Oct 31, 2020
प्रेम

बुकमार्क (Bookmark)

Read Later
बुकमार्क (Bookmark)

रिटाला अगदी लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. असणारचं ना!!

तिचे बाबा हे एका वाचनालयात जे नोकरीला होते. त्यामुळे ते कधी कधी काही पुस्तके रिटाला वाचायला घरी आणत असतं आणि तेव्हापासून रिटाला वाचनाची जी सवय लागली ती लागलीचं.

जर कोणी तिला विचारले तुझे पहिले प्रेम कोण आहे? तर एक सेकंद ही न गमावता पुस्तक हेच उत्तर तिच्या तोंडून ऐकायला मिळायचे.

आता तर तिने घराजवळ असलेल्या वाचनालयात स्वत:ची नाव-नोंदणी ही केली होती. त्यामुळे आता तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक वाचण्यासाठी तिला तिच्या बाबांवर अवलंबून राहावे लागत नव्हते. तसेच आता ती हवे तेव्हा हवे ते पुस्तक वाचू शकत होती.

रिटा वाचनाबरोबर तिला वेळ मिळेल तेव्हा लिखाण ही करीत असे. पण ते लिखाण ती तिच्यापुरतेच मर्यादित ठेवत असे. तिची एक सवय होती. तुम्ही छंदचं म्हणा ना!!

तिला बूकमार्क्स बनवायला खूप आवडायचे. ती जेव्हा पण एखादे पुस्तक वाचनालयातून घरी आणत असे, तेव्हा ती त्यामध्ये स्वत: बनविलेले बूकमार्क् ठेवत असे आणि त्या बूकमार्कवर तिने स्वत: लिहिलेली किंवा एखाद्या पुस्तकात वाचलेली एखादी ओळ तिच्या सुंदर हस्ताक्षरात लिहीत असे.

काय भन्नाट आयडिया होती ना!!

रिटा अभ्यासातही खूप हुशार होती. त्यामुळे ती शाळेत असताना सगळ्या शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती. आता तर ती बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. तसेच तिला पुढे शिक्षिका व्हायचे होते. असो.  

एक दिवस अजबच गोष्ट झाली. नेहमीप्रमाणे तिने वाचनालयातून एक पुस्तक वाचायला घेतले. पण ते पुस्तक तिने आधीच वाचलेले होते आणि ते उघडताच तिने त्यावेळी बनविलेला बूकमार्क ही तिला त्या पुस्तकात ठेवलेला आढळला. तिला तो बघितल्यावर आनंद झाला. तिने तो हातात घेतला तर तिला त्या बूकमार्कमध्ये थोडा बदल झालेला आढळला. मग तिने नीट निरखून पाहिले.

तर तिने लिहिलेल्या ओळीच्या खाली कोणीतरी काहीतरी लिहिले होते. मग रोज एक पुस्तक असे करून हळूहळू तिने वाचलेली काही पुस्तके वाचनालयातून आणायला सुरुवात केली. पण तिने आणलेल्या प्रत्येक पुस्तकाच्या बूकमार्कवर तिने लिहिलेल्या ओळीखाली एक ओळ लिहिलेली तिला आढळली.

तिला पहिल्यांदा थोडे आश्चर्य वाटले. पण नंतर तिला फार मज्जा वाटायला लागली.

मग ती विचार करू लागली, “ही व्यक्ति कोण असेल मुलगा की मुलगी?” मग तिला वाटे, “कोणीही असू देत पण जे काही लिहिले ते छान लिहिलंय.”

तिने वाचनालयातल्या काकांकडे ह्याबाबत विचारपूस ही केली. पण त्या व्यक्तीबद्दल सांगणे फार कठीण आहे असे काका म्हणाले.

खरं म्हणायला गेलं तर ती पुस्तकात ठेवत असलेल्या बूकमार्क्सबद्दल त्या काकांना ही माहीत नव्हते.

आता ह्याला काय म्हणावं!!   

पण तरीही त्या व्यक्तीला शोधण्यासाठी ते मदत करतील असे आश्वासन त्यांनी रिटाला दिले. मग रिटा वाचनालयातून तिने न वाचलेले नवीन पुस्तक घेऊन घरी आली. थोडे वाचल्यावर तिने नेहमीप्रमाणे छानसा बूकमार्क त्या पुस्तकामध्ये ठेवला. यावेळी तिने कोड्यात लिहितात तशी सुंदर ओळ त्या बूकमार्कवर लिहिली. ती ओळ अशी काहीतरी होती, “आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

मग तिने ते पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर ते वाचनालयात परत केले व दुसरे पुस्तक आणले. पण तिला हे पुस्तक वाचण्यात आज मन लागत नव्हते. तिचे सगळे लक्ष त्या वाचलेल्या पुस्तकामधल्या बूकमार्कमध्ये होते.

