निवडुंग काटेरी (भाग ९ आणि अंतिम)

निवडुंग घरात दुर्देव आणते


निवडुंग काटेरी (भाग ९)


आजी मालाला फोन करणार होती. पण इतक्यात मालाचाच आजीला फोन आला. " आजी कशी आहेस तू? आणि तात्या, सुधा आजी? बरे आहात ना तुम्ही सगळे? " माला बोलत होती पण तिचे बोलणे आरळ आरळ येत होते. दारू प्यायला सारखे. आजीला ही ते कळत होत. " आजी मी खूप दिवसात तुम्हाला भेटले नाही. मी येतीय ह्या विकएंडला. I love you Aaji. "

"ऐक माला. नीट लक्ष देऊन ऐक. आम्ही तिघेही उद्या वृद्धाश्रमात रहायला जातोय. हो उद्याच. तू आलीस तरी आम्ही तिघेही तुला भेटणार नाही. " संगितावहिनी.

" अग, पण का? पैसे कमी पडता येत का? मी अजून पाठवू का? " माला

" अजिबात नाही. उलट तू इतके दिवस पाठवलेले पैसेच आम्ही तुला परत पाठवले आहेत. आम्हाला मानसिक समाधानाची आणि आरामाची गरज आहे. म्हणून आम्ही वृद्धाश्रमात जायचा निर्णय घेतला आहे. " संगितावहिनी.

" आजी अग ह्यावेळी मीही तुम्हांला सरप्राईज देणार होते. कुणाला तरी भेटायला आणणार होते. आजी प्लीज थांबा ना ग विकएंडपर्यंत. " माला.

मालाच्या ह्या बोलण्यावर परत सगळे भाळले आणि थांबायला तयार झाले. लगेच वृद्धाश्रमात जायच्या ऐवजी माला येऊन गेल्यावर वृद्धाश्रमात जायचे ठरले. आजीच्या मनात आले, बहुतेक पोराने लग्न करायचे ठरवले म्हणून कोणालातरी भेटायला घेऊन येणार असेल. किती झाले तरी मालाची ओढ कमी होत नव्हतीच. पोटच्या पोरीची पोर धागा असा तुटणार थोडीच होता. मालाच्या ओढीने तिघे परत थांबले.

ठरल्या दिवशी माला आली. तिच्याबरोबर तिचा एक मित्र ही होता. बलबीर सिंग. तिने मित्र अशीच ओळख करून दिली. " आजी, सुधा आजी तात्या, हा माझा मित्र बलबीर सिंग. और बलबीर ये मेरे नाना नानी है। " माला.

रात्री जेवण झाल्यावर माला आणि बलबीर मालाच्या खोलीत झोपायला निघाले. तेव्हा आजीने मालाला आठवले. " अग हे काय? लग्न केल आहेत का तुम्ही? एका खोलीत कसे झोपणार? भिती नाही वाटतं तुला. " संगितावहिनी.

"अग रोज झोपतो तसेच झोपणार. " माला

" म्हणजे " संगितावहीनींनी अवाक होऊन विचारले. अग रोज असे झोपता, तेही लग्न न करता? "

" हो आम्ही लिव्ह इन मध्ये राहतो. म्हणजे लग्न न करता एकत्र राहतो. " माला.

" नवराबायको सारख? " संगितावहिनी.

" हो. अगदी नवराबायको सारख. " माला.

" अग, बाई बाई, ही असली थेर चालणार नाहीत इथे. तू ताबडतोब निघून जा इथून. चल चालती हो. " संगितावहिनी.

आवाज ऐकून बलबीर ही बाहेर आला. माला त्याला म्हणाली, " अरे इन लोगोंको लिव्ह इन में रहना पसंद नही है। इसलीये ये लोग हमे यहाॅंसे जाने को कह रहे है। चलो चलते है। मै ही गलत थी जो तुम्हे यहाॅं लेके आई। " माला.

सामान आवरून माला रात्रीच्या रात्री निघून गेली. संगितावहिनी स्वतःशीच बडबडत बसल्या. " मालाचा बाप म्हणजे आपल्या घरातला निवडुंग. निवडुंग जस घर उध्वस्त करतो तसेच ह्या माणसा मुळे आपल घराण उध्वस्त झाले." सुधा वहिनी आणि तात्या गप्प होते. दुसऱ्या दिवशी उठून सकाळी सकाळीच तिघे वृद्धाश्रमात निघून गेले.
इकडे मालाही स्वतःच्या इच्छेप्रमाणे आयुष्य घालवायला निघून गेली परत कधीही न येण्यासाठी.


समाप्त.

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all