पप्पांचा अनपेक्षित कॉल

Call Of My Father From Heaven

पप्पांचा अनपेक्षित कॉल


नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी मी मोबाईलवर एक कथा लिहीत बसले होते. तेवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवरील नाव बघून माझा मलाच विश्वास बसत नव्हता, कारण स्क्रीनवर \"पप्पा\" हे नाव झळकत होतं. मी बिचकतच फोन उचलून कानाला लावला.


मी- हॅलो….


पप्पा- हॅलो, फोन उचलायला एवढा उशीर का लावलास?


मी- तुमचं नाव स्क्रीनवर बघून विश्वास बसत नव्हता म्हणून.


पप्पा- बाळा तू कशी आहेस?


मी- मजेत. तुम्ही कसे आहात?


पप्पा- समाधानी


मी- पप्पा तुम्ही जिथे आहात, तिथे फोन आहे का?


पप्पा- इथे एकच मोबाईल आहे. सर्वजण फोन करण्यासाठी नंबर लावून ठेवतात. आपला नंबर आला की, आपलं सिमकार्ड टाकून फोन लावायचा. ज्याच्या सिममध्ये बॅलन्स आहे, त्याचा फोन लागतो आणि ज्याचे सिम बंद झालेय, त्याला इच्छा असूनही फोनवर बोलता येत नाही. तू माझ्या सिमकार्डला बॅलन्स नसता टाकला तर मलाही आज तुझ्यासोबत बोलता आले नसते.


मी- फोनवर बोलण्यासाठी नंबर लागायला तुम्हाला जवळपास दीड वर्ष लागले. तिकडे एवढी गर्दी आहे का?


पप्पा- कोरोनामुळे इकडे जरा जास्तच गर्दी झाली आहे. आपल्या आजूबाजूचे बरेच लोकं इथे आहेत. मी इथे आल्यानंतर दोन महिन्यांनी दादा आला, त्यानंतर एक महिन्याने आक्का आली. तुला तर माहीतच आहे की, मला गप्पा मारायला सोबत असली की, मी मजेत असतो. सुरुवातीला मी तुमच्या काळजीत असायचो. माझ्यानंतर तुमचं कसं होईल? ही काळजी लागून राहिली होती. दादाला आणि आक्काला तशी काळजी नव्हती, कारण त्यांची मुलं मोठी झालेली आहेत. आता मात्र मला तुमची काळजी वाटत नाही.


मी- का?


पप्पा- गेल्या वर्षभरात तुम्ही मी सोडून आलेला व्यवहारांचा पसारा एकदम व्यवस्थितपणे सांभाळलास. कोरोनाचा काळ असल्याने तुमच्या जवळ आपले नातेवाईक येऊ शकले नाही, त्यामुळे तुम्ही एकटे पडला होतात, तुम्हाला आजूबाजूच्या लोकांचा, नातेवाईकांचा खूप राग आला होता ना? 


मी- हो पप्पा. तुम्ही सर्वांची मदत केली होती, पण तुमच्या शेवटच्या क्षणी कोणीच आले नाही, याचं जास्त वाईट वाटत होतं.


पप्पा- अरे बाळा, तो काळचं तसा होता. माझ्या वर्षश्राद्धाच्या वेळी तुम्ही तुमचा राग बाजूला ठेऊन माझा विचार करुन सर्व नातेवाईकांना बोलावलंत, याचं मला खूप कौतुक वाटलं. माझी मुलं माझ्यासाठी काहीपण करु शकतात, हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलंत. 


मी- पप्पा ते आमचं कर्तव्य होतं.


पप्पा- कोरोना काळात अनेक जण गेलेत, पण त्यांच्या मुलांनी कोणतेच विधी केले नाहीत. मुलांनी आपल्या आई वडिलांच्या अस्थींना स्पर्श सुद्धा केला नाही. तुम्ही मात्र माझे सर्व विधी मनापासून केलेत, याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे.


मी- पप्पा प्लिज आभार मानून परकं करु नका.


पप्पा- बरं आयुष्य काय म्हणतंय?


मी- आयुष्याचं दुसरं नाव परीक्षा म्हणता येईल. दररोज एक नवीन प्रश्नपत्रिका समोर असते, आपण ती सोडवत जायची. उत्तर लिहितांना बऱ्याचदा तुमची आठवण येते. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलं असतं? हा विचार करुन त्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं.


पप्पा- बाळा आयुष्य यालाच म्हणतात. माझंचं चुकलं, तुझ्या आयुष्याचे प्रश्न तुला कमी होते का? की मी माझ्या आयुष्यातील काही प्रश्नपत्रिका कोऱ्या ठेऊन आलो. तुझ्यावर सर्वांत जास्त जबाबदाऱ्या सोपवून आलो.


मी- नाही पप्पा. तुमचं काहीच चुकलं नाहीये. देवाने तुम्हाला वेळेआधी नेलं, यात त्याची चूक आहे. तुमच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे. पप्पा मी त्यांची उत्तरं बरोबर लिहीत आहे ना? मी माझ्या जबाबदाऱ्या बरोबर निभावत आहे ना?


पप्पा- हो. तू माझ्यापेक्षा चांगली उत्तर लिहीत आहे. माझा एक सल्ला ऐक, माझ्या प्रश्नांचा अतिताण तू घेऊ नकोस. तू सगळं काही उत्तम करत आहेस. तू माझी मुलगी आहेस, हे पावलोपावली तुझ्या वागण्यातून स्पष्टपणे जाणवून देत आहेस. तुला तुझ्या जबाबदाऱ्या झेपवत नाहीयेत का?


