पुस्तकानुभव / परीक्षण / समीक्षण - प्रतिपश्चंद्र

डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे लिखित प्रतिपश्चंद्र ही कादंबरी म्हणजे रहस्य, इतिहास, उत्कंठा, थरार

पुस्तक - प्रतिपश्चंद्र

लेखक - डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे

प्रकाशन - न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस

किंमत - ३९०/- पृष्ठ संख्या - ४४०/-





        कोयाडे सरांना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला तो स्व. स्वप्नील कोलते पाटील यांच्या "मुकद्दर" या कादंबरी प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने. कोयाडे सरांची भाषा आणि बोलणं अगदी साधं. त्यांची प्रतिपश्चंद्र हि कादंबरी माझ्याकडे आगोदरच खरेदी केलेली होती. पण वाचण्याचा योग काही येत नव्हता. एका बाजूला छ. शिवरायांबद्दल वाचन चालू होतं, तर बहिर्जी नाईक यांच्याबद्दल हळू हळू लेखनही. त्यातच फेसबुकवर विजयनगर साम्राज्याबद्दल वाचनात आलं, आणि प्रतिपश्चंद्रची आठवण झाली. पुस्तकांच्या कपाटात कित्येक दिवस माझ्या वाचनाच्या प्रतीक्षेत वाट पाहणारं ते पुस्तक बाहेर काढलं. घड्याळात रात्रीचे अकरा वाजले होते. म्हटलं, सुरुवातीची काही पानं वाचूया. पण मग झोप कुठे लागतेय. वाचता वाचता पुस्तक अर्ध्याच्या वर कधी गेलं आणि पहाटेचे चार कधी वाजले कळलंही नाही. पुस्तक हातातून खाली तर ठेऊ वाटेना पण झोपही आवश्यक होती. पुस्तक ठेऊन दिलं, पण स्वप्नातही वाचलेलं कथानक गोंधळ घालत होतं. उठायला तसा उशीर होणारच होता. ९ वाजता उठलो नि सरळ पुस्तक घेऊन बाथरूममध्ये शिरलो. दहा मिनिटांचं काम अर्धा एक तासावर गेलं. दारावर बायकोची थाप पडली, नि पोटात पुस्तक लपवत पटकन आवरून बाहेर आलो. चहा घेऊन पुन्हा गॅलरीमध्ये पुस्तक हातात घेतलं. बायकोनं दिलेले पोहे खायचं सुद्धा भान राहिलं नाही. दुपारी बारा वाजता पुस्तक वाचून संपवलं. पण त्या कथानकातून अजूनही बाहेर आलेलो नाहीये.



        एखाद्या चित्रपटालाही लाजवेल इतकं थरारक नि अप्रतिम कथानक. निसर्गवर्णन, प्रसंग, आणि संवाद रचना यांचा सुंदर मिलाप असलेलं, हे मराठी मातीतल्या मराठी माणसानं लिहिलेलं मराठी पुस्तक. पुस्तक म्हणा, कादंबरी म्हणा, कथा, इतिहास, ग्रंथ काहीही म्हणा. एवढा सहज सुंदर आणि माहितीपूर्ण ठेवा म्हणजे प्रतिपश्चंद्र!


        छ. शिवरायांच्या राजमुद्रेतील "प्रतिपश्चंद्र" हे प्रथमाक्षर! आणि हेच अक्षर वाचकाला रहस्याच्या शेवटपर्यंत एखाद्या मार्गदर्शक, गाईड सारखं सतत आपल्या आसपास असल्यासारखं वाटतं राहतं. नकळत संदेश देत राहतं. भारतावर सुरुवात झालेल्या पहिल्या परकीय आक्रमणापासून ते छ. शिवरायांच्या मृत्यूपर्यंतच्या ऐतिहासिक सत्य घटना, तसेच ऐतिहासिक संदर्भ आणि सद्यपरिस्थिती यांच्यावर कल्पनाशक्तीची अद्भुत शाल पांघरून वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवत विचार करायला भाग पाडणारं लेखन म्हणजे "प्रतिपश्चंद्र"


        कादंबरीच्या सुरुवातीलाच स्वराज्याची राजधानी रायगड स्वतः आपल्याशी खरंच संवाद साधतोय असं वाटतं. रायगड असंच आपल्याशी कायम बोलत राहावं, त्याचं मन मोकळं करत राहावं, आणि आपणही मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावं असं वाटतं. लेखकाच्या लेखणीची आणि कल्पनाशक्तीची दाद द्यावी तेवढी कमीच आहे. हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती असलेले विष्णूचे दहा अवतार, महादेवाची मंदिरं बांधण्यामागचं कारण, शुभ लक्षणी असलेलं स्वस्तिक, हात जोडून केलेला नमस्कार, या गोष्टींचं अभ्यासपूर्ण, मनाला पटणारं, वास्तवाशी आणि विज्ञानाशी सुसंघटित असं वक्तव्य वाचतच राहण्यासारखं आहे.


