Feb 27, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

पुस्तक रसग्रहण - ‘नाझी भस्मासुराचा उद्यास्त’

Read Later
पुस्तक रसग्रहण - ‘नाझी भस्मासुराचा उद्यास्त’

पुस्तकाचे नाव :- नाझी भस्मासुराचा उद्यास्त

लेखक :- वि. ग. कानिटकर 

पुस्तक परीक्षण :- तनुजा संतोष प्रभुदेसाई 


             २०१९ साली ही कादंबरी मी पहिल्यांदा वाचली. एखादी अतिशय मोठी कादंबरी आपण वाचतो तेव्हा किती दिवस लागतात ? साधारण दीड ते दोन दिवस. पण मी इतकी समरस झाले होते त्या इतिहासाशी, की मी एका रात्रीत वाचून काढली. वाचनात फार गुंतले की झोपेचे जाणीव होतं नाही हेच खरे. 'नाझी भस्मासुराचा उद्यास्त' ही वि.ग. कानिटकर यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी होती. इतिहास हा विषय माझ्या जिव्हाळ्याचा ! मला अतिशय आवडते इतिहासात रमायला. त्यात विश्वाच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायची नेहमीच उत्सुकता. आपल्या ज्ञानाच्या परिघाबाहेरचे ज्ञान मिळवायला आपल्याला नेहमीच आवडते. त्याच हेतूने दुसऱ्या महायुद्धाशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या जर्मनीच्या इतिहासाबद्दलची आणि खास करून अडॉल्फ हिटलर या व्यक्तिमत्वावर प्रकाश पाडणारी ही कादंबरी मी वाचली. 

            ही कादंबरी म्हणजे ५३० पानांचा एक ग्रंथच आहे. खरे तर या कादंबरीवर परीक्षण लिहिण्यापूर्वी माझ्या मनात विचार आला. याचे सार्थ परीक्षण मी लिहू शकेन ना ? माझ्या मनात हे पुस्तक वाचल्यानंतर ज्या भावना होत्या, त्यांना मी योग्य आकार देऊ शकेन ना ? परंतु वि.ग.कानिटकरांच्या कादंबऱ्या मनाशी जोडल्या जातात हे खरे. वाचक आणि लेखकामध्ये एक अदृश्य अनोख्या नात्याची वीण असते. लेखकाच्या भाषेशी, विचारांशी आपण एकरूप होऊ शकलो तर ती कादंबरी आपलीशी वाटते. अशीच ही शैली मला आपलीशी वाटू लागल्याने मी या अप्रतिम कादंबरीचे परीक्षण लिहिण्याचे ठरवले आहे. ही कादंबरी आणि त्यात मांडलेला विषय याची व्याप्ती खोल आहे. जवळपास पाचशे पानांच्या ग्रंथात दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास यथायोग्य मांडणे हे काही सोपे नव्हे. लेखकाच्या लेखणीला तोडीस तोड परीक्षण कदाचित शक्य होणार नाही. तेव्हा हे परीक्षण मी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.    

             कादंबरी लिहिताना लेखकाने केलेले प्रचंड संशोधन आणि गाढा अभ्यास हे दोन्ही घटक आपल्याला कादंबरी वाचताना लक्षात येतात. लेखकाचे शब्दांवर विलक्षण प्रभुत्व आहे. त्या काळातला इतिहास त्या काळातल्या भाषेला साजेसा, पण मराठीत लिहिणे हे लेखकाच्या लेखणीला लाभलेले दैवी वरदान आहे जणू ! संपूर्ण कादंबरीत लेखकाच्या ओघवत्या आणि सहजतेने वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लेखनशैलीची प्रचिती येते. 

              इतर कादंबऱ्या आपण जशा वाचतो तशी भरभर वाचण्याची ही कादंबरी नाही. अतिशय जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्ण नजरेने प्रत्येक शब्द, प्रसंग, घटना, त्याचे दिलेले इतर अर्थ वाचणे आणि त्याची सांगड आपल्या इतिहासाच्या ज्ञानाशी घालून देणे अशा पद्धतीने ही कादंबरी वाचायला हवी. ही कादंबरी अडॉल्फ हिटलरचे आयुष्य आणि जर्मनीचा इतिहास याचा मिलाफ आहे. मी तर वाचताना नेहमीच आवडलेल्या वाक्यांवर पेन्सिलीने खुणा करते. कारण ती वाक्य आपल्याला आपले भाषाकौशल्य सुधारण्यासही मदत करतात. कादंबरीचे वाचन असे करावे की पुन्हा कधीही तुम्हांला त्या घटनेचा संदर्भ विचारला तर ती घटना तुम्हांला लक्षात आली पाहिजे. 

