द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 21)

जेव्हा "द बॉस" मोड ऑन होतो...!


इतका भयाण योगायोग कसा असू शकतो हे प्रश्न आर्याला पडला होता. सोबतच आईने हे काम कधी हातात घेतलं हेही तिला कळेना, कारण तिच्या माहितीनुसार मिस्टर रॉनने दगाबाजी केल्यानंतर आई अज्ञातवासात गेली होती.

"हा अज्ञातवास म्हणजेच The Real Face Of America" हेझल म्हणाली.

"Face of america सोडल्यानंतर मॅडम घरी जात होत्या, एखादी दुसरी स्त्री असती तर पूर्ण वाटेत रडत बसली असती. पण ऑफिसपासून घर 15 मिनिटाच्या अंतरावर होतं. त्या वेळात मॅमने The Real Face Of America चं प्लॅनिंग केलं. आधी बसलेल्या चटक्यांमुळे मॅमने हे काम दूर राहून करण्याचं ठरवलं. मॅम हे सगळं एकटीने करत होत्या. खरं तर त्यांना कुणाचीच गरज नव्हती, writeup पासून ते प्रिंटिंग पर्यन्त सर्व गोष्टींचं त्यांना ज्ञान होतं."

"मग तुम्ही कसे आलात इथे?"

"आम्हाला मिस्टर रॉनसोबत काम करणं कठीण जात होतं. आम्हाला तनिषा मॅम सोबतच काम करायचं होतं. मोठ्या मुश्किलीने आम्ही मॅमच्या घरी पोचलो आणि त्यांना सांगितलं. त्यांनी होकार दिला आणि आमचं काम सुरू झालं"

"पण face of America मध्ये त्यांनी already आपल्या आयडियाज इम्प्लिमेंट केल्या होत्या, मग यात नवीन कल्पना कुठून आणल्या?"

"तिथलं काम घाईनेच झालेलं, त्यात जो मजकूर होता त्यावर मॅम खुश नव्हत्या. पण घाईघाईने लाँच करायचं म्हणून आम्ही पहिलं मासिक प्रकाशित केलं. पण मॅमने खरा प्राण ओतला तो real face of America मध्ये"

"म्हणजे नेमकं काय केलं?"

"मॅमने जबरदस्त कल्पना सांगितल्या, त्यांच्या मते वाचनातून वाचक आपलं प्रतिबिंब बघण्याचा प्रयत्न करतात, मनोरंजन म्हणून त्यांना हसायला आवडतं, आपल्या आजूबाजूला असलेल्या घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहायला आवडतं. त्यांनी सर्वात प्रथम आम्हाला समाजात फिरायला लावलं, लोकांना वाचायला लावलं. त्यामुळेच मी हॉटेलमध्ये बसून एकेकाचा चेहरा वाचत असायचो. आणि हेझल वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुप द्वारे लोकांचं परीक्षण करत होती"

"मग पुढे?"

"आम्हाला असं लक्षात आलं की लोकं बाहेरून खूप आनंदी दाखवतात पण आतून खचलेली असतात. मनातलं सगळं बाहेर काढायला त्यांना वाट मिळत नाही, मग पार्ट्या, इव्हेंट्स, ड्रिंक्स अश्या गोष्टीतून हे दुःखं विसरायचा प्रयत्न करतात. त्यांना मायेची ऊब मिळतच नाही. दुसरी अजून एक गोष्ट की ही लोकं सेलिब्रिटीजबद्दल वाईट बातम्या, गॉसिप वाचतात तेव्हा त्यांच्यात एक अकार्यक्षम वृत्ती निर्माण होते"

"ते कसं?"

