु त्याच घरात राहत होते. गेल्या वर्षी पार्वती आणि महेश परत हिरा आणि रघुला भेटायला गेले. नेहमी प्रमाणे ते थांबणार नव्हतेच. ते परत निघणार तोच तो माणूस परत त्यांच्या समोर आला. त्याला बघतच त्यांना पहिल्या वेळेस ते आले होते तेव्हाचा प्रसंग आठवला.

"सोडा सोडा हे घर. उशीर व्हायच्या आत सोडा." अस म्हणत तसाच तावात निघून गेला. पार्वती आणि महेशने त्यांना खूप समजावले की, आता तरी सोडा घर मुलं मोठी झाली आहेत. 

"पुर्वी बारावीला आहे. ती झाली की पुढच्या वर्षी आम्ही घर सोडतो." रघुने आश्वासन दिले. 

त्यानुसार पुर्वीची बारावीची परीक्षा झाली आणि आठ दिवसात ते घर सोडणार होते, म्हणजे उद्या आणि आज दिनुचा असा फोन आला.

आठवणींच्या वाटांवरून सकाळ झाली. पार्वती आणि महेश मालदाभाडीला जायला निघाले. ऐन तारुण्यातील देखणी मुलगी गमावल्याचे दुःख हिरा आणि रघुवर कोसळले होते. घरात सामान बांधून ठेवलेले होते. सगळे सोपस्कार पार पडले. हिरा रडून रडून बेहाल झाली होती. 

"कसं झालं?" महेशने दिनुला विचारले.

"काल अचानक भर उन्हात आभाळ दाटून आलं. पाऊस येईल म्हणून पुर्वी वर गवाक्ष झाकायला गेली. अस ती नेहमीच जायची. घरी कोणीच नव्हतं आम्ही उद्या ह्या घरातून जाणार होतो, म्हणून सामानाची आवरा आवर सुरू होती. आई बाबा नवीन घराच्या साफ सफाईला गेले होते. मी सुध्दा बाहेर गेलो होतो. पुर्वी घरात एकटीच होती. मी घरी आलो तेव्हा ती पलंगावर बसलेली होती. अतिशय घाबरलेली, थरथरत होती. मला वाटलं पावसात भिजली म्हणून थंडी भरली असेल, पण भिजण्या इतका पाऊस जोरात नव्हता. तिच्या अंगावर मी चादर टाकली तिने माझ्याकडे बघितले, तिच्या नजरेत खूप भीती होती. अंग तापाने फणफणत होते. मी डॉक्टरला बोलावून आणतो म्हणून जायला निघालो तोच तिने माझा हात पकडून जाऊ नकोस अशी मान हलवली आणि विहिरीकडे बघून परत घट्ट डोळे बंद केले. मी तिला पाणी दिले आणि तिने …." पुढे दिनु बोलूच शकला नव्हता. 

सगळ्या नातेवाईकांमध्येच हीच चर्चा होती की, त्या विहिरीनेच तिचा जीव घेतला. 

महेश आणि पार्वती जड पावलांनी जायला निघाले. थोडं चालून गेल्यावर तो साधू त्यांना परत दिसला. 

"सांगत होतो लवकर घर सोडा. आता रडत बसले." असं बोलत तो निघून गेला.

पुढील काही दिवस हिरा आणि रघु मुलीच्या आठवणीत त्याचं घरात राहिले, पण त्यांना त्यांची पुर्वी तशीच पलंगावर बसलेली दिसायची. कधी वर गवाक्ष झाकताना दिसायची. कधी मोठं मोठ्याने हसताना. कधी खूप रडताना.

"जा जा तुम्ही जा." असं सांगायची. त्या नंतर हिरा आणि रघुने ते घर सोडले पण त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली.

आता म्हणतात त्या घरात कोणीच रहात नाही, पण सगळ्यांना तिथे ती दिसते.

धन्यवाद

©वर्षाराज

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतून कोणताही अंधविश्वास पसरवण्याचा हेतू नाही. कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. कथा कशी वाटली नक्की सांग. लाईक करा. कमेंट करा. धन्यवाद