ब्रेकअप

गोष्ट ब्रेकअपची

"स्वप्नाली, असा किती दिवस विचार करत राहणार? तुझ्या बॉयफ्रेंडला म्हणावं, आता तरी लग्नाचं मनावर घे." राही आपल्या मैत्रिणीला म्हणत होती.

"हो. ग. माझं बोलणं झालं आहे. त्याच्या आई - बाबांची परवानगी मिळाली की झालं. तसंही रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहोत आम्ही." स्वप्नाली विचार करत म्हणाली.

"या बाबतीत अद्वैतशी तुझं बोलणं होऊन एक वर्ष झालं. या एका वर्षात आई - बाबांशी एकदाही बोलता आलं नाही त्याला? तुला वाईट वाटेल, पण तो तुला नुसतीच आश्वासन देतो आहे. प्रत्यक्षात तो त्याच्या आई - बाबांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न करतो की नाही ते बघच." राही.

"ए, उगीच काहीतरी बोलू नकोस. गेले तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये आहोत आम्ही. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर. समजा तशी वेळ आलीच तर मी त्याला समजून घेईन. कारण पटलं तर सरळ बाजूला होईन. त्रास होईल थोडे दिवस. पण आपल्या नशिबात प्रेम नसेल तर आपण ओढून -ताणून तरी का आणायचं?"

"बोलायला सगळं सोपं असतं. पण निस्तरायला अवघड. त्यापेक्षा यात पडूच नये. असं माझं म्हणणं. आधीच आपल्याला इतके टेन्शन्स असतात. त्यात हे ब्रेकअपचं टेन्शन नको ग बाई." राही आवरून ऑफिसला पळाली.

राहीचं बोलणं ऐकून अद्वैतला फोन करावा की नको? हा विचार करत स्वप्नाली आवरू लागली. ऐन पावसाळ्यात ट्रॅफिकमध्ये अचानक झालेली भेट ते गेल्या तीन वर्षांचं रिलेशनशिप.. तिला अद्वैतची खूप आठवण आली.
'राही म्हणते तसं ब्रेकअप तर होणार नाही ना आमचं? आणि झालंच तर माहित नाही, माझी प्रतिक्रिया कशी असेल? पण माझा अद्वैत तसा नाही. तो खूप समजूतदार आहे. मला सांभाळून घेणारा आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.
पण त्याच्या मनात काही वेगळं असेल तर? राही म्हणते तसं, तो आपल्या आई -बाबांशी अजून का बोलू शकला नसेल?'
इतक्यात तिला राहीचा फोन आला. "स्वप्ना, जास्त विचार करत बसू नकोस. आवरून ऑफिसला जा. माझं बोलणं मनावर घेऊ नको. हे व्हायचं ते होईल."

'खरंच, राही इतकं कोणी ओळखत नाही मला. माझ्या मनात काय आहे, हे तिला बरोबर कळतं. खरंच लव्ह यू यार..' स्वप्नालीने मनातल्या मनात राहीला मिठी मारली.

गेले आठ दिवस अद्वैतचा फोन आला नव्हता म्हणून स्वप्नाली काळजीत होती. तिने त्याला खूप फोन केले होते. मात्र वेळ नाही या नावाखाली तो तिला टाळत होता.


संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्वप्नाली राहीची वाट पाहत बस स्टॉपवर उभी होती. इतक्यात आईचा फोन आला.
"स्वप्ना, घरी कधी येतेस? दोन महिने होऊन गेले. तुझं येणं झालं नाही आणि मावशीने सांगितलेल्या त्या स्थळांचं काय झालं? काय उत्तर देऊ मी त्यांना?" सीमा काकू काळजीने विचारत होत्या.

"आई... हे सगळं आता बोललंच पाहिजे का?आणि एक मिनिट, राहीने तुला काय सांगितलं? म्हणून आज फोन केलास ना? नाही म्हणजे आईला आपल्या मुलीच्या मैत्रिणी फार जवळच्या असतात म्हणून म्हटलं."

"नाही अग. राहीने मला काही सांगितलं नाही. तसं सांगण्यासारखं काही होतं का? काय लपवतेस तू? ते आधी सांग. राही असेल ना तुझ्यासोबत? तिच्याकडे फोन दे आधी." आई चिडून म्हणाली.

