बॉस?? भाग २

कथा एका स्त्रीची आणि तिच्या बॉसची

बॉस?? भाग २



"रजनी, थोडे काम आहे. जरा केबीनमध्ये ये.." अजयने रजनीला जवळपास आज्ञाच दिली.. 

" दोन मिनिटात हातातले काम संपवते आणि येते सर.." रजनी उत्तरली..

अजय केबिनमध्ये गेला आहे हे पाहून तिने श्रुतीला फोन केला..

"श्रुती.. सरांनी मला बोलावले आहे.. दहा मिनिटांनी प्लिज अर्जंट काम आहे असा फोन करशील?"

" हो करेन.. पण जरा जपून.. तो माणूस स्वतःला झळ बसू देत नाही अजिबात.. इथले सगळे नियम तो कोळून प्यायला आहे.. तू नवीन आहेस म्हणून तुला सांगते.."

"मग मॅनेजमेंट त्यांच्याविरुद्ध काही कारवाई नाही का करत?"

" पहिली गोष्ट तो चारित्र्याने कसाही असला तरी कर्मचारी म्हणून तो उत्तम आहे.. त्यामुळे मॅनेजमेंटला त्याला गमवायचे नाहीये.. दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून पर्यंत त्यांच्याविरुद्ध एकही तक्रार गेली नाही.. मग कारवाई होणार तरी कशी? त्याच्या हाताखालच्या बर्‍याचशा मुली ऑफिस सोडून जातात. पुढे इतर ठिकाणी काही त्रास होऊ नये म्हणून बेटर अपॉर्च्युनिटीसाठी काम सोडले असे सांगतात.."

" ठिक आहे.. चल बघते मी.." रजनी विचार करत म्हणाली..

" सर आत येऊ?" रजनीने विचारले..

" तोच मंजुळ आवाज.." अजय स्वतःशीच हसला..

"अग ये ना.. तुझीच केबिन समज.. बस.."

" सर काही काम होते का?"

" तू काय फक्त कामापुरतीच बोलणार का माझ्याशी?"

" सर ऑफिसमध्ये आपण काम करायलाच येतो ना?"

" ते आहेच ग.. पण त्यापलिकडे जाऊन मैत्रीही होऊ शकते ना?"

"म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचे आहे सर?" रजनीने सर या शब्दावर जोर देत म्हटले..

" तसे काही नाही ग.. इतके दिवस झाले तू इथे कामाला लागून आपल्याला एकमेकांविषयी जास्त काहीच माहित नाही.. म्हणून म्हटले एकदा बसून बोलूयात.. तू तर कॉफीसाठी सुद्धा येत नाहीस.."

" त्याचे काय आहे सर.. माझा नवरा ना खूप संशयी आहे.. त्याला मी कोणाशी बोललेलेही आवडत नाही. कॉफी दूरच राहिली.." रजनीने अजयपासून सुटका करून घेण्यासाठी टेप मारली..

" असे आहे तर.." अजय विचारात पडला.. "आपण एक काम करूया का? माझे एक फार्महाऊस आहे.. तिथे जाऊया का? छान लॉंगड्राईव्ह पण होईल.. आणि इथल्यापेक्षा जास्त तिथे मनमोकळेपणाने बोलता पण येईल.."

रजनीला पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटले.. तो पुढे काही बोलणार इतक्यात रजनीचा फोन वाजला.. तिला हायसे वाटले..पण फोन श्रुतीचा नव्हता तर पाळणाघरातून आला होता..

"हॅलो रजनीताई.."

" हो बोला ताई.."

" अहो, यशला ताप चढला आहे.. मी काही त्याला शाळेत पाठवले नाही. तुम्हाला जमेल का यायला कारण बाकीची मुलेही आहेतच इथे.."

" हो.. मी निघते लगेच.." रजनीने फोन ठेवला.. अजय जरा वैतागूनच तिच्याकडे बघत होता.. तिचे फोनवरचे एकतर्फी संभाषण ऐकत होता..

" सर माझ्या मुलाला बरे नाहीये.. मला गेलच पाहिजे. चालेल ना."

"हो जा ना.. मी गाडीतून सोडू का?" अजय मनाचा मोठेपणा दाखवत म्हणाला..

" नाही मी जाते टॅक्सीने.."

" सांभाळून जा. आणि ते फार्महाऊसवर जाण्याचा नक्की विचार कर.." रजनी आता कोणतीच प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हती.. ती आपल्या डेस्कजवळ आली.. पटापट सामान भरले.. निघताना श्रुतीला सांगून निघाली.. पाळणाघरात पोचेपर्यंत तिचा जीव खालीवर होत होता.. "सकाळी तर यश बरा होता.. अचानक काय झाले?" तिच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली होती.. ती यशला घेऊन तशीच डॉक्टर कडे गेली.. व्हायरल इन्फेक्शन मुळे ताप आला आहे.. पण थोडी काळजी घ्यायला हवी असे सांगितल्यावर तिने लगेच अजयकडे सुट्टीसाठी अर्ज केला..