                 यात लेखकाने कथानक दोन पद्धतीने मांडले आहे. अर्ध्या अधिक कादंबरीत लेखक स्वतः सांगत आहेत की इतिहास काय घडत आहेत. तर थोड्या फार भागात हिटलर स्वतः काय काय बोलत होता, हिटलरची भूमिका काय होती, हिटलरने एक सामान्य व्यक्ती ते जर्मनीचा सर्वेसर्वा हा प्रवास कसा केला हे हिटलर आणि संबंधित व्यक्तींच्या संवादातून मांडले आहे. त्याकाळची कित्येक वर्तमानपत्रे, मासिके यांचे संदर्भ लिहून त्या काळी घडलेल्या घटनांचे लिखित पुरावेही दिले आहेत. हर्मन गोअरिंग, गोबेल्स, हिंडेनबुर्ग, रिबेनट्रॉप, इटलीचा सर्वेसर्वा मुसोलिनी, चेंबर्लेन इत्यादी अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या उल्लेख या कादंबरीत आहे. महत्वाच्या व्यक्ती म्हणण्याचा उद्देश हा की यापैकी बऱ्याच जणांनी हिटलरचे वेगवेगळे रूप पाहिले आहे. कथेतील मुख्य पात्र अथवा कथानकाचा नायक हिटलरच आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संपूर्ण जर्मनी आणि त्यासोबतच जगात महासत्ता समजल्या जाणाऱ्या अनेक देशांना आपल्या इशाऱ्यांवर झुलवत ठेवणारा राज्यकर्ता होता अडॉल्फ हिटलर. हिटलरशिवाय दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास अपुरा वाटेल. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभ आणि अंताचे कारण हिटलरच होता. 

             अडॉल्फ हिटलरला उद्देशून त्या काळात वापरले जाणारे अनेक शब्द लेखकाने योग्यरित्या मांडले आहेत. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होता. परंतु स्वतः अधिकार प्राप्त झाल्यावर हिटलरने स्वतःला ‘फ्युरर’ म्हणावे अशी पद्धत रूढ केली. हिटलरने असा उल्लेख केल्यापासून पुढील इतिहासात सर्वत्र हिटलरचा उल्लेख फ्युरर असाच झाला आहे. हिटलरच्या जीवनातील काही भाग,घटना मांडताना लेखकाने आपला दृष्टिकोनही मांडला आहे. जसे, रशियावर चढाई करण्याचा निर्णय हिटलरने घेतला ही त्याच्या आयुष्यातील एक घटना मांडल्यानंतर, हिटलरचा हाच निर्णय त्याच्या पराभवाला कारणीभूत ठरला हे लेखकाचे अभ्यासपूर्ण मत आणि त्यानंतर त्या मताला दिलेले पुरावे यामुळे लेखकाच्या लेखणीवरचा आपला विश्वास वाढत जातो. ही कादंबरी वाचताना वाचकाकडे खूप सहनशक्ती हवी. मराठीत लिहिलेली कादंबरी असली तरी काही शब्द हे जर्मन लोक जसे वापरत होते तसेच लिहिलेले आहेत. त्या शब्दांचा अर्थही लेखकाने उत्कृष्टरित्या समजावला आहे. ज्याला एकेकाळी निम्म्या विश्वावर आधिपत्य स्थापन करणाऱ्या अडॉल्फ हिटलरबद्दल जाणून घ्यायचे आहे त्याला ही कादंबरी वाचतांना कुठेही कंटाळा नक्की येणार नाही. हे परीक्षण लिहिताना मी कादंबरी समोर घेतलेली नाही, याची नोंद घ्यावी. एकदा तो इतिहास किंवा ते कथानक विचारांशी जोडले गेले की पुन्हा एखादा प्रसंग कादंबरीत धुंडाळण्याची गरज पडत नाही. 

