*बायको कसं म्हणू तुला मी* भाग- २

बायको कसं म्हणू तुला मी


* बायको कसं म्हणू तुला मी* - भाग- २

लग्नानंतर राधा सनीला घेवून सासरी गेली. तिच्या दुसऱ्या नवऱ्याचे नाव होते सूरज. सुरज राधाला ठीक सांभाळत होता पण किती केले तरी सनीचा सावत्र बापच. त्यामुळे नकळतपणे का होईना तो सनीकडे दुर्लक्षच करायचा. सनीला हवं तसं वडिलांचे प्रेम देण्यात कसर ठेवायचा. सनीची जबाबदारी स्विकारायला कानाडोळा करायचा. हे जेव्हा राधाला जाणवू लागले तेव्हा तिने रमेशला तशी कल्पना दिली. रमेशने तिला सनीला त्याच्याकडे पाठवण्याचा सल्ला दिला. मामाचाही सनीवर खुप जीव होता. तो पोटच्या पोरासारखा त्याला जीव लावायचा त्यामुळे तिने सनीला आपल्या माहेरी पाठवले.

सनी आता मामाच्या घरीच म्हणजे रमेशकडे राहू लागला. रमेशलाही एकुलती एक मुलगी होती. ती सनीपेक्षा थोडीशी लहानच, म्हणजे सनी अन् ती समवयस्करच होते. तिचे नाव होते रुपाली. इकडे मामा-मामी, सनी आणि रुपाली असे चौघेजण आनंदात एकत्र राहत होते.

सनी व रुपाली एकत्र खेळायचे- बागडायचे, शाळेत जायचे, सगळं काही एकत्रच. ते नात्याने मामे बहिण- आत्ते भाऊ असे जरी असले तरी अगदी सख्या बहिण भावासारखेच वागायचे. सनी रुपालीला सख्खी बहिणच मानत असे. बालपणापासून एकत्र वाढलेली हे दोघे बघता बघता कधी मोठी झाली हे समजलच नाही.

रुपाली आता वयात आली, तिला लग्नासाठी स्थळे शोधायची मोहिम सुरू झाली. स्थळ शोधत असतानाच एके दिवशी रमेशच्या मनात एका वेगळ्याच कल्पनेनं जागा घेतली. ती म्हणजे रुपाली ही आपली एकुलती एक मुलगी आहे. आता जर ती लग्न करुन परक्याच्या घरी गेली तर आपल्या घराला वारस कोण? कुणा परक्याच्या हाती सगळं जाणार, त्यापेक्षा जर सनी आणि रुपालीचेच लग्न लावून दिले तर घराला घरचा वारसही मिळेल, विश्वासाचं माणूसही मिळेल, अन् म्हातारपणीचा हक्काचा आधारही मिळेल.

रमेशला सनीचा स्वभाव खुप आवडायचा. सनी एक आज्ञाधारक मुलगा होता. त्यामुळे त्याने सनीलाच आपला जावई करण्याचे ठरविले. रमेशच्या मनात जे आले ते त्याने राधाला बोलून दाखवले, रुपाली ही मामाचीच मुलगी आहे लग्न करायला काही हरकत नाही हे राधालाही पटले. राधाने अन् रमेशने भोळ्या भाबड्या मनाने जो निर्णय घेतला त्याचा पुढे काय परिणाम होईल हे त्यांच्या लक्षातही आले नाही. त्या दोघांनी आपल्या मुलांच्या मनाचा विचार अन् करता फक्त पुढील भविष्याचा विचार करुन निर्णय घेतला.

हो पण लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ नसतो की जो काही वेळ मांडून मनात येईल तेव्हा मोडता येतो. लग्नानंतर पती पत्नीने एकमेकांना मनापासून स्विकारुन आपलं मानलं तरच त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुखाचा होऊ शकतो. लग्नानंतर दोन मनांचं मिलन झालं तर त्यांच्या संसारात कोणतेही संकट आले तरी ती दोघे न घाबरता त्यांचा सामना करुन एकमेकांना आधार देतात. त्यामुळेच लग्न ठरवताना मुला- मुलींच्या मनाचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो. आयुष्यभराचे नाते हे लादून चालत नसते तर ते एकमेकांच्या ओढीने जुळायला हवे असते. तरी अजूनही काही लोकं मुला-मुलीच्या मनाचा विचार न करता सौंदर्य किंवा संपत्ती याचाच विचार करुन लग्नं जुळवतात.

इथेही तेच झाले, राधाने व रमेशने आपल्या घराला विश्वासू वारस हवा, म्हातारपणीचा आधार हवा म्हणून सनीचं आणि रुपालीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं.

मनात योजिल्याप्रमाणे रमेशने रुपालीसमोर सनीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला व राधाने सनीसमोर रुपालीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. हे एेकल्यावर रुपाली व सनीलाही धक्काच बसला. ऐकताक्षणी त्यांनी लग्नास नकार दिला. त्यांना हे लग्न अजिबात मान्य नव्हते. कारण ते एकमेकांना बहिण-भाऊच समजत होते.

क्रमश:

सौ.वनिता गणेश शिंदे©️®️

🎭 Series Post

View all