बॉस?

कथा एका स्त्रीची आणि तिच्या बॉसची

बॉस??



"या आत या.." अजयने पुढच्या उमेदवाराला बोलावले.. ती आत आली आणि तो बघतच राहिला..

पंचवीस ते तीसच्या मधले वय.. चेहर्‍यावर गोडवा.. खांद्यावर रूळणारे काळेभोर केस.. हात आणि चेहरा सोडला तर शरीराचा कोणताही अवयव न दिसणारे कपडे.. खटकणारी एकच गोष्ट.. गळ्यातले मंगळसूत्र.. 

" या बसा ना.."

" थॅंक यू सर.." तो गोड आवाज.. त्याने डोळे बंद करून घेतले..

" सर.. तुम्हाला बरे वाटत नाही का?"

" नाही.. मी बरा आहे.. रजनी ना तुमचे नाव?" त्याने समोरच्या कागदपत्रांकडे नजर टाकत मिसेस बोलणे टाळले.. पण तिने नाही..

" हो सर.. मी मिसेस रजनी सुभाष.."

"ओके.. तुमच्या बायोडेटा बघून तरी तुम्ही या पोस्टसाठी फिट बसता असे वाटते.. होप तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल.."

" हो सर.. नक्की मी पूर्ण प्रयत्न करीन.."

" मग हा जॉब तुम्हाला मिळालाच असे समजा.."

" थॅंक यू सो मच सर.."

" सर नका म्हणू.. मला अजयच म्हणा."

" सर राग येऊ देऊ नका. पण मला नावाने हाक मारायला नाही जमणार.. कुठे तरी वयाचा आणि अधिकाराचा प्रश्न येतोच ना? निघू मग मी सर?"

" हो.. बाहेर रिसेप्शनमध्ये थांबा.. तुमचे पेपर्स तयार झाले कि सही करून निघा.." अजय हात मिळवायला जायच्या आधीच रजनीने हात जोडले आणि ती तिथून निघाली..

"वय आणि अधिकार.. माय फूट.. पन्नाशीला आलो असलो तरी दिसतो ना चाळीशीचा.. वय?" स्वतःच्या डाय केलेल्या केसातून हात फिरवत अजय स्वतःशीच पुटपुटला.. "काही दिवसातच स्वतःहून येशील माझ्यासोबत फिरायला.."

     इथे रजनी सगळे पेपर्स घेऊन ऑफिसच्या खाली आली.. तिथे तिचा नवरा सुभाष तिची वाट पहात होता.

" खूप उशीर झाला का रे मला?"

" नाही.. आम्ही आत्ताच आलो.. हो कि नाही रे यश?"

" हो आई.. बाबांनी मला ना समुद्रावर नेले होते.. त्या लाटा मस्त अंगावर येत होत्या.. आम्ही खूप मजा केली.."

" अरे व्वा.. आईला सोडून गेलात ना एकटे एकटे.. आता आई चिडली.."

" नको ना चिडूस ग.. आणि आता मला भूक लागली आहे.. बाबा म्हणाले आई येईल मगच हॉटेलमध्ये जाऊ.." यश मुद्दाम केविलवाणा चेहरा करत म्हणाला..

" गुलाम.. आईचा राग कसा काढायचा तुला चांगले माहित आहे.. चला जाऊया.." रजनी यशचा गालगुच्चा घेत म्हणाली..

"हो.. पण त्या आधी मुलाखतीचे काय झाले ते तर सांग?" सुभाषने विचारले.

" मला मिळाली नोकरी.." रजनीचा आवाज उत्साही वाटत नव्हता.. सुभाषच्या ते लक्षात आले.. पण हि काही बोलायची जागा नव्हती..

" अरे व्वा..मग आपण आता हॉटेलमध्ये जाऊ.. मस्त पार्टी करू आता काय बाबा तुझी आई कामाला जाणार.. या गरिबाकडे लक्ष द्याल ना मॅडम?" तो मस्करी करत म्हणाला.. ते पाहून रजनीला हसायला यायला लागले.. ती बाईकवर बसायला गेली..

 बसताना त्याच्या झालेल्या स्पर्शाने मोहरली.. रजनी ऑफिसमधून बाहेर पडल्यापासून तिचा पाठलाग करणारा अजय हे बघत होता आणि अकारणच जळफळत होता.. सुभाष, रजनी दोघे घरी आले.. दमलेला यश पटकन झोपला.. रजनीही सुभाष शेजारी जाऊन पहुडली.. तिच्या डोक्यावरून हात फिरवत सुभाषने विचारले..

 " सांग आता काय झाले ते?"

" तुला काय माहीत?"

" आपल्या लग्नाला ना सात वर्षे झाली. एवढ्या वर्षात तुझे मन थोडे तरी वाचायला शिकलो आहे.. पटकन सांग काय झाले ते? ऑफिस चांगले नाही का? पगाराचा प्रॉब्लेम आहे का?"

"कसे सांगू समजत नाहीये.. तू हसशील मला.. तुला वाटेल माझ्या मनाचे खेळ आहेत हे?" 