"एखादा लोकप्रिय सेलिब्रिटी, त्याकडे खूप पैसा आणि प्रसिद्धी आहे.त्याला समाजात खूप ट्रोल केले जाते, अरेरे, किती वाईट जीवन आहे, यापेक्षा आपण बरे ! असा विचार लोकं करू लागतात. त्यामुळे लोकांची महत्त्वाकांक्षी वृत्ती कमी होऊन आहे त्याच स्थितीत सेफ झोन मध्ये राहण्याची वृत्ती वाढतेय..एवढा पैसा कमावला पण काय उपयोग? शेवटी स्वतःचीच इज्जत घालवली ना..असं म्हणत आपणही यशाची शिखरं चढू नये म्हणून पळवाट काढतात.."

"इतका खोलवर विचार, बापरे ! खूप deep आहे हे !"

"सारासार अभ्यास करून लोकांच्या मनाचा विचार करून आम्ही एक अनुक्रमणिका बनवली आणि त्यातला मजकुर आम्ही स्वतः लिहिला. पण आता खरी परीक्षा होती मार्केटिंगची"

"का? मॅम कडे भरपूर पैसा होता की मार्केटिंग साठी"

"होय, पण जेवढं मार्केटिंग केलं असतं तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचलं असतं.. मिस्टर रॉनपर्यंत सुद्धा. आणि त्यांना समजल्यावर ते शांत बसले नसते, त्यांनी इथेही काड्या केल्या असत्या"

"मग यावर मार्ग काय काढलात तुम्ही?"

"आम्हाला तर काहीच सुचत नव्हतं, पण The Boss...हेझल, पुढचं तू सांग.. माझा घसा सुकलाय सांगून.."

"घसा सुकलाय? अरे नुसतं सांगून तुझा घसा सुकला.. हे सगळं करत असतांना मॅमचं काय झालं असेल? असो, बरं आर्या, मी तुला मार्केटिंगचं सांगते. आमच्या मासिकातील मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे सेलिब्रिटीज बद्दल लिहिलेले आर्टिकल्स. त्या आर्टिकल्समध्ये आम्ही असे सेलिब्रिटीज घेतले होते ज्यांची सद्य स्थितीत विनाकारण खूप बदनामी सुरू आहे..त्यांच्या आयुष्याची माहिती काढली, लोकांना प्रेरणा मिळेल असं त्यांचं आयुष्य जगासमोर आणलं.."

"पण कितीही चांगलं लिहिलं तरी त्यांच्यापर्यंत ते पोचलं कसं?"

"त्यातच खरी गम्मत आहे..पॉप सिंगर फिलिपच्या स्टाफ सोबत कार्लने ओळख करून घेतली..काहीही करून त्या फिलिपपर्यन्त ते मासिक त्याला पोचवायला लावलं..."

"हो पण त्याने ते वाचून खुश होऊन ठेऊन दिलं असेल, तो कशाला पुन्हा ते मासिक मागेल.."

"The Boss Mode On झाला तो इथेच.. फिलिपचं आर्टिकल ज्या पानावर लिहिलं होतं त्या पानाला मॅमने मुद्दाम ब्लर छापायला लावलं...त्याला वाटलं प्रिंटिंग एरर आहे..स्वतःबद्दल वाचण्यासाठी तो खूप आतुर झाला..मॉडेल डायनासोबत पण असंच, तिच्या आर्टिकलचं पान ब्लर, बाकी सगळी पानं नीट..अश्या बऱ्याच सेलिब्रिटीजला हेच केलं गेलं.."

"मग, त्यांनी काय केलं?"

"आम्ही एक चेन बनवली.. सर्वात प्रथम ते मासिकाची चौकशी नेट वर शोधतील, आम्ही नेट वर आपली काहीही माहिती दिली नव्हती..मग new यॉर्क मधल्या सर्वात मोठ्या बुक स्टोर मध्ये ते जातील.. तिथे आम्ही आमचीच माणसं ठेवलेली... त्यांनी या इव्हेंटचा पत्ता दिला...आणि बघ, सेलिब्रिटीज हजर..ऐन वेळेवर.."

"हा टाइम कसा मॅनेज झाला?"