" रजनी, अग एवढी सुट्टी?"

" सर माझा मुलगा माझ्याशिवाय राहू शकत नाहीये.. त्याला सध्या गरज आहे माझी.. आणि कामाला सुरुवात केल्यापासून मी एकदाही सुट्टी घेतली नाही.. माझ्याकडे आहेत त्याच सुट्ट्या मी मागते आहे.." 

" हो.. पण..."

" पण काय सर?"

" काही नाही.. घे तू सुट्टी.. पण तुझे काम नंतर तुला जास्त वेळ बसून पूर्ण करावे लागेल.."

" सर मी काही फाईल्स घरी आणून काम केले तर चालणार आहे, असे मोठे सर म्हणाले आहेत. तुम्हाला चालेल ना?"

" तू त्यांना का फोन केलास?" अजयने चिडून विचारले..

"सर मी त्यांना फोन नाही केला.. त्यांचा मला आला होता.. श्रुतीने त्यांना माझ्या मुलाबद्दल सांगितले म्हणून.."

" अस.. मी काय बोलणार मग.. दोन दिवसांनी ऑफिसचे गेटटुगेदर आहे.. त्याला तरी येणार का तू?"

" हो.. ते चुकवून कसे चालेल?" रजनी म्हणाली.. ते दोन दिवस रजनीने खूप विचार करण्यात घालवले.. ती श्रुतीशी बोलली.. आणि ती एका निर्णयावर आली.. 

      गेटटुगेदरच्या दिवशी रजनी एकटीच ऑफिसला निघाली.. यशला अजूनही तेवढे बरे वाटत नव्हते म्हणून सुभाष त्याच्याजवळ थांबणार होता.. रजनीने आज कधी नव्हे ते हलकासा मेकअप केला होता.. एक छानशी डिझायनर साडी नेसली होती..

" तू अशी जाणार आहेस ऑफिसला?" सुभाषने आश्चर्याने विचारले..

"का? वाईट दिसते आहे का?" रजनीने आरशात पाहून विचारले..

" अग.. तुला बघून मला तुला सोडावेसे वाटत नाही.. त्या म्हातार्‍याचे काय होईल? हा विचार करतो आहे.." सुभाष हसत म्हणाला..

"सुभाष प्लीज.. मला अजिबात आवडत नाही.. त्याच्यावरून चिडवलेले.. आणि आज ऑफिसमधली सगळी माणसे असणार आहेत.. मग त्याच्यासाठी मी काय अजागळासारखी जाऊ?"

" नाही ग राणी.. मी फक्त मस्करी करत होतो.. तू जा.. आणि काही गरज लागली तर फोन कर तसा.." सुभाष गंभीर होत बोलला..

" तुला माझा निर्णय पटतो आहे ना?" रजनीने विचारले.

" मी नेहमीच तुझ्यासोबत आहे.."

रजनीने आत्मविश्वासाने ऑफिसमध्ये पाऊल ठेवले.. नेहमी साध्या येणाऱ्या रजनीकडे आज सगळेच वळून वळून बघत होते.. रजनीने श्रुतीला शोधून काढले..

" माय गॉड.. कसली दिसते आहेस तू?" श्रुती म्हणाली..

" काही केले नाहीये.. फक्त साडी नेसली आहे.. ते सोड.. तू माझे काम केलेस?"

" आज तरी कामाचा विषय सोडून दे.." रजनीने पाठी वळून पाहिले.. अजय हसत तिथे उभा होता.. "आज गेटटुगेदर आहे.. फॅमिली, मित्रांशी ओळख वाढवायचा दिवस.. आणि तू रुक्ष कामाचे काय घेऊन बसलीस?"

" असे नाही सर.." रजनीने बोलायचा प्रयत्न केला..

"श्रुती, मला थोडे पाणी हवे आहे. आणशील का प्लीज?" अजयने श्रुतीला विचारले..

" हो सर.. " ती खांदे उडवत तिथून निघाली..

" रजनी खूप छान दिसते आहेस आज.. तू ना स्वतःला असे मेन्टेन केले आहेस ना.. मस्तच.." अजय बोलतच होता..

" काय मस्त आहे? मलाही सांगा ना?" एका सुंदर बाईने येऊन विचारले.. रजनी तिच्याकडे पहातच राहिली. सोज्वळ चेहरा, छान नेसलेली साडी.. चेहर्‍यावर मेकअपचा मागमूस नसताना एवढे सौंदर्य.. हि बाई या माणसाची बाई.. यांचा विश्वास बसेल माझ्यावर? करतील या मला मदत? रजनी विचार करत होती..


रजनीच्या मनात नक्की काय चालले आहे? ती त्यात यशस्वी होईल का? पाहू पुढील भागात..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all