वीर पत्नी भाग दोन

Story Of A Brave Soldiers Wife


बारावी झाल्यावर त्याने जानकीला दिलेल्या लाल गुलाबाचे फुल तीनं, स्वतःच्या पुस्तकात अजूनही जपून ठेवलं होतं. एकंदरीतच रामच जानकीवर हक्क गाजवणे जानकीलाही आवडत होतं.


बालपणीच्या आठवणींमध्ये रमताना जानकीला तो प्रसंग आठवला……


डीग्गर खेळताना एकदा जानकीचा पायाचा अंगठा फुटला आणि रक्ताची धार लागली, तेव्हा रामनं तिला अगदी दोन्ही हातात उचलून घरी आणलं होतं. अशा एक ना अनेक आठवणी जानकीच्या मनात गोड रुंजी घालत होत्या. रामच्या नावानेच तिच्या अंगावर रोमांच उठत होते.

साक्षगंधाच्यावेळी अंगठी घालताना रामने तिचं बोट अलगद दाबलं आणि रामचा तो ओझरता स्पर्श तिला मनात परत आठवावासा वाटत होता.

दोन्ही घरी लग्नाचे विधी सुरू झाले. लग्नाचे मुहूर्त, कुळाचार, देवीचा गोंधळ, हळद, मेहंदी सगळे कार्यक्रम अगदी निर्विघ्न  पार पडले. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी जानकी अगदी गोंधळून गेली होती.

लग्नाचा दिवस उजाडला. हॉलवर सर्वत्र फुलांच्या माळा लावल्या होत्या. रोषणाई केली होती. शहनाईच्या मंद स्वर लहरी वातावरणात उत्साह पेरत होत्या. मंगल संगीत वाजत होतं. प्रवेशद्वारावर सुवासिनी पाहुण्यांचं हळदी-कुंकू लावून, अत्तराने स्वागत करत होत्या. लाल, पिवळ्या, हिरव्या अक्षदा वऱ्हाडाला देत होत्या. तिकडे मात्र जानकीच्या आईची नुसती उलघाल होत होती.

लग्न लागले, कन्यादान झाले, त्यावेळी मात्र आई-बाबा-लेक तिघांच्याही डोळ्यात पाणी तराळले. तिच्या बाबांनी जावयाला हात जोडून,
"माझ्या मुलीला सांभाळून घ्या अशी विनंती केली." रामने ती नम्रपणे मान्य केली. पाठवणीच्या वेळी मात्र तिचा आणि तिच्या आईचा अश्रूंचा बांध फुटला.

सासरी कौतुकाचे, आनंदाचे, शुभ-शकुनाचे माप ओलांडून जानकी आणि रामच्या संसार ची पहिली रात्र आली.

राम-जानकी दोघे एकमेकांना केवळ अनिमीश-आतुर नजरेने एक टक बघत होते. शब्द मौन झाले होते आणि हाव-भावातून एकमेकांच्या भावना व्यक्त करणे आणि समजून घेणं सुरू होतं. त्या धुंद रात्री ते नवपरिणीत दाम्पत्य एकमेकांत कधी विरघळलं ते रात्रीच्या चांदण्यांना आणि अंगणातल्या मधुमालती आणि रातराणीलाही कळले नाही.

दुसऱ्या दिवशी कुलदेवतेच्या दर्शना करिता राम जानकी तयार झाले. त्या दोघांचा जोडा अगदी शोभून दिसत होता. नात्यातल्या बाया दोघांचीही हातानीच नजर काढून, दोन्ही हात कानाजवळ दुमडत होत्या.

लग्नानंतरच्या त्या मंतरलेल्या रात्री होत्या. राम जानकीच्या कुशीत डोकं ठेवून बालपणीच्या आठवणीत रमून जाई, तर जानकी मांडीवरच्या त्याच्या केसात अलगद आपली बोटं फिरवत राही.

लग्नानंतरचे रामचे सुट्टीचे दोन महिने कसे संपले ते दोघांनाही कळलच नाही आणि रामला सीमेवर जाण्याचे बोलावणे आले. जानकीच्या चेहऱ्यावर मातृत्वाचे तेज आलं होतं आणि डोळ्यात रामच्या विरहाचे अश्रू.



राम -"हे काय जानू मी तिकडे सीमेवर जातो आहे आणि तुझ्या डोळ्यात पाणी? अगं तू एक वीर पत्नी आहेस तुझ्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य मला तिथे शत्रूंशी लढायला दहा हत्तीच बळ देईल! तू माझा आधार आहेस, तू माझी प्रेरणा आहेस. चल पटकन एक गोड स्मित कर बरं!"

जानकी -"अहो आपल्या लग्नाला आता कुठे केवळ दोन-सव्वा दोन महिने होत आहे. आपल्या संसाराच्या वेलीवर आता एक सुंदर फुल उमलणार आहे आणि अशात तुम्ही तिकडे सीमेवर शत्रूंशी लढायला जात आहात, मला धीर होत नाही आहे. फार काळजी लागून राहिली आहे."



राम -"अग तू वेडी आहेस का? तुझं प्रेम मला शत्रूच्या गोटातूनही, त्यांच्या बंदुकीच्या गोळ्यातूनही सही सलामत तुझ्याजवळ घेऊन येईल. तू फक्त हिम्मत दाखव आणि आपल्या बाळ आहे ना तुझ्याजवळ! स्वतःची काळजी घे, आणि बाळाची पण! आईकडे लक्ष दे. येतो मी."