द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 16)

Hezal And Karl Resigns, They want To Work With Tanisha


तनिषाने face of America चं ऑफिस सोडलं ते कायमचंच, पुन्हा कधीही न येण्यासाठी. या काळात मेघनाने तिला खूप समजावलं, की वाद आपापसात मिटवून घे म्हणून. कारण मिस्टर रॉन यांची अमेरिकेत व्यवसाय जगतात ख्याती होती. त्यांच्यासोबत काम करायला मिळणं मोठं भाग्य, त्यात त्यांच्याशी जर वाद घातला तर व्यवसाय तर सोडाच, अमेरिकेत जगणंही मुश्कील होणार होतं!

"तनिषा, जे झालं ते चुकीचंच झालं..पण काहीवेळा माघार घेणं योग्य"

"आपली बाजू बरोबर असेल तर आणि असत्याला आपल्याला स्वीकारायचं नसेल तर माघार ही पळवाट आहे.."

"पळवाट तर तू काढतेय.. तू ऑफीस कायमचं सोडायचं म्हणतेय"

"ऑफिस सोडतेय, काम नाही"

"म्हणजे? तू कसलं काम हातात घेणारेस आता?"

तनिषा मौन राहिली. तिचं हे मौन म्हणजे येणाऱ्या वादळाची चाहूल होती.

तनिषाने तिचं राहतं घर सोडलं, ती कुठे जातेय, काय करणार आहे कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. मेघनाला सुद्धा तिने बजावून सांगितलं की आता ती परतणार ते एक झंझावाती वादळ घेऊनच!

***

निकिता हे सर्व श्वास रोखून ऐकत असते. पुढे अनुष्का काय सांगते याकडे तिचे कान टवकारले जातात.

"मग पुढे?"

"पुढे तनिषा मॅम कुठे गेल्या, काय केलं कुणालाच नाही माहीत"

"म्हणजे स्टोरी सम्पली?"

"हो"

निकिताचा हिरमोड झाला, रोज तिला तनिषा मॅम बद्दल ऐकायची सवय झाली होती तनिषा मॅम कुठे असतील, काय करत असतील याबद्दल तिला खूप उत्सुकता होती, पण आता कोण सांगणार पुढे काय झालं ते?

***

"हे बघा, तुमची हिस्टरी बघता तुम्हाला या ठिकाणी एडिटर म्हणून काम करता येणार नाही, सॉरी"

जवळपास प्रत्येक पब्लिशिंग कंपनीकडून आर्याला नकार येत होता, CEO पदावरून तिची हकालपट्टी झाली होती हे ऐकल्यावर कोणती कंपनी तिला काम देणार होती? आर्या जॉब शोधून शोधून थकली. जवळचे पैसेही संपत आलेले, वडिलांकडे मागायला तिचा स्वाभिमान आड येत होता.

"हे टेबल नंबर, पाठ करून ठेवा. ती ती ऑर्डर त्या त्या टेबलवर नेऊन द्यायची, महिना 300 डॉलर्स मिळतील"

अखेर एका हॉटेलमध्ये तिला वेट्रेसचं काम मिळालं. भारतात हे काम कमी दर्जाचं असलं तरी बाहेरच्या देशात शिक्षण घेणारी मुलं, साईड इन्कम साठी काम बघणारी माणसं आनंदाने ही नोकरी करतात. आर्याला प्रचंड ताण आलेला. भारतात महागड्या हॉटेल्समध्ये महागडे पदार्थ ऑर्डर करायची सवय, आणि इथे? इथे एका साध्या हॉटेलवर काम करायचं, तेही वेट्रेसचं! अवघड आहे बाबा !

"Hey, order"

हॉटेलमध्ये आलेली काही मुलं तिला या टोन मध्ये ऑर्डर घेण्यासाठी बोलवत होती. तिला अश्या आवाजाची सवय नव्हती, ती रागारागाने गेली, ऑर्डर घेतली आणि आत नेऊन दिली. डोक्यात असंख्य विचार सुरू होते, एकीकडे लाज वाटत होती अन दुसरीकडे भीती, इथे कुणी ओळखीचं दिसलं तर?

या सगळ्यात चुकीच्या ऑर्डर्स तिने चुकीच्या ठिकाणी नेऊन ठेवल्या. मग काय! एकच राडा, एकीकडे मालक ओरडतोय दुसरीकडे ग्राहक चिडले. या सगळ्यात आर्याला खूप वाईट ऐकावं लागलं, तिला सवय नव्हती..तावातावाने ती नोकरी सोडून जायला निघाली, तोच तिच्या लक्षात आलं की आपल्याकडचे पैसे संपलेत आणि या सॅलरीवर तिला रूम चं भाडं भरायचं आहे..ती हतबल झाली, मागे फिरली. मालकासमोर जाऊन उभी राहिली, थरथरत हात जोडले आणि माफी मागू लागली, नोकरीवरुन काढू नका असा गयावया करू लागली. मन सांगत होतं इथून निघून जा पण बुद्धी मात्र वास्तवाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. तो दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता.

***

तनिषाने face of america सोडलं, तिथला स्टाफ सुदधा आता मिस्टर रॉन यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत होती. स्टाफला फक्त पगाराशी घेणं होतं. पण त्यातल्या दोन व्यक्ती अश्या होत्या की ज्यांची तनिषा मॅमवर निष्ठा होती. त्यांना मिस्टर रॉन प्रमाणे काम करणं जड जात होतं, स्वतःची कल्पकता वापरताच येत नव्हती. त्या दोघांचं आपापसात बोलणं झालं आणि दोघांनी एकत्रच नोकरीचा राजीनामा दिला. त्या दोन व्यक्ती म्हणजे हेझल आणि कार्ल !

(तनिषाच्या घरी)

"हे बघा, तिथे आता माझा काहीही अधिकार उरलेला नाही. तुम्ही मिस्टर रॉन सोबत जुळवून घ्या, माझ्यामुळे नोकरी का सोडताय?"

"मॅडम तुम्हालाही त्यांच्यासोबत जुळवून घेता आलं असतं, तुम्ही का सोडलं?"

तनिषा निरुत्तर झाली..

"मग तेच कारण आहे..आम्ही नोकरी सोडल्याचं. मॅडम पैशापेक्षा महत्वाची असतात आपली तत्व..आम्हाला आमच्या तत्वांमुळे बाहेरच्या जगात कुणी उभं करत नव्हतं पण तुम्ही आमच्यातली स्किल्स ओळ्खलीत. आम्हाला तुमच्यासोबत काम करताना एक समाधान वाटत होतं. तुम्ही नवनवीन विषय explore करायला लावायचे, नवनवीन गोष्टी शिकवायच्या...इथे मिस्टर रॉन आमच्याकडून अपेक्षा करतात की आम्ही एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याला ट्रोल करणारं लिहावं..हे आमच्या तत्वात बसत नाही. मॅडम, भलेही तुम्ही आम्हाला पैसे नका देऊ, पण तुमच्यासोबत काम करू द्या"

"पण मी दुसरं काहीतरी करेल असं का वाटलं तुम्हाला?"

हेझल आणि कार्ल, दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात.

"मॅडम, वाघ जर जखमी असेल तर त्याच्या आक्रमकतेची तीव्रता खूप जास्त असते हे माहितीये आम्हाला..तुम्ही तर वाघीण आहात.."

क्रमशः

🎭 Series Post

View all