'साप नव्हे धाकला, नवरा नव्हे आपला' - भाग २ (अंतिम भाग)

This compelling tale delves into the universal struggles faced by a woman in the intricate tapestry of married life. With authenticity and vulnerability, it explores the highs and lows, the growth, and the resilience required to navigate the labyrint

हिवाळ्याचे दिवस होते. रविवार असल्याने नवरा घरी होता.

 "आम्ही शेतावर जातो तू जेवण घेऊन ये मागून." असं सांगून सासू सासरे आणि तिचा नवरा शेतावर गेले होते.

ती पदर खोचून कामाला लागली. डाळीला फोडणी करताना तिला मळमळायला लागले. लगेच धावत बाथरूम मध्ये पळाली. भडभड उलट्या झाल्या. जीव कासावीस झाला. थोडावेळ पडून राहिली आणि अर्ध्या तासाने नाईलाजाने स्वयंपाकाला लागली. जीव हलका झाला होता, गुड न्यूज होती. तिला आनंद झाला होता. ही बातमी समजल्यावर नवरा आता तरी आनंदी होईल असे तिला वाटले खरे पण शेतावर जेवण घेऊन जायला उशीर झाला म्हणून तो तिच्यावर गेल्या गेल्याच ओरडला. चेहऱ्यावरील हसू आणि आनंद तिथेच मावळला. 

    सगळे जेवायला झाडाखाली आले. आमटीच्या वासाने तिला पुन्हा मळमळू लागले. कोरड्या उलट्या झाल्या आणि ती तिथेच झाडाखाली सावलीत लवंडली. 

"बघा, महाराणी कशा झोपा काढतायत."

सासू शांताबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. शेजारच्या रानात काम करत असलेली हौसा बोलली, 

"अगं इनामदारीन तुझी सून दोन जिवाची हाय वाटतं. आगं नातू होईल तुला बघ आता, जरा सांभाळून घे तिला आता."

त्यावर सासू बोलली, 

"व्हय का, आमी पुटुशी नव्हतो का कधी?"

असे कौतुकाचे शब्द कानावर पडल्यावर सुमा लगेच उठली. तिने नवऱ्याकडे पाहिले तर तो फक्त तिच्याकडे बघत होता. 

दिवसापासून दिवस सरत होते. डॉक्टरने तिला विश्रांती घ्यायला सांगितली होती. 

"आमाला पोरं झाली नाहीत का? पोटुशी असताना मी सगळी कामं करत होते. काम केल्यावर चांगला यायाम होतो. बाई हातापायांनं लवकर सुटते." सासू असं तत्वज्ञान सांगायची. 

मोठं पोट घेऊन ती सातव्या महिन्यापर्यंत काम करत होती. आनंद झाला होता तो फक्त तिच्या आईला, माहेरच्या माणसांना. आईला समजल्या बरोबर आई तिच्या आवडीचे पदार्थ घेऊन भेटायला आली होती. नंतर सातव्या महिन्यात ऐपतीप्रमाणे डोहाळे जेवण केले आणि ती माहेरी बाळंतपणासाठी गेली. 

 नऊ महिने भरले आणि सुमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सासरी कळवले पण सगळा आनंदी आनंदच. मुलगी झाली म्हणून सासू, नवरा नाराज होते. बातमी कळल्यावर दुसऱ्या दिवशी तिला बघायला गेले. हिरमुसलेली तोंडं घेऊन. नवऱ्याने मुलीला कुशीत घेतले. तो खूश झाला खरा, पण त्याची आई लगेच बोलली, 

"हुंडा झाला हुंडा."

सुमा निराश झाली.

तिची आई पण चरकून बोलली,

"पहिली बेटी धनाची पेटी! देवानं वट्यात जे टाकलं ते गोड मानून घ्यावं."

महिन्या मागून महिने जात होते. मुलगी मोठी होत होती. एकदा आनंद मुलीला बघायला गेला होता.

"चांगला दिवस बघून आपल्या घरी लक्ष्मीला घेऊन जा." 

सुमाची आई बोलली.