मग दोन दिवसांनंतर ती पुन्हा वाचनालयात गेली आणि तिने त्या वाचलेल्या पुस्तकाबद्दल काकांना विचारले, तर ते पुस्तक सध्या तरी कोणी वाचायला नेले नाही असे तिला कळले. ती थोडी हिरमुसली.

त्यांनंतर तिची परीक्षा सुरू झाली. त्यामुळे पुढचे काही दिवस तिला वाचनालयात जाता आले नाही. जेव्हा तिची परीक्षा संपली, तेव्हा रिटाने त्या पुस्तकाबद्दल काकांकडे चौकशी केली, तेव्हा ते पुस्तक काही दिवसांपूर्वी एका  मुलाने वाचायला नेले हे कळले. पण तो मुलगा कोण हे काही केल्या तिला कळले नाही.

असेच काही दिवस गेले आणि एक दिवस ते पुस्तक पुन्हा तिला वाचनालयात आढळले. तिने ते लगेच घेतले आणि लागलीच ते उघडून बघितले, तेव्हा खरंच त्या ओळीखाली अजून एक सुंदर ओळ लिहिली होती ती अशी “कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

रिटा हे वाचून खूपच खुश झाली आणि आनंदाने घरी परतली.

त्यांनंतर हा सिलसिला काही महीने असाच सुरू होता. तो मुलगा कोण याचा शोध रिटाला काही केल्या लागू शकला नाही आणि त्यात झाले असं की, रिटा राहत असलेली इमारत जुनी झाल्यामुळे ती पाडून त्याजागी नवीन इमारत उभी राहणार होती. त्यामुळे रिटा आणि तिचे कुटुंब दुसरीकडे राहायला गेले. त्यामुळे मधली काही वर्षे तिचा इथल्या वाचनालयाशी असलेला संपर्क ही तुटला व तिची इमारत पूर्ण होण्यासाठी ७-८ वर्षे लागली. त्या सर्व काळात तिचे लग्नही झाले. त्यांनंतर तिच्या बाबांनी हे घर विकून नवीन ठिकाणी घर घेतले. त्यामुळे ह्या कॉलनीत परत येण्याचा प्रश्नच उरला नाही.

इतक्या वर्षात तिचा अभ्यास, मग नोकरी त्यामुळे तिचा छंद काहीसा मागेच राहीला. हल्ली ती ऑनलाइन पुस्तके वाचण्यासाठी मागवू लागली. त्यामुळे तिला कोणतेही वाचनालय जॉइंट करायची गरजच भासली नाही.

मंदार हा रिटाचा नवरा. तो पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. पण तो खूप चांगला लेखक ही होता. मंदार आणि रिटा या दोघांचे अरेंज मॅरेज झाल्यामुळे अजूनही त्यांना एकमेकांचे स्वभाव नीट कळले नव्हते.

अहो, लग्नाला २ महिनेच तर झाले होते ना!!

एक दिवस मंदार लिखाणासाठी वापरत असलेला डेस्क साफ करताना त्याच्या ड्रॉवरमध्ये रिटाला एक लिफाफा मिळाला. तिने तो उघडून पहिला तर तिला त्यामध्ये तिने बनविलेले काही बूकमार्क्स आढळले. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास नाही बसला.

म्हणजे तो मुलगा मंदार होता?? तिने तो लिफाफा होता तसा परत ठेवून दिला.

मग तिने एक नवीन बूकमार्क बनवून मंदार लिखाण करत असलेल्या वहीत त्याच्या नकळत ठेवला आणि त्यावर तिच्या सुंदर हस्ताक्षरात ही ओळ लिहिली, “सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले कि आपोआप सुटतात.”

जेव्हा मंदार नेहमीप्रमाणे लिखाण करायला त्याच्या डेस्ककडे बसला आणि लिखाणासाठी जेव्हा त्याने त्याची वही उघडली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यालाही क्षणभर विश्वास नाही बसला.

मग त्यानेही नेहमीप्रमाणे त्या ओळीखाली एक ओळ लिहिली,

शांत राहणं पण खूप कठीण असतं

मग तो रिटाजवळ गेला आणि त्याने तो बूकमार्क तिला परत दिला आणि मग दोघेही खूप हसले.

(हा ब्लॉग आवडल्यास त्यावर प्रतिक्रिया जरूर द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर तो नक्की शेअर करा. धन्यवाद.)

@preetisawantdalvi  

 

 

 

Circle Image

Preeti Dalvi

Writer, Author, Blogger

मला वाचनाची खूप आवड आहे। वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही। मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत। त्या कथांमध्ये "गुंतता हृदय हे। " ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले। ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद। ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले। खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम।।