बुद्धीच्या पल्याडं

This is another rural life story. It is also describes relationship status between a boy and his mother. It shows that how any mother has conscious about their children at any situation. It is also life story of mine. Read it. Feel it. Thank you.

         तवाच्ची गोष्ट हाय. माझी पाचवीची परीक्षा संपली हुती. माझ्या शाळंला उन्हाळ्याची सुट्टी लागली आन म्या शेपूट वर करून उधाळणाऱ्या देशी खोंडागत मामाच्या गावाला उधाळलो. मला पहिल्यापास्नं कनाय मामाच्या गावाला जायाचं लई याडं. दिवाळीला जायाचं, जत्रंला जायाचं, उन्हाळ्यात जायाचं. एवढंच काय... आवं आयच्या मागं दोन दोन तास धुपाटनं लावून, तिनं मारल्यावं रडून बिडून, कोपऱ्यात बसून, परत तिनं वैतागून चल म्हणलं की रखीपुनवंच्या सणाला जायाचं, सख्खा मामा आसू निदान चुलत, सख्खा चुलत आसू निदान चुलत चुलत... समद्यांच्या लग्नाला जायाचं. 
     म्हंजी आसं बरंच इव्हेंट व्हयाचं माझं पुरवी. पर आता मामाच्याचं काय सवताच्या बी गावात  फिरायला नकु वाटतं. कारण दोन्हीकडंच्या समद्या खानदानात आम्हीचं यक बिना कामाधंद्याचं धेंडुक. हा पर आपला मित्र परिवार लय दांडगा हाय बरं का. आपुन काय अगदीचं हे म्हंजी हे न्हाय. न्हाय म्हंजी आपलं सांगून ठिवतुयं. निदान तुमच्या नजरंत आमी म्हंजी पाकंच किस झाड़ की पत्ती... आन चिंधी वगैरे !
      तर सांगायचं म्हंजी आसं का आपलं म्या मामाच्या गावाला गेलो. ह्या बारीला कारण बी जरा तगडं हुतं. माझ्या धाकट्या मामाचं लगीन ठरल्यालं. त्याज्या मुळं आता जाम मजा करायची ह्ये मनातं पक्कं केल्यालं. माझी आय बी व्हतीचं म्हणा माझ्या संग. सॉरी....म्हंजी मी व्हतो माझ्या आय संग. हा तर माझं दोन दिवसं लय म्हंजी लय सुखात गेलं तिथं. जी ती यचं, मला जवळ घ्येचं आन माझी मया करायचं. कोण पप्प्याचं घिलं तर कोण उचलूनचं घिलं आसं.
        समद्या सख्ख्या अन चुलत आज्ज्या माझ्या गालावरंन हात फिरवून त्येपल्या गालावर बोटं मोडायच्या, आयचं वडील म्हंजी भाव मला खांद्यावरंन समदं गावं फिरवायचं. दोन्ही मामं तर मागायच्या आधीचं जी पाहीजेलं ती गोष्ट मला आणून द्याचं. खायाची आसू निदान खेळायची समद्या गोष्टी हजर. थोरल्या मामी तर माझ्या आय वाणीचं माझं समदं करायच्या. मला जेवायला घालायच्या, आंघुळ घालायच्या, कपडे घालायच्या, भांग पाडायच्या. आन वरनं आवं जावं बी बोलवायच्या. बाकी समदे सोन्या म्हणायचे. फक्त मामीचं सोनू म्हणायच्या. तसा ह्यो लाड दरबारीला व्हयाचाचं पर ह्या बारीला जरा जास्तचं चालल्यालं. 
        म्हंजी मला काय समद्यांच्या प्रेमावं शंका हुती आसं काय नाय पर मला पक्की खात्री हुती ह्यांत नक्कीचं काय तरी गौडबंगाल हाय म्हणून. मग जवा मी नीट कानोसा घेतला तवा मला कळलं का ही आमच्या आयसायबांची चाल हाय. तिनं थोरल्या मामाला सांगितल्यालं की मला पवायं येत न्हाई म्हणून. आन गॉड गॉड बोलून मला नदीवं निव्हून पवायला शिकवं आसं बी. म्हंजी एकंदरीत सोन्या बळीचा बकरा हुता तर. हो हो बळीचा बकराचं. कारण मला पवायची जाम भीती वाटायची तवा. दोन तीन यळंला माझ्या पप्पांनी मला हिरीवं नेलंत बी पर पाणी बघून माझ्या पोटात गोळा यचा आन मला जाग्यावं “त्याला” लागायची. एकदा मला न सांगता हिरीवं नेलं आन मला वरंनचं पाण्यात टाकलं. तवा म्या रडून रडून पार गोंधळ करून पप्पांना म्हणलं, “ नाय नाय म्या तुमचा पोरगाचं नाय. तुमचं पिरेमचं नाय माझ्यावं. तुम्हांला मला मारायचंच हाय. ” पप्पा फकस्त हसले. तवापास्नं म्या शपथचं घेतल्याली. पवाय आल्या बगर पाण्यात म्हणून कवा उतरायचं न्हाई.
        मग एक दिस मामा माझ्याशी गॉड गॉड बोलून, रानातनं यिवं म्हणून मला नदीवं घिवून गेला. नदीच्या पल्याडं मामाचं वावार हाय ह्ये मला माहिती हुतं. कशाचं काय मागणं समदी पोरं आली. मामानं मला खांद्यावं उचलून घेतल्यालं. वाईचं नदीत शिरला आन दिलं मला कपड्या सकट नदीत टाकून. माझ्या आजूबाजूला पोरं बी आली. मोठी, बारकी, अन काय काय तर माझ्या बी वयाची हुती. निब्बार पवत हुती. आन म्या आपला गुरांगत वराडतुय,“मामा..मामा...मामा.” मामा तिकडं लांब नदीच्या दुसऱ्या काठावं. एका क्षणापुरतं मला वाटलं त्यो माझा मामा न्हाईचं. पर दहा मिनिटं गेली आन म्या आपसूक नदीच्या पाण्यावं तरंगायं लागलो. मामा म्हणला, “आता तसाच यं हिकडं. शिकलास तू पवायला.” म्या गेलो बी मस्त पवत पवत. आन तवा म्या पवायं शिकलो त्यो कायमचाचं. आयचा प्लॅन कामी आला. शेवटी आय ती आयचं आसती म्हणा. आपल्या बुद्धीच्या पल्याडं जे असतंय का न्हाई त्याला एकतर “ देव ” म्हणत्यात निदान “आई-बाप.”

------ विशाल घाडगे ©™✍️