द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 22)

Bhairav To Leave Shabdantar??????
तिघांना शेवटी कळून चुकलं की हे सगळे योगायोग नसून तनिषा मॅमने घडवून आणलं होतं. आर्याला हेही समजलं की आपण इथे आलो तेव्हापासून आईची आपल्यावर नजर होती, कार्ल, हेझलला बरोबर तिने माझ्या आसपास पोहोचवलं आणि इथपर्यंत आणलं.

इनाया मावशीने बरोबरच सांगितलं होतं, शब्दांतर सांभाळायचं म्हणजे मला आईसारखं बनावं लागेल, पण खरंच आईसारखं बनणं शक्य आहे?

आर्या आणि तनिषा त्यांच्या खऱ्या नात्याची ओळख लपवत एकत्र काम करू लागले होते. त्यांनी पुढचे प्लॅन्स बनवायला सुरवात केली. हेझल आणि कार्लने विचारलं,

"मॅम, आपलं पुढचं प्लॅनिंग काय आहे?"

"इथे अमेरिकेत आपल्या कंपनीचं वर्चस्व हवं, त्यासाठी आपण इतर व्यवसायातही शिरायला हवं"

"दुसरा कोणता व्यवसाय?"

"सांगते.. त्या आधी आपलं लक्ष्य हे असलं पाहिजे की The Real Face Of America अमेरिकेच्या घराघरात पोहोचायला हवं"

"त्यासाठी काय करायला हवं?"

"विचार करा जे मोठमोठे व्यावसायिक आहेत ते मोठे कसेकाय झाले? त्यांनी असे उत्पादन घेतले जे अगदी गरीबतला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूसही खरेदी करतो. उदा. भारतात Tata मीठ..झोपडीतला माणूस आणि महालातला माणूसही ते विकत घेतो, आणि त्यावाचून गत्यंतर नाही"

"मिठाचं ठीक आहे पण मासिकाचे ग्राहक मर्यादित असतात, वाचनाची आवड असणारे लोकच घेतात."

"कार्ल, अजून थोडा खोलवर विचार कर..अशी कोणती गोष्ट आहे जी 90% लोकं वाचतातच.."

"वर्तमानपत्र..." आर्या एकदम बोलून उठते..

तनिषा कौतुकाने तिच्याकडे बघते, पण पटकन ते भाव कार्ल आणि हेझलपासून लपवते.

"बरोबर, प्रत्येक घरात वर्तमानपत्र वापरले जाते. आपल्याला वर्तमानपत्र सुरू करावे लागेल..The real face of America newspaper"

हे ऐकून हेझल जराशी गंभीर होते. तनिषाला तिचे भाव लगेच समजतात,

"काय झालं हेझल?"

"मॅडम मासिक ठीक आहे, पण वर्तमानपत्र म्हणजे...आम्ही जन्मापासून इथे राहतोय, इथे हे सगळं करणं सोपं नाही. काही ठराविक वर्तमानपत्र आहेत ज्यांची चलती आहे, ते सोडून इतर वर्तमानपत्र लोकं स्वीकारतील की नाही शंकाच आहे"

"वर्षानुवर्षे एखाद्या गोष्टीची सवय पडली असेल तर ती मोडायला त्रास होणारच, पण मोडलेली सवय जेव्हा पथ्यावर पडते तेव्हा तो बदल हवाहवासा वाटतो"

कार्लला मात्र तनिषा मॅमच्या या निर्णयावर विश्वास वाटतो. भारतीय कंपनीने अमेरिकेत वर्तमानपत्र सुरू करणं म्हणजे विनाहत्यार शिकार करायला जाण्यासारखं होतं, पण तनिषाकडे एक अदृश्य अस्त्र होतं.. इच्छाशक्तीचं.. तिच्या भेदक नजरेनेच कठीणातली कठीण गोष्ट आरपार भेदली जाई.

आर्याला तर धडकीच भरते, आईने इतका मोठा निर्णय घेतला..आणि इतक्या विश्वासाने ती बोलतेय..हे जमेल का आपल्याला? एकीकडे काम करत असतानाच दुसरीकडे आईकडून गोष्टी शिकणंही चालूच होतं.

