"झाली का तुझी बकबक सुरू, जरा तोंड बंद ठेवत जा! जास्त कळत असल्या सारखी बोलते.”सुमाचा नवरा आनंद, सुमावर ओरडला.
ती हिरमुसली. नेहमी सारखीच, आता बोलायचे नाही अजिबात इथून पुढे. तिने कितीतरी वेळा ठरवले होते मनाशी पण प्रत्येक वेळी विसरत होती. आता मात्र 'कानाला खडा'. तिने आता निश्चयच केला पण डोळे पाण्याने डबडबले होते. डोळ्यातील पाणी लपवत, तिने डोळे हळूच पदराने पुसले; पण मनात आठवणी पिंगा घालू लागल्या.
लग्न होऊन ती या घरात आली होती. नवी नवरी साजिरी, बावरी, सुखी संसाराची स्वप्नं बघत मुली संसारात पदार्पण करतात. तशी तिची ही काही गुलाबी स्वप्न होती. लग्न ठरल्यावर ती खूप खूश होती. नवरा जवळच्या एम आय डीसीत नोकरीला होता. घरी शेतीवाडी होती. एक मोठे दीर आणि एक लग्न झालेली नणंद, हिचा नवरा आनंद धाकटा. सासू सासरे, एक छोटी पुतणी असं त्यांचं कुटुंब होतं.
लग्न झाले नव्याचे नऊ दिवस सरले आणि घरातील सर्वांचे रंग तिला हळूहळू कळू लागले. दोन महिन्यातच जाऊबाईंनी नवीन जोडप्याला वापरायला दिलेली आपली खोली परत घेतली. त्यांची गैरसोय होत होती म्हणे! स्वयंपाक घर, एक खोली आणि ओसरी असं त्यांचं छोटंसं घर. हा जोड स्वयंपाकघरात झोपू लागला. नाईलाज होता. स्वयंपाकघर म्हणून भल्या पहाटे उठावे लागे.
एक दिवस सुमा आनंदला म्हणाली,
"आपल्या पडवीत एक खोली काढुया."
त्यावर तो तिच्या अंगावर खेकसलाच,
"खोली काढणं एवढं सोपं हाय का? पाहिजे असेल तर तुझ्या बापाकडून पैसे आण की!”
ती चपापली आणि तिला राग ही आला.
ती बोलली,
"माझ्या बाबांचं नाव मधे कशाला घेता? जमत नसेल तर तसं सांगा."
त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.
"नवऱ्याला उलटून बोलतेस का?”
असं म्हणून त्याने लगेच तिच्या एक थोबाडीत दिली.
"आमच्या इनामदार घराण्यातील पुरुषांना घरातल्या बायका तोंड वर करून बोलत न्हाईत, लक्षात ठेव हे नाहीतर कानाखाली असाच जाळ निघेल परत तोंड उचकले तर."
थप्पड जोरात बसली होती. मुसमुसतच ती झोपी गेली.
सकाळी सासू शांताबाईंने तिला विचारले,
"लय धुसफूस चालली होती राती?”
ती चमकली आणि बोलली,
"न्हाय हो काय नाय, असच आपलं बोलत होतो."
मातृप्रेमी लेकाने आपल्या आईच्या कानावर सगळे घातले होते. मग काय सगळा आनंदी आनंदच.
"सुख रुततयं व्हय तुला?" तिची सासू शांताबाई बोलली.
सुमाने चकार शब्द तोंडातून काढला नाही. घरात सगळ्यांना कळले होते. मोठी जाऊबाई आपल्याच तोऱ्यात असायची. तिच्या नवऱ्याचं तिच्यासमोर काही चालत नसायचं. अगदी 'ताटा खालचं मांजर' होता तो आणि म्हणे इनामदारांच्या घरातल्या बायका तोंड वर करून बोलत नाहीत!