सुभाष उठला.. त्याने रजनीचे हात हातात घेतले.. 

"एवढाही विश्वास नाही माझ्यावर?"

" तसे नाहीये.. बरं ऐक.. आज जिथे गेले होते ना तो बॉस मला चांगला नाही वाटला.."

" म्हणजे?"

" त्याची नजर, त्याची बोलण्याची पद्धत.. बाईला न पटकन आपल्याकडे कोण कोणत्या नजरेने बघते हे लगेच कळते.. तो माणूसच मला नाही पटला.." रजनी उद्वेगाने सांगत होती..

" खूप तरूण, हँडसम आहे का तो?"

" तरूण कसला? पन्नासच्या आसपास आहे म्हणे.. त्या रिसेप्शनीस्टने बोलता बोलता सांगितले.." ते ऐकून सुभाष हसायला लागला..

 " अग तू त्या माणसाला काय घाबरतेस? "

" हसलास? म्हणून तुला सांगत नव्हते. तो बाबांच्या वयाच्या आसपास आहे.. पण तरिही विचित्रच बघत होता.."

" रजनी चिडू नकोस.. बघ जबरदस्ती नाही.. आपल्याला पैशांची एवढी पण गरज नाही.. तू तिथे कंफर्टेबल नसशील तर हि नोकरी नको करूस.. आपण थांबूया.. दुसरीकडे चांगली संधी मिळाली तर बघ.."

" पण कंपनी, पगार इथे सगळच चांगलं आहे रे.. माझे ना डोकेच चालेनासे झाले बघ.."

" मग तुझे तू ठरव.. तुला दुसरीकडे कामाला जायचे असेल तरी मला चालेल.. आणि जर त्या माणसाला काही समज द्यायची असेल ते ही मला चालेल.."

" नको असा आततायीपणा करायला.. थोडे थांबून निर्णय घेते.."

" तुझी इच्छा.."

काही दिवसातच रजनीचे ऑफिस सुरू झाले.. सकाळी यशला पाळणाघरात सोडून ती ऑफिसला जाऊ लागली.. तिथून तो परस्पर शाळेत जायचा.. येताना सुभाष घरी घेऊन यायचा.. सगळे घर सेट झाले होते. ऑफिस पण चांगलेच होते. आवडीचे काम करायला मिळाल्यामुळे रजनी पण आनंदात होती.. अडचण फक्त एकच होती अजयची.. येताजाता तो तिच्या आसपास घुटमळत असायचा.. ती त्याला टाळायचा फार प्रयत्न करायची पण तरिही तो संधी साधून तिच्यासमोर यायचाच.. मग नाईलाजाने तिलाही त्याच्याशी बोलावे लागे..

" रजनी बाहेर छान पाऊस पडतो आहे. चल जाऊन कॉफी घेऊयात.."

" नाही सर.. माझ्याकडे आता भरपूर काम आहे.. आणि मला ते आजच्या आज पूर्ण करून द्यायचेच आहे.. "

"अच्छा.. मग हि कॉफी उधार राहिली बरं.." हे संवाद नेहमीच होत रहायचे..

दिवस जात होते.. रजनी कामात छान रूळली होती. ती अजिबात अजयला दाद देत नव्हती. तो ही तिचा पिछा सोडत नव्हता ना मर्यादेच्या बाहेर जाऊन काही वागत होता.. एक दिवस न राहवून रजनीने रिसेप्शनीस्टला श्रुतीला विचारले..

" श्रुती, सरांच्या घरी कोणी नाही का ग? सतत बाहेर दिसतात.."

"अग.. बरी आहेस ना? तू सरांची बायको पाहिली नाहीस अजून.. कसली सुंदर आहे.. आणि कॉलेजला जाणारा मुलगाही आहे.."

" मग तरिही?" रजनीला पुढे बोलू कि नाही कळत नव्हते..

" तरिही ते असे बायकांच्या पाठी का लागतात हेच ना?"

रजनीला काय बोलावे सुचत नव्हते..

"अग घरात पंचपक्वान्न असले तरी बाहेर शेण खाणारी माणसे हि.. काय बोलायचे त्यांना.. एवढी सोज्वळ बायको आहे त्याची तरीही हा माणूस असा वागतो.. मला तर कधी कधी त्या माऊलीचीच दया येते.. तू बघशील त्यांना.. आपल्या ऑफिसचे गेटटुगेदर आहे पुढच्या महिन्यात.. आपल्या कुटुंबाला ऑफिस मध्ये हक्काने घेऊन यायचा एक दिवस.. तेव्हा त्यांचे डोळे बघ.. सतत एक वेदना असते.."


हे बोलणे ऐकून रजनीच्या मनात त्या न बघितलेल्या स्त्रीबद्दल दया निर्माण झाली.. पुढील भागात पाहू रजनी या सगळ्यातून कसा मार्ग काढते ते..


कथा कशी वाटली नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर दादर मुंबई

🎭 Series Post

View all