             कादंबरीचे स्वरूप वर्णनात्मक आणि माहितीप्रद जास्त आहे. मात्र जिथे हिटलरच्या ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्रातील प्रसंग लिहिलेले आहेत तेव्हा हिटलरची वैचारिक आणि काहीशी भावनिक बाजूही समोर येते. कथानक कशा पद्धतीने उलघडत गेले हे आपल्या लक्षात येते. दुसऱ्याच्या महायुद्धाच्या काळातील प्रसंग, व्यक्ती, राहणीमान, अडीअडचणी, राजकीय वातावरण, राष्ट्रांची लष्करी ताकद यांचे जसेच्या तसे वर्णन लेखकाने केले आहे. त्यामुळे आपण ही कादंबरी वाचत नसून त्या इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत, अशी भावना वाचकाच्या मनात निर्माण होते. कदाचित हेच या कादंबरीच्या यशाचे गमक असावे. त्या काळातील सैनिकांच्या, अधिकाऱ्यांच्या भावना, विविध स्थितीमध्ये त्यांच्या आयुष्यात येणारी स्थित्यंतरे याची वर्णने अतिशय उत्कृष्ट आहेत. 

                 हिटलरच्याबद्दल जगात अनेक मतांतरे आहेत. काहीजण हिटलरला क्रूर राज्यकर्ता मानतात तर काहीजण त्याला निष्णात नेतृत्व मानतात. माझ्या मते ह्या दोन्हीही भूमिका तितक्याच योग्य आहेत. हिटलर एक असा व्यक्ती होता ज्याच्या स्वभावात अनेक गुण होते. नाण्याच्या दोन बाजू असतात असे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आपण स्वभावाचेही वाईट आणि चांगले असे दोन प्रकारे विभाजन करू शकतो. सत्तेकरिता हिंसक राजकारण करणारा क्रूर हिटलर नक्कीच चुकीचा होता. यात काही वाद नाही. पण जर्मनीच्या झालेल्या तुकड्यांना जोडून जर्मनीला एकसंध राष्ट्र बनवणारा त्यांचा फ्युररही तोच होता. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून तो वेगळा आहे. अर्थात कोणाचा कोणता गुण अंगिकारावा इतके समजण्याइतपत आपण सर्व सुज्ञ आहोत. माझ्या या मताशी साधर्म्य दाखवणारा हा ग्रंथ असल्यामुळे तो मला अधिक आवडला असे मी म्हणेन. म्हणजे लेखकांनी हिटलरविषयी लिहिताना पक्षपातीपणे मत मांडलेली नाहीत. त्यांची मते पूर्णतः निपक्षपाती असल्याने हिटलर आणि दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास अधिक योग्यरित्या समजू शकला आहे. जसे इतर पुस्तकांतून आपण वाचतो की हिटलर क्रूर होता, त्याच्यामुळे जर्मनीच्या इतिहासाला कलंक लागला इत्यादी. पण लेखकाने हे ही मांडण्यावर भर दिला आहे की हिटलर भावनिकही होता. अर्थात ही गोष्ट सहज पटण्यासारखी नाही. अशा वेळेला लेखकाने अनेक दाखले दिलेले आहेत. मात्र लेखकाने त्याची अन्यायी बाजुही लपवून ठेवलेली नाही. एकूणच हिटलरचे सर्वांगीण चित्रण या कादंबरीत उमटले आहे.

           मुळातच वि.ग.कानिटकर एक अतिशय प्रतिभावंत लेखक होते. त्यांना जागतिक राजकारणाचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या अनेकांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती. त्यातीलच ‘नाझी भस्मासुराचा उद्यास्त ’ ही एक कादंबरी आहे. नाझी भस्मासुराचा उदयास्त ही लेखमाला प्रथम ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांनी रा.म.शास्त्री या टोपण नावाने ती लिहिली होती. मात्र, कानिटकर यांचे नाव वाचकांना पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीनंतर कळले. याचा उल्लेख त्यांनी तिसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतही केलेला आहे. 

          एकूणच, अडॉल्फ हिटलरच्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम आणि दुसऱ्या महायुद्धाची इत्यंभूत माहिती मिळवायची असेल तर ‘नाझी भस्मासुराचा उद्यास्त’ या कादंबरीला पर्याय नाहीच! अतिशय अप्रतिम अशी ही कादंबरी असल्याने आपण सर्वांनी ती नक्की वाचावी. 


- तनुजा संतोष प्रभुदेसाई


_________________


इराच्या साप्ताहिक स्पर्धेत भाग घ्यायची ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे तुमचे अभिप्राय नक्की कळवा. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//