निवडुंग काटेरी (भाग ५)

निवडुंग घरात दुर्देव आणते


निवडुंग (भाग ५)

आबा दवाखान्यात होते तेव्हापासून माला जरा बरी वागत होती. दोन्ही आजीना थोडी कामात मदत करत होती. कधीतरी आबांच्या तब्येतीची चौकशी करत होती. पण हे नाटक किती दिवस चालणार होते कोण जाणे. पण सध्या सगळं ठीक होत.

तात्या आणि सुधावहिनींनी परत जायचा विषय काढला नाही पण त्यांना आता इथे रहाणे अवघड वाटत होत. सारखे सारखे वाद त्यांनाही नको वाटत होते. आबा आजोबांशी वाद झाल्यावर माला तात्यांशी अगदी नीट वागू लागली. तिच वागण किती डिप्लोपॅटीक आहे हे सगळ्यांना समजत होत. इतक्यात तिच मिडटर्म सबमिशन आले. तिला माहिती होत तात्या ही रात्री मैत्रिणीकडे जायला नकार देणार. मग तिने शक्कल लढवली. तिने तिच्या मित्रमेत्रिणींनाच घरी बोलावले. रात्री अकरा वाजता तिच्या मित्रमैत्रिणी आले. थोडावेळ त्यांचे सबमिशनचे काम चालू होते. पण नंतर त्यांच्या गप्पा हशा नाच सगळं सुरू झाले. थोडावेळ सगळ्यांनी सहन केले पण वयाप्रमाणे त्यांना झोपेची गरज होती. संगीतावहीनींनी दार वाजवले मालाच्या रूमचे पण त्या दंग्यांमुळे त्यांना ऐकू येत नव्हते की त्यांना ऐकायचेच नव्हते कोण जाणे. दार वाजवून संगितावहिनी कंटाळल्या पण आबांना त्रास होत होता म्हणून त्या पुन्हां पुन्हां दार वाजवत होत्या. शेवटी आबांनीच त्यांना नको दार वाजवू म्हणून सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी संगितावहिनी मालाला म्हणाल्या, " अग रात्रीचा किती दंगा करायचा काही मर्यादा आहे की नाही. आमच्या कुणाची झोप झालीच नाही, पण शेजारपाजारचे पण ओरडतील आता. " माला लगेच फणकारून म्हणाली, " ही अशीच मजा करायची असते. सगळे हेच करतात. आणि मी तर नाही ना आता रात्री बाहेर जात आता. काही झाले तरी मीच दोषी का? किती दिवस मला असं बंधनात ठेवणारे? "

आबा सगळं ऐकत होते पण काही बोलले नाहीत. फक्त हताशपणे ता त्यांकडे बघत राहिले. पुढच्या वेळेपासून माला न विचारता रात्री मैत्रिणीकडे सबमिशनसाठी जाऊ लागली. संगितावहिनींनी फक्त एक अट घातली, ज्या मैत्रिणीकडे जात आहेस, तिचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि दुसऱ्या मैत्रिंणींचेही फोन नंबर व पत्ते इथे घरी देऊन जायचे, तरच जायचं. "

अशा तर्हेने मालाची रात्री मैत्रिणीकडे जायची परवानगी मिळवली. पण ती वाईटही वागत नव्हती. पण अरेरावी करणे, ओरडाआरडा करून स्वतःचे खरं करणे हेच ती करत होती.

आबांना आता मालापेक्षा जास्त संगितावहिनी, सुधावहिनी आणि तात्यांची काळजी वाटत होती. मालाचे वागणे हे कसे सहन करतील, देवच जाणे. स्वतः आबांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती. सारखी बारीकसारीक कुरबुर चालूच होती.

संगितावहिनींना ही आजकाल सारखा खोकला येत होता डाॅक्टरकडे जायच्या ऐवजी त्या घरीच काढे घेत होत्या. सुधावहिनी आणि तात्या ही आता थकले होते. म्हणून थोड्या कामासाठी, वरकामासाठी, आणि पोळी भाकरीसाठी बाई ठेवली होती. पण त्यातही मालाचे नखरे सुरु झाले. " पोळी कच्चीच आहे. भाकरी जाडच झालीय" म्हणून ती तक्रार करू लागली. शेवटी सुनितावहिनींनी सांगितले "तुझी तू पोळ्या कर आणि खा. " तेव्हां गप्प बसली.

तिचा अभ्यास व्यवस्थित चालू होता, म्हणजे अस दिसत तरी होत. ती मार्क व्यवस्थित पाडत होती. आता तिसरे वर्षे चालू होते. तिला मोठा प्रोजेक्ट करायचा होता. एका कंपनीतर्फे हा प्रोजेक्ट करायचा होता. ती आणि तिच्या बरोबर एक मुलगा होता "सेसील". दोघांची चांगली मैत्री होती. दोघ मिळून त्या प्रोजेक्टवर भरपूर काम करत होते. त्यासाठी एकमेकांकडे जाणं येणं होत होत. मुलगा वागायला बरा होता. पण डिस्टर्बन्स नको म्हणून खोलीच दार बंद करून दोघांनीच तासनतास खोलीत बसणे किती योग्य होते. आबा तात्या आणि दोन्ही आजीना हे पटत नव्हते.
एक दिवस सुधावहिनींनी धाडसाने मालाला विचारले " बाळा तू रागवणार नसशील तर एक विचारू का?
" विचार ग आजी. मी नाही रागवणार तुझ्यावर. " माला

" तू आणि तो सेसिल का कोण तो तुझा मित्र तुमच्यात तस काही नातं आहे का? म्हणजे तुम्ही लग्न वगैरे करणार आहात का? " सुधावहिनी.

" नाही ग आजी. मला लग्नच करायचे नाही.माझा विश्वासच नाहीये लग्न, प्रेम याच्यावर. मी इंजिनिअर झाले की नोकरी करणार, भरपूर पैसे मिळवणार आणि तुम्हांला सगळ्यांना सुखात ठेवणार. * माला

सुधावहिनी च्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून मालाने त्यांना मिठी मारली. सुधावहिनी मनाशीच म्हणाल्या " कधी अगदी मधासारखी गोड बोलते ही मुलगी. मग मधेच काय होत देव जाणे. आपल्या आजी आजोबांना मात्र सुखाने जगू देत नाही. का ही वादळापुर्वीच शहाणपण देव जाणे"

एकदिवस रात्री परत आबांच्या छातीत आणि पाठीत दुखायला लागले. रात्रीत त्यांना दवाखान्यात न्यावे लागले. पण काही उपयोग झाला नाही. दवाखान्यात नेई पर्यंत सगळं संपल होतं. आबा सर्वांना सोडून गेले होते.

आता काय होणार सगळ्यांच? खासकरून संगितावहिनींच?

पाहू पुढच्या भागात.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all