वीर पत्नी अंतीम भाग

Story Of A Brave Soldiers Wife


रामने तिची समजूत काढली आणि तो रवाना झाला. सीमेवरच्या धुमश्चक्रीत, बंदुकींच्या गोळ्यांच्या वर्षावात, बॉम्ब गोळ्यांच्या कानठळ्या वाजवणार्या आवाजात रामला जानकीचे ते गर्भारपणाचे तेज असलेले आणि डोळ्यातले आतुरता आणि ओढ अडवलेले रूप आठवत राही. इकडे जानकी मात्र रोज देव्हार्यात रामच्या दीर्घायुष्यासाठी दिवा लावून देवाला साकडं घाली.

आणि एक दिवशी जवळपास चार एक महिन्याने रामच्या शहीद होण्याची बातमी रामच्या घरी आली.


जानकीच्या डोळ्यातून ना अश्रू येत होते, ना कंठातून एकही हुंदका फुटत होता. रामच्या फोटोला छातीशी धरून ती शून्यात नजर लावून कुठेतरी हरवली होती, तर शांता आत्या त्या बातमीने आतून पुरती तुटली होती. शांत आत्या अगदी धायमोकलुन रडत होती.

रामच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी शांता आत्याच्या घराबाहेर मोठा जनसागर जमला होता. त्या दिवशी त्या गावात एकही चूल पेटली नव्हती, एकही दुकान उघडलं नव्हतं, शाळा, दवाखाने सगळच बंद होतं. बाया-माणसं, म्हातारी वृद्ध मंडळी, लहान मुलं, अगदी झाडून सारे रामच्या अंत्यदर्शनाला हजर होते. रामच्या शेवपेटीवरचा तिरंगा आर्मीच्या जवानांनी शांता आत्याला दिला.

जानकीला सावरत तिची आई तिला, रामच्या जवळ घेऊन गेली. त्यावेळी जानकीने रामचा निष्प्राण हात आपल्या पाच महिन्याच्या गर्भातल्या बाळावरून फिरवला आणि…..


जानकी - "तुम्ही मला वचन दिलं होतं की, सीमेवरून तुम्ही सही सलामत परत याल,  आणि आता हे असे तिरंग्यात लपेटून शांतपणे का झोपले आहात तुम्ही? तुम्ही काहीही बोलणार नाही हे मला माहिती आहे, तरीही, मी तुम्हाला वचन देते की, मी आणि आपलं बाळ देशसेवेसाठी स्वताःला समर्पित करु. देशासाठी तुमच्यासारखाच प्राण्याचं बलिदान देऊ."

रामची वर्दी आपल्या छातीशी कवटाळून, रामच्या पार्थिवाच्या बाजूला बसून जानकीने स्वतःच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

जानकीच्या हृदय हेलावणाऱ्या आर्त आक्रोशाने उपस्थित सर्व जनसमुदायाला स्वतःचे अश्रू आवरणे कठीण झाले होते.


गावच्या नदीकाठावर शहीद रामला मुखाग्नी देण्यात आला.


योग्य वेळी जानकी बाळंत झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला.

तिचा मुलगा दीड वर्षाचा झाल्यावर, जानकीने सर्विस सिलेक्शन बोर्ड (एस. एस बी.) ची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर लष्करी अधिकाऱ्यांच्या अकादमीत 49 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षणही पूर्ण केलं. कॉमेट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये आधुनिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम प्रणाली अंतर्गत उड्डाणाचे धडे घेतले. दीक्षांत सोहळ्यात \"आर. पी.ए.ए. एस. विंग प्रदान करून जानकीला गौरवण्यात आले.

*********************************************

भारतीय सेनेच्या बिहार रेजिमेंटच्या सातव्या बटालियनचे मेजर प्रसाद महाडिक हे कर्तव्य बजावताना शहीद झाले होते त्यांच्या शौर्यापासून प्रेरणा घेत वीर पत्नी गौरी महाडिक यांनीही भारतीय सैन्य दलात जाण्याचा निश्चय करत तो पूर्ण केला.


अरुणाचल प्रदेशच्या तवांग मधील भारत चीन सीमेवरील \"आसाम हील\" येथे टँक तपासणी करताना झालेल्या स्फोटात मेजर प्रसाद महाडिक यांना वीरमरण आले होते. यानंतर वीरपत्नी गौरी महाडिक यांनी भारतीय सैन्यात भरती होऊन शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यांनी चेन्नईच्या अकादमी प्रशिक्षण घेतले, जेथे त्यांच्या पतीने प्रसाद महाडिक यांनी प्रशिक्षण घेतले होते.

मार्च 2020 साली त्या लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या. आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.

समाप्त.


©® राखी भावसार भांडेकर.

फोटो साभार गूगल.



🎭 Series Post

View all