"ती अजून यायची आहे. बरं ते जाऊ दे. मी विकेंडला येईन तेव्हा बोलू." स्वप्नालीने फोन ठेऊन दिला.

"कशी मुलगी आहे ही? हिच्या मनात काय आहे? हेच कळत नाही." आई वैतागून बाबांकडे तक्रार करत म्हणाली.

"ती इथे आली की मग बोलू. आत्ताच सगळे अंदाज काढत बसू नको." बाबांना आपल्या बायकोचा स्वभाव माहिती होता.

इकडे बराच वेळ झाला तरी राहीचा पत्ता नव्हता. स्वप्नाली तिला फोन करत होती. मात्र ती उचलत नव्हती. काही वेळातच राही घाईघाईने येताना दिसली आणि तिच्यासोबत अद्वैत होता. त्यांच्या मागून एक सुंदरशी मुलगी चालत येत होती.
'अद्वैत! आत्ता इथे?' स्वप्नाली पुढे आली.
"इतके दिवस कुठे गायब होतास? असं न सांगता कोणी जातं का? किती मिस केलं मी तुला! आणि ही कोण?"

"स्वप्ना, ही.."

"राही, तू आता काही बोलूच नकोस. तुला माहिती आहे आदू, ही सकाळी माझ्या मनात काहीबाही भरवत होती. पण तू तसा नाहीस. हो ना? तू बोललास का आई -बाबांशी? काय म्हणाले ते?"
अद्वैत सोबत असलेली मुलगी प्रश्नार्थक नजरेने स्वप्नालीकडे पाहू लागली.

"स्वप्नाली, मी आई -बाबांशी बोलू शकलो नाही. पण.. ही माझी बायको." अद्वैत त्या मुलीकडे पाहत म्हणाला.

"बायको म्हणजे? लग्न कधी झालं?" स्वप्नालीला काहीच कळेनासे झाले.

"चार दिवस झाले. मी सांगणार होतो तुला. पण सगळं इतक्या झटपट झालं की वेळच मिळाला नाही." अद्वैत खाली मान घालून म्हणाला.

"काय? तू असं कसं करू शकतोस? तुझं माझ्यावर प्रेम होतं ना? तू आपल्याबद्दल आई - बाबांशी बोलणार होतास ना?" स्वप्नालीचे डोळे पाण्याने भरून आले.

"हळू बोल. तिला ऐकू जाईल. आत्ताच लग्न झालंय आमचं." अद्वैत खालच्या आवाजात म्हणाला.

"तू फसवलंस मला! तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. इतके दिवस टाईमपास केलास ना?
ए, इकडे ये. हा तुझा नवरा आहे ना, तो विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही. त्याचं माझ्यावर प्रेम होतं. त्याने तुझ्याशी लग्न केलंच कसं?" स्वप्नाली त्या मुलीचा हात धरून म्हणाली.

"अद्वैत, काय बोलते ही? मला काहीच माहिती नाही यातलं.." ती मुलगी रागाने लालबुंद होत म्हणाली.

"माझं अफेअर आहे, असं कोणी लग्न करताना आपल्या बायकोला सांगेल? त्याने तुलाही फसवलं आणि स्वप्नालीला सुद्धा. मी हेच म्हणत होते. आता कळलं का?
अद्वैत, आई -बाबांच्या सांगण्यानुसार लग्न केलंस ना? त्यांना स्वप्नालीबद्दल सांगायला हिंमत नव्हती का तुझ्यात?" राही त्याची कॉलर पकडून म्हणाली.

"सॉरी, नाईलाज होता माझा. पण हे बघा, रस्त्यात तमाशा नको. कुठेतरी बसून बोलू." अद्वैत आपल्या बायकोकडे पाहत म्हणाला. हळूच त्याने आपली कॉलर सोडवून घेतली.

"जे काय असेल ते इथेच होईल. निवांत बसून बोलायला आम्हाला वेळ नाही." राही.

"हे काय चाललंय? अद्वैत, हे सगळं असं होतं तर मला बोलला का नाही?" ती मुलगी अजूनही रागातच होती.

"तू थांब जरा. स्वप्नाली, माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि आता मला माझ्या बायकोशी प्रामाणिक राहायचं आहे." अद्वैत हळू आवाजात तिची नजर चोरत म्हणाला.