मी- पप्पा जबाबदाऱ्यांचं काही नाही पण, आयुष्यातील काही गणितं सुटतंच नाहीयेत. गणितं सोडवण्यासाठी सूत्रचं सापडतं नाहीयेत. काही समस्या अश्या येतात की, त्याच्यासमोर आई हतबल होऊन जाते, तिच्याकडे बघून खूप वाईट वाटतं. आपण आपल्या आईसाठी काहीच करु शकत नाही, असं वाटतं.


पप्पा- बाळा तू आईसाठी भरपूर काही करत आहेस. आत सध्याचा तूच तिचा सर्वांत मोठा आधार आहेस. तू तुझी सर्व कर्तव्ये निभावत आहेस. मला तुझ्याकडून काहीच तक्रार नाहीये. तू मुलीचे सर्व कर्तव्ये पार पाडत आहेत. हा… आता थोडं कमी जास्त, इकडे तिकडे होणारच आहे. शेवटी तुलाही तुझ्या बऱ्याच इच्छा बाजूला ठेऊन पुढे जावं लागतं आहेत.

तू इतकी छान लेखिका आहेस, याची मला कल्पनाच नव्हती. आपल्या शोकेसमध्ये पाच सहा ट्रॉफी जमा झाल्या आहेत. तू माझ्यावर लिहिलेलं पुस्तक तर अप्रतिम आहेस. तू लिहिलेलं पुस्तक वाचून आपल्या नातेवाईकांनी तुझं खूप कौतुक केलं. मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो आहे.


मी- पप्पा तुम्हाला आदरांजली वाहण्याचा तो एक छोटासा प्रयत्न मी केला.


पप्पा- उत्तम प्रयत्न केलास. तुमच्या पाचही जणांची पत्र वाचताना मला भरुन आलं होतं. माझी मुलं माझ्यावर एवढं प्रेम करतात, याची मला कल्पना नव्हती. माझ्यावर पुस्तक लिहून ते वर्षश्राद्धाच्या दिवशी प्रकाशित करुन एक वेगळेपण टिकून ठेवलंस. आपल्या गावात जे वेगळेपण मी जपून ठेवलं, तेच तुही केलंस.


मी- पप्पा तुमचं नाव आज स्क्रीनवर बघून खूप छान वाटलं. पप्पा मला अधूनमधून फोन करत जा.


पप्पा- फोन करायला नंबर लागेल की नाही हे माहीत नाही. तसंही तुला फोन करण्याची गरज आता पडणार नाही. माझी लहान पिल्लं आता मोठी झाली आहेत. मी दिलेल्या संस्कारांचा मान राखून पुढं जात आहेत. माझ्या मुलांच्या पंखात एवढी ताकद आहे की, ते त्यांचं त्यांचं उडू शकत आहेत. काही अडचणी आल्यातर त्या सोडवून पुढे जातील, याबाबत मला शाश्वती आहे.

एकच सांगेल की, तुझा भाऊ लहान आहे, तो आता कुठे मोठा होत चालला आहे, हळूहळू तो सर्व जबाबदाऱ्या सांभाळेल, तोपर्यंत तू सगळं सांभाळ. तुझ्या मोठ्या बहिणी त्यांच्या घरी सुखी आहेत. जशी इतकी वर्षे माझी सेवा केलीत, तशी तुझ्या आईची सेवा कर.

माझ्यामुळे तुझ्या आईला बराच त्रास सहन करावा लागला आहे. तुम्ही तिला जपत आहातच, पण ती कधी चिडली, तिने कधी त्रास दिलाच तर थोडं सहन करुन घ्या. आज तुमच्याकडे जे काही आहे, त्यात तिचा सर्वांत जास्त मोठा वाटा आहे.

तुम्ही सर्व बहीणभाऊ कायम एकत्र रहा. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. तुम्ही शेवटपर्यंत एकत्र राहिलात तर हीच माझ्यासाठी सर्वांत मोठी आदरांजली ठरेल. माझं काही चुकलं असेल तर माफ कर.


मी- पप्पा तुमचं काही चुकलं नाहीये. तुम्ही आमच्यावर रागावला असाल, चिडला असाल तर ते आमच्या चांगल्यासाठीच होतं. तेव्हा तुमच्या बोलण्याचा राग येत होता, पण त्यामागील भावना आत्ता कळत आहेत. पप्पा तुमचा आशीर्वाद कायम सोबत असुद्यात.


पप्पा- माझा आशीर्वाद कायम माझ्या मुलांसोबत असेल. बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की, आपण जर कोणाचं काही वाईट केलं नसेल, तर आपलंही देव काहीच वाईट होऊ देत नाही. बरं शेवटी काही बोलायचं आहे का?


मी- हॅपी फादर्स डे पप्पा. 


आणि फोन कट झाला. 


तेवढ्यात मोबाईलची रिंगटोन वाजली, म्हणून हाताने चाचपडत मोबाईल बघितला तर अलार्म वाजत होता, तेव्हा लक्षात आले की, आपण तर हे स्वप्न बघत होतो. 

खरंच किती छान झालं असतं ना की, देवाघरी गेलेल्या व्यक्तींसोबत आपण फोनवर बोलू शकलो असतो तर…….

बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असती……

सोशल मीडियावर फादर्स डेच्या पोस्ट बघून पप्पांची आठवण येत होती आणि त्याचाच परिणाम म्हणून स्वप्नात पप्पांसोबत बोलणं झालं. असो पण खूप छान वाटलं.


©®Dr Supriya Dighe