"मॅम मग हे मासिक? याचं काय?"

"हे तर सुरूच राहील..आपल्या वर्तमानपत्राचा हा एक भाग असेल, उद्या आपण एक मिटिंग घेऊ..त्यात वर्तमानपत्रासाठी काय काय करायचं , कुठले डिपार्टमेंट बनवायचे, प्रिंटिंगचं कसं मॅनेज करायचं हे ठरवू..

सर्वजण घरी जायला निघाले, कार्ल आणि हेझल बाहेर निघताच तनिषाने आर्याला आवाज दिला.

"आर्या...बरी आहेस ना?"

आर्याला भरून येतं.."हो आई.."

आई ऐकताच तनिषाचाही ऊर भरून आला.

"तुझं सामान आवर, आपल्या बंगलोवर ये रहायला.."

"नाही आई, इनाया मावशीने मनाई केलीये.."

"तिच्याशी मी बोलेन, फार राग आला असेल ना मावशीचा?"

"आधी आला होता, पण इतलं सगळं पाहिलं आणि समजलं, की इनाया मावशी का इतकी कठोर वागतेय ते..तिला माझ्यात तुला पाहायचं आहे, तुझं प्रतिबिंब पाहायचं आहे...पण तू सहजासहजी घडलेली नाहीस आई, कित्येक खाचखळगे पार केले, संकटांना तुडवून लावलं, प्राण ओतत रक्ताचं पाणी केलंस तेव्हा जाऊन "तनिषा-The Boss" बनली..माझ्या वाटेला हे खाचकळगे आले नाही ही माझी पुण्याई आणि तुझं प्रेम..पण आता मलाही संघर्ष काय असतो ते शिकायचं आहे, तडजोड काय असते हे शिकायचं आहे. त्यासाठी मला एकटं राहावं लागेल. माझी काळजी करू नकोस, या कष्टातच मला आनंद आहे, काहीतरी केल्याचं समाधान आहे"

असं म्हणत आर्या निघून गेली. आपली मुलगी मोठी झाली असं तनिषाला मनोमन वाटून गेलं.

****

(भारतातील शब्दांतर ऑफिस)

"खूप वाईट वाटतं, अगदी सुरवातीपासून शब्दांतरसाठी मी जीव ओतून काम केलं, अगदी लहान होतो तेव्हापासूनच.. आज तनिषा मॅम नसतांना ही जागा माझी होती पण कुणीही दुजोरा दिला नाही. CEO ची जागा रिक्त ठेवली पण मला बसवलं नाही"

भैरव आर्ततेने बोलत होता आणि समोरचा माणूस त्याचं सांत्वन करत होता.

"तुम्ही कंपनीसाठी काहीही करा, तुमची रिक्त जागा भरून काढायला कंपनी नेहमी तत्पर असते, you can be always replaced"

"पण शेवटी घर चालवावं लागतंच ना प्रत्येक माणसाला, इथे पगारपाणी चांगला आहे, त्याच्याकडे बघून काम करत रहायचं फक्त"

"नाही भैरव, असा स्वाभिमान गाळून चालणार नाही, मी एक ऑफर देतो तुला..बघ आवडेल का.."

"कोणती ऑफर?"

"अमेरिकेत तनिषा मॅम ला ज्या कंपनीने हाकललं तिथे तू CEO म्हणून काम पहायचं... विचार कर, new york शहर, आणि तू एका कंपनीचा CEO"

भैरवाच्या डोळ्यात चमक दिसली, तो ऑफरसाठी उत्सुक दिसू लागला.

"Mr. BHAIRAV...CEO...अहा.."

"ही संधी सोडू नकोस भैरव, तुला इतकंच करायचं आहे की इतकी वर्षे शब्दांतर मध्ये तुला जो अनुभव आला त्या तिथे वापरायच्या आहेत. कंपनीच्या आतल्या गोष्टी, इथल्या गोपनीय स्ट्रॅटेजीज तिथे वापर आणि face of America ला वर ने, लाईफ बनून जाईल तुझं"

भैरवने अमेरिकेला जाण्याच्या संधीवर शिक्कामोर्तब केलं. जेव्हा ही खबर इनायाला समजली तेव्हा ती ताबडतोब शब्दांतर मध्ये आली.

