निवडुंग काटेरी (भाग ३)

निवडुंग घरात आणते दुर्देव


निवडुंग  काटेरी (भाग ३)


इतक्या वर्षांनंतरही संगितावहीनीना निलीमाच्या आठवणीने खूप त्रास झाला. त्यांच बीपी वाढले. आबांनी चटकन त्यांना सावरले आणि डाॅक्टरांना बोलावून आणले. इंजेक्शन दिल्यावर संगितावहीनी झोपल्या. माला आबाआजोबांजवळ खूप रडली. तिला तिच्या बाबांविषयी काही विचारावेसेही वाटले नाही. ती आबांना म्हणाली, " आबा साॅरी, माझ्यामुळे आजीला एवढा त्रास झाला. पण मैत्रिणी सारख्या विचारतात मग मलाही राग येतो. पण मी आता नाही रागवणार, मी शहाण्यासारखी वागेन. आबा खरचं साॅरी. " आबांनी तिला जवळ घेतले आणि तेही रडू लागले. तात्यांनी आबांना आणि सुधावहिनींनी मालाला शांत केले. " आजी, आपल्या आजीला काही होणार तर नाही ना? "म्हणून माला परत रडू लागली. मग सुधा आजीने मालाला शांत केले व झोपवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी माला संगिता आजीच्या कुशीत शिरली व झोपून गेली. तिला कोणीच शाळेसाठी उठवले नाही. संगितावहीनी ही शांत झोपल्या होत्या.

जरा उशीरानेच संगितावहीनीना जाग आली. त्या खडबडून उठल्या, पण सुधावहिनींनी त्यांना उठू दिले नाही. अगदी दोन दिवस सख्ख्याबहिणीपेक्षा जास्त काळजी घेतली संगितावहिनींची. तर आबा आणि तात्या़नी पण मालाला छान गोष्टी सांगून व विनोद सांगून तिचा मूड हसरा व चांगला केला. दोघी आजी नात छान बर्या झाल्या. या घटनेनंतर मालाच्या वागण्यात ही भरपूर सुधारणा झाली. चांगल शिकून मोठ व्हायचे तिनी मनाशी ठरवले. व ती जास्त अभ्यास करू लागली. आता आबा आजींचीही काळजी थोडी कमी झाली.
रोज नवनवीन हट्ट करणारी मालिनी आता एकदम शहाणी शाळेतल्या मैत्रिणींबरोबर भांडण ही कमी झाली. शाळेतल्या इव्हेंट मधे ती उत्साहाने नेहमीच भाग घेत असे पण नेहमी चिडचिड करुन इव्हेंट ची मजा चालवणारी माला आता शांत झाली. शाळेतले शिक्षकही तिच्याबद्दल आता चांगल बोलू लागले.


सहावी सातवीत आडनिड वय आणि भलते सलते विचार यात अडकून तिच अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होत. आठवीत गेल्यावर तिला शिक्षकही चांगले मिळाले आणि आबा आजींनी पण तिला गोड शब्दात समजावून सांगितले. त्यामुळे दहावीत जाताना माला चारी तुकड्यात पहिली आली. आता शाळेला ही माला कडून अपेक्षा वाढल्या. ती बोर्डात येईल अशी आशा सर्वांनाच वाटत होती.
नेमकी बोर्डाच्या परीक्षेच्या धामधुमीत एक घटना घडली. मालिनीचा बाबा तुरुंगातून सुटून आला. त्याने कुठून कसा पत्ता मिळवला आणि मालिनीला भेटायला आला. तेव्हा नेमकी मालिनी घरात होती. त्याला ती ओळखू शकणारच नव्हती पण त्याचा अवतार बघूनच ती घाबरली. तिने त्याला भेटायला स्पष्ट नकार दिला. आजी आबांना सांगून त्याला घरातून हाकलून लावले. ती डिस्टर्ब झाली. ती बाहेर जायला ही घाबरू लागली. पण आबा आजींनी तिच्यावर कोणतेच दडपण येऊ दिले नाही. तात्या आणि आबा रोज तिला रिक्षाने परीक्षेला सोडायला जात. असे तिचे बोर्डाचे सर्व पेपर चांगले गेले. महिना दीड महिना आता सुट्टी होती. आता तिचा वेळ जाता जाईना. मग आजीने तिला भरत काम विणकाम शिकवण्याचा विडा उचलला. तिला बाकीच्या मैत्रिणींसारखे निरनिराळे क्लास करायचे होते. पण परिस्थितीमुळे ही शक्य नव्हते आणि परत तिला बाहेर पाठवायची कुणाची तयारी नव्हती.
बोर्डाचा रिझल्ट लागला. ती ऊत्तम मार्गांनी पास झाली. शाळेत पहिली आली. तिला इंजिनिअर व्हायचे होते म्हणून तिने सायन्सला अॅडमिशन घेतली. खरंतर सायन्स आबांना परिस्थितीमुळे झेपणार नव्हते. पण आता पाळणाघरात आणखी चार मुले वाढवली. शिवाय आबा आणि तात्यांचे पेन्शन मिळून सगळे कसेतरी जमवत होते. त्यामुळे मालाला देखील आपल्या हौशीला आवडी निवडीला मुरड घालावी लागत होती. पण ह्या सगळ्यापेक्षा आता तिला शिकून खूप मोठ होण महत्वाचे वाटत होते.

क्रमशः

बारावी नंतर होणार का माला इंजिनिअर? पाहू पुढच्या भागात.


सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज.

🎭 Series Post

View all