"इव्हेंटच्या बरोबर काही तास आधी मासिक त्यांना पोचती केली जेणेकरून वेळेवर ते इथे येतील.."

आर्या मटकन खाली बसली.

"हे सगळं...माझ्या डोक्याच्या पलीकडे आहे, इतका सगळा विचार, इतकं प्लॅनिंग कुणी कसं करू शकतं?"

"The Boss, काहीही करू शकतो आर्या"

"बरोबर, आई काहीही करू शकते, mom can do anything"

"काय??"

"सॉरी..आय मिन, mam can do anything"

आईचं हे रूप तिने पाहिलं आणि तिला उपरती झाली, आपल्याला शब्दांतर मधून काढलं तेच योग्य होतं. कुठे आईचं तल्लख डोकं आणि कुठे माझं..तिला तिचं बालपण आठवलं... आई एका बाजूला तांदूळ निवडत असायची आणि दुसऱ्या बाजूला पानं चाळत असायची, तिला सलग असा लिहायला वेळच मिळायचा नाही..मग कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मिळालेले 10-15 मिनिटं, फरशी पुसून झाल्यानंतर ती वाळेपर्यंत मिळालेले पाच मिनिटं, वर कपडे वाळत टाकायला गेली की माईंपासून चोरून काढलेले 10 मिनिटं...या चोरलेल्या वेळात ती तिचं काम करे, काम न येणं यापेक्षा ते करायला न मिळणं इथपासून तिचा संघर्ष होता...आणि कुठे आपण, सगळं आयतं मिळालेलं..काम करायला वेळच वेळ, हाताशी माणसं, सर्व सुविधा.. आणि आपण काय केलं? आर्याला स्वतःवरच राग येऊ लागला..

आर्याने वेट्रेसची नोकरी सोडली आणि कार्लसोबत जॉईन झाली. तनिषा फार कमी वेळा ऑफिसमध्ये येई, बाकी सगळी कामं कार्ल आणि हेझल करत असत. असंच एकदा लवकर काम झालं आणि तिघेही बाहेर जरा पाय मोकळे करायला गेले..

पाऊस नुकताच पडून गेलेला आणि आता उन्हं पडलेलं..त्यामुळे आकाशात सुंदर असं इंद्रधनुष्य तयार झालं. हेझल म्हणाली,

"बघा, नेमके आपण बाहेर पडलो आणि इंद्रधनू साकारलं गेलं.."

"हाही एक योगायोग म्हणायचा.."

"हा हा...बाय द वे आपण तिघे कसे अगदी वेळेवर भेटलो..नाही का?"

"हो ना, कार्ल मला माहित नव्हतं की तुलाही तनिषा मॅम सोबत काम करायचं आहे ते...नाहीतर आपण त्या दिवशी कॅफे मध्ये भेटलोच नसतो..."

"होना..तनिषा मॅमने मला त्या कॅफेवर जायला लावलेलं.. एक क्लाएंट येणारे असं सांगून, तो तर आलाच नाही पण तू दिसलीस.."

"आणि मलाही तनिषा मॅम ने तिथेच जायला लावलं होतं, कॅफे पीपल रिसर्च साठी..."

आर्या चालता चालता थांबते,

"आणि तुम्ही याला योगायोग म्हणता?"

दोघेही थबकतात...

"म्हणजे, तनिषा मॅम ने..आपण भेटावं...म्हणून.."- कार्ल

"एक मिनिट आर्या... तू ज्या फेसबुक ग्रुपवर आहेस त्याच ग्रुप मध्ये मी कशी? योगायोग??"

"नाही मला ते इनाया मावशीने..." बोलता बोलता परत आर्या विचारात पडते..

"आणि मी कुठल्या हॉटेल मध्ये बसून लोकांचा रिसर्च करावा हेही मॅमने सांगितलेलं... त्याच हॉटेलमध्ये आर्या मला भेटली...हाही योगायोग???"

क्रमशः

🎭 Series Post

View all