"हो मी आईला सांगतो." असे नवरा बोलला, पण त्याला त्याच्या आईने अगोदरच सांगितले होते, "पोरगी चालायला लागल्यावरच हिकडं आणायची." 

मुलगी चालू लागली आणि मगच सुमाला सासरी नेले. आता रोजच सुमाची ओढाताण व्हायची. मुलीकडे बघत काम करावे लागे. मुलीने शू, शी केली तरी सासुबाई सुमाला हाक मारत ती हातातलं काम टाकून पळत येत असे. दिवसभर काम, मुलीचं बघायच सुमा थकून जायची. एक दिवस मुलगी आजारी पडली. तिला लूजमोशन सुरू झाले होते. सुमाने रात्र जागून काढली. मुलीचं करता करता ती थकून गेली होती. सकाळी काम करण्याचे त्राण तिच्यात अजिबात राहिले नव्हते. मुलीला दवाखान्यात न्यायचे होते पण स्वयंपाक ही करायचा होता. सुमा भरभर आवरत होती आणि अचानक ती चक्कर येऊन पडली. 

"आता हिची आणि काय सोंग?" सासू बोलली. 

सुमाला आणि मुलीला दवाखान्यात नेले. सुमाची रक्ततपासणी केली. रिपोर्ट मध्ये कळले की तिचे हिमोग्लोबिन कमी झाले होते. अशक्तपणा अंगात होता त्यामुळे तिला विश्रांतीची गरज होती आणि पौष्टिक आहाराचीही. पण कसली विश्रांती आणि कसला पौष्टिक आहार! डॉक्टरने तिला रोज अंडी खायला सांगितली होती.

सासू बोलली, 

"अंडी माहेरी जाऊन खा आणि विश्रांती पण घे."

 तिची रवानगी माहेरी झाली. आता ती बिनकामाची होती...

   दिवसामागून दिवस गेले. मुलगी तीन वर्षाची झाली आणि तिला पुन्हा दिवस गेले. यावेळी मुलगा झाला होता. घरात आनंदी आनंद झाला होता. पण बाळाची आई मात्र दुर्लक्षितच होती. 

दरम्यानच्या काळात मोठी जाऊबाई वेगळे राहू लागली होती. तिच्या नवऱ्याचे बाहेर प्रताप सुरू झाले होते ते कानावर येत होते. पैसा अडका, ऐषोआराम असून खरेच जाऊबाई सुखी होती का?....

मुलं मोठी झाली पण परिस्थिती फारशी बदलली नाही. आपल्या बाबांचे वागणे मुलीच्या लक्षात येत होते. पण मुलगा आजीचा लाडका होता. तो लहान होता आणि त्याला फारसे काही कळत नव्हते. मुलगा हुशार होता पण आजीच्या आणि बाबांच्या छायेत वाढताना तो ही बाबांसारखा होऊ नये म्हणून चौथी नंतर तिने त्याला नवोदय विद्यालयात घातले होते. 

 सध्या मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे तर मुलीचे लग्न झाले आहे. मुलीला नवरा मात्र चांगला बघून दिला. ती तिच्या घरी आनंदी आहे पण तिला आपल्या आईची काळजी नेहमी वाटतेच. रोज तिचा फोन असतो. 

 सुमाच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. तेवढ्यात नवरा ओरडला, 

"आज चहा मिळणार आहे का?"

आणि ती दचकून विचार चक्रातून बाहेर आली आणि चहा बनवायला किचनमध्ये गेली. लग्नाला अठ्ठावीस वर्ष झाली तरी तिच्या नवऱ्यात काहीच बदल झाला नव्हता. पुरुषी अहंकार कुरवाळत तो मजेत होता. बायकोच्या मनाचा जरा सुध्दा विचार त्याच्या मनाला शिवला नव्हता. 

"अजून अशाच कितीतरी सुमांची कहाणी असेल."

पदराने डोळे पुसत सुमा पुटपुटली, 

"साप नव्हे धाकला नवरा नव्हे आपला, हेच खरे!"

      

 ©सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव

९/२/२०२४