"भैरव सर, हे काय ऐकतेय मी?"

"जे ऐकलं ते बरोबरच ऐकलं..मी शब्दांतर सोडतोय"

"भैरव? विसरलास? या शब्दांतरने आणि तनिषा मॅडमने तुला काय काय दिलं ते? अरे जीव द्यायला निघाला होतास तेव्हापासून तनिषा मॅम ने तुझ्या आयुष्याला तोलून धरलंय. जरा तरी उपकार ठेव"

"उपकार उपकार म्हणत किती दिवस असंच नोकर म्हणून राबू मी? आणि शब्दांतरला जेवढी वर्ष काम केलं तेवढ्यात त्या उपकाराची परतफेड केलीये मी..आता मला स्वतःचा विचार करायचा आहे"

"पण हे सगळं तुझ्या डोक्यात आलं तर कसं?"

"इथे CEO ची जागा रिक्त ठेवतील पण माझा विचार त्या जागी करणार नाही, का? काय कमी आहे माझ्यात?"

"भैरव? हे तू बोलतोय? अरे तसं तर मीही म्हणाले असते, की मला CEO करा म्हणून, मीही खूप मोठं योगदान दिलंय कंपनीसाठी..पण मला माझी जागा माहितीये"

"मलाही माझी जागा कुठे आहे ते माहितीये, मी face of America मध्ये जातोय, CEO म्हणून.."

इनाया दीर्घ श्वास घेते, काहीसा विचार करून तनिषाला फोन लावते..

"हॅलो तनिषा.." घडलेलं सगळं ती तनिषाला सांगते..

"एक मिनिट भैरवकडे फोन दे"

भैरव फोन घेतो, इनाया भैरवच्या चेहऱ्याचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न करते. भैरव मौन होता. तनिषा मॅम त्याला समजावत असतील, त्याच्यावर राग काढत असतील हाच विचार ती करत होती. ते सगळं ऐकून भैरवचं मतपरिवर्तन होईल आणि तनिषाचा शब्द भैरव मोडणार नाही याची इनायाला खात्री होती. भैरवने फोन ठेवला. इनाया कानात प्राण आणून भैरव काय बोलतो याकडे लक्ष देत होती..तो काहीच बोलत नव्हता, मग तिनेच विचारलं,

"नाही सोडणार ना शब्दांतर?"

"माझा निर्णय झालाय..Face of America. मी अमेरिकेत जाणार !"

इनाया हे ऐकून दुखावली जाते. तिला असं वाटू लागतं की तनिषाने तिच्यावर सोपवलेली जबाबदारी तिच्याकडून डळमळीत होत आहे. भैरवच्या भरवशावर कंपनी सुरळीत सुरू होती, पण आता तोही नाही. आता इनायाला स्वतः पुढे होऊन ऑफिसचं काम सांभाळावं लागणार होतं.

****
(शब्दांतरचं कॅन्टीन)

"कसला विचार करतेय निकिता?"

"तनिषा मॅमचा.. कधी येणार त्या?"

"लवकरच.. आतून खबर मिळलीये की त्या भारतात परतणार आहेत. मानव सरांना तसं कळवलं त्यांनी"

"खरंच?"

"होय.."

"पण मला पुढची स्टोरी समजलीच नाही, face of America नंतर मॅम कुठे गेल्या? काय केलं त्यांनी?"

अनुष्का हसू लागते, "अगं वेडे यावेळचं आपलं मासिक वाचलं नाही का?"

"ते तर मी कधीच वाचत नाही, डिजाईन काढण्यापूरता जेवढे लागतात तेवढेच फक्त"

"अरेरे..शब्दांतरची एम्प्लॉयी आणि वाचायचा कंटाळा?"

निकिता पळत जाऊन मासिक घेऊन येते, त्यात तनिषा मॅमला अमेरिकेत मिळालेल्या पुरस्काराची माहिती होती. निकिताला प्रचंड कौतुक वाटतं.

"एकवेळ आकाश संपेल पण मॅमच्या महत्त्वाकांक्षेला अंत नाही"

क्रमशः

🎭 Series Post

View all