"मग इतके दिवस आपल्यात काय होतं?" आता स्वप्नालीचा बांध तुटू पाहत होता.

"ते मला माहित नाही."

अद्वैतच्या या वाक्यावर स्वप्नालीने त्याला एक जोरदार थप्पड लगावली.

"सॉरी, स्वप्ना. रियली सॉरी." अद्वैत पुन्हा मान खाली घालून म्हणाला.

"या सॉरीचा अर्थ कळतो तुला? म्हणजे याचंही स्वप्नालीवर प्रेम होतं." राही त्याच्या बायकोकडे पाहत म्हणाली.
राहीने टॅक्सी थांबवली आणि स्वप्नालीला ओढत नेत ती अद्वैतच्या बायकोकडे वळून म्हणाली, "जा आता तुम्ही दोघे. झाला तेवढा तमाशा पुरे झाला आणि अद्वैत, पुन्हा माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात डोकावण्याचा सुध्दा प्रयत्न करू नकोस."

"मला कुठेही यायचं नाही. मला अद्वैतशी बोलायचं आहे ग." स्वप्नाली राहीचा हात सोडवत म्हणाली.

"नसता मूर्खपणा करू नको. आता सगळं संपलंय. त्याची बायको त्याला चांगलचं बघून घेईल. तू तुझ्या बाजूने विषय संपव. हे तितकं सोपं नाही, मला माहिती आहे. पण आपण ठरवलं तर सगळं सोपं आहे. मी आहे ना? तू नको काळजी करू." हे ऐकून स्वप्नाली राहीला बिलगली.
"माझी काय चूक होती? असं का करावं त्याने? मनापासून प्रेम केलं मी त्याच्यावर. विश्वास ठेवला आणि तो मात्र एका क्षणात सगळं विसरून निघून गेला. त्याला विसरणं इतकं सोपं नाही ग." स्वप्नाली खूप रडली. अगदी मन मोकळं होईपर्यंत.

"तो तुझ्यापासून दूर गेला खरा. मात्र याची सल कायम त्याच्या मनात कायम राहील. जे आपलं नाही, ते आपल्यापासून दूर जाणारच. पण आता तू तुझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळी आहेस. नशिबात नसलेलं प्रेम ओढून -ताणून आणता येत नाही. तूच म्हणाली होतीस ना?" राही आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली.
"त्याने आपल्या आई -बाबांचा विचार केला आणि लग्न केलं. तसंच तूही आपल्या आई -बाबांचा विचार करून कुठलाही वेडा विचार मनात आणू नको. शेवटी'ब्रेकअपही' सेलिब्रेट करता आलं पाहिजे. त्यालाच तर लाईफ म्हणतात! आणि
मला आपली मैत्री आयुष्यभरासाठी हवी आहे. प्रेम म्हणजे अख्खं आयुष्य नव्हे ग. ते तू आपल्या माणसांवरही करू शकतेस." राही स्वप्नालीला जवळ घेत म्हणाली.

इतक्यात राहीचा फोन वाजला.
"अग, कधीचा फोन करते आहे मी! दोघीही फोन उचलत नव्हता. काळजी वाटते ग. बरं, सुट्टीला येताना तूही ये स्वप्नासोबत. हेच सांगायला फोन करत होते." सीमा काकू गडबडीने म्हणाल्या.

"हो. नक्की येईन आणि काकू तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्या मुलीला सावरायला मी आहे ना! लवकरच ठीक होईल ती." राही विश्वासाने स्वप्नालीकडे पाहत म्हणाली.

"राही काय बोलतेस? काही कळत नाही. काही झालंय का?" सीमा काकू काळजीने म्हणाल्या.

"काही नाही. ते आपलं असंच.."

स्वप्नाली आपल्या मैत्रिणीकडे नुसतीच पाहत राहिली. परिस्थिती कशीही असो, आपले कधीच साथ सोडत नाहीत. तिने आपल्या मनाशी पक्कं केलं, या साऱ्यातून लवकर बाहेर पडायचं. अगदी कोणालाही न दुखवता. तिला राहीचं वाक्य आठवत राहिलं, ब्रेकअपही सेलिब्रेट करता यायला पाहिजे. यालाच तर लाईफ म्हणतात!

©️Sayalij.