दिवसा मागून दिवस जात होते. सुमा शांतपणे कुणाशी फारसं न बोलता काम करायची. मनाला बजावायची 'गरीबा घरची पोर आहेस तू.' अजून दोन बहिणींची लग्नं व्हायची होती. म्हणून गप्प होती. त्यांचं कसं होणार? आणि आईला उगाच दु:ख कशाला म्हणून तिने ब्र शब्द माहेरी सांगितला नव्हता.
माहेरी गेल्यावर सगळे विचारायचे, "तुझा नवरा कसा आहे? सासू, जाऊ कशी आहे?"
ही सांगायची सगळे चांगले आहेत. कारण आई बाबा, बहिणींच्या तोंडावरचा आनंद तिला मावळू द्यायचा नव्हता.
सुमाचा शिवणक्लास झाला होता. एकदा माहेरी गेली होती तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला विचारले होते,
"शिलाई काम करायला सुरुवात केलेस का?"
सुमा बोलली,
"अगं आमची शेती पण आहे. शेती लांब नाही, घराभोवतीच आहे. मग कधीतरी शेतात पण जावं लागतं."
असं सांगून वेळ मारून नेली पण मैत्रिणीला तिच्या चेहऱ्यावरील उदास भाव दिसलेच. तिने सुमाला बोलते केले. सुमानेही मन मोकळे केले.
मैत्रीण बोलली,
"असच असतं बघ. माझ्याकडे पण थोड्याफार फरकाने तीच गत; पण तुझा नवरा मात्र जास्तच अहंकारी वाटतोय. जपून रहा. साप नव्हे धाकला, नवरा नव्हे आपला."
सुमाला तिचे बोलणे मनोमन पटले. अशी कोणतीच गोष्ट त्याने आजवर केली नव्हती, ज्यामुळे त्याच्या बद्दल तिला प्रेम, आपलेपणा वाटेल.
सुमाच्या मोठ्या जाऊबाईंचा भलताच तोरा होता. तिचा नवरा मोठ्या पदावर होता ना, त्यामुळे ती कामचुकारपणा करायची, मोठेपणा गाजवायची. लहान जावेला सुमाला तिने कधी सांभाळून घेतलेच नाही. कसं ही बोलायचं आणि काम लावायचं. ही कुणाला सांगणार. मनात म्हणायची, 'आपलंच नाणं खोटं आहे म्हणून सर्वांचं फावतं.'
अधूनमधून नणंद यायची ती पण नणंद बाईचा तोरा गाजवायची. मुळात काही झालं, थोडं खटकलं तरी तिचा नवरा बहिणीला फोन करून सांगायचा. मग काय आगीत तेल ओतलं जायचं.
एकदा जवळच्या नात्यातील लग्न होतं तर सगळे त्या लग्नाला गेले होते. ती पण गेली होती. त्या लग्नात नातेवाईकांसमोर आनंद तिच्यावर ओरडला होता. तिचे काळीज चरकले होते. हा बाहेरच्या माणसासमोर ही अपमान करू लागला होता. शांताबाईंचा चेहरा खुलला होता. तिला रागावल्यावर तिचा अपमान केल्यावर त्या खूश व्हायच्या. आईचा कुकूला बाळ आईला खूश ठेवण्यासाठी आटापिटा करायचा. आताच्या आता इथून निघून जावे असं तिला वाटलं होतं; पण काय करणार ?तेव्हापासून तिने एक मात्र मनाशी निश्चित केलं याच्याबरोबर लग्न समारंभ, इतर कार्यक्रमात आता बाहेर जायचे नाही आणि ती ते कटाक्षाने पाळत होती. पण कधीतरी जाण्याचा प्रसंग आलाच तर ती त्याच्यापासून दूर रहात होती.
एखादं मूल झाल्यावर सुधारेल ही एकमेव आशा बाळगून ती आला दिवस ढकलत होती.
क्रमशः
©® सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
०९/०२/२४