फुलपाखरू

Gosht eka premachi

ती तिच्या संसारात खुश नव्हती असं अजिबात नव्हत. स्वत: च घर, पैसा अडका, जीव लावणारा नवरा, दोन लहान मुलं आणि आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या सासुबाई..आणि काय हवं.?
पण तिच्या मनात एक वेगळीच पोकळी भरून  राहिली होती, रिकामेपणाची. ती कुणालाच भरून काढणे शक्य झालं नव्हत. बऱ्याचदा आपल्याच विश्वात गुंग असायची ती, खूपसारे विचार तिच्या मनात गोंधळ घालत. मग शांतपणे काम करू लागायची ती.

'हे असे अचानकपणे आपल्याला काय होते,' हे तिलाही कळायचे नाही. तिला फक्त शांतता हवी असायची आपल्या आजूबाजूला. आता मुलांचा चिवचिवाटही सहन व्हायचा नाही.
हल्ली नवराही तिला थोडा बिचकुन असायचा आणि सासुबाईंच्या प्रश्नावर तिची चिडचिड ठरलेली असायची, त्यामुळे त्याही गप्प बसायच्या. 'आपल्याला नक्की काय हवं आहे' याचा तिने खूप विचार केला होता, पण या प्रश्नाचं उत्तर तिला मिळतच नव्हत.

एके दिवशी अचानकपणे 'तो 'तिच्या आयुष्यात आला..आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. एरवी मोजकेच बोलणारी ती, आता छान हसू -खेळू लागली होती. आनंदी राहू लागली होती, मनात आनंदाची कारंजी घेऊन.
एक निराळीच 'समाधानाची' भावना तिच्या चेहेऱ्यावर दिसू लागलेली. ती नव्याने स्वतः च्याच प्रेमात पडली आणि त्याच्याही.
हल्ली त्याच्या विचारात ती जरा जास्तच रमू लागली, आपल्या भोवतालचे वातावरण विसरून. त्याचं बोलणं तिला तासनतास ऐकत रहावं वाटायचं. त्याने केलेली चेष्टा -मस्करी तिच्या गालावर लाजेचे रंग भरायची.
आता त्याची आवड -निवड लक्षात घेऊन ती सार काही करत होती. यामुळे घरचं वातावरणही बदलून गेलं होत आणि तिच्या मनाचंही.

तिच्या अशा अचानक बदलण्याने नवरा भांबावून गेला. पण ती खुश आहे, म्हणून तोही आनंदी झाला, तिला देण्यासाठी वेळ होताच कुठे त्याच्याकडे!

कधी कधी ती स्वप्नातून बाहेर यायची..वास्तवात. "आपला नवरा, दोन मुलं यांना कळलं तर? नकोच, त्यापेक्षा या भावना आपल्या मनातच राहिलेल्या बऱ्या. उगीच भांडण, वादविवाद नकोत. बसलेल्या संसाराची घडी मोडली तर? या सामाजिक नियमांच्या चौकटीत बंदिस्त राहून जे योग्य वाटेल तेच करावं. नाही काय?"
काहीही असो, ती खुश होती, लग्नानंतरची पहिली काही वर्ष सोडली तर, जवळ जवळ दहा- बारा वर्षांनी!
"प्रेमात पडण्यासाठी वयाचे बंधन कसले? प्रेम..किती छान भावना आहे ही. 'एकाने दुसऱ्याच्या मनातील भावना ओळखून वागणे.' बस् इतकीच तिची व्याख्या होती प्रेमाची. कदाचित हेच शोधत होतो आपण इतके दिवस!

"नवरा या नावाखाली सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जातात. तो वागतो तसा नावाप्रमाणेच..'नवरा.'
मग तिथे हक्क, अधिकार, अपेक्षा आल्याचं. पण बऱ्याचदा प्रेम करायचे तो विसरून जातो आणि मग बायकोला सगळ्याच बाबतीत गृहीत धरलं जातं.

लग्नाची नवीन वर्ष जशी मागे पडतात तस एकमेकांच्या सहवासात, वागण्या, बोलण्यात अगदी सहजपणा येतो आणि प्रेम करायचे राहून जाते का? आता नव्याने स्वप्न पाहायचे वय आहे हे आपले? जीव लावणारा नवरा, दोन गोंडस मुलं असताना आपण कुणाच्या प्रेमात पडू शकतो! याचे तिला आश्चर्य वाटत होते.
"सुनबाई"..सासूबाईंच्या हाकेने ती बऱ्याच वेळाने आपल्याच विचारातून भानावर आली. "यांना आपल्या मनातल्या भावना कळल्या की काय? कावरी -बावरी झाली ती. आपण किती विचार करतो आजकाल ,याचे भानच तिला राहिले नव्हते.

तसा तो ही सांसारिकच होता. पत्नी आणि एक लहान मुलगी असलेला.

एके दिवशी त्याने तिला आपल्या मनातल्या 'भावना' सांगितल्या. त्याच्या अशा उघड -उघड सांगण्याने ती बावरून गेली आणि वास्तवात आली. "हे आपण काय करत होतो?" त्याच्या मनाचा ठाव तिला लागेना. आता ती त्याच्याशी बोलणे टाळू लागली..त्याची भेटही टाळू लागली. त्यामुळे तो नाराज झाला. तिच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे ती घाबरली.
"आपल्या मनातल्या भावना कुणाला कळल्या तर? खरं तर त्याला ही कळायला नको होत्या. हे गुपित आपल्या जवळच राहील असतं तर फार बरं झालं असतं."

आता त्यांचं नातं बदलून गेलं. तो खुलून येऊ लागला तसा खूप विचार करून तिने माघार घेतली. "मर्यादेच्या पलीकडे जाऊन मला काहीही करायचे नाही. आपलं मैत्रीचं छान नातं असावं. त्यात कुठल्याही अपेक्षा नकोत, ना कसले अधिकार,नाही हक्क. फक्त वाहवत जावं..मनाजोग. फक्त एकमेकांचे मन जपण्याचा प्रयत्न करू. मला बाकी काही नको. बोल..तयार आहेस का तू?
तिच्या बोलण्याने त्याच मन मात्र दुखावलं. पण तिच्यावर अधिकार दाखवू शकत नव्हता तो.
तो म्हणाला, "एकमेकांपासून दूर जावू कायमचेच." त्याच्या वागण्याने ती निराश झाली. त्याला विसरू शकत नव्हती ती..पण दुखावलेला तो निघून गेला होता. 'मैत्रीच्या नात्याला हळुवारपणे प्रेमाचे नाव देऊन' आणि ती मात्र बागडत राहिली..आपल्या 'भावनेच्या' बगीच्यात, 'फुलपाखरू' होऊन.