       सुरुवातीपासूनच वाचकाच्या मनाची पकड घेत चालू होणारं कथानक, अचानक घडणाऱ्या घटनांमुळे वेगवान होऊ लागतं. नकळत वाचक कथानकात आणि त्या रहस्यमध्ये गुंतत जातो. कादंबरीच्या नायकाबरोबर फिरताना वाचक निसर्गाची विलोभनीय वर्णनं, इतिहास, तत्वज्ञान, आणि प्रसंगानुरूप आलेले संवाद वाचण्यात गुंतून गेल्याशिवाय राहणार नाही.


        पूर्ण कादंबरीमध्ये लेखकाने कुठेही छ. शिवराय, कि जे एक स्वराज्य निर्माता, उत्कृष्ट राजा, आणि आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांचं कुठेही दैवतीकरण केलेलं नाहीये. भारतीय इतिहासातील तेरावे, सतरावे आणि एकविसावे शतक यांची कल्पनातीत सांगड घालण्यासारखं शिवधनुष्य लेखकाने ज्ञान, शब्द आणि कल्पनेच्या जोरावर ताकतीने पेललं आहे.


        कादंबरीचं मुख्य कथानक म्हणजे विजयनगर साम्राज्याचा गुप्त खजिना आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांची आणि थरारक प्रसंगांची मालिका. हंपी म्हणून प्रसिद्द असलेलं कर्नाटक मधील ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच विजयनगर साम्राज्याची राजधानी. या विजयनगर साम्राज्याने परकीय आक्रमणांपासून आपला खजिना एका गुप्त ठिकाणी हलवला? त्यानंतर परकीय बहामनी राज्याची वारंवार आक्रमणे होत राहिली आणि हे साम्राज्य लयास गेलं आणि त्यांचे वारसही अज्ञातवासात गेले. पण जेव्हा शिवराय दक्षिणेच्या मोहिमेवर होते तेव्हा याच विजयनगरच्या वंशजांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि कित्येक वर्षे गुप्त ठेवलेल्या खजिन्याचं रहस्य महाराजांच्या हवाली केलं. पण महाराजांना यातलं काहीही एक नको होतं. कारण आयतं किंवा फुकटचं मिळाल्यावर काय होतं? हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्यामुळे त्या खजिन्याचे आपण मालक न बनता रक्षक होण्याची जबाबदारी महाराजांनी शिरावर घेतली आणि हि जबाबदारी पार पाडण्याचं काम अर्थातच गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांच्यावर सोपवण्यात आली. ज्याप्रमाणे कोळी आपल्या सावजाला पकण्यासाठी फसवं जाळं विणतो त्याप्रमाणे बहिर्जी आणि महाराजांनी एक योजना आखली, खजिन्याच्या संरक्षणासाठी जाळं विणलं. आणि त्यासाठी ठेवले आठ शिलेदार. तेव्हापासून ते आजपर्यंत त्या आठ शिलेदारांचे वंशज त्या खजिन्याच्या रहस्याची जिवापेक्षा जास्त काळजी घेतात. तो खजिना मिळवण्यासाठी त्या शिलेदारांच्या जीवावर उठलेले शुत्रूचे वंशज ते आजपर्यंतचा त्या खजिन्याच्या शोधाची थरारक कहाणी म्हणजे "प्रतिपश्चंद्र"!


        सर्वात शेवटी पुन्हा एकदा जेव्हा रायगड आपल्याशी संवाद साधतो तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.असं वाटतं आपल्या दैवताची पंढरी आपल्याशी पुन्हा एकदा तिच्या मनातलं गूढ आपल्याला सांगू पाहतेय. आणि यावर कळस म्हणजे कादंबरीमध्ये एका रहस्याचा शोध घेता घेता सर्वात शेवटी लेखकाने जो धक्का दिलेला आहे, तो तर अवर्णनीय.


        पूर्ण कथानक सांगायचं म्हटलं, तर आणखी एखादं पुस्तक होईल. खजिन्याचं रहस्य स्वतः वाचून अनुभवण्याची जी मजा आहे ती इथं थोडक्यात देऊन रहस्यभेद करणं योग्य ठरणार नाही.


कादंबरीमध्ये वाचण्यासारख्या, माहितीपूर्ण आणि शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत.


- पुराणातल्या मत्स्य अवतारापासून ते बुद्ध, कली अवतारापर्यंत मानवाची कशी उत्क्रांती होत गेली? त्याचं सुसंबद्ध विश्लेषण आपल्याला थक्क करून सोडतं.

- आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक का शुभ मानलं जातं? आणि त्याची वैचारिक आणि तात्विक मांडणी लेखकाने पटवून दिली आहे.

- महादेवाची मंदिरं पृथ्वीच्या दक्षिणोत्तर चुंबकाशी कशी निगडित आहेत आणि शिवलिंग म्हणजे एक पॉजिटीव्ह एनर्जीचा कसा स्रोत आहे?

- हिंदू संस्कृतीमध्ये समोरच्या व्यक्तीला नमस्कार का घातला जातो? त्याच महत्व आणि माहिती, आपल्याला थक्क केल्या शिवाय राहत नाही.


- कथेच्या नायकावर अचानक ओढवलेल्या संकटांना तो योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन कसा सामोरा जातो? एखादा निर्णय चुकला तरीही त्याचवेळी काय करायला पाहिजे हे तो दाखवून देतो? त्याची विचार करण्याची पद्धती, त्याचं वागणं, बोलणं, समोरच्या व्यक्तीचा आदरभाव, या आणि अशा अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत.


- आपल्या भारताचा इतिहास हा किती भव्य आणि शूरवीरांच्या पराक्रमांनी भरलेला आहे? याचं ज्ञान तुम्हाला कादंबरी वाचताना ठिकठिकाणी जाणवतं.


- एखाद्या गोष्टीचं वेड माणसाला कोणत्या पातळीपर्यंत, थरापर्यंत पोहोचवू शकत? मग ते वाईट असो वा चांगलं! याच उत्तम उदाहरण म्हणजे हि कादंबरी.


- एखादं उदात्त स्वप्न उरी बाळगून ते मिळवण्यासाठी त्या दिशेने पूर्ण ताकतीनिशी आणि प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न केले तर ते स्वप्न, ते ध्येय गाठण्यासाठी आजूबाजूची परिस्थिती सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार होते. याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही.


- प्रतिपश्चंद्र हि डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांची पहिलीच कादंबरी पण एखादा लेखक कसा असावा? आणि त्याने कशा पद्धतीने लेखन केलं पाहिजे? याच उत्तम उदाहरण कोयाडे सरांनी या कादंबरीमधून नवीन लेखकांना दिलेलं आहे.


- कादंबरी किंवा कथा लिहीत असताना आपला अभ्यास किती दांडगा असला पाहिजे? आपल्याला शब्दांची आणि त्याच्या अर्थांची ओळख असली पाहिजे. शिवाय, आपलं वाचन चांगलं असेल तर नवं नवीन कल्पना शब्दांमध्ये कशा प्रकारे मांडता आलं पाहिजे? हे कादंबरी वाचल्यावर कळतं.


- प्रतिपश्चंद्र म्हणजे केवळ वाचकांचं मनोरंजन करणारी नसून माहितीचा अमूल्य साठा असलेली, नवीन वाचकांना वाचण्यासाठी प्रेरणा देणारी, उद्युक्त करणारी आणि प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावी अशी अनमोल साहित्यकृती आहे.


"प्रतिपश्चंद्र" म्हणजे फक्त विजयनगरच्या लुप्त झालेल्या खजिन्याच्या शोधाची कहाणी नाहीये तर लेखकाने साहित्यविश्वातील पहिलं लेखन शिवरायांच्या चरणी अर्पण केलेलं वंदन आहे. त्रिवार मानाचा मुजरा आहे.

कोयाडे सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये या कादंबरीची निर्मिती कशी झाली, कादंबरी मूर्त रूपात आणण्यासाठी किती वाचन, माहितीचा साठा त्यांनी डोळ्याखालून घातला, ते तर सांगितलेलं आहेच. शिवाय, शेवटी त्यांनी "गुलाल" या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळी सांगितलेल्या आहेत, त्या नक्कीच आपल्याला सतत प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाहीत.


जीत की हवस नहीं , किसी पे कोई वश नहीं ,

क्या ज़िन्दगी है ठोकरों पे मार दो |

मौत अंत है नहीं, तो मौत से भी क्यूँ डरें ?

ये जाके आसमान में दहाड़ दो |



~ धन्यवाद

~ ईश्वर त्रिंबक आगम