निवडुंग काटेरी (भाग २)

निवडुंग घरात आणते दुर्देव

निवडुंग ( भाग २)

एका खेडेगावातून आबांची बदली एका बर्यापैकी मोठ्या शहरांत झाली. इथले वातावरण एकदमच निराळे. इथे आपले कसे होणार याची काळजी आता आबा, तात्या आणि संगितावहीनी आणि सुधावहिनी चौघांनाही वाटू लागली. बदली झाल्यावर तात्या आणि सुधावहिनी आपल्या घरी निघाले होते पण आबा आणि संगितावहीनी दोघांनी त्यांना एकत्र रहाण्याची गळ घातली. तात्या म्हणाले " एकत्र रहायला हरकत नाही, पण कधी भांडण झाली तर परत नव्याने सगळं उभ करणे मला आणि आबाला दोघांनाही शक्य नाही. " यावर सुधावहिनी म्हणाल्या " माझी आणि संगीताची नाही हो व्हायची एकमेकांत भांडणे, तुम्ही भाऊभाऊच बघा काय ते? " असे हो नाही करत सर्वांनी एकत्र रहायचे आणि मालिनीला मोठे करायचे ठरले. तात्या आणि सुधावहिनी गावी जाऊन त्यांचे गावचे सगळे व्यवहार निस्तरून कायमचे आबा संगितावहीनी बरोबर शहरात वास्तव्याला आले. बघतांनाच शहरात चांगली चार खोल्यांची मोठी जागा बघितली. सगळे मजेत राहू लागले.

वेळ जाणे आणि थोडासा संसाराला हातभार म्हणून सुधावहिनी आणि संगितावहीनींनी पाळणाघर सुरू केले. त्या मोठ्या शहराची ती गरज होती त्यामुळे पाळणाघरात अल्पावधीतच चांगला जोर धरला. मालिनी बरोबर आणखी चार सहा मुलांना सांभाळणे दोघींना सोप जात होत. बघता बघता मालिनीचा वर्षाचा वाढदिवस आला. आबा तात्यांनी वाढदिवस मोठ्या थाटात केला. पण संगितावहिनींच्या डोळ्यातील पाणी मात्र थांबत नव्हते. मालिनीच्या वाढदिवशीच निलीमाचे मारहाणी मुळे झालेल निधन त्या कसं विसरणार होत्या.
रोज नवनवीन गूण करत माला दिवसागणिक मोठी होत होती. असेच दिवस जात राहिले. माला तीन वर्षांची झाली. आता तिला शाळेत घालण आवश्यक होत. सर्वानुमते तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचे ठरले. मालाची शाळा सुरू झाली. ती हुशार होती पण तितकीच हट्टी होती. शाळेचा नियम म्हणून ती डब्यात भाजी पोळी न्यायची पण घरी भाजीला हातही लावायची नाही. आजी ओरडली तरी आजोबा लाड करणार हे तिला पक्के ठाऊक होते. पाळणा घरातल्या इतर मुलांनाही त्यामुळे भाजी खायला नको असे. मग कंपल्सरी सकाळी मालाला भाजी पोळीच देण्यात येई. रात्री जेवणात मात्र तिच्या आवडीचे. कधी गुळांबा साखरआंबा तर कधी मिरचीचा ठेचा. कधी बटाटेवडा, भजी असे नुसते चमचमीत खाणे तिला आवडे. लहानपणापासूनच मालाची ही आवड बघून सगळ्यांना आश्चर्य वाटे.
पण हुशार ही तितकीच. अभ्यासासाठी कधी शाळेतून तक्रार नाही. पण भांडण मारामाऱ्या मुळे सारखी शाळेतून तक्रारी.
शाळेत जायला लागल्यापासून माला आई विषयी ही प्रश्न विचारू लागली होती. काही वर्षे काहीतरी ऊत्तर देऊन काढली पण आता ती पाचवीत गेली, चांगली मोठी झाली. आता तिला काय ऊत्तर देणार? सगळ्यांना मोठा प्रश्न पडला.

चांगल्या मार्कांनी पास होऊन माला पाचवीत गेली. वर्ग बदलला. मैत्रिणी ही बदलल्या. आता परत नव्याने सगळ्यांचे आई बद्दल प्रश्न. आता माला मोठी झाली होती. पण आई बद्दल कोणी काही विचारले की तिला खूप रडू यायचे. यावेळी मात्र तिने ठरवले की काही झाले तरी आज आजी आबांना सगळं खरं सांगायला लावायचं.
ती घरी गेली आणि तशीच फुगून बसून राहिली. कपडे बदलले नाहीत की हातपाय धुतले नाही. शेवटी आबांनी खोट खोट राबवून कपडे बदलून हातपाय धुवायला लावले. पण तिने खायला स्पष्ट नकार दिला. "आज माझ्या आई बद्दल सगळं सांगितल्या शिवाय मी काहीही खाणार नाही. हं ती देवाकडे गेली हे मलाही माहिती आहे पण कशी गेली मला सोडून? माझे बाबा कुठे आहेत मला सगळंच ऐकायचे आहे. माहिती करून घ्यायचे आहे.
शेवटी संगितावहीनी तिला समजवायला लागल्या " मी सांगते तुला सगळं काही, पण तू शांत रहायचं. हट्टीपणा करायचा नाही. आणि एकीकडे मी भरवते ते जेवायचे. " संगितावहीनींनी सांगायला सुरुवात केली. " तुझी आई म्हणजे निलीमा आमची म्हणजे माझी आणि आबांची मुलगी. एकुलती एक आम्ही तिला खूप लाडाकोडात वाढवली. चांगले शिक्षण दिले. ती एकवीस वर्षांची झाल्यावर तिचे एका मुलाशी थाटामाटात लग्नही करून दिले. पण त्या मुलांबद्दल आम्हाला खरी माहिती मिळाली नव्हती. तो जुगारी आणि व्यसनी होता. तो तुझ्या आईला मारायचा. आज ना उद्या तो सुधारेल या आशेवर तुझ्या आईने आम्हांला काही सांगितले नाही. इकडे निलीमा ला दिवस राहिले आणि तुझ्या बाबांची नोकरी गेली. झाले तो सर्व राग ते निलीमावर काढू लागले. रोज दारू पिऊन यायची आणि मारायचे. तुझ्या वेळी निलीमा ला आठवा महिना चालू होता. तुझा नराधम बाप दारू पिऊन आला आणि त्याने निलीमा ला मारायला सुरुवात केली. एक लाथ निलीमाच्या पोटावर बसली आणि तिला रक्तस्राव सुरू झाला. तेव्हा तशीच कळवळत ती दवाखान्यात निघाली. शेजारच्यांनी तिला दवाखान्यात पोचवले व एका बरोबर आमच्या घरी निरोप दिला. दवाखान्यात पोचल्यावर आम्हांला सर्व समजले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. तू आमच्या हातात होतीस आणि तुझी आई शेवटच्या घटका मोजत होती. तिने फक्त तुझ्यावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच मला तुला सांभाळायला सांगितले. " एवढे सांगून माई कोसळल्या. त्यांना इतक्या वर्षांनंतरही त्या सगळ्याचा खूप त